काकडीवर्गीय पिकामध्ये झुकीनी लागवड सलाड आणि प्रक्रीया उद्योगासाठी करण्यात येते. याची मागणी मोठ्या शहरांतून वाढत आहे. सध्या लहान प्रमाणावर लागवड होत असली तरी काकडीसारखाच त्याचा उपयोग होतो यामुळे याची लोकप्रियता वाढण्याची शक्यता आहे. झुकीनी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पिकाचा काकडीवर्ग असल्याने हे काकडीसारखेच आहारदृष्ट्या महत्वाचे आहे.
सौजन्य – कृषीसमर्पन समूह, महाराष्ट्र राज्य
हवामान आणि जमिन –
या पिकाला मध्यम प्रतीची, पाण्याचा चांगला निचरा होणारी, भुसभुशीत आणि सुपिक जमिन निवडावी. उष्ण आणि शीतोष्ण हवामानात येणारे हे पिक आहे. याची लागवड काकडी पिकाप्रमाणेच उन्हाळी हंगामात करावी.
लागवडीचा हंगाम –
झुकिनीची लागवड उन्हाळी हंगामात प्रामुख्याने केली जाते. पेरणी जानेवारीमध्ये करावी. रोपे रुट ट्रेनरमध्ये तयार करून एक महिन्याची रोपे मुख्य शेतात लावतात. पेरणी केल्यापासून १० ते १४ आठवड्यात पीक काढणीसाठी तयार होते.
उन्नत वाण –
झुकीनीचे हिरवे आणि सोनेरी पिवळे असे दोन प्रकार आहेत. हे आयात झालेले पीक असल्याने सर्वच वाण हे परदेशातील आहेत. यामध्ये आपल्या भागात लागवड करण्यासाठी झुकिनी, गोल्डन झुकिनी, गोल्ड रश आणि अरीस्टोक्रॅट या वाणांच्या प्रामुख्याने वापर केला जातो.
झुकिनीची गर्द हिरव्या रंगाची फळे असलेली जात फार लोकप्रिय असून फळांचे उत्पादन अधिक येते. याचा वापर सलाड म्हणून तसेच त्याची भाजी सुद्धा केली जाते. गोल्डन झुकिनी आणि गोल्ड रश या सोनेरी पिवळ्या रंगाच्या फळांच्या जागी असून गर दुधाळ रंगाचा आणि चांगल्या स्वादाचा असतो. गोल्ड रश वाण लवकर येणारा असल्याने त्याची लोकप्रियता वाढत आहे. अरीस्टोक्रॅट हा संकरीत वाण आहे. हिरव्या रंगाचा, लवकर येणारा व फळाचे अधिक उत्पादन ही या वाणाची वैशिष्ट्ये आहेत.
बियाण्याचे प्रमाण, लागवडीचे अंतर आणी लागवड पध्दत –
एक हेक्टर लागवडीसाठी १.५ ते २ किलो बियाणे लागते. लागवड ६० सेमी X ६० सेंमी अंतरावर करावी. लागवड बियाणे टोकून किंवा रोपे तयार करून पुनर्लागवड करूनही करता येते. एका ठीकाणी ३ बिया टोकून उगवण झाल्यावर सशक्त व निरोगी एकच रोपटे ठेवावे. उगवणीसाठी सर्वसाधारण ५ – ८ दिवस लागतात. उगवण चांगली होण्यासाठी पेरणीच्या अगोदर बियाणे रात्रभर पाण्यात भिजवून घ्यावे.
पुनर्लागवड करण्यासाठी रोपे रूट ट्रेनर्समध्ये तयार करून सर्वसाधारण एका महिन्याची रोपे मुख्य शेतात लावावी. लागवड सऱ्यांवर किंवा ठिबक सिंचन पध्दतीने केल्यास गादीवाफ्यावर करता येते. झुकिनीची लागवड शेतात तसेच शेडनेट हाऊसमध्येही चांगल्याप्रकारे करता येते. शेडनेटचा वापर केल्यास उत्पादन चांगले येते.
खते आणि पाणी व्यवस्थापन –
लागवडीच्या अगोदर शेताची तयारी करताना हेक्टरी २० – २५ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. लागवडीच्या वेळी हेक्टरी ५० किलो नत्र, ६० किलो स्फुरद व ५० किलो पालाश याप्रमाणे खते द्यावी. ठिबक सिंचनावर पीक घेतल्यास खते ठिबक सिंचनाद्वारे थोडीथोडी द्यावी. त्यासाठी विद्राव्य खतांचा वापर करावा. झुकिनीची चांगल्या वाढीसाठी जमिनीत नियंत्रीत ओलावा असणे आवश्यक आहे. हवामानाला अनुसरून नियमीत पाणी द्यावे. ओलावा राखण्यासाठी आच्छादनाचा (मल्चींग) वापर करावा.
आंतरमशागत –
बियाण्याची उगवण होऊन चांगली वाढ झालेले एका जागी एकच रोप ठेवावे. तण काढून जमिन स्वच्छ ठेवावी. फळे खराब होऊ नये म्हणून त्यांचा ओल्या मातीशी संपर्क येऊ देऊ नये. त्यासाठी जमिनीवर गवताचा भाग ठेवून त्यावर फळ टेकवावे.
महत्वाच्या किडी, रोग आणी त्यांचे नियंत्रण –
काकडीवर्गीय पिकाप्रमाणेच झुकिनी पिकावर मावा, लाल भुंगे, लीफ मायनर (पाने पोखरणारी अळी) आणि फळमाशी या किडींचा प्रादुर्भाव होतो. किड लागलेली फळे काढून नष्ट करावीत. फळमाशीच्या नियंत्रणासाठी फेरोमोन सापळ्यांचा (ट्रॅप्स) वापर करता येतो. लीफ मायनरच्या नियंत्रणासाठी सुरूवातीलाच मोनोक्रोटोफोस किंवा डिमेक्रान या कीटकनाशकांच्या वापर करावा. त्याचप्रमाणे पिवळ्या रंगाच्या चिकट सापळ्यांचा वापर करावा.
रोगामध्ये केवडा, भुरी आणी करपा या रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने होतो. काही ठीकाणी जमीनीत ओलावा वाढल्यास मर रोगाच्या प्रादुर्भाव होतो. विषाणूमुळे होणाऱ्या केवडा रोगाने ग्रासलेली रोपे उपटून नष्ट करावी आणी मॅन्कोझेबची १० लीटर पाण्यात २५ ग्रॅम प्रमाणे फवारणी करावी. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कॅलक्झीन ३ ते ४ किलो किंवा बाविस्टीन १० ग्रॅम कॅरा ५ मिली यापैकी कोणत्याही एका बुरशीनाशकाची १० लीटर पाण्यातून फवारणी करावी. गंधकाची धुरळणी करू नये. मर रोगाच्या प्रादुर्भाव झाल्यास रोपांचा मुळाजवळ कॉपरऑक्सीक्लोराईड किंवा कॅपटान १० लीटर पाण्यात २० ग्रॅम प्रमाणे द्रावण तयार करून त्याचप्रमाणे सुरूवातीस ट्रायकोडर्मा व्हीरीडी या जैवीक बुरशीचा वापर जमिनीतून करावा.
काढणी आणि उत्पादन –
फळे काढणीची वेळही त्यांचा वापर कशासाठी करावयाच्या आहे त्यावर अवलंबून असते. सलाडसाठी वापरल्यास १० – १२ सेंमी. लांबीची कोवळी फळे काढावीत. फळे जून झाल्यास त्यांचा कडकपणा वाढतो आणि चवही बिघडते. प्रक्रीया उद्योगासाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार काढणीची वेळ ठरवावी.
सर्वसाधारण एक झाडापासून १० – १४ आठवड्यांच्या कालावधीत काढणी केल्यास सरासरी १५ – १६ फळे मिळतात. फळांच्या वजनाला अनुसरून हेक्टरी जवळपास ४ – ५ टनापर्यत उत्पादन मिळते.
झुकिनीच्या फळांची साठवण ८ – १० डिग्री सेल्सीअस तापमान आणि ९० – ९५ टक्के आर्द्रता असलेल्या साठवणगृहात १ – २ आठवड्यापर्यत करता येते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.