इस्रायल मराठवाड्याला जल व्यवस्थापन सहकार्य करणार : इस्रायल वरिष्ठ अधिकाऱ्यांची राज्यपालांना माहिती
मराठवाड्यातील पाण्याच्या दुर्भिक्षावर मात करण्याच्या दृष्टीने इस्रायल येथील राष्ट्रीय जलव्यवस्थापन कंपनी महत्वाकांक्षी अश्या मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पासाठी बृहत आराखडा तयार करीत असल्याची माहिती इस्रायलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आज येथे दिली.
कोविडमुळे लांबणीवर पडलेला हा प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यासाठी राज्य शासनाने इस्रायलला सहकार्य करावे अशी विनंती इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी यावेळी केली.
इस्रायलच्या एशिया व पॅसिफिक विभागाचे उपमहासंचालक राफाएल हर्पाज सध्या भारत भेटीवर आले असून गुरुवारी (दि. १७) त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. बैठकीला इस्रायलचे मुंबईतील वाणिज्यदूत कोबी शोशानी व राजकीय सल्लागार अनय जोगळेकर उपस्थित होते.
इस्रायल येथे फार कमी पाऊस पडतो. मात्र सूक्ष्म जलव्यवस्थापनासाठी इस्रायल पूर्वीपासूनच प्रसिद्ध आहे. इस्रायल येथे मोठ्या प्रमाणावर खाऱ्या पाण्याचे निःक्षारीकरण केले जाते तसेच वापरलेल्या पाण्यापैकी ८५ टक्के पाण्यावर पुनर्प्रक्रिया केली जाते. त्यामुळे आज इस्रायल पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्णच नाही तर जॉर्डनला देखील पाणी निर्यात करीत असल्याचे राफाएल हर्पाज यांनी राज्यपालांना सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायलला भेट देणारे पहिलेच पंतप्रधान असून इस्रायलचे पंतप्रधान देखील यावर्षी भारतभेटीवर येणार असल्याचे हर्पाज यांनी यावेळी सांगितले. इस्रायल देश क्रिकेट किंवा फुटबॉल मध्ये प्रगत नसला तरीही शिक्षणाच्या बाबतीत अग्रेसर असून आज अनेक भारतीय विद्यार्थी व संशोधक इस्रायल येथे शिक्षण संशोधन करीत असल्याचे हर्पाज यांनी सांगितले.
कर्करोग संयंत्रामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के
इस्रायलने अलीकडेच मुंबई येथील टाटा स्मृती रुग्णालयाला कर्करोग उपचारासाठी अद्ययावत मशीन (ICE Cure Cryoablation Device) दिली असून या संयंत्रामुळे शस्त्रक्रीया न करता देखील कर्करोग बरा करता येतो अशी माहिती वाणिज्यदूत कोबी शोशानी यांनी यावेळी दिली. या मशीनच्या यशस्वीतेचे प्रमाण ९८ टक्के इतके जास्त असून रुग्णांनी कर्करोगाच्या निदानासाठी लवकर आल्यास त्याचा अधिक फायदा होऊ शकतो असे त्यांनी सांगितले.
इस्रायलचा जलव्यवस्थापन प्रकल्प मराठवाड्यासाठी निश्चितच वरदान ठरेल असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी काढले. भारत इस्रायलचे संबंध केवळ ३० वर्षे किंवा ७० वर्षे इतके जुने नसून ते हजारो वर्षे जुने असल्याचे राज्यपालांनी सांगितले. भारताने ज्यू धर्मीय लोकांना नेहमीच सन्मानाने वागवले असेही राज्यपालांनी हर्पाज यांना सांगितले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.