अचाट वाटावे असे प्रयत्न सिंचनासाठी त्याने कसे केले आणि त्यातून आपली तीन एकराची सुपारी, नारळ बाग संपन्न केली. ते त्या डॉक्युमेंटरी मधून दिसले. हाच छोटा शेतकरी ‘अमिया महालिंग नायक’ यावेळी च्या पद्मश्री पुरस्कारात झळकल्याने खूपच समाधान वाटले.
निशिकांत अनंत भालेराव
शेती अभ्यासक
अॅग्रोवन पेपरची बांधणी करण्यासाठी 2004 मध्ये डोळ्यापुढे शेती संबंधित काही प्रकाशने शोधत होतो. जी होती ती फार टिपिकल होती. कोणीतरी सुचवले की कर्नाटकात सुपारीच्या नावावरून एक निघते ते पहा. अनियतकालिक होते ‘अड्डीके पत्रिका’. श्री पदरे त्याचे संपादक होते. ते स्वतः सुपारी पीक घ्यायचे आणि कर्नाटकातील सुपारी उत्पादकांचे हाल पाहून त्यांनी अगदी प्राथमिक स्तरावर एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी अड्डीके पत्रिका सुरू केली, पुढे ते एक उत्तम कृषी नियतकालिक म्हणून सर्वमान्य झाले.
श्री पदरे हिंदू दैनिकातून अनेकदा शेती विषयक लेख लिहीत असतात. अनेक शेतकऱ्यांच्या नाविन्यपूर्ण तंत्र, आणि पिक उत्पादना विषयी सकारात्मक अशी उदाहरणे ते देत असतात. चार पाच वर्षांपूर्वी त्यांनी मंगळूर जवळील एका सुपारी शेतकऱ्याने स्वतः एकट्याने शेतात पाणी, सिंचन व्यवस्था उभी करण्यासाठी काय काय प्रयत्न केले ते वाचण्यात आले. गेल्यावर्षी तोच शेतकरी हिस्ट्री चॅनेल वर एका डॉक्युमेंटरी मधून दिसला. अचाट वाटावे असे प्रयत्न सिंचनासाठी त्याने कसे केले आणि त्यातून आपली तीन एकराची सुपारी, नारळ बाग संपन्न केली. ते त्या डॉक्युमेंटरी मधून दिसले. हाच छोटा शेतकरी ‘अमिया महालिंग नायक’ यावेळी च्या पद्मश्री पुरस्कारात झळकल्याने खूपच समाधान वाटले.
सध्याच्या केंद्रातील आणि राज्यातील सरकारच्या कडून कोणत्याच अपेक्षा नसताना असे काही समजले की बरे वाटते. हे पद्मश्री प्राप्त शेतकरी नायक यांनी सुरुंग पद्धतीने आपल्या शेतात सिंचन व्यवस्थापन केले. आधी दुसऱ्याच्या शेतात जाऊन ते सुपारी वेचायचे आणि वाळवण्याचे काम करत. पुढे त्यांना 2 एकर पहाडावरील जमिन कोणीतरी दिली. तिथे पाण्याचा प्रश्न होता. मजूर परवडत नाहीत म्हणून त्यांनी स्वतः 30 फूट खोल चर खणले. त्यांच्यापुढे पारंपारिक असे ‘सुरुंग’ हे मॉडेल होते. 2 वर्षे प्रयत्न करूनही पाण्याचे चिन्ह दिसेना. त्या पठारावर चार ठिकाणी किमान 6 वर्षे रोज सायंकाळी 7 तास हा शेतकरी 30 -चाळीस फूट खणत बसे एकटाच पाण्याच्या शोधात सगळे त्याला हसत, वेडा म्हणत. पाचव्या ठिकाणी एका पाषाणा खाली त्याला ओल दिसली आणि तिथे 50 फूट चर नेल्यावर त्याला पाणी दिसले. जे झीरो इनर्जी ( zero energy) ने त्याने तुषार जलसिंचन प्रयोगाद्वारे त्या डोंगराळ शेतात आणले. आज अमिया महालिंग नायक या पद्मश्री सन्मानित 2 एकरवाल्या शेतकऱ्याच्या शेतात 200 सुपारी, 80 नारळ, काजू आणि मसाला पिके आहेत.
सिंचनाचे बिन खर्चाचे पण पारिश्रमीक मॉडेल म्हणून श्री पदरे यांनीही त्याची प्रशंसा केली होती. आज नायक यांच्या गौरवाने कर्नाटकातील या मॉडेलचा गौरव झाला हे छानच ! नीरज चोप्रा, सोनू निगम, प्रभा अत्रे, यांच्या पद्म पुरस्काराचे कौतुक होणारच ! पण अमिया महालिंग या शेतकऱ्याचेही झाले पाहिजे ना ?
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.