July 27, 2024
underground ways and waterways are advanced routes article by Mahadev Pandit
Home » भूमार्ग, जलमार्ग हेच उन्नतमार्ग…
काय चाललयं अवतीभवती

भूमार्ग, जलमार्ग हेच उन्नतमार्ग…

शहराचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मेट्रो व जलमार्ग खूपच हातभार लावतील. भूमार्ग व जलमार्ग हेच उन्नत मार्ग आहेत. भुसंपादनाचा खर्च कमी होत असल्याने तसेच अनेक नागरी प्रश्नांना फाटा मिळत असल्याने याचा विचार करून भविष्यात नियोजन करण्याची गरज आहे.

महादेव पंडीत
महादेव पंडीत

महादेव पंडीत

सांगली येथील वॅालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे १९८९ च्या बॅचचे स्थापत्य अभियंता.

जिओटेक्नीकल व स्थापत्य सल्लागार म्हणुन जवळ जवळ ३० वर्षाचा मेरेथॅान अनुभव.

ईमेल : mip_68@hotmail.com
भ्रमनध्वनी : ९८२००२९६४६

अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या तीन मुलभूत गरजा आहेत. पण आज धावपळीच्या युगात ‘‘शहरातील वाहतुक व्यवस्था’’ ही सुद्धा चौथी मुलभूत गरज असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मुलभूत गरजांचा त्रिवेणी संगम पुर्ण करण्यासाठी वाहतुकीची अत्यंत निकड भासते. उत्तम शेती, दुय्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी हा पारंपारिक साचा आता कुस बदलत त्याऐवजी उत्तम नोकरी, दुय्यम धंदा आणि कनिष्ठ शेती ह्या नव्या क्रमामध्ये दाखल झाला आहे. आणि याच नव्या क्रमामुळे आज मितिला नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या प्रगतशील शहरामध्ये लोकसंख्या झपाटयाने फोफावत आहे. त्यातल्या त्यात पुर्ण भारत देशामध्ये प्रत्येकाचा डोळा मुंबईवरच स्थिरावलेला दिसत आहे. मुंबईमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस पोटा-पाण्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारची नोकरी मिळतेच आणि त्याचा उदरनिर्वाह चालु राहतो आणि म्हणूनच मुंबईला ‘‘उदरनिर्वाहाचा हुकमी एक्का’’ संबोधण्यास काहीच वावगे वाटत नाही. मुंबई शहरातील त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील इतर मेट्रो शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुलभ व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकार मेट्रो सिटीमध्ये मेट्रोरेलचे अनेक मार्ग प्रस्तावित करत आहे, पण पुढे जाऊन ते पण पुरेसे होतील ही नाही याबद्दल थोडीसी शंका वाटते.

मेट्रो, मोनो सेवा मुंबईच्या दिमतीला हजर

मुंबई शहरामध्ये सन 1873 ते सन 1962 पर्यंत ‘ट्राम सेवा’ दिमतीस होती, त्यानंतर १९७१ पर्यंत ट्रॉली बससेवा चालू होती. त्याचप्रमाणे दिनांक 16 एप्रिल 1853 ला बोरीबंदर ते ठाणे दरम्यान पहिली लोकल धावली आणि खरोखरच पूर्ण मुंबई रेल्वेरूळावर आली. त्यानंतर १५ जुलै १९२६ रोजी नावाप्रमाणेच बेस्ट असणारी ‘‘बेस्ट ही नविन जलद व सुलभ सेवा मुंबई दफ्तरी रूजू झाली आणि आजतागायत तग धरून राहीली आहे पण पुढे धावण्यास तिच्यामध्ये आज ताकद राहीलेली दिसत नाही. स्वातंत्र्यानंतर गेल्या ७४ वर्षात लोकलच्या वेगवेगळया विस्तारीत कक्षाव्यतिरिक्त घाटकोपर ते वर्सोवा ही नविन तंत्रज्ञानातील एकमेव मेट्रो सेवा मुंबईच्या दिमतीला हजर झालेली आहे. याव्यतिरिक्त दक्षिण मुंबईमध्ये ‘मोनो’ एका नवख्या सासुरवासिणी सारखी रूजू झाली आहे. पण मुंबईचे आणि मोनोचे तितकेसे सोयर जमलेले नाही ! पाहूया पुढे जमते का ?

भूमार्ग, जलमार्ग हेच उन्नतमार्ग

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निसर्गाचा योग्य वापर हेच प्रत्येक बाबींवरील किंवा समस्येवरील रामबाण औषध आहे. शहराअंतर्गत वाहतूक व्यवस्थेमध्ये प्रामुख्याने भुमार्ग, लोहमार्ग व जलमार्ग हे तीन प्रकार येतात. शहरातील स्थायिक वस्तीचा विचार करता सद्यस्थितीत रस्त्यांची रूंदी वाढविणे अशक्य कोटीतील गोष्ट झालेली आहे आणि त्यामुळे सध्या सेवेत हजर असलेले कोणतेही भुमार्ग विस्तारीत कक्षामध्ये येण्यास राजी नाहीत आणि यासाठी ‘‘उन्नतमार्ग व शक्य असेल त्याठिकाणी जलमार्ग’’ हे दोनच अखंड अबाधित राहणारे पर्याय डोळ्यासमोर येतात पण त्याचे सकस नियोजन आजमितीला होताना निदर्शनास येत नाही.

चौदा मार्ग नियोजनात

आज घाटकोपर – वर्सोवा, आरे कॉलनी ते कफ परेड, कल्याण एपीएमएसी ते तळोजा, विक्रोळी ते बदलापूर, मुंबई विमानतळ ते नवीमुंबई विमानतळ, दहिसर – मंडाळे, कुलाबा – सिप्झ, वडाळा – कासारवडवली – गायमुख, ठाणे – भिवंडी – कल्याण, स्वामी समर्थ नगर – विक्रोळी, अंधेरी – दहिसर, वडाळा – जीपीओ, अंधेरी पूर्व – बांद्रा पुर्व आणि दहिसर पूर्व ते मिरा – भाईंदर – विरार असे एकूण १४ मार्ग सद्या नियोजनात आहेत व काही मार्गाचे काम प्रगतीपथावर चालू आहे. पुढील पाच ते सहा वर्षात मुंबईच्या सेवेत समाविष्ठ होण्याच्या प्रतिक्षा यादीत वाट पाहत आहेत. आजमितीला वर वर पाहता हे सर्व मेट्रो रूट MORE THAN SUFFICIENT या शिर्षकाला साजेसे आहेत पण येणाऱ्या दशकामध्ये लोकसंख्येत त्याचप्रमाणे चाकरमान्यांच्या संख्येत किती भर पडणार आहे. याचा सर्वांनाच विसर पडलेला आहे. कुलाबा – सिप्झ हा एकमेव भुयारी मेट्रो रूट आहे बाकीचे सर्व एकमजली उन्नत मेट्रो मार्ग आहेत.

प्रवासात फुकट जाणारा वेळ वाचवण्याची गरज

TIME IS MONEY ही रोजच्या व्यवहारातील तोंडी म्हण सार्थ करण्यासाठी वाहतूक व्यवस्था अत्यंत आदर्श बनविली पाहिजेत. आठ तास कार्यालयीन काम करण्यासाठी जवळ जवळ प्रत्येकाला आजमितीला सकाळ व संध्याकाळ अशा दोन्ही प्रहरी एकंदरीत तीन ते चार तास मोजावे लागतात म्हणजेच काय चाकरमान्यांच्या पुर्ण कार्यालयीन कामाच्या जवळ जवळ ५० प्रतिशत वेळ फक्त कार्यालय गाठण्यासाठी व परत स्वतःच्या घरी परतण्यासाठी खर्ची घालावा लागतो. मग सांगा बरे प्रवासाअंतर्गत खर्ची पडणारी ५० टक्के वेळ कार्यालयीन कामासाठी कारणी लावली तर आपल्या भारत देशामध्ये ‘‘शिवराज्य” नक्कीच अवतरेल. शहरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुलभ त्याचप्रमाणे जलद आणि आदर्शवत असणे हे शहराच्या तसेच देशाच्या उच्च प्रगतीचे लक्षण आहे. मुंबईच्या सद्यस्थितीत रूजू असलेल्या वाहतूक यंत्रणेमध्ये धावपळ करताना आजमितीला बरेच लोक आपले प्राण गमावत आहेत. मुंबईकर चाकरमानी कार्यालयात वेळेवर पोहोचण्यासाठी सकाळच्या सत्रात लोकलच्या दारात लोंबकळत जीवघेण्या परिस्थितीमध्ये प्रवास करत असतात. मग सांगा बरे ! किती वाईट अवस्था आहे. या मुंबईकर चाकरमान्यांची. चाकरमानी उदर निर्वाहासाठी मुंबईची निवड करतात आणि दर दिवशी ते चाकरमानी मृत्यूच्या दाढेत उभे राहून प्रवास करत असतात. किती भयानक चित्र आहे हे ?

मार्ग नियोजनात दुरदृष्टी हवी

भविष्यात लोकसंख्येत होणारी वाढ लक्षात घेऊन पूर्ण विचाराअंती उन्नतमार्गाचे नियोजन केले पाहिजेत. सद्या प्रगती पथावर असलेले १४ मेट्रो मार्ग पुर्ण विचाराअंती मुंबईच्या सेवेसाठी नियोजनात आणलेले आहेत, पण उद्या २५ किंवा ५० वर्षांनी दूसरे उन्नत मार्ग बांधणार कोठे ? त्यासाठी आपल्याकडे मोठे रस्तेच उपलब्ध नाहीत. त्याचप्रमाणे मुंबईतील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये मेट्रोच्या खांबाला उभे राहण्यासाठी जागाच शिल्लक नाही. सागरी किनाऱ्याचा शेजारवास, नैसर्गिक कोकणी बेटामुळे पावसाचे प्रमाण जास्त, त्याचप्रमाणे दाटीवाटीचे शहरीकरण या तीन कारणांमुळे भुयारी मेट्रो मार्ग अद्याप मुंबईकरांच्या पसंतीला उतरलेला नाही. भुयारी मेट्रो मार्ग पावसाळयात पाण्याने भरेल की काय ? या भुताटकीने मुंबईकर चाकरमानी आजसुद्धा पछाडलेला आहे. कुलाबा – सिप्झ हा पहिल्यांदाच भुयारी मेट्रो मार्ग प्रस्तावित केलेला आहे. पण भुयारी मेट्रो मार्ग मुळातच खुप महागडा प्रकल्प आहे आणि म्हणूनच पुढील ५० वर्षाचे अंतर्गत वाहतुकीचे नियोजन आजच्या एकमजली मार्गामध्येच दूमजली किंवा तीन मजली उन्नतीकरण समाविष्ठ करूनच पूर्व नियोजन केले तर मुंबईतील चाकरमान्यांना खूपच आरामदायी प्रवास ठरेल आणि त्याचा सरळ फायदा देशाच्या प्रगतीला हातभार लावेल.

फाऊंडेशन खुदाईचा खर्च वाचवण्याची गरज

शहराअंतर्गत वाहतूक व्यवस्था नियोजनसाठी काही प्रगत देशाचा आदर्श आपण विचार घ्यायला हवा. जपानची आजची लोकसंख्या आणि त्यांच्याकडील फोर (4) टियर मेट्रो लाईन पाहिली तर आपल्या लक्षात येईल की जपानी नियोजन किती परिपूर्ण आणि लाभदायी आहे. मग जपानी नियोजनाचा आदर्ष डोळयासमोर ठेऊन आपण चालले तर चालणार नाही का ? आज मंबईची लोकसंख्या जवळ जवळ दोन कोटीच्या घरात आहे, त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेला एकुण सहा महानगरपालिकांनी वेढा टाकलेला आहे. मग अशा मानवनिर्मित भौगोलिक परिस्थितीमध्ये वेढलेल्या मुंबईची लोकसंख्या पुढील २५ ते ५० वर्षात चार कोटींच्या घरात आरामात जाईल, मग त्यावेळी आपल्याकडे कोणताच पर्याय उपलब्ध नसेल आणि त्यावेळी रस्त्यावर प्रवाशांची भांडणे, मारामाऱ्या होतील व त्यांचे रूपांतर दंगलबाजीमध्ये होईल आणि मुंबईचा चाकरमानी सैरभैर होईल. मग हे सर्व महाभारत टाळण्यासाठी आजच उन्नत मेट्रो मार्गाचे ४ टियर किंवा ३ टियरमध्ये उन्नतीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. उन्नत मेट्रोमार्गाचे ४ टियर किंवा ३ टियरमध्ये नियोजन केल्यामुळे आजच्या एकेरी उन्नत मार्गाच्या फाऊंडेशनच्या खर्चामध्ये थोडी वाढ अपेक्षित आहे, पण भविष्यात त्याचा शत प्रतिशत फायदा होईल. आजच जमिनीखालचे सर्व काम पूर्ण होईल आणि रस्त्यावरचे दोनदा लावण्याचे काम उद्भवणार नाही त्याचप्रमाणे फाऊंडेशन खुदाईचा भरपूर खर्च वाचेल. त्याचबरोबर अंदाजपत्रकात भविष्यात होणाऱ्या वाढीचे बचतीमध्ये रूपांतर होईल आणि अपेक्षित बचतीमध्ये इतर सोयी सुविधा शहरांच्या दिमतीला साज भरतील.

जलमार्गाचे नियोजन सुद्धा एक वरदान

मुंबई हे एक नैसर्गिक बेट असल्यामुळे उन्नत मार्गासोबतच जलमार्ग नियोजन सुद्धा एक वरदान ठरेल. पश्चिमेला चांगला विस्तीर्ण समुद्रकिनारा त्याचप्रमाणे वाशीपासून ठाणे मार्गे वसईपर्यंत चांगली व सुलभ खाडी उपलब्ध आहे. पण अद्याप जलमार्ग हया नैसर्गिक सेवेचा उपभोग सरकारने घेतलेला नाही. केवढी मोठी आदर्श नैसर्गिक देणगी उपलब्ध असतांना आपले मायबाप सरकार मर्जीतील कंत्राटदारांच्या भल्यासाठी जलवाहतुकीकडे वाकड्या तसेच करड्या नजरेने पाहत बसलेले आहे. रस्ते बांधकामासाठी त्याचप्रमाणे उन्नत मेट्रोसाठी जलमार्गाच्या तुलनेत भरपूर खर्च अपेक्षित आहे. जलमार्ग चालू करण्यासाठी फक्त जलवाहतुकीचे जेटी स्वरूपात थांबे बांधणे व जल सर्वेक्षण करण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे काँक्रीट व लोखंडाचा वापर खूपच कमी होईल. जलमार्ग प्रकल्पाच्या खर्चात खुपच बचत होईल आणि त्यामुळे नैसर्गिक संपत्तीचा ऱ्हास होणार नाही आणि त्यामुळे शहरात नैसर्गिक समतोल टिकून राहील.

जलमार्गात भूसंपादनाचा प्रश्नच नसल्याने खर्चात बचत

आज रस्ता म्हटले तर त्याच्यावर प्रत्येक आम आदमी स्वतःचे वाहन घेऊन येणारच आणि त्यामुळे रस्त्यावर वेळोवेळी ट्रॅफिक जॅमचा कटू अनुभव मिळणारच, आणि म्हणूनच मोनो, उन्नत मेट्रो व उन्नत लोहमार्ग आणि जलमार्ग यांनाच पसंती क्रमांक देऊन अंतर्गत वाहतूक सुसज्ज त्याचप्रमाणे सुलभ बनविली पाहिजेत. आपल्या देशात सुसज्ज असे आरमार दल असल्यामुळे जल वाहतुकीसाठी त्याचा योग्य तांत्रिक सल्ला घेणे खुपच उचित ठरेल. नौदल सेना सर्वगुणसंपन्न असल्यामुळे जलमार्गाचे आदर्श नियोजन करणे आपल्या देशासाठी खुपच सोईचे आहे आणि त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात खूपच बचत अपेक्षित आहे. रस्ते, सागरी किनारपट्टी, तसेच चांगल्या खोल खाड्या या सरकारच्या मालकीच्या असल्यामुळे जलमार्गासाठी व उन्नतमार्गासाठी स्थानिक लोकांची शेती विकत घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जलमार्गामुळे व उन्नतमार्गामुळे स्थानिक रहिवासी सुरक्षित तसेच निश्चित राहतील. सरकारचा भूसंपादनासाठी वाया जाणारा रेव्हेन्यू वाचेल आणि आरामदायी व सुसज्ज असे तीन ते चार मजली उन्नतमार्ग व जलमार्गाचे जाळे शहरांच्या वाहतुक सेवेत दाखल होईल आणि आपला चाकरमानी आनंदाने, आरामदायी प्रवास करेल आणि देशाला प्रगतीपथावर घेऊन जाईल. याव्यतिरिक्त शहराचे आरोग्य सदृढ व निरोगी राहण्यास मेट्रो व जलमार्ग खूपच हातभार लावतील.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

डिजीटायझेशन प्रणालीमुळे बांधकाम विभागाला सोन्याचे दिवस !

महामार्गावर शुन्य अपघाताचे ध्येय कधी साध्य होणार ?

गच्चीवर उतरत्या छप्पराची परवानगी अन् सक्ती गरजेची

2 comments

Col Ravi Ghodake May 3, 2021 at 11:39 PM

Excellent article..

Reply
संजय तागडे May 3, 2021 at 10:33 PM

शहरातील वाहतूक व्यवस्था या विषयावर सखोल व अभ्यासपूर्ण लेख.सद्यस्थितीतील वाहतूक व्यवस्था व भविष्यात कशा प्रकारचची समक्ष वाहतूक व्यवस्था असावी याबद्दल लेखक प्रदीर्घ अनुभवी स्थापत्य अभियंता असलेमुळे तांत्रिक मुद्द्यांवर सामान्य नागरिकाला समजेल अशा भाषेत सांगितले आहे.शासनाने या बाबींचा साकल्याने विचार करून यावर त्वरित नियोजन व अंमलबजावणी करणे आवश्यक आहे व लोकप्रतिनिधी यानी यासाठी आग्रही राहणे ही काळाची गरज आहे.शहरांच्या नियोजित विक कार्यक्रमात अशा तज्ञ व्यकींना सामावून घेतले पाहिजे.

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading