कोणाची मनोकामना कशी आहे. कोण कशासाठी इथे आले आहे. कोणाची दृष्टी वक्र आहे. कोणाची दृष्टी सरळ आहे. या ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार त्याला येथे लाभ आहे. म्हणूनच येथे अनेक जातीचे संत झाले. उच्चनीच असा भेदभाव येथे नाही. येथे सर्वांसाठी समान नागरी कायदा आहे. असा समान नागरी कायदा या देशात पूर्वापार चालत आला आहे. तो असाच पुढेही चालू राहणार आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे
मोबाईल – 9011087406
समर्थाचिये पंक्तिभोजनें । तळिल्या वरिल्या एक पक्वान्नें ।
तेवी श्रवणें अर्थे पठणें । मोक्षुचि लाभे ।। ४८ ।। श्री ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – खऱ्या श्रीमंताच्या पंक्तीला भोजनांत खालच्या वरच्या माणसांना एकच पक्वान असते. त्याप्रमाणे या गीतेच्या श्रवणाने अर्थज्ञानाने व आवर्तनाने मोक्षच मिळतो.
एक अशिक्षित खेडूत विठ्ठलाचा भक्त होता. पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्याची त्याची तीव्र इच्छा होती. आळंदीहून वारीमधून तो विठ्ठल दर्शनासाठी निघाला. पालखीसोबत तो चालू लागला. आळंदी सोडली पालखी पुण्याकडे निघाली. लाखो भक्त भाविक वारीमध्ये सहभागी झाले होते. कोणी सज्जन होते. कोणी विद्वान होते. कोणी पंडित होते. कोणी तत्त्ववेत्ते होते. कोणी उद्योगपती होते. कोणी वैद्य होते. कोणी श्रीमंत होते कोणी गरीब होते. कोणी थोर होते. कोणी अशिक्षित होते. असे नाना प्रकारचे नागरिक यामध्ये सहभागी झाले होते. प्रत्येकाच्या मुखात मात्र विठ्ठल नामाचा गजर सुरू होता. ज्ञानोबा तुकारामांचा जयघोष सुरू होता. सकल संतांचा गजर केला जात होता. सगळे वातावरण भक्तिमय झाले होते. रस्त्याच्या दुतर्फा दर्शनासाठी नागरिक उभे होते. पालखीच्या मार्गावर रांगोळी काढली जात होती. पाण्याची कळशी ओतून महिला पालखीचे स्वागत करत होत्या.
सर्व जातीधर्मातील, विविध पंथातील नागरिकांसह परदेशी नागरिकही उपस्थित होते. सर्वांना दर्शनाचा लाभ मिळत होता. देवाच्या दारात सगळे सारखेच असतात. दर्शन घेऊन सगळे समाधानी होत होते. वातावरणातील उत्साह वाढत होता. त्याने मनेही फुलत होती. मनाला आलेली मरगळ दूर होत होती. ठराविक दिवसानंतर बॅटरीत पाणी टाकून ती चार्ज करावी लागते. त्याप्रमाणे मनेही चार्ज होत होती. वर्षभरातील दुःखे माऊलीच्या चरणी अर्पण करून मन हलके केले जाते. आता ही फुल चार्ज झालेली मनाची बॅटरी वर्षभर अशीच राहणार होती. दरवर्षी येथे मनाचे चार्जिंग होते. वारीतील उत्साहात मन प्रसन्न होते. हे पाहून-ऐकून त्या खेडूताचे मनही उत्साहित झाले.
थोडे पुढे गेल्यावर खेडूताला एक विणाधारी वारकरी दिसला. त्या वीणेच्या तारेच्या सुरात तो गुंग झाला होता. जयघोषाच्या आवाजातही त्याला तो वीणेचा तार ऐकू येत होता. इतके त्याचे मन त्यात गुंतलेले होते. अशी मनाची एकाग्रता पाहून त्या खेडूताचे मनही असेच एकाग्र झाले. त्या विणाधारी वारकèयासोबत तो खेडूत चालू लागला. पुढे काही अंतर गेल्यावर त्या विणाधारीकडे एका मुलाने विणा घेण्यासाठी आग्रह धरला. त्याने लगेच विणा देण्याची तयारी दर्शविली. विणा घेणाऱ्या त्या मुलाने त्याला वाकून नमस्कार केला आणि विणा घेतला. विणा दिल्यानंतर त्यानेही त्या विणा घेतलेल्या मुलाला वाकून नमस्कार केला. दोघांचे ते स्नेह पाहून तो खेडूत भारावून गेला. येथे लहान-थोर असे काही नाही. सर्व सारखेच असतात. विणा घेणारा मुलगा वयाने लहान असला म्हणून काय झाले. पण त्याच्यामध्येही तोच आत्मा आहे. जो माझ्यामध्ये आहे. सर्वांच्या ठायी असणारा आत्मा सारखाच आहे. त्या आत्म्याचा हा सन्मान आहे. अशी समानतेची भावना पाहून खेडूताचे मन भरून आले.
दुपार झाली. पालखी विसावली. भोजनाची लगबग सुरू झाली. छोटे छोटे गट करून प्रत्येकाने भोजनाची झोळी उघडली. खेडूतानेही भोजनाची झोळी उघडली. त्यावर एक वारकरी त्याला म्हणाला, काय भाऊ असे एकटे का बसला आहात. या आमच्या पंगतीत बसा. जरा आमची मीठभाकरही चाखून पाहा. कशी चवीला झाली आहे ते सांगा. यावर तो खेडूत लाजला. यावर तो वारकरी म्हणाला, येथे लाजला तो उपाशी राहिला. चार चौघात मिसळायला शिका. आपली दुःखे हलकी होतील. मन हलके करायला शिका म्हणजे मनाची मरगळ दूर होईल. नव्या चारचौघांच्या ओळखीने थोड्या वेगळ्या वातावरणाची माहिती होईल. मन प्रसन्न होईल. यावर तो खेडूत त्या वारकऱ्यांच्या गटात सहभागी झाला. प्रत्येकाच्या झोळीत वेगवेगळ्या भाज्या होत्या. प्रत्येकाने थोडी थोडी प्रत्येकाला दिली. वेगवेगळ्या भाज्यांची चव येथे चाखायला मिळाली. या जेवणाच्या गोडीने तो खेडूत प्रसन्न झाला. चालण्यातून आलेला त्याचा सगळा थकवा दूर झाला. पुढे चालण्यासाठी त्याला उत्साह मिळाला.
वारीमध्ये सहभागी झालेले वाणी, शिंपी, कुंभार, चांभार, ब्राह्मण सर्वच जाती धर्माचे सर्वजण एकत्र चालत होते. कोणाच्या डोकीवर तुळशी होती. कोणाच्या हाती विणा होती. कोणाच्या हाती ज्ञानेश्वरी होती. कोणाच्या हाती तुकाराम गाथा होती. कोणी श्वेत वस्त्रात होते. तर कोणी भरजरी वस्त्रात होते. सर्वजण येथे एकत्रितपणे चालत होते. कित्येक वर्षापासून महाराष्ट्रात ही परंपरा आहे. मोक्ष मिळविणे हीच सर्वांची मनोकामना आहे. देवाचे दर्शन. तो मज भेटावा हीच भावना प्रत्येकाच्या मनात आहे. जन्म मरणाच्या फेèयातून सुटका व्हावी आपला हा आत्मा त्यातून मुक्त व्हावा. हा सर्वांचा नवस आहे. आत्मज्ञानाचा, ब्रह्मज्ञानाचा लाभ व्हावा प्रत्येकाची इच्छा आहे. एकाच गोष्टीसाठी सर्वजण एकत्र आले आहेत. पण मनात भेदभाव नाही. काय मिळेल याची चिंता नाही. पण या वाटेवर तो चालत आहे. दर्शनाच्या ओढीने त्याचे चालणे सुरू आहे.
पंढरीत गेल्यानंतर दर्शनासाठी वेगळी रांग नाही. एकच रांग आहे. या रांगेतही सर्व भाविक एकत्र आहेत. सर्वांना देवाचे दर्शन हे सारखेच आहे. कोणी मुख दर्शनाच्या रांगेत उभे राहून दर्शन घेते तर कोणी विठ्ठलाच्या चरणी मस्तक ठेवण्यासाठी सात-सात तास रांगेत उभे राहते. कोणी दर्शन घेण्यासाठी इतका वेळ नाही म्हणून मनात विठ्ठलाचे सगुण रूप आठवून मनानेच दर्शन घेते. सर्वांना समान दर्शन येथे भगवंताचे आहे. ही समानता पाहून तो खेडूत अधिकच भारावून गेला. महाप्रसादही सर्वांना सारखाच आहे. सर्वांचे ध्येय एक आहे. कोणाची भक्ती कशी आहे. कोणाची मनोकामना कशी आहे. कोण कशासाठी इथे आले आहे. कोणाची दृष्टी वक्र आहे. कोणाची दृष्टी सरळ आहे. या ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार त्याला येथे लाभ आहे. म्हणूनच येथे अनेक जातीचे संत झाले. उच्चनीच असा भेदभाव येथे नाही. येथे सर्वांसाठी समान नागरी कायदा आहे. असा समान नागरी कायदा या देशात पूर्वापार चालत आला आहे. तो असाच पुढेही चालू राहणार आहे. यासाठी कोणाच्या सत्तेची येथे गरज नाही. या लोकशाहीत सर्वच सत्ताधीश आहेत. शिष्य गुरू आहे. गुरू शिष्य आहे. असाही येथे भेद नाही. सर्वांसाठी येथे एकच भोजन आहे. सर्वांसाठी आत्मज्ञान हा लाभ आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.