July 27, 2024
The Kirloskar family's legal battle is extreme
Home » किर्लोस्कर कुटुंबातील न्यायालयीन “दंद्व टोकाचे !
विशेष संपादकीय

किर्लोस्कर कुटुंबातील न्यायालयीन “दंद्व टोकाचे !

भारतातील यशस्वी उद्योग समूहांमध्ये पुण्यातील किर्लोस्कर उद्योग समूहाचे नाव आदराने घेतले जाते. लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर हे समूहाचे संस्थापक. त्यांच्यानंतर शंतनुराव किर्लोस्कर यांनी त्याची धुरा सांभाळली. समूहाच्या चवथ्या पिढीमध्ये गेली 6 वर्षे न्यायालयीन द्वंद्व सुरू असून दिवाळखोरीच्या लवादाच्या दारात ते पोचले आहे. वास्तविक ही अत्यंत खेदजनक घटना आहे. या उद्योगात हजारो मध्यम वर्गीय गुंतवणूकदार भागधारकांची मोठी गुंतवणूक आहे. त्यास निश्चितच धक्का पोचतो. सर्वसामान्य गुंतवणूकदार, भागधारकांना या द्वंद्वाची माहिती असणे आवश्यक असल्याने न्यायालयीन वादाचा घेतलेला आढावा…

प्रा. नंदकुमार काकिर्डे

सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया(सेबी) या शेअर बाजाराच्या म्हणजे भांडवली बाजाराच्या नियंत्रकांनी अलीकडेच शेअर बाजारावरील नोंदणीकृत कंपन्यांनी नियम 30 ए नुसार कंपनीच्या मालकीबाबत किंवा कंपनीचे कामकाज चालण्याच्या संदर्भात काही कौटुंबिक करार केलेले असतील तर त्याची सर्व माहिती भागधारकांना देण्याबाबत व्यापक भूमिका जाहीर केलेली आहे. वास्तविक अनेक वर्षांपासून अशा प्रकारची माहिती कंपनी क्षेत्राने देण्याची आवश्यकता होती. देशातील विविध कंपन्यांच्या प्रवर्तक कुटुंबांमध्ये अनेकदा वाद निर्माण झाले. गेली काही वर्षे न्यायालयीन द्वंद्वांमध्ये गुंतलेल्या किर्लोस्कर कुटुंबीयांच्या कंपन्यांबाबत हीच स्थिती आहे.

2017 मध्ये अतुल आणि राहुल चंद्रकांत किर्लोस्कर या भावांनी मुंबईतील राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणात (नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल – एनसीएलटी) त्यांचा सख्खा भाऊ संजय किर्लोस्कर यांच्या विरुद्ध अर्ज केला. संजय चंद्रकांत किर्लोस्कर हे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. संजय किर्लोस्कर हे “दडपशाही आणि गैरव्यवस्थापन” करत असून कंपनीच्या अल्पसंख्य भागधारकांसाठी ते हानिकारक असल्याने त्यांना या पदावरून काढून टाकण्याची मागणी या लवादापुढे केली होती. सुमारे सहा वर्षे हे द्वंद्व सुरू होते. त्याचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. अतुल व राहुल चंद्रकांत किर्लोस्कर यांनी याबाबत यशस्वीपणे मुद्दे मांडल्याचे या लवादाने मान्य केले.

किर्लोस्कर कुटुंबातील सख्ख्या भावांमध्ये हे न्यायालयीन द्वंद्व निर्माण होण्याचे प्रमुख कारण आहे एका कौटुंबिक वाटप करारनाम्याचे. किर्लोस्कर कुटुंबामध्ये अनेक कंपन्यांचा समावेश असून त्यातील विविध भागभांडवलाचे आर्थिक वाटप 11 सप्टेंबर 2009 रोजी “डीड ऑफ फॅमिली सेटलमेंट” ( डीएफएस) द्वारे करण्यात आले. सर्व न्यायालयीन वादांमध्ये या महत्वाच्या दस्तऐवजाचा सतत वापर करण्यात आला. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड चे 35 टक्के भाग भांडवल संजय किर्लोस्कर यांच्याकडे आहे तर किर्लोस्कर इंडस्ट्रीज कडे या कंपनीचे 28 टक्के भाग भांडवल आहे.

या सख्ख्या भावांमध्ये नेमका वादाचा मुद्दा आहे तो किर्लोस्कर ब्रदर्सच्या नियंत्रणासंदर्भात आहे. या कुटुंबातील एकूण मालमत्तांचे वाटप आर्थिक समानता लक्षात घेऊन करण्यात आले होते. किर्लोस्कर समूहाचे प्रमुख लक्ष्मणराव किर्लोस्कर यांना शंतनुराव व राजाराम असे दोन अशी दोन मुले होती. शंतनूरावांना चंद्रकांत व श्रीकांत अशी दोन अपत्य होती. चंद्रकांत किर्लोस्कर यांना अतुल, संजय व राहुल अशी तीन मुले आहेत. दुसरीकडे राजाराम यांना सुधा कुलकर्णी ही कन्या व गौतम हा मुलगा होता आणि ही सर्व मंडळी या वाटप करारातील लाभधारक होते.

खरे तर संपूर्ण किर्लोस्कर कुटुंबीयांचे हेच फक्त वारसदार नव्हते परंतु किर्लोस्करांपैकी अन्य शाखा या करारापूर्वीच वेगळ्या झालेल्या आहेत. या करारानुसार किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कंपनीचे शेअर्स अतुल व संजय या दोन्ही भावांमध्ये वाटले गेले. मात्र या करारानुसार जे काही भाग भांडवलाची पुनर्रचना झाली त्यानुसार अतुल किर्लोस्कर यांना किर्लोस्कर ब्रदर्सच्या माध्यमातून किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडचे भाग भांडवल मिळाले. या कंपनीतही जनतेचे मोठ्या प्रमाणावर भाग भांडवल आहे. साधारणपणे 1980 च्या दरम्यान किर्लोस्कर कुटुंबामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या भाग भांडवलाचे वाटप करण्यात आलेले होते आणि त्याच वेळेपासून किर्लोस्कर ब्रदर्सचे जादा नियंत्रणाचे भागभांडवल संजय किर्लोस्कर यांच्याकडे होते. त्यावेळी पासूनच अतुल आणि संजय किर्लोस्कर यांच्यात कमालीचे वाद सुरू झालेले होते.

किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड या कंपनीच्या व्यवसायाशी स्पर्धा करत आहे असा आरोप त्या वेळेला करण्यात आला होता व त्यामुळे कुटुंबातील वाटप झालेल्या कराराचा भंग होत असल्याचा न्यायालयीन दावा करण्यात आला होता. त्याच वेळेला अतुल किर्लोस्कर व किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्या वतीने किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीकडे अर्ज करण्यात आला होता. त्यांनी किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीचे आणखी समभाग विकत घेण्यासाठी किंवा सध्याचे सर्व समभाग कोणत्या तरी बाहेरच्या गुंतवणूकदाराला विकण्यासाठी परवानगी मागितली होती. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या संबंधित अनुपालन ( कम्पलायन्स) अधिकाऱ्यांनी ही पूर्वपरवानगी नाकारली. अशी खरेदी किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड ने केली तर त्यांचे कंपनीतील एकूण भाग भांडवल 25 टक्क्यांच्या वर जाऊन संजय किर्लोस्कर यांचे पूर्ण नियंत्रण असलेल्या भांडवलाला धोका निर्माण होईल म्हणून परवानगी नाकारण्यात आली.

त्याचवेळी अतुल किर्लोस्कर यांना त्यांचे भागभांडवल बाहेरच्या अन्य कोणालाही विकण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. अशी विक्री केल्यामुळे कौटुंबिक कराराच्या प्रमुख शर्तींचा भंग होत असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले. मात्र त्याचवेळी संजय किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड चे सर्व समभाग विकत घेण्याची तयारी दाखवली व त्यांनी असा दावा केला की जर किर्लोस्कर इंडस्ट्रीज कंपनीला शेअर्स विकायचे असतील तर ते सर्वप्रथम संजय किर्लोस्कर यांनाच विकावे लागतील. अन्य कोणालाही नाही.

आजमितिला किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड चे जे भाग भांडवल किर्लोस्कर ब्रदर्स मध्ये आहे त्याचे बाजारातील मूल्य साधारणपणे 3000 कोटी रुपयांच्या घरात आहे. एक प्रकारे श्री अतुल किर्लोस्कर यांच्या हाताभोवती ही जणू सोन्याची बेडी होती. कारण त्यांना मोठा भागधारक असून किर्लोस्कर ब्रदर्स मध्ये कोणतीही भूमिका बजावता येत नव्हती व त्याचवेळी ते शेअर्स अन्य कोणालाही विकता येत नव्हते. त्यांच्या मते किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या संचालक मंडळाने त्यांच्या मार्गात मोठा कायदेशीर अडथळा निर्माण केला. त्यावर पर्याय म्हणून मार्ग काढण्यासाठी त्यांनी नॅशनल कंपनीला ट्रायब्युनल (एनसीएलटी) यांच्याकडे धाव घेऊन संजय किर्लोस्कर यांची हकालपट्टी करण्याची व कंपनीचा गाशा गुंडाळण्याची मागणी केली होती.

किर्लोस्कर ब्रदर्सच्या वतीने या दाव्याला विरोध करण्यात आला. यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट बाब म्हणजे किर्लोस्कर कुटुंबीयांमध्ये जो वाटप करार झाला तो कुटुंबातील व्यक्तींमध्ये करार होता व त्याची कोणतीही दखल कोणत्याही कंपनीने घेण्याचे कारण नाही असे न्यायालयात मांडण्यात आले होते. किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीतर्फे असे मांडण्यात आले होते की संजय किर्लोस्कर यांना या वाटपाद्वारे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे अन्य कुटुंबियांना डावलून व्यवस्थापन करण्याचा कोणताही अधिकार प्राप्त झालेला नाही. त्यामुळे किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड ला जे अधिकार आहेत तेच अधिकार संजय किर्लोस्कर यांना प्राप्त झालेले आहेत. त्यामुळे किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडच्या संचालक मंडळाने संजय किर्लोस्कर यांना मदत करून किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडचा हस्तांतरण अधिकार नाकारला. संजय किर्लोस्कर हे दडपशाही व गैरव्यवस्थापन करत असल्याचा यावेळी आरोप करण्यात आला.

संजय किर्लोस्कर व किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड यांनी कौटुंबिक वाटप कराराचे समर्थन केले असून या करारामुळे विविध कंपन्यांमधील समभागांचे केवळ वाटप च केलेले नाही तर त्याद्वारे संजय किर्लोस्कर यांचा किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीवरचा व्यवस्थापन नियंत्रणाचा हक्क मान्य केलेला आहे असा दावा केला.

दरम्यान एनसीएलटी लवादाने यांनी दोघांची बाजू ऐकूनअसे मत व्यक्त केले आहे की किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे संचालक मंडळ व त्यांच्या अनुपालन अधिकाऱ्यांनी या कौटुंबिक करारावर भर देऊन निर्णय घेतलेला आहे. किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडकडे असणाऱ्या शेअर्स हस्तांतरण प्रक्रियेत अन्य दस्तऐवजाचा वापर करण्यात आला असून ते योग्य नाही असे मत व्यक्त केले आहे. या करारानुसार कुटुंबामध्ये निर्माण झालेल्या वादामध्ये किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेड कंपनीने ज्यांच्याकडे सध्या व्यवस्थापन आहे त्यांच्या बाजूने त्यांना पाठिंबा दिला असून ही गोष्ट अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तसेच या वादापासून किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीने दूर राहणे आवश्यक होते असे मत व्यक्त केले आहे.

कंपनीच्या संचालक मंडळांनी संजय किर्लोस्कर यांचीच री ओढल्याचे मत व्यक्त केले होते. किर्लोस्कर इंडस्ट्रीच्या समभागांच्या हस्तांतरणास किंवा विक्रीस मनाई करून कंपनीने या कौटुंबिक कराराला पूर्णपणे धक्का दिला आहे व कुटुंबाच्या सदस्यांमध्ये आर्थिक समानता निर्माण करण्यामध्ये बाधा आणली आहे असे मत व्यक्त केले आहे यामुळे किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडचे जे समभाग किर्लोस्कर ब्रदर्स

मध्ये आहेत त्याला केवळ कागदाशिवाय अन्य काहीही किंमत किंवा मूल्य नाही असे मत व्यक्त केले आहे. किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडने 2016 मध्ये संचालक मंडळाच्या बैठकीत या कौटुंबिक वाटप कराराची कायदेशीर दखल घेतली. मात्र त्याच वेळेला किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडने आणखी शेअर्स खरेदी करण्यासाठी व किंवा आहे ते समभाग विकण्यासाठीची परवानगी मागितली होती त्याच वेळेला या कराराची दखल घेण्यात आली याची नोंद एनसीएलटी ने केली आहे. किर्लोस्कर समूहातील किंवा कुटुंबातील सदस्यांमध्ये असलेल्या या कराराची कोणतीही दखल घेण्याचा किंवा ते बंधनकारक असण्याचा किर्लोस्कर ब्रदर्स ला हक्क नाही त्याचप्रमाणे त्यांनी त्याची कोणतीही दखल घेण्याचे कारण नाही असे मत व्यक्त केले. मात्र लवादाने या निर्णयामध्ये संजय किर्लोस्कर यांना किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडचे व्यवस्थापन नियंत्रण करण्याचा अधिकार असून त्यात अतुल यांचा काही हक्क नाही असेही नमूद केले आहे. तसेच हा करार कोणत्याही कंपनीवर बंधनकारक नसून त्यापेक्षा काही वेगळे या करारामध्ये अपेक्षित नाही असे मत व्यक्त केले आहे.

अतुल किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड चे समभाग संजय किर्लोस्कर यांना 30 दिवसात विकण्याची ‘ऑफर’ द्यावी व त्यांनी जर ते विकत घेतले नाहीत तर अन्य कोणालाही बाजारात खुल्या बाजारात विकता येतील असा निर्णय लवादाने दिला आहे. मात्र किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडने यामध्ये शेअर्सवर किती अधिमुल्य ( प्रीमियम) घ्यावे याबाबत काहीही निर्णय दिलेला नाही. किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेडने हे शेअर्स खुल्या बाजारात विकले तर त्यांना जास्त किंमत येऊ शकेल असे मतही लवादाने व्यक्त केले आहे. बाहेरच्या व्यक्तीला हे शेअर्स विकले गेल्यामुळे कंपनीच्या भागधारकांना त्याचा लाभ होईल असे मतही व्यक्त केले आहे. या न्यायालयीन वादामध्ये संजय किर्लोस्कर यांनी किर्लोस्कर ब्रदर्सच्या वतीने सर्व बाजू मांडून त्याचा सर्व कायदेशीर खर्च कंपनीने केला आहे. कंपनीच्या प्रवर्तकांनी यात किती खर्च केला व कंपनीने किती खर्च केला याची कोणीही तपासणी केलेली नाही.

किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीने कायदेशीर लढाईसाठी आत्ता पर्यंत तब्बल 274 कोटी रुपये खर्च केल्याचे वार्षिक ताळेबंदा वरून दिसून येत आहे. दरम्यान किर्लोस्कर इंडस्ट्री लिमिटेड यांनी या लवादाने दिलेला निर्णय त्यांनी केलेल्या आरोपांना पुष्टी देणारा असल्याचे व किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीचे संचालक मंडळ ‘स्वतंत्र’ नसल्याचे मत व्यक्त केले असल्याचे दावा केला आहे. किर्लोस्कर ब्रदर्स मध्ये किर्लोस्कर इंडस्ट्रीजचे अतुल किर्लोस्कर व राहुल किर्लोस्कर यांच्याकडे 24.93 टक्के भाग भांडवल आहे. तसेच किर्लोस्कर ब्रदर्स या कंपनीत संजय किर्लोस्कर यांचे 22.48 टक्के तर त्यांच्या पत्नी प्रतिमा किर्लोस्कर यांचे 17.44 टक्के समभाग आहेत. एकूण प्रवर्तकांकडे 66 टक्क्यांच्या घरात भाग भांडवल आहे.

किर्लोस्कर इंडस्ट्रीने एक पत्रक प्रसिद्ध केले असून त्यात 21 मे 2024 रोजी या लावादाने दिलेला निकाल किर्लोस्कर ब्रदर्सचे व्यवस्थापन स्वतंत्र व पारदर्शकपणे चालत नसल्याचे मत व्यक्त केले आहे. कंपनी या दोन भावांच्या वादामध्ये तटस्थ राहिलेली नाही असे मत लवादाने व्यक्त केले आहे. संजय किर्लोस्कर व किलोस्कर ब्रदर्स या दोघांनी सादर केलेले पुरावे आणि दावे यात पूर्णपणे संजय किर्लोस्कर यांचाच पाठपुरावा केलेला आहे असे स्पष्ट केले आहे. कंपनीने केलेल्या खर्चाबाबतही लवादाने काही मत व्यक्त केलेले नाही. लवादाने कंपनीच्या कामामध्ये दोन्ही बाजूंनी गतिरोध निर्माण केल्याबद्दल कडक शब्दात नापसंती व्यक्त केली आहे.

किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीच्या हजारो भागधारकांचे हित लक्षात घेऊन कंपनीचा गाशा गुंडाळण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे. लवादाच्या निर्णयाला आव्हान दिले गेले तर हा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या अंगणात जाऊन पडणार आहे. याचा प्रतिकूल परिणाम कंपनीच्या अन्य भागधारकांवर होत आहे हे नाकारता येणार नाही. त्यामुळे औद्योगिक कुटुंबांनी त्यांच्यातील वाद तंटे हे सामोपचारानेच मिटवले पाहिजेत व त्यात भागधारकांच्या हिताला बाधा येऊ नये याची दखल घेण्याची निश्चित गरज आहे. मुंबईतील गोदरेज कुटुंबाने अलीकडेच सामोपचारानेच त्यांच्या व्यवसायांचे यशस्वी वाटप केले होते. त्यांचाच आदर्श अन्य औद्योगिक कुटुंबांनी ठेवावा असे म्हटले तर ते अयोग्य होणार नाही.

सध्या किर्लोस्कर ऑइल इंजिन्स कंपनीच्या समभागाची बाजारातील किंमत 1200 रुपयांच्या घरात आहे तर उलाढाल 4900कोटी रुपयांच्या घरात असून गेल्या वर्षभरात त्याचा उच्चांकी भाव 1379 रुपये तर निचांकी 382 रुपये होता. किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत 1618 रुपयांच्या घरात आहे. या शेअर्सनी वर्षभरात 1925 रुपयाची उच्चांकी तर 530 रुपयाची निचांकी नोंदवली होती.त्यांची उलाढाल 2700 कोटींच्या घरात आहे. किर्लोस्कर इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीचा भाव सध्या 6122 रुपयांच्या घरात आहे. त्यांची उलाढाल 120 कोटींच्या घरात आहे.

प्रा. नंदकुमार काकिर्डे
लेखक पुणेस्थित अर्थ विषयक ज्येष्ठ पत्रकार व बँक संचालक आहेत


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

व्हिडिओः शोध काटेमुंढरीचा…

प्रसार माध्यमातील नव्या बलाढ्य युती बाबत

प्रवेश परीक्षा : आव्हाने आणि संधी!

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading