September 8, 2024
Needs of Sparrow Conservation Sharad Apte article
Home » चिमणी संवर्धनासाठी करा हे उपाय…
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

चिमणी संवर्धनासाठी करा हे उपाय…

चिमणी का गेली


२० मार्च जागतिक चिमणी दिन. या निमित्ताने बर्ड साँग या संस्थेच्यावतीने चिमणी गणना आयोजित करण्यात येते. ही गणना १८ मार्च रोजी करण्यात येते. परिसरातील चिमणीची आजची स्थिती आणि तिच्या संवर्धनासाठी नियोजन हा या गणनेचा उद्देश आहे. या गणनेत सर्वाधिक लोकांनी सहभागी व्हावे व त्या निमित्ताने संवर्धन मोहिमेला बळ मिळावे या उद्देशाने हा लेख…

– शरद आपटे

पक्षी अभ्यासक , सांगली
९८९०३८४४००

काही वर्षा पूर्वी चिमणी हा पक्षी आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होता. ओसरीवर आणि परसदारी वावरणारी चिमणी कोठेतरी वळचणीला घरटे बांधून आपला संसार ही थाटे. हा घास चीवूचा आणि हा घास कावूचा हे दिवस जावून हा घास डोरोमन, मिकी माउसचा असा झाला आणि निर्जीव कल्पित पात्रांनी लहान मुलांच्या भाव विश्वात प्रवेश केला. तेंव्हाच चिमणीने हजारो वर्ष केलेले आधीराज्य आता संपले हे निश्चित झाले.

चिमण्या कमी होत आहेत हे अलीकडे जाणवू लागले आणि तिच्या संवर्धनासाठी काहीतरी केले पाहिजे (सहसा दिखावू) असे वाटू लागले आणि त्यातूनच जागतिक चिमणी दिन २० मार्च निश्चित झाला. नेचर फॉरएवर सोसायटी नाशिक आणि Eco-sys foundation फ्रान्स यांच्या पुढाकाराने हा दिवस प्रथम २०१० साली साजरा झाला आणि गेली १२ वर्षे तो साजरा होत आहे आणि होत राहीलही. चिमणी गणनेपासून ते चिमण्यांना अन्न, घरटे, चित्रकला पोस्टर स्पर्धा, गाणी नाच असे उपक्रम झडत आहेत. जागृती आणि माहितीत दर वर्षी भर पडत आहे आणि तितक्याच वेगानी चिमणी एक एक गल्ली सोडून जात आहे.

२० मार्च जागतिक चिमणी दिन. या निमित्ताने बर्ड साँग या संस्थेच्यावतीने चिमणी गणना आयोजित करण्यात येते. ही गणना १८ मार्च रोजी करण्यात येते. परिसरातील चिमणीची आजची स्थिती आणि तिच्या संवर्धनासाठी नियोजन हा या गणनेचा उद्देश आहे. या गणनेत सर्वाधिक लोकांनी सहभागी व्हावे व त्या निमित्ताने संवर्धन मोहिमेला बळ मिळावे या उद्देशाने हा लेख...
२० मार्च जागतिक चिमणी दिन.

चिमणी हा पक्षी गाव चिमणी, हौस स्परो आणि पासर डोमॅस्टीकस या शास्त्रीय नावने जगभर ओळखला जातो. आर्टीक, अंटार्टीक अशा अति थंड प्रदेश आणि उंच पर्वत रांगा सोडता चिमणी जवळ जवळ सर्व जग व्यापून आहे. प्रदेशानुसार याच्या १२ पोटजाती नमूद आहेत. मुळचा मध्य आशियातील, मनुष्य शेती करू लागला आणि गावे वसवून राहू लागला तेंव्हा चिमणीने माणसाचा घरोबा साधला हा कालखंड २० हजार वर्षापेक्षा जास्त नाही. शेतीबरोबर आणि मनुष्य वस्ती बरोबर हा पक्षी जिथे मनुष्य तिथे चिमणी असे समीकरण बनून गेला. आजही चिमणी जिथे दिसते तिथे मनुष्य वस्ती असतेच असते. सातारा जिल्ह्यातील जोगीमठ या देवास्थात राहिलो होतो. डोंगराच्या अगदी माथ्यावर असलेल्या या मंदिराच्या जवळपास २ ते ३ किलोमीटर अंतरावर एकही मनुष्य वस्ती नाही मात्र तिथे पन्नास एक चिमण्या सुखनैव नांदत होत्या कारण एकच तिथे एक पुजारी सेवासाठी वस्ती करून होता. आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या खंडात चिमणी अलीकडे माणसाने न्हेवून सोडली आहे. तिथे ती आता चांगलीच स्थिरावली आहे.

मोबाईल टॉवरच्या परिसरातही हजारो चिमण्या

चिमणी दिसेनाशी झाली असे जेंव्हा जाणवू लागले तेंव्हाच मोबाईल आणि तसेच अनेक टॉवर जिकडे तिकडे दिसू लागले आणि लागलीच त्याचा आणि चिमणी जाण्याचा संबंध जोडला गेला आणि मोबाईलच्या टॉवरमुळे चिमणी गेली असा समज घट्ट झाला. या समजाला शास्त्रीय आधार अजिबात नाही. आमच्या सात वर्षाच्या गणनेत टॉवर आहे आणि परिसर चिमणीस योग्य आहे तिथे चिमण्या आजही दिसतात. सन २०१९ च्या गणनेत सांगली शहरात १२०४५ चिमण्या मोजल्या गेल्या त्यातील ५८३८ टॉवर असलेल्या परिसरात मोजल्या गेल्या. म्हणून कोणी टॉवर उखडा असे आंदोलन केले नाही, कारण चिमणी गेली तर गेली तिच्यासाठी मी मोबाईल का सोडू इतक आमच चिमणीवरच प्रेम.
गेली हजोरो वर्षे मानवी वस्तीशी मिळून राहिलेली चिमणी पूर्णपणे मानवावर अवलंबून झाली. तिचे अन्न आणि तिची घरटी हे सर्व मानव वस्तीत हजारो वर्षे होत आले. याचा तिला आपला विस्तार करण्यात निश्चितच फायदा झाला. औद्योगिक क्रांती आली आणि माणसाचे राहणीमान अचानक बदलू लागले. कारखाने, शहरीकरण, घरांची रचना, पिकपाणी सर्वातच अमुलाग्र बदल सुरु झाले. अगदी प्रगत देशात आणि तेथील शहरात ते सुरु झाले तो पर्यंत त्याचा विस्तार मर्यादित होता म्हणून चिमणीवरील परिणामही मर्यादित होते. गेल्या पन्नास वर्षात भारताचाच विचार केलातर हे बदल मोठ्या शहरापासून सुरु होत आज अगदी खेडो पाडी पोचले आहेत आणि त्याचा परिणाम साहजिकच व्यापक होत आहे.

माणसाच्या बदलत्या राहणीमानाचा चिमणीवर परिणाम

माझा लहानपणी इतक्या चिमण्या इथे होत्या असे वाक्य 80 वर्षांच्या माणसापासून ५ वर्षाचे मुलही म्हणून जात. ज्यावेळी इथे चिमण्या होत्या त्यावेळचा तुमच्या घराचा परिसर कसा होता हे जर डोळ्यासमोर आणले तर चिमणी का गेली याची करणे लगेच सापडतील. मानवी वस्तीत मातीची कौलारू घरे, गाई गुरांचे गोठे, कचरा, उरलेले अन्न बाहेर टाकण्याची पद्धत, उघड्या गटारी अश्या अनेक गोष्टी चिमणीला जगवत होत्या. त्या अचानक बदलल्या. चिमणी हा कुलिंग (Order Passariformes) गणातील पक्षी म्हणजे वृक्षारोही. तथापि त्याचे अन्न मात्र जमिनीवर आहे. बिया, कीटक आणि त्यांच्या अळ्या हे त्याचे नैसर्गिक अन्न. म्हणून चिमणीला दाट झाडीचा परिसर चालत नाही. त्यामुळे आपल्या बागेत झाडे असतात आणि मोकळी जमीन नसते आणि असलीच तर त्यावर आपण लॉन वाढवतो. झाडाच्या ढोलीत, खडकाच्या कपारीत गवत कड्या लावून केलेले घरटे हे त्याचे मुळचे नैसर्गिक घरटे. मनुष्य वस्तीत आल्यावर माणूस खातो ते ते सर्व आणि त्याने त्याचसाठी बांधलेल्या सर्वांचा आधार घेत ती घरटे करू लागली अगदी जनावरांचा गोठा असो किंवा घरातील दिव्याची शेड असो सर्वांचा तिने घरासाठी उपयोग केला. माणसाच्या राहणीमानात अचानक झालेला बदलाशी तिला जोडून घेता आले नाही. आणि तिने तेथून आपला मुक्काम हलविला आणि जिथे अजूनही परिसर योग्य आहे अश्या मनुष्य वस्तीत ती स्थलांतरित झाली. मोठ्या शहरात रहदारीच्या जागेत एखादा कोपरा आजही चिमणीसाठी योग्य आहे तिथे चिमणी टिकून आहे. बॉम्बे स्टॉक एक्सेंज मुंबई लगतच्या एका बोळात मी अनेक चिमण्या पहिल्या आहेत.

घरट्याजवळच अन्न गरजेचे

चिमणी जेंव्हा पिलांना जन्म देते तेंव्हा तिचे घरटे आणि पिलांना लागणारे अन्न किडे, अळ्या हे जवळपासच असावे लागते. दर मिनिटाला लागणारे अन्न ती दूरवर जावून आणु शकत नाही. गेल्या काही वर्षात रहदारीत इतकी प्रचंड वाढ झालेली आहे की एखाद्या गल्ली बोळातही दिवस उजाडल्यापासून मावळे पर्यंत सतत वाहने चालत असतात. ही रहदारी चिमणीस अन्न मिळविण्यापासून अडवतात.

चिमणीला परत आणता येईल का ?

तिला लागणारे अन्न आणि तिच्या घरट्याची जागा दिल्यास ती परत येवू शकेल ? हे घरटे आणि हे तुला ताटलीत अन्न आता इथे मुकाट्याने रहा असे होणार नाही. ती कृत्रिम घरटे स्वीकारते, तुम्ही टाकलेली चपाती, भातपण खाईल पण तिच्या सर्व अन्न घटकांची भरपाई त्यातून होणार नाही. पक्ष्यांना शुद्ध स्वरूपातील मीठ पचविता येत नाही आणि आपण देतो त्या प्रत्येक पदार्थात मीठ असते. तिच्या नैसर्गिक अन्न घटकासारखे अन्न दिले गेले पाहिजे. पिलांना लागणाऱ्या अळ्या किडे कोठून आणेल, त्या बरोबर आणि अन्न पचनास मदत करणारे सूक्ष्म जीव कसे मिळतील. मातीची अंघोळ तिला कोठे करता येईल. ती कधी एकटी अंघोळ करीत नाही हे समूहाने चालते. त्याचं सामुहिक जीवन तितकाच महत्वाचे आहे. अनेक नर एकत्र येवून आपल्या शेपट्या वर आणि पंख खाली करून छाती फुगवून नाचताना आपण पहिले असेल. ते त्यांचे प्रदर्शन असते. नर आपल्या छातीवरील काळा धब्बा स्पष्ट दाखविण्याचा प्रयत्न करीत असतो.

चिमणीच्या घरट्याला कचरा ठरवू नका

टाऊनशीप सारख्या प्रकल्पात चिमणी नैसर्गिकपणे सहज स्थापित करता येईल. त्यासाठी काही करायचे नाही हेच करायचे. म्हणजे मोकळ्या जागा मोकळ्या आणि उघड्या ठेवायच्या. झाडांची दाटी कमी ठेवायची. कमीत कमी पेव्हिंग करायचे. अशी बांधकामे करायची की त्यात त्यांना घरटी करता यावी. त्यांच्या घरट्याचा काडी, कचरा याला प्रथम कचरा ठरवू नये. तो घरटी करण्याच्या काळात होतो. त्यांच्याशी जवळीक वाढविण्यासाठी त्यांच्या सोबत वाढ दिवस, त्यांची चित्रे, त्यांच्यावर कविता असे उपक्रम करत राहायचे.

सतर्क राहण्याची गरज

चिमणी आजच्या घडीला संकट ग्रस्त किंवा तिच्या अस्तित्वाबद्दल काळजी असलेला पक्षी नाही. त्यांची संख्याही उत्तम आहे. पण ही परिस्थिती असेच शहरीकरण सुरु राहिलेतर बदलू शकते. भारतात गिधाडांची संख्या ८० च्या दशकात कोटीच्या घरात होती. २००० उजाडता उजाडता ती काही हजारात आली आणि ९७ टक्के गिधाडे नष्ट लक्षात आले. त्यामुळे सतत सतर्क राहणे आवश्यक आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

मौसमई नैसर्गिक गुहा: निसर्गाची अजब किमया

मराठवाड्यात आठवडाभर पावसाचा जोर कमी राहणार !

सौंदर्य !…

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading