आयुष्याचा एक समजुतदारपणा असावा लागतो. रोजच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात दुःखाची एक सावली असते. व्यक्तीगत दुःखापासून पुढे परिघापलिकडे जाऊन व्यक्त होणं, ही समाजदत्त दुःखाशी जोडलेली एक प्रक्रिया आहे. ही पल्लवी यांच्या कवितेत सातत्याने जाणवते.
मराठी विभाग, यशवंतराव चव्हाण काॅलेज, हलकर्णी, ता. चंदगड
– प्रा. डाॅ. चंद्रकांत भगवंत पोतदार
संपर्क – ९४२३२८६४७९
कविता एक अंत:प्रवाह असतो. काळाच्या कसोटीवर उतरताना अंतर्मुख होऊन स्वतःलाच दिलेली एक प्रतिक्रिया म्हणजे कविता असते. स्वतःला छिलून घेण्यात एक कवीचा पुनर्जन्म असतो. हृदयाची संवेदनशील कोवळीक आणि जीवनातला दाह यांच्या संमिश्रतेतच एक जगणं असतं. शब्द, अर्थ, संवेदना, प्रतिमा, रुपकं, भवताल, विचार यातून एक सुक्ष्म दृष्टी येते, ती कवितेची असते. स्त्री मनाची घुसमट व्यापक असते, तर मनाचा थांगपत्ताच लागत नाही. अशावेळी तिच्या अंतर्मनातले उचंबळून येणारे शब्द.
मनाची अस्वस्थ घालमेल, संसाराचा गाडा ओढताना कौटुंबिकतेतून जीवनाच्या तत्वज्ञानापर्यंत पोहोचण्याऱ्या बहिणाबाई चौधरी यांच्यापासून कवयित्री कल्पना दुधाळ यांच्यापर्यंत एक स्रीमनाचा अखंड प्रवास आहे. याच काव्यप्रवाहात कवयित्री पल्लवी परुळेकर – बनसोडे यांची कविताही स्वतःच्या आत्मबळावर सभोवताल मांडणारी आहे. ‘देहमूठ’मधील कविता आई आणि भुईला अर्पण करुन एक मुक्त काव्यप्रवास त्यांनी अधोरेखित केला आहे.
वेदना आणि संवेदना यामागे एक नेमकी जाणीव असते काळजातली सल अस्सल काव्यरुपात व्यक्त होते. या वेदनेचे पंख सावरत जगताना स्री मनाचा कोंडमारा आहे. जगण्यातली अस्वस्थ तगमग आहे. वेदनेचा सैल धागा उलगडताना होणारी आर्तता आहे. जगण्यातला शुद्ध विशुद्धपणा आहे. मानसिक विचारांचा गुंता आहे. आपल्या परक्या माणसांमधली नात्यांची गुंतागुंत आहे. स्त्रीजातीचं बाईपण आहे. जुन्या पारंपारिकतेत आधुनिकतेचा चेहरा आहे. स्रीजन्माचा वारसा हक्क दुनियेतल्या प्रवेशाबरोबरच चिकटलेला आहे. अशा सगळ्या वातावरणातली संवेदना शब्दबद्ध करणारी पल्लवी परुळेकर-बनसोडे यांची कविता असंख्य स्पंदनांना मांडत मांडत स्री जाणीवांना अधोरेखित करणारी आहे. स्रीचे सोशिकपण टाक्या टाक्याने सांधणाऱ्या एखाद्या रजईसारखे आहे. जनावरांसारखं राबणं स्रीच्या वाट्याला आलं. आभाळाला साक्षी ठेवून काळजातलं मौन काळजातचं राखून ठेवायचं. जगण्याचा जणू शापच आपल्या वाट्याला आला आहे असे मुके प्राक्तन सांभाळत जगणाऱ्या स्रीचे भावविश्व कवयित्री रेखाटते. कुंकवाच्या चितेवर उभे आयुष्य जाळताना जगणं कसं सिद्ध करणार ?
कुणा सांगु उलघाल
नि:शब्द ही मौन रात
वर डोळा पाणी अन्
सांजअभ्रे काळी आत
-पृष्ट,१९जन्माची शिदोरी
हे नि:शब्द मौन किती काळ सोसणार ? गहन मौनाचा जीवनप्रवास किती काळ सोसायचा ? दैनंदिन जीवनप्रवासात बघता बघता तळहातही शुष्क झाले. जगण्यातली मुळंच हद्दपार झाली. सभोवताल सगळा फाटक्या काळजाचाच आहे. प्रेम उरलंच नाही. केवळ वासनेचे भूतच सभोवताली वावरताना दिसते. पापण्यांची ओल सांडतच स्वतःचा तोल सावरायला हवा. आयुष्याचे कोवळेपणही बंदिवान बनू पाहते आहे. वासनांध जगातवावरताना स्वतःचीच एक कसोटी असते. हे अखंड स्रीजातीचे दुःख मांडताना कवयित्री लिहीते –
गर्दी फाटक्या दिलाची
गर्द वासना मोकाट
ठेव जपुनिया बाई
उभ्या इभ्रतीचा काठ
-पृष्ठ२४,गर्दी…
कवयित्री पल्लवी यांच्या कवितेत केवळ स्रीजातीचेच दुःख नाही, तर सभोवतालच्या जगण्याचा पसारा व्यक्त होतो, पण त्यात स्रीजाणिवांचे जग अधिक गडदपणे व्यक्त होते. बाईच्या जगण्याची तऱ्हा, स्रीमनाचा वावर, बाईपणाचा पसारा, माहेरच्या ओढीची खोल जाणीव आणि माहेराविषयीचा विरह, अस्वस्थ आठवणींची कालवाकालव अशा स्रियांच्या स्वगताबरोबरच आदिवासी स्रीयांचे दुःख आईपणाच्या मायेचे वैश्विक रुप, मुके दुःख आणि त्याची गाथा अशा सगळ्यातून एक नवा विचार व्यक्त होताना दिसतो. दुःखाला बोलता येत नाही, गिळताही येत नाही. अशा स्रीमनाची कोंडी मांडताना कवयित्रीचे शब्द खूप महत्त्वाचे आहेत.
वांझ झाल्या साऱ्या कळा
आईपण तोलू कसे
पान्हा फाटका हा माझा
दुःख मुके बोलू कसे
-पृष्ठ ४९, रंग निर्गंध गहिरा
इथे मातृत्वाचे भाव आहेत आणि दुसरीकडे दुःखाची गाथा आहे. आईपणात मातृत्वभाव आहे, तर बाईपणात वासना दडली आहे.
आई अन् बाई बघा
फुका झिजवते काया
वरवर बिलगते
हिला दुनियेची माया
-पृष्ठ ४६
ही शब्द मांडणी या अर्थाने ठळक वाटते. वात्सल्यभाव, जिव्हाळा, माया, प्रेमभावना, नात्यांची ओढ इत्यादी गोष्टी मातृत्वभावनेत आहेत तर बाईपणाच्या वासनेचे जग वेगळे आहे.
दारावरचा उंबराही अबोल झाला, तर करायचं काय ? मायेची ओल हरवली तर करणार काय ?अशावेळी केवळ अंतरीचा खोलभाव व्यक्त होत असतो. अनुभवांचे मुकेपण, जगण्यातले रितेपण, जन्मभराची कानातली कुजबुज, मनाचा रुसवा, उंबरठ्याचा वसा, धुळीतल्या पावलांचा हिशोब, वळचणीला पडलेली खेळणी, आठवणींचा पाचोळा, अशा असंख्य गोष्टींचा जाणवणारा पोरकेपणा आणि हळूहळू येणारा परकेपणा कवयित्रीच्या शब्दातून व्यक्त होत राहातो. भोवतालचे कठोर वास्तव, जगण्यातली अस्वस्थ तगमग वेगवेगळ्या प्रतिमांमधून येणारे धूसर विश्व, असंख्य जखमांचे ओझे पेलत स्रीदुःखाला प्रभावीपणे मांडले आहे. स्वतःला आणि स्वतःच्या सावलीलाही मिळुनच रहावे लागते. याचे चित्र मांडताना कवयित्री लिहीते –
माझी सावलीच अशी
रोज रोज भेटे मला
तिला टाळण्याचे असे
काय गवसले मला !
– पृष्ठ६३, याद
‘देहमूठ’मधल्या सर्व कवितांकडे नजर टाकल्यावर स्रीयांच्या सुखदुःखाची गाथा उलगडताना स्रीकवितेची अभिव्यक्ती चिंतनातून जशी येते तशी कधीकधी आत्मसंघर्षाचीही भाषाही मांडते. स्री म्हणजे दुःखाची भळभळती धारा, प्राचीन काळातल्या द्रौपदीचं दुःख असो किंवा आधुनिक जगातल्या स्रीयांचं दुःख असो, त्यात भारतीय स्री जीवनाचे कंगोरे टिपताना सोसण्याची ताकद ही आंतरिकताच आहे, याचे भाष्य करते.
आयुष्याचा एक समजुतदारपणा असावा लागतो. रोजच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या प्रत्येक प्रसंगात दुःखाची एक सावली असते. व्यक्तीगत दुःखापासून पुढे परिघापलिकडे जाऊन व्यक्त होणं, ही समाजदत्त दुःखाशी जोडलेली एक प्रक्रिया आहे. ही पल्लवी यांच्या कवितेत सातत्याने जाणवते. अंतर्मनात दबून राहिलेली स्वप्न, शब्दांचे थवे, खिडकीतून दिसणारे जग, जगाचा अवाका, यासर्वार्थाने स्रीचं नातं हुंदक्याशी, आसवांशी, नात्यांशी, रक्ताशी, अंधार – उजेडाशी व्यापक अर्थाने येते. आपला उंबराही अबोल झाला तर कुणाशी बोलायचं ? जगण्याचे अन्वयार्थ कुणाला विचारायचे ?
ऋणानुबंधाचे प्रहर कसे सांभाळायचे ? डोळ्यातल्या आसवांचं करायचं काय ? खिन्न अशा काळोखाचं आक्रंदन कुणाला सांगायचं ? असे अनेक प्रश्न स्रीजातीच्या अखंड दुःखदायी जगण्याचे आहेत. ‘देहमूठ’ संग्रहात या सगळ्यांचा येणारा संदर्भ स्रीजीवनाचा व्यापक पट मांडतो. कोवळ्या देठातली ऊबेची माया आणि डोळ्यातून पाझरणारी देहकाया माऊलीच्या जगण्याशी निगडीत येते, तशी ती संपूर्ण स्रीविश्वाला अधोरेखित करते.
कवयित्री पल्लवी परुळेकर – बनसोडे यांच्या ‘देहमूठ’ संग्रहानं आयुष्य आणि आशयाचा एक व्यापक पट मांडला आहे. स्रीव्यवस्थेचा एक समाजकोष मांडतानाच जगण्याच्या पेचातून स्रीमनाचा कोष कवयित्री उलगडते हे आशादायी चित्र आहे. चिंतनाची सकसता, अभिव्यक्तीची जाणीव, विचारांचे वेगळेपण, वर्तमानाशी जुळवून घेताना मनाचा ढवळून येणारा तळ जीवनाकडे बघण्याची डोळस दृष्टी देतो. असे असले तरीही सकस चिंतनाची, कवितेतून पोहोचवल्या जाणाऱ्या विचारसूत्राची व्यापक मांडणी अजूनही खोलवरच्या विचारातून येण्यासारखी कवितेची स्थिती आहे. शेवटी जीवनाचा अविरत शोध माणसाला अंतर्मुख करतो. ‘देहमूठ’मधील कविता अशा वाटेवरची कविता आहे. परिस प्रकाशनची संग्रह मांडणी उत्तम !
पुस्तकाचे नाव – ‘देहमूठ'(कविता संग्रह)
कवयित्री – डाॅ. पल्लवी परुळेकर – बनसोडे
प्रकाशन – परिस प्रकाशन, पुणे संपर्क ८२७५६९१४२७
प्रथमावृत्ती डिसेंबर २०२०
मूल्य : १४०, पृष्ठे : ८०
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.