March 2, 2024
What and why to do sannyasa article by Rajendra Ghorpade
Home » संन्यास कशाचा अन् कशासाठी करायचा ? 
विश्वाचे आर्त

संन्यास कशाचा अन् कशासाठी करायचा ? 

मीपणा ज्याने सोडला तो खरा संन्यासी. यासाठी संसाराचा त्याग करण्याची गरज नाही. आत्मज्ञान हे सद्गुरूंच्या कृपेने मिळते. यासाठी शरीराला कष्ट देण्याची, पीडा करण्याची गरज नाही. केवळ क्षणभर स्मरणानेही कृपा होऊ शकते. फक्त त्यात भक्तीचा भाव असावा.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे

मोबाईल – 9011087406

आणि मी माझें ऐसी आठवण । विसरलें जयाचें अंतःकरण ।
पार्था तो संन्यासी जाण । निरंतर ।। २० ।। ज्ञानेश्वरी अध्याय ५ वा

ओवीचा अर्थ – आणि ज्याच्या अंतःकरणामध्ये मी आणि माझें यांचे स्मरणच राहीले नाही, अर्जुना तो सदोदित संन्यासीच आहे असे तू जाण.

संन्यास म्हणजे घरदार सोडायचे. एकांतात जाऊन भगवंताचे स्मरण करायचे. हिमालयात, जंगलात जायचे असाच समज आहे. बारा वर्षांचे तप केल्यानंतर आत्मज्ञान प्राप्त होते असे म्हटले जाते. पण प्रत्यक्षात किती संन्यासी आत्मज्ञानी झाले आहेत. अनेकांनी संन्यास घेतला, पण आत्मज्ञानाचा लाभ एखाद्यालाच झाला किंवा तेही घडत नाही. असे का? आज भारतात अनेक थोर संतांचे मठ आहेत. तेथेही आत्मज्ञान प्राप्तीसाठी शिक्षण दिले जाते. अनेकजण घरा-दाराचा त्याग करून तेथे जातात. पण तेथेही एखाद्यालाच आत्मज्ञानाचा लाभ होतो किंवा तेही नाही. असे का घडते ? कारण आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टीचा त्यांनी संन्यासच केला नाही.

आत्मज्ञान प्राप्तीमध्ये घरदार सोडणे म्हणजे संन्यास होत नाही. यासाठीच आत्मज्ञान प्राप्तीसाठी आवश्यक गोष्टींचा अभ्यास प्रथम करायला हवा. मीपणाच गेला नाही तर घरदार सोडूनही आत्मज्ञान होत नाही. स्वतःतील मीचा विसर हाच खरा संन्यास आहे. हे मी केले. हे माझ्यामुळे झाले. हा मीपणा, हा अहंकार सोडायला हवा. त्याचा त्याग करायला हवा. हे सोडण्यासाठी घरदार, संसार सोडण्याची गरज नाही. बारा वर्षांच्या संसारत्यागाने जे प्राप्त झाले नाही, ते केवळ एका क्षणात प्राप्त होऊ शकते.

बारा वर्षांच्या तपाने ज्ञान प्राप्त होऊ शकते. काही मठामध्ये दहा- बारा वर्षांच्या तपानंतर आचार्य, संत अशी पदवी दिली जाते. पण हे पुस्तकी, पंडिती ज्ञान म्हणजे आत्मज्ञान नव्हे. अशी आचार्य प्राप्त व्यक्ती आत्मज्ञानी असेलच असे नाही. हे ज्ञान सद्गुरूंच्या कृपाशीर्वादाने प्राप्त होते. यासाठी सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गाचा अवलंब करणे गरजेचे आहे. ज्ञानेश्वरीमध्ये संसार करता करताही परमार्थ साधतो. असा मार्ग सांगितला आहे. संसारात राहूनही मोक्ष मिळविण्याचा मार्ग सांगितला आहे.

मीपणा ज्याने सोडला तो खरा संन्यासी. यासाठी संसाराचा त्याग करण्याची गरज नाही. आत्मज्ञान हे सद्गुरूंच्या कृपेने मिळते. यासाठी शरीराला कष्ट देण्याची, पीडा करण्याची गरज नाही. केवळ क्षणभर स्मरणानेही कृपा होऊ शकते. फक्त त्यात भक्तीचा भाव असावा. यासाठी प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. हे सर्व कार्य भगवंत आपणाकडून करवून घेतात. आपण फक्त निमित्त मात्र आहोत. असा विचार प्रकट व्हायला हवा. तशी समर्पणाची, त्यागाची भावना मनात उत्पन्न व्हायला हवी. ही त्यागाची, समर्पणाची भावना म्हणजेच संन्यास.

पूर्वीची राजे संन्यास घेत होते. म्हणजे ते राज्य म्हणजे सत्तेचा त्याग करून वनात जाऊन राहात. म्हणजे सर्व सामान्यात येऊन राहात. हा त्यांचा त्याग हा ज्ञानप्राप्तीसाठी आहे. म्हणजे त्यांचा संन्यास हा संसाराचा त्याग नाही हे लक्षात घ्यायला हवे. सत्तेचा त्याग, मी पणाचा त्याग, माझ्यामुळे राज्य चालते हा मी पणाचा, अहंकाराचा तो त्याग आहे. हे लक्षात घ्यायला हवे. मी माझे ही आठवणच राहात नाही तेव्हाच खरा संन्यास घडतो. ही भावना आहे. त्या त्यागातूनच आत्मज्ञानप्राप्तीचा मार्ग सुकर होतो. अध्यात्मिक प्रगती होते.

Related posts

साहित्यिक आठवणींचा पीठाक्षरं भाग – ३

शिक्षणाकडे पहायचा दृष्टीकोन कसा हवा ?

भक्ताला आत्मज्ञानी करण्याकडेच सद्गुरुंचा ओढा

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More