April 4, 2025
Online education system leads to unemployment on engineering freshers article by Mahadev Pandit
Home » ॲानलाईन शिक्षण पध्दतीमुळे अभियांत्रिकी फ्रेशरवर बेरोजगारीचे सावट
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

ॲानलाईन शिक्षण पध्दतीमुळे अभियांत्रिकी फ्रेशरवर बेरोजगारीचे सावट

ॲानलाईन शिक्षण पध्दतीमुळे अभियांत्रिकी फ्रेशरवर बेरोजगारीचे सावट

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने या पारंपारिक म्हणी प्रमाणे ॲाफलाईन अभियांत्रिकी शिक्षण पध्दतीला कोव्हिड व्हेरियंटची सतराशे विघ्ने ही नवीन म्हण नजिकच्या काळात नक्कीच प्रचलित होईल आणि शिक्षकांना व विद्यार्थ्यांना लॅाकडाऊनची सवय अंगवळनी पडेल आणि भविष्यात विशेषता नवे कोरे अभियंते अर्धशिक्षितच राहतील आणि या शापीत ॲानलाईन प्रणालीमुळे आयुष्यभर महाविद्यालयामधील प्लेसमेंट सेलमधून मनपंसत स्वप्नवत अशी प्लेसमेंट सरकारच्या नाकर्तेपणामुळे मिळाली नाही असा दोष सरकारच्या माथी मारत राहतील

– महादेव ई. पंडीत

स्थापत्य अभियंता

अन्न, वस्त्र व निवारा ह्या पारंपारिक मुलभूत गरजेव्यतिरिक्त शिक्षण ही आजची चौथी मुलभूत गरज आहे. आजकाल बहूतांशी पालकांचा आपल्या पाल्यांला दहावीनंतर बारावी सायन्सला महागड्या इंटीग्रेटेड क्लासला प्रवेश घेऊन इंजिनियर व डॅाक्टर बनवायचे असा कल बघायला मिळतो. शैक्षणिक क्षेत्रात डॅाक्टर व इंजिनियर व्यतिरिक्त अनेक संधी उपलब्ध असल्यातरी अभियांत्रिकी क्षेत्रातील मोठमोठाली पॅकेज पाहून अनेक पालक आपल्या पाल्याला अभियंता बनवायचे अशी गोड स्वप्ने पहात असतात.

सर्व साधारणपणे आपल्या देशात जून ते एप्रिल हा अगदी नैसर्गिक ऋतू चक्रावर आधारीत पारंपारिक शैक्षणिक कालखंड आहे. 20 मार्च 2020 पर्यंत सर्व अभियांत्रिकी शैक्षणिक प्रकिया अगदी पारंपारिक पध्दतीने सुरळीत चालली होती. पण डिसेंबर 2019 मध्ये चीनमधील वुहाण या अतिप्रगत शहरामध्ये नोव्हेल कोरोना व्हायरस जन्मला आणि त्या महाभयंकर विषाणूने सर्व जगाचे दैनंदिन जीवनाचे ठोकेच चुकविले. बघता बघता हा जीवघेणा व्हायरस हवाईमार्गे भारतात मार्च २०२० अखेरीस दाखल झाला आणि पुढे सर्व भारतीयांची सर्वच नियोजित गणिते चुकविली. कोव्हीड १९ या संसर्गजन्य रोगाविषयी आपल्याला कोणतीही शास्त्रीय व वैद्यकिय माहिती कानावर उपलब्ध नसल्यामुळे सर्वप्रथम कॅालेजला अगदी २० मार्च २०२० पासून लॅाकडाऊनमध्ये टाकले.

अभियांत्रिकीवर दुर्लक्ष भविष्यात त्रासदायक

सर्वसाधारण मे हा महिना नैसर्गिक उन्हाळी सुट्टीचा कालावधी असल्यामुळे शिक्षण मंडळाने शैक्षणिक बाब दुर्लक्षित केली पण अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी एप्रिल व मे महिना खुप महत्वाचा असतो. कोव्हिडचा पहिला लॅाकडाऊन खुपच कडक असल्यामुळे पुर्वीच्या ॲाफलाईनच्या प्रगती पुस्तकाचा आधार घेऊन १९ – २० या शैक्षणिक वर्षाची सांगता केली व जुलै २०२० मध्ये पुढील शैक्षणिक नियोजननंतर पहाता येईल असे गृहित धरुन सोडून दिली आणि तेंव्हापासून आजतागायत अभियांत्रिकी महाविद्यालये दुर्लक्षितच आहे. एकंदरीत चांगला व्यावसायिक अभियंता तयार करण्यासाठी एकुण ॲाफलाईन आठ सेमिस्टरची गरज असते. अभियंते हे देशाच्या प्रगतीचे केंद्रबिंदू आहेत म्हणुन अभियांत्रिकीवर दुर्लक्ष भविष्यात त्रासदायक ठरेल.

दुर्देवाने जूलै २०२० कोरोनाचा संसर्ग वाढतच गेला त्यामुळे थोडी थोडी ॲानलाईन शिक्षण पध्दत पहिल्यांदाच चाचणी तत्वावर सुरु झाली आणि सर्वांणा प्रचलित होऊन रूजू होऊ लागली. सुरवातीला मुलांना सुखद अनुभव आला पण नंतर नंतर विद्यार्थी वर्ग ह्या ॲानलाईन शिक्षण पध्दतीला कंटाळून दुर्लक्ष करू लागला. खरेतर अभियांत्रिकी अभ्यासक्रम प्रात्यक्षिकासोबत प्रत्यक्ष क्लासरुम मध्ये मुळापासून शिकण्याचे शास्र आहे. पण कोव्हीड पॅन्डेमिकमध्ये ॲानलाईन शिवाय दुसरा कोणताच पर्याय नसल्यामुळे पुर्ण सेमिस्टर पहिल्यादांच ॲानलाईन पध्दतीने शिकवली व डिसेंबर २०२० मध्यावर ॲानलाईन परिक्षा घेऊन कोव्हीड पॅन्डेमिक मधील पहिल्या सेमिस्टरची सांगता केली.

ॲानलाईन पध्दतीने सांगता

डिसेंबर २०२० अखेर कोरोनाचे भितीदायक वातावरण विरळ होईल व जानेवारी २०२१ मध्ये सर्व अभियांत्रिकी व्यवहार व पारंपारिक प्रचलित शैक्षणिक पध्दत सुरळीत होईल व किमान दुसरी सेमिस्टर व्यवस्थित पार पडेल असे वाटले पण पब्लिकच्या मनमानी वृत्तीमुळे पुन्हा एकदा मार्च २०२१ मध्ये कोरोना डोके वर काढू लागला. कोव्हीडला पण परिक्षा कधी असतात त्याचा अंदाज येऊ लागला आहे. संसर्गजन्य विषाणू नेहमीच आपले रुप बदलुन पुन्हा पुन्हा सक्रिय होत असतो. डिसेंबर २०२० अखेरीस कोव्हीडचा नवीन व्हेरियंट डिटेक्ट झाला आणि मार्च २०२१ अखेर पर्यंत खुपच संसर्गित होऊन एकदम धुमाकूळ घालु लागला. ॲाक्सीजन व हॅास्पीटलची कमतरता भासल्यामुळे अनेक रुग्णांची खुपच वाताहत झाली त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ९ एप्रिल २०२१ पासुन पुन्हा लॅाकडाऊन लावला व २०-२१ हे अभियांत्रिकीचे शैक्षणिक वर्ष ॲानलाईन परिक्षा पध्दत वापरुन सर्वांचे रिझल्ट देऊन ॲानलाईन पध्दतीने सांगता केले म्हणजेच सलग दुसरी सेमिस्टर पण ॲानलाईनवरच पुर्ण अभ्यासक्रम घेऊन संपविली.

पुन्हा एकदा २१ -२२ हे शैक्षणिक वर्ष जुलै – ॲागस्ट २०२१ पासून तरी पारंपारिक प्रचलित शैक्षणिक पध्दतीने सुरळीत चालू होऊन अभियांत्रिकी अभ्यासक्रमाची तिसरी सेमिस्टर तरी ॲाफलाईन पध्दतीने प्रात्यक्षिकांच्या मदतीने शिकाऊ अभियंते आत्मसात करून अभियांत्रिकी क्षेत्राचा आनंद घेतील असे वाटले, पण कोव्हिडच्या डेल्टा व्हेरियंटचे भंयकर थैमान पाहून अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ॲाफलाईन अभ्यासक्रम चालू करण्याचा नादच सोडून दिला व पुन्हा ॲानलाईन शैक्षणिक पध्दतीचाच अवलंब करुन २१ – २२ हे शैक्षणिक वर्ष ॲानलाईनच सुरु ठेवले.

अभियांत्रीकी विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता

दिर्घकाळ ऑनलाईन प्रणाली अस्तित्वात चालूच ठेवली तर कदाचित अभियांत्रिकी शिक्षणाचा मूलभूत पायाच कच्चा राहण्याची शक्यता अधिक आहे आणि पुढील शंभर वर्षे त्याचे पडसाद पहाण्यास मिळतील. जूलै २० व ॲागस्ट २१ मध्ये अभियांत्रिकी महाविद्यालयात आवडीच्या ब्रॅंच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत कॅालेज कॅम्पस सुध्दा पाहिला नाही. जीएस व सीआर या कॅालेजच्या निवडणुक प्रणालीच्या तसेच सांस्कृतिक करमणुकीच्या व विविध स्पोर्टच्या ॲक्टिव्हीटीमुळे प्रत्येक अभियंता आपल्या व्यावसायिक ज्ञानाबरोबरच अष्टपैलू व स्पर्धात्मक बनतो पण अभियांत्रिकी महाविद्यालये गेले दोन वर्षे लॅाकडाऊन आहेत त्यामुळे अभियंत्यांना ह्या सर्व बाबींचा अनुभव शुण्य. विद्यापीठ आयोगाने व सरकारणे सुद्धा सर्व अभियांत्रिकी कला कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये ॲानलाईनच कोंबण्याचा प्रकार करू नये आणि त्यामुळे अती तिथे माती होण्याचा अधिक संभव डोळ्यासमोर तरळतो. ॲानलाईन शिक्षण प्रणालीमुळे गरीब होतकरु अभियांत्रीकी विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे कारण कोव्हीड पॅन्डेमिकमध्ये अभियांत्रिकी वस्तीगृहे पुर्णता लॅाकडाऊन आहेत त्यामुळे ते शहरातील अद्यावत तंत्रज्ञानाला मुकतील.

आक्टोंबर २०२१ अखेर पर्यंत कोव्हीडच्या डेल्टा व्हेरीयंटमुळे अभियांत्रिकी महाविद्यालये बंदच होती. कोव्हीड १९ हा संर्सगजन्य रोग अभियांत्रिकीच्या शैक्षणिक विभागासाठी काळा शापच ठरला आहे.

ओमिक्रॉनमुळे पुन्हा ऑनलाईनचाच पर्याय

आता कुठे म्हणजेच १५ डिसेंबर २०२१ मध्ये प्रायोगिक तत्वावर आयआयटीने ॲाफलाईन ॲानलाईन असा हायब्रीड पॅटर्न चालु केला होता, त्यामध्ये गरीब होतकरु मुलांना कॅालेजची ग्रंथालये, वसतीगृहे, ॲाफलाईन तासीका व कॅन्टीन चालू करून दिली होती व कमीत कमी डिसेंबर २०२१ मध्ये शिकाऊ अभियंत्याना ॲाफलाईन परिक्षेचा व प्रात्यक्षिकांचा त्याचप्रमाणे परिक्षकांच्या समोरासमोर बसून ॲाफलाईन व्हायवा उर्फ डिफेंन्सचा मनमुराद आनंद घेता आला असता पण हा सर्व आनंद कोव्हीडच्या ओमिक्रॅान ह्या नव्या व्हेरियंटने गिळंकृत करून टाकला आणि पुन्हा एकदा ॲानलाईन पध्दतीने तिसरी सेमिस्टर सुध्दा संपवुन टाकली.

हायब्रीड पॅटर्नवरुन जानेवारी २०२२ मध्ये तरी सर्व अभियांत्रीकी महाविद्यालये पारंपारिक पध्दतीने नियमित चालू होतील असे वाटले होते पण त्या आधीच ६ डिसेंबर २०२१ ला दक्षिण आफ्रिकेत कोव्हिडचा ओमीक्रॅान व्हेरिंएंट जन्माला आला आणि त्वरित जगातील १२० देशाबरोबरच भारतात सुध्दा ३१ डिसेंबर २०२१ ला शे पाचशेच्या आसपास पोहचला आहे. जगातल्या तज्ञ डॅाक्टर लोकांच्या मते या नव्या व्हेरियंटचा संसर्ग पुर्वीच्या डेल्टा व्हेरियंट पेक्षा खुपच फास्ट आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा तोकड्या मेडिकल सोई सुविधामुळे कडक निर्बंध लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शासनाचे कडक निर्बंध म्हणजे अभियांत्रिकी कॅालेजच्या कामकाजावर प्रथम गदा येणार. आता १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत सर्व कॅालेज बंद रहाणार असे शिक्षण मंत्री महोदयानी जाहीरच केले आहे. कदाचित ओमिक्रॅान व्हेरीयंटचा संसर्ग वाढत जाण्याचे संकेत ६ जानेवारीच्या ३६००० कोव्हीड बाधित संख्येवरून नक्कीच २१ -२२ हे शैक्षणिक वर्ष सुध्दा ॲानलाईन परिक्षा घेऊन ॲानलाईन परिक्षापध्दतीची हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात शिक्षण मंत्रालय गुंतले आहे, अशी मनात आज पाल चुकचुकत आहे आणि ह्या हॅट्रिकच्या नादात सलग चौथी सेमिस्टर ॲानलाईनच होणार असे स्पष्ट चित्र आज दिसत आहे. दरवर्षी १५ डिसेंबर ते १५ जानेवारी हा कालखंड टेकफेस्ट व प्लेसमेंटचा असतो त्यामुळे अभियांत्रिकी परिसर आनंदी व सदाबहार असतो पण गेले दोन वर्षे नेमका डिसेंबरमध्ये कोव्हीडचा नवा व्हेरियंट जन्म घेतो आणि नव्या अभियंत्याच्या आनंदावर विरजन घालतो.

मोठ मोठ्या कंपन्यांची अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे पाठ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एक वाक्य आहे. शिक्षण हे वाघीणीचे दुध काढण्याचा प्रकार आहे आणि हे वाक्य अभियांत्रिकी शिक्षण विभागाला एकदम तंतोतत जुळते. सलग चार सेमिस्टर ॲानलाईन परिक्षा पध्दतीने पुर्ण केलेल्या असल्यामुळे अभियांत्रीकी विद्यार्थ्यांना अत्यंत अत्यावश्यक असलेल्या प्रात्यक्षिकांचा तसेच टेक फेस्टचा व तांत्रिक सहलींचा अनुभव शुण्य आणि म्हणून या ॲानलाईन पध्दतीने पदवी प्राप्त केलेल्या अभियंत्यांचे योग्य मुल्यमापन कसे करायचे त्याचप्रमाणे प्रात्यक्षिकांचा अनुभव नसलेले अभियंते व्यावसायिक कामे कशी पार पाडणार ? हा गहन प्रश्न प्लेसमेंट कंपनीना पडला आहे त्यामुळे कॅपंस प्लेसमेंट साठी अनेक मोठ मोठ्या कंपन्यानी अभियांत्रिकी महाविद्यालयाकडे पाठ फिरवली आहे. कंपनींच्या प्लेसमेंट सेलच्या पाठ फिरवन्यामुळे देशातील हाजारो शिकाऊ अभियंते नोकरीविना बेरोजगार होतील आणि लाखो रुपये खर्च करुण आपल्या पाल्याला महाकाय पॅकेज मिळेल या आशेने डोळे लाऊन बसलेल्या पालकांचा खुप मोठा भ्रमनिराश होईल म्हणूनच सरकारणे लवकरात लवकर अभियांत्रिकी महाविद्यालये पुर्वीप्रमाणे कोव्हीडची निर्बंधांची कडक अंमलबजावणी करून त्वरीत चालू करण्याचा निर्णय घेऊन पालकांना व विद्यार्थ्याना लाभदायक दिलासा दिला पाहीजेत नाहीतर मार्च २० व डिसेंबर २० मध्ये कोव्हीड १९, एप्रील २१ मध्ये डेल्टा व्हेरियंट , डिसेंबर २१ आणि जानेवारी २२ मध्ये ओमिक्रॅान व्हेरियंट अशी अनेक संकटे दर ५-६ महिन्याच्या अंतराने येत राहतील आणि नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने या पारंपारिक म्हणी प्रमाणे ॲाफलाईन अभियांत्रिकी शिक्षण पध्दतीला कोव्हिड व्हेरियंटची सतराशे विघ्ण ही नवीन म्हण नजिकच्या काळात नक्कीच प्रचलित होईल आणि शिक्षकांना व विद्यार्थ्यांना लॅाकडाऊनची सवय अंगवळनी पडेल आणि भविष्यात विशेषता नवे कोरे अभियंते अर्धशिक्षितच राहतील आणि या शापीत ॲानलाईन प्रणालीमुळे आयुष्यभर महाविद्यालयामधील प्लेसमेंट सेलमधून मनपंसत स्वप्नवत अशी प्लेसमेंट सरकारच्या नाकर्तेपणामुळे मिळाली नाही असा दोष सरकारच्या माथी मारत राहतील व नवे कोरे अभियंते नोकरीच्या शोधात वर्षानुवर्षे पायपीट करत राहतील आणि ॲानलाईन पदवी प्राप्त अभियंते बेरोजगार रहाण्याचा अधिक धोका आजच दिसत आहे व बेरोजगारी नव्या तरूण अभियंत्याना नैराश्याकडे ढकलेल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

1 comment

P.B.JOSHILKAR -QA/QC Manager, HEISCO-KUWAIT March 20, 2022 at 12:43 PM

पंडित साहेब,
लेख अतिशय उत्कृष्ट , नेहमी प्रमाणे नविन वृत्तसेवा आणि लेखन सत्य परिस्थितीशी निगडित असल्यामुळे भविष्यात नवीन अभियंताना आणि डॉक्टरांना कठीण प्रसंगाशी सामोरे जावे लागणार.
मागिल दोन वर्षांपासून शिक्षण मंडळाच्या Online धोरणामुळे अभियांत्रिकी आणि वैद्यकीय विद्यार्थांचे खुपच नुकसान झाले आहे. त्यामुळे पुढील व्यावसायिक जीवनात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार.
*असेच उत्तम लेखन प्रकाशित व्हावे.*
*पुढील लेखनासाठी शुभेच्छा*

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading