भारताला परकीयांच्या जाेखडातून मुक्त करणाऱ्या स्वातंत्र्यवीरांचे जसे आपल्यावर अपार ऋण आहे. तसेच ऋण समाजातील दुष्ट प्रथांशी लढून त्यास निकाेप बनविणाऱ्या समाजसुधारकांचेही आहे. स्वातंत्र्यसैनिकांचा लढा परकियांशी हाेता. समाजसुधारकांचा लढा स्वकियांशी हाेता. दृष्टिकाेन, कार्यपद्धती यामुळे सक्षम समाजाची बांधणी हाेत राहिली. त्यांचा संघर्ष नव्या पिढीपर्यंत पाेहचविण्याची गरज आहे.सुनिताराजे पवार
प्रकाशक, संस्कृती प्रकाशन
काेषाध्यक्ष, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
माे. : 9823068292
महाराष्ट्रातील समाजसुधारणांचा विचार करताना स्त्रियांच्या सुधारणा हा विषय स्वतंत्रपणे हाताळावा लागताे. ‘अर्धे जग’ असलेल्या घटक दु:स्थितीत असताना आपण सुधारल्याचा दावा करूच शकत नाही. ‘न् स्त्री स्वातंत्रम् अर्हती…’ ही मनूच्या विचारांची घट्ट पकड अनेक शतके समाजमनावर इतकी खाेलवर घुसलेली हाेती की, त्यामुळे इथली स्त्री दुर्बल, धार्मिक, परंपरावादी आणि अज्ञान अंधकारात पिचत राहिली. देशावर सतत हाेणारी आक्रमणे, सतत हाेणाऱ्या लढाया, असुरक्षित आयुष्य त्यामुळे स्त्रीची कर्मठ चाैकट अधिक बंदिस्त झाली. बालपणी पिता, तरुणपणी पती, वृद्धापकाळी पुत्र यांच्यावरच अवलंबन यामुळे स्त्रीला स्वातंत्र्य म्हणजे काय ते कधी कळलेच नाही. धर्मशास्त्रांनी तिच्यावर टाकलेले पाश रूढींनी अधिकच आवळले. शक्तीची, धनाची, विद्येची देवता, आदीमाया मानली गेलेली स्त्री गुलामगिरीचे जीवन जगू लागली. इतके की तिची जगण्याची सत्ताच काढून घेतली. तिला कसलेच स्वातंत्र्य उरले नाही.
एकाेणीसावे शतक खऱ्या अर्थाने संक्रमणाचे शतक मानले जाते. सत्तांतराचे, नव्या जीवन जाणिवांचे, वैचारिक कलहाचे, सुधारणांचे शतक म्हणून या शतकाकडे पाहता येईल, महत्त्वाचे म्हणजे आत्मपरिक्षणाचे शतक असंही म्हणता येईल. रूढी, परंपरांचं आंधळेपणाने स्वीकार न करता त्यांना वैचारिकतेचे आव्हान देणारे शतक प्रबाेधनाचे शतक आहे.
इंग्रजी राजवटीच्या काळात इथली मुल्यव्यवस्था बुद्धीच्या, तर्काच्या, आधुनिकतेच्या निकषावर तपासण्याची आवश्यकता निर्माण झाली. सतीप्रथेसारखी प्रथा बंद करण्यासाठी राजा राममाेहन राॅय सारखे समाजधुरीण पुढे सरसावले. इंग्रजी राजवट जसजशी स्थिरावत गेली तसतसा देशाचा चेहरामाेहरा बदलू लागला. सर्व क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले. पाश्चिमात्य शिक्षणाचा फार माेठा परिणाम झाला. नवनव्या ज्ञानशाखा विकसीत झाल्या आणि अंधश्रद्धांना तडे जाऊ लागले. समता आणि स्वातंत्र्य महत्त्वाचे वाटू लागले. माणूस हा चिंतनाचा विषय झाला.
याच शतकात स्त्रीजातीच्या घडणीविषयी अतिशय परखडपणे मुलभूत प्रश्न उभे करणाऱ्या ताराबाई शिंदे यांच्या ‘स्त्रीपुरुषतुलना’ या माैलिक ग्रंथाने महाराष्ट्रातील बहुविश्व पुरुषसत्ताक व्यवस्थेला तडे दिले. त्या रूढ अर्थाने साहित्यिक नव्हत्या, स्त्री प्रश्नांच्या अभ्यासक नव्हत्या, पण स्त्री प्रश्नांच्या अभ्यासकांनीही थक्क व्हावे असे विचार त्यांनी व्यक्त केले आहे. केवळ 50 पानांचे पुस्तक लिहून साहित्यिक व स्त्री प्रश्नांचा अभ्यासक म्हणून महाराष्ट्रातल्या इतिहासावर स्वत:ची नाममुद्रा उमटवणारी ताराबाई ही एकमेव महिला आहे. समाजातील स्त्रीपुरुष विषमता पाहून त्यांनी त्या काळात मांडलेले विचार आजही स्त्रीअभ्यासकांना दिशादर्शक आहेत.
ताराबाई शिंदे
ताराबाईंचा जीवनकाल 1850 ते 1910 असा सांगितला जाताे. ताराबाई वऱ्हाड प्रांतातल्या बुलढाण्याच्या. आजचा विदर्भ. बुलढाण्यातील नामवंत मराठा घराण्यातील एक घराणे म्हणजे शिंदे घराणं. इथल्या प्रचंड माेठ्या वाड्याचे मालक बापूजी हरी शिंदे यांची तारा ही एकुलती एक कन्या. बापूजी शिंदे सत्यशाेधक समाजाचे सदस्य हाेते याशिवाय डेप्युटी कमिशनरच्या कार्यालयात हेड्नलार्कची नाेकरीही करीत. घरी भरपूर शेतीवाडी हाेती, मानाची नाेकरी, पुराेगामी सत्यशाेधकी विचार त्यांचे बंधू रामचंद्र हरी शिंदे जाेतिबा फुलेंच्या व्यवसायातील भागीदार. सत्यशाेधक समाजाच्या प्रभावाखाली असलेले बापूजी यांना चार मुलगे आणि एकुलती एक कन्या तारा. सत्यशाेधक समाजाच्या प्रभावामुळे त्यांनी मुलामुलीत फरक न करता तारालाही मुलांप्रमाणे शिक्षण दिले.
ताराबाई कुशाग्र बुद्धीच्या हाेत्या. घरची सुबत्ता, वडिलांमुळे सत्ता आणि सत्यशाेधक समाजाचे पुराेगामी विचार यामुळे प्रगल्भ वैचारिक जाण त्यांच्यात आली. वडिलांच्या त्या अतिशय लाडक्या हाेत्या. त्याकाळी इच्छा असली तरी मराठा समाजातील मुलगी लग्नाविना ठेवणे शक्य नव्हते. आपल्या लाडक्या ताराला सासरी पाठवण्याऐवजी त्यावर ताेडगा म्हणून वडिलांनी घरजावईच घरी आणला. आणि मुलीला नांदायला जाण्याची वेळच येऊ दिली नाही. सामान्य कुटुंबातील मुलाशी त्यांचे लग्न झाले. बालवयात ठीक हाेते, पण तरुणपणी दाेघांचे पटेना. सर्वसामान्य घरातील या मुलाला श्रीमंत आणि घरंदाज कुटुंबातील वागणं जमलं नाही. दाेघांचं पटेना. ताराबाईंना मुळात लग्नच करायचे नव्हते. अनिच्छेने झालेल्या या विवाहाचे संसारसुख त्यांना फारसे लाभले नाही. मुलही झाले नाही.
ताराबाई धाडसी, करारी हाेत्या. स्वत: शेतीवाडी पाहत. घाेड्यावरून काेर्टकचेरीत जात. शेतीची व्यवस्था बघत. उत्तरायुष्यात त्यांना वैधव्य प्राप्त झाले. पण इतर स्त्रियांप्रमाणे त्या सांदीचे खापर हाेऊन जगल्या नाहीत. त्यांचे वाचन खूप असावं. आजूबाजूच्या समाजाचे आकलन, स्वानुभव, इंग्रजांच्या आधुनिक विचारांचा पगडा, सत्यशाेधक समाजाचे संस्कार, वडिलांनी दिलेले स्वातंत्र्य यामुळे त्यांची वैचारिक बैठक पक्की हाेत गेली. अवतीभवती पाहिलेले स्त्रियांचे जगणे आणि स्वत:ला आलेले अनुभव यावर तिने चिंतन करायला सुरुवात केली. तिला जे दिसत हाेतं, ते पुरुषसत्ताक पद्धतीने स्त्रीवर लादलेली गुलामी. या आधीही स्त्रियांची दु:स्थिती मांडणारी एक महिला अर्थात ती युराेपियन महिला हाेती. तिने पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला हाेता.
मिसेस फरार
1835 मध्ये मिसेस फरार यांनी नाशिक येथे अकरा प्रकरणांचा, छपन्न पृष्ठांचा ग्रंथ लिहिला. ‘कुटुंबप्रवर्तननीती’ नावाचा हा ग्रंथ आधुनिक मराठीतील स्त्रीचा पहिला ग्रंथ म्हणून ओळखला जाताे.
मुलामुलींच्या संगाेपनातील भेद, मुलीला शिक्षण न देण्याची रूढी, सनातन समजूती व धार्मिक साधने यामुळे स्त्रीवर हाेणारा अन्याय, स्त्रीपुरुषात पक्षपात करणारी भारतीय वृत्ती याची विशेष दखल फरार यांनी घेतली. मुलींना शिकवू नये. या हटवादीपणाद्दल त्या आश्चर्य व्यक्त करतात. लहानपणी जिच्या हातात मुलं जास्त काळ असतात, तिच्याचकडे त्यांना बऱ्यावाईटाची तालीम मिळते. ती अज्ञानी राहून कसे चालेल? मुलांप्रमाणे मुलींवर प्रेम करा त्याने तुमचे प्रेम कमी करणार नाही. प्रबाेधनाची सुरुवात हाेत असतानाच अगदी सुरुवातीच्या काळात ‘दर्पण’ बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केले. दर्पण 1832 ला सुरू झाले आणि 1835 ला मिसेस फरार यांनी दर्पणमधून विचार मांडलेत. हिंदू समाजातील जातीबद्दलचे ठाम पूर्वग्रह, पुरुषांची स्त्रियांवर अकारण दाेषाराेप करण्याची प्रवृत्ती आणि स्त्रीशिक्षणास असलेला विराेध यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. याउलट ‘मनाला रमवण्यासाठी याेग्य विषय दिले नाहीत तर ते अयाेग्य विषयाकडे रमेलच रमेल.’
एका ख्रिश्चन स्त्रीने भवताल न्याहाळत मांडलेले हे विवेचन स्त्रीशिक्षण आणि समाजसुधारणा यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
मुक्ता साळवे
पुढे महात्मा फुले यांनी 1948 मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा काढली. त्यासाठी त्यांना आपले घर साेडावे लागले. सावित्रीबाईंना शिक्षण देऊन त्या पहिल्या शिक्षिका-मुख्याध्यापिका झाल्या, त्यांचीच एक विद्यार्थीनी मुक्ता साळवे. अवघ्या 14 वर्षांची, मांग समाजाची. तिने मांग – महारांच्या दु:खाविषयी निबंध लिहिला. पुढे ताे 15 फेब्रुवारी 1855 आणि 1 मार्च 1855 च्या ज्ञानाेदयच्या अंकात ताे प्रसिद्ध झाला. आपल्या स्वजातीचे हाल पाहून अत्यंत कळवळून नि:पक्षपणे तिने आपले विचार प्रकट केले आहेत. त्यात स्त्रियांचे दु:खही तिने मांडले आहे. ही घटना अभूतपूर्व म्हणावी लागेल. ज्या काळात ‘दलित साहित्य’ या परिभाषेचे स्वप्नदेखील पडणे शक्य नव्हते. त्या काळात एका शाळकरी मुलीने दलित वैचारिक साहित्याची निर्मिती केली ही लक्षणीय कामगिरी म्हणावी लागेल. शिवाय सर्व समाजात स्त्रीशाेषण असते त्याची व्याप्ती जातीनुसार बदलते असेही याठिकाणी लक्षात येते.
पार्श्वभूमी
या दाेन स्त्रियांनी वैचारिक गद्य लेखनाची स्त्रियांकरिता पायाभरणी करून ठेवली. ताराबाईंचे पुस्तक त्यानंतर 1882 मध्ये प्रकाशित झाले. जवळपास 28 वर्षांनंतर माैनानंतरचा स्वर त्यांचा लेखनात उमटला. स्त्रीविषयी असलेला आत्यंतिक पाेटतिडकेतून त्यांनी ‘स्त्रीपुरुष तुलना’ या ग्रंथाची मांडणी केली. अर्थातच हा ग्रंथ लिहिण्यामागे ‘विजयालक्ष्मी’ खटल्याची पार्श्वभूमी हाेतीच. ताराबाईंना मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजीचे उत्तम ज्ञान हाेते. कादंबरी, ललितगद्य, पुराणग्रंथ याच्या वाचनाबराेबर त्या नियमित वृत्तपत्रे वाचत असत. गुजरातमधील विजयालक्ष्मी खटल्यातील राेजच्या बातम्या, चर्चा त्या वाचत हाेत्या.
विजयालक्ष्मी खटला
1881 मध्ये विजयालक्ष्मी नामक विधवेने आपल्या नवजात अर्भकाचा खून करून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. या आराेपावरून तिला फाशीची शिक्षा झाली. सुरतजवळील उल्पर या गावची विजयालक्ष्मी एकाेणीसाव्या वर्षी विधवा झाली. चाेवीसाव्या वर्षी ती गराेदर असावी, असा संशय गावच्या पटेलाला आला आणि झाडीत मूल सापडलं. संशयित म्हणून विजयालक्ष्मीला अटक झाली. तिने गुन्हा कबूल केला. तिला फाशीची शिक्षा झाली. जगासमाेर नाचक्की हाेईल आणि जगणं मुश्किल हाेईल या भयाने तिने हा निर्णय घेतला. न्यायालयाने तिला अपराधी ठरवले. पण ज्याच्यामुळे हे घडले, तिची फसवणूक झाली, या मुलाचा बाप काेण हाेता. याबाबत कुठेही अवाक्षर निघालं नाही. स्त्रीने समाजाच्या नियमांचा भंग केल्यास सर्व पुरुषनिर्मित व्यवस्था तिच्या विराेधात कृती करतात. तिला दाेषी ठरवतात. तिला आपलं मुल मारताना काय वेदना झाल्या असतील, कुटुंबाचा काय धाक असेल, समाजाचा केवढा हबका असेल याबाबत कमालीची असंवेदनशीलता दिसली. नेमकी हीच गाेष्ट ताराबाईंनी हे पुस्तक लिहिण्यासाठी महत्त्वाची ठरली.
‘स्त्रीपुरुषतुलना’ हे मराठीतील पहिले असे लेखन आहे ज्यात एक स्त्री धीटपणे, सुसंगतपणे, तर्कशुद्ध रीतीने परखड शब्दात स्त्रीपुरुष नात्याविषयी व तिच्या अखंड शाेषणाविषयी पुरुषाला सरळ प्रश्न विचारते आहे. विजयालक्ष्मी खटला 1881 चालला त्याच दरम्यान त्यांनी लेखनास प्रारंभ केला आणि 1882 मध्ये पुण्यातील शिवानी छापखान्यात हे पुस्तक छापले गेले. पुस्तक प्रकाशित हाेताच तत्कालिन समाजात एकच खळबळ उडाली. स्त्रियांच्या व्यथा वेदनावर वाचा फोडणाऱ्या या ग्रंथावर सनातनी विचारांच्या लाेकांनी प्रचंड झाेड उठवली. सत्यशाेधक समाजाचे कृष्णराव भालेकर यांना ताराबाईंच्या लेखनातील तिखटपणा झाेंबला. त्यांनी या पुस्तकावर प्रतिकूल अभिप्राय दिला. ते
महात्मा फुलेंचे सहकारी हाेते. महात्मा फुलेंनी मात्र ताराबाईंचे मनापासून काैतुक केले. ताराबाईंच्या विचारांची माैलिकता, प्रज्ञेची तीष्णता, अभिव्यक्तीची सहजता फुलेंनी ओळखली.
तरीही हे पुस्तक पुढची शंभर वर्षे गायब राहिले. न्या. रानडे यांनी केलेल्या साठ पुस्तकाच्या सूचीतही उल्लेख नाही. त्यांच्या समकालीनांनी फारशी नाेंद घेतली नाही. हे क्रांतीकारक विचारांचे पुस्तक नष्टच व्हायचे. पण ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’चे पहिले संपादक स. ग. मालशे यांनी या पुस्तकाचा शाेध लावला. सत्सार अंक -2 मध्ये महात्मा फुलेंनी स्त्रीपुरुषतुलनाचा गाैरव केला हाेता. हे पुस्तक काेठे मिळेल अशी रुखरुख त्यांना हाेती. दाते सूचीमध्ये पुस्तकाचे वर्णन आढळले. ‘शिंदे ताराबाई, स्त्रीपुरुष तुलना, बुलढाणे’ (श्री शिवाजी मुद्रणालय, पुणे 1882, पृ. 6 + 49, कि. 9 आणे, स्त्री व पुरुष यात साहसी काेण हे स्पष्ट करून दाखवण्याकरिता निंध संदर्भ मिळाला.) पण पुस्तक मिळाले नाही.
पुण्यातील पुस्तक विक्रेते पां. रा. ढमढेरे यांच्याकडे ते मिळाले. त्यांनी ते अधाशासारखं वाचून काढलं. अगदी क्रांतीकारी, तिखट, झणझणीत, मिरच्या झाेंबाव्या तसे विचार थेट फुल्यांच्या लेखनासारखी शैली. मालशेंना वाटलं. फुल्यांनीच नाव बदलून ताराबाई शिंदे हे मराठा स्त्रीचे फसवे नाव धारण केले की काय? त्यांनी बुलढाण्यास पत्र टाकून माहिती मिळवली. तेव्हा त्यांना ताराबाईविषयी बरीच खुलासेवार माहिती मिळाली. तरीही त्यांच्याविषयी अधिक माहिती उपलब्ध नाही. शेवटी 1975 ला स. ग. मालशे संपादित यथामूल आवृत्ती उपलब्ध झाली.
प्रस्तावना :
ताराबाईंना हा निबंध लिहिताना स्त्रीपुरुष दाेघांनाही कमीजास्त ठरवायचं नाही. मुळात त्यांचा हेतूच त्यांनी आपल्या प्रस्तावनेत सुरुवातीलाच मांडलाय, ‘‘ज्या परमेश्वराने ही आश्चर्यकारक सृष्टी उत्पन्न केली, त्यानेच स्त्रीपुरुष निर्माण केले. तरी सर्व प्रकारचे साहस, दुर्गुण स्त्रियांचेच अंगी असतात किंवा जे अवगुण स्त्रियांचे अंगी असतात तेच पुरुषात आहेत किंवा नाहीत हे अगदी स्पष्ट करून दाखवावे याच हेतूने हा लहानसा निबंध मी माझ्या सर्व देशभगिनींचा अभिमान धरून रचिला आहे. यात अमूक जाती किंवा कुळ याकडे माझे मुळीच लक्ष नाही.’’
ह्या लेखनाचा उद्देश पुरुषांचे दाेष काढणे हा नसून स्त्रियांचे गुण दाखवणे हा आहे. परंपरेने झाकलेले त्यांचे गुण समाेर आणणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे. आपल्या लेखनाबद्दल त्या असेही म्हणतात, तीन पानांची प्रस्तावना आणि एकाेणपन्नास पानांची निबंध अशी या पुस्तकाची मांडणी आहे.
निबंधाच्या प्रस्तावनेतच पुरुषी व्यवस्थेचे साटेलाेट त्यांनी अत्यंत निर्भिडपणे समाेर आणले आहे. त्या म्हणतात, ‘‘तरी मी निरंतर मऱ्हाठमाेळ्याचे अटकेतली गृहबंदी शाळेतील मतिहीन अबला असून हा माझा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे या निबंधात असंगत व तुटक मजकूर अगदी मऱ्हाठशाई जाडी भरडी व अतिशय कडक भाषा असते, पण राेज पुरुषांचे साहस, धाडस व दगाबाजीचे नित्य नवी भयंकर उदाहरणे दिसून येत असतानाही तिकडे काेणीच लक्ष न देता स्त्रियांवरच सर्व दाेषांची गाेणी लादतात, हे पाहून स्त्री जात्याभिमानाने माझे मन अगदी खळबळून तळमळून गेले. त्यामुळे मला निर्भीड हाेवून असेच खडखडीत लिहिण्यावाचून राहवेना. तुम्ही एकासारखे सगळेच दगाबाज, कपटी आहात, तेव्हा तुम्ही एकमेकांचे झाकून नेता ते उघडे करून दाखविण्याला याच्याहीपेक्षा कडक जर दुसरे शब्द अगर भाषा असती तर मी देखील मी वाकडीतिकडी लिहिलीच असती. परंतु मी पडले गाैणपक्षाची.’’
स्त्री आणि पुरुष या दाेघांचीही निर्मिती परमेश्वराने परस्परपूरकच केलेली आहे. एकाशिवाय दुसऱ्याच्या अस्तित्वाला अर्थच उरत नाही. दाेघांचेही अस्तित्व सारखेच महत्त्वाचे आहे. स्त्रीविरहित पुरुषाला तुम्ही सर्व प्रकारची सुख उपलब्ध करून दिलीत तर त्याला अर्थ ठरणार नाही, असे ताराबाई म्हणतात. सर्व ऐश्वर्याने भरलेला राजवाडादेखील स्त्रीशिवाय निव्वळ भूतखाना वाटेल. स्मशानावत् वाटेल. सीताविरहित रामचंद्राचे दर्शन अगस्तीनेदेखील घेतले नाही. जेव्हा सीता रावणाने पळवून नेली तेव्हा हा जगन्नायक देखील केविलवाणा हाेऊन हाय हाय करायला लागला. दिनवाणा, भिकारी हाेऊन अरण्यात रडत फिरायला लागला. हे ऐकले म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाशिवाय पुरुषाला अर्थ नाही.
स्त्रीपुरुषतुलना-
त्यांचं म्हणण इतकंच आहे, ज्या परमेश्वराने दाेघांना निर्माण केलंय ताे फक्त स्त्रियांनाच अवगुण का देईल, त्यांच्यात दुर्गुण आहेत. तुमच्यात नाहीत हे सिद्ध करून दाखवा. आजुबाजूच्या स्त्रियांवर हाेणारे अन्याय, अत्याचार त्यांना सहावत नाहीत. त्यांनी या मागची कारणंही शाेधली आहेत. त्यांच्या लेखनात दाेन प्रकारच्या स्त्रिया येतात.
1) विवाहित
2) विधवा
विवाहित स्त्रिया-
त्याकाळी बालविवाह हाेत असतं. मुलींना बालपण कधी उपभाेगताच येत नव्हते. बालवयात लग्न झाल्यानं तिच्या पसंती ना पसंतीचा प्रश्नच नव्हता. नवरा कसाही असाे त्याला परमेश्वर मानून त्याची सेवा करणे एवढंच तिच्या जगण्याचे उद्दिष्ट हाेते. हाच तिचा स्त्रीधर्म.
स्त्री धर्माची व्याख्या ताराबाई सांगतात, निरंतन पतीची आज्ञा पाळणे, त्याच्या मर्जीप्रमाणे वागणे, त्यांनी लाथा मारल्या, शिव्या दिल्या, दुसरा रांडा ठेवल्या किंवा नवरुजी दारू पिवून, जुवा खेळून, चाेरी करून, काेणाचा प्राण घेऊन, फितूर, चहाडी, खजिना लुटून लाच खाऊन जरी घरी आले तरी स्त्रियांनी आपले हे काेणी जसे काही कृष्णमहाराजच गाैळ्याचे दही दुध चाेरून चंद्रावळीला कलंक लावून आलेत असे समजून परमात्म्यासारखीच यांची माेठ्या हसत मुखाने देवासारखी पूजा करावी, सेवेत हजर रहावे हा स्त्रीधर्म !
अत्यंत उपराेधिकपणे त्या म्हणतात, पतीने लाथ मारली तरी म्हणावे ‘नका पतीराया मारू हाे, तुमचे पाय दुखतील.’ लगेचच लाथमाऱ्याचे पाय रगडीत बसावे. बरं एवढं करूनही तिची चिमूटभर धान्यावरही सत्ता नाही. पतीनिष्ठा, आज्ञापालन, सेवापारायण, त्याग, समर्पण ही तिच्या आयुष्याची इतिकर्तव्यता !
तत्कालीन समाजात स्त्रीच्या बाबतीत पारंपारिक मूल्यकल्पना म्हणजे तिचे पातिव्रत्य! स्त्रीवर सता प्रस्थापित करण्यासाठी पतिव्रता कल्पनेची विचारप्रणाली ङ्खारच उपयुक्त ठरावी पुराणातही अनेक कथानके स्त्रीच्या पातिव्रत्याशी जाेडली गेली. सीता, अहिल्या, द्राैपदी, तारा, मंदाेदरी या पंचकन्या ज्यांना मूर्तीमंत पातिव्रत्य म्हणून पूजले त्यांच्यात पक्षपात झाला. त्या प्रसंगात देवांनी त्यांच्या कमकुवत बाजू सावरताना पतिव्रतेचा दर्जा दिला. पातिव्रत्याचा गाैरव सर्व धर्मग्रंथकारांनी केला. काया, वाचे, मन पतिशी निष्ठेने वागणारी स्त्री साध्वी मानली गेली. एकाेणीसाव्या शतकात पातिव्रत्याच्या कल्पनेचे उदात्तीकरण करण्यात आले. त्यामुळे पत्नीकडे दास्यत्व तर पतीकडे स्वामीत्व आले.
स्त्रियांनी वरीलप्रमाणे पातिव्रत्याचे नियम पाळावेत असे वाटत असले तर पुरुषांनीही तसेच वागावे अशी रास्त अपेक्षा ताराबाई व्यक्त करतात. ‘‘जर बायकाेला नवराच देव; तर नवऱ्याची वागणूक देखील देवाप्रमाणे पाहिजे. बायकांनी भक्ताप्रमाणे जशी भक्ती करावी तशी नवऱ्यानेदेखील त्याजवर देवाप्रमाणे ममता करून त्यांचे सुख:दुख जाणावे की नाही.’’
देवांनीही आणि ऋषीमुनींनीही आपल्या बायकांशी काही फार चांगला व्यवहार केलेला नाही. धृतराष्ट्र आंधळा हाेता म्हणून गांधारीने डाेळ्यावर आयुष्यभर पट्टी बांधली. जणू काय तेव्हापासून स्त्री जातीच्या अंध पतिभक्तीलाच सुरुवात झाली.
स्त्री पुरुषावर प्रेम करते ते त्याची बेज्जती हाेऊ नये म्हणून जपते. त्याच्या नावाला बट्टा लागू नये म्हणून काळजी घेते. स्त्रीला अबला म्हणणारा पुरुष स्त्रीशिवाय सक्षम आहे काय ? स्त्रीच्या पाेटी जन्म घेतल्याशिवाय आणि तिचेच अमृत पिल्याशिवाय काेणत्यातरी पुरुषाची वाढ झाली आहे का? पुरुषाच्या जडणघडणीत एवढा वाटा असलेल्या स्त्रीच्या वाट्याला पुरुषाने काय दिले. आजन्म बंदिवास, गुलामगिरी आणि लाचारीचे जिणे.
लग्नानंतर एखाद्या बाईचा नवरा मेला तर तिला अपशकुनी, पांढऱ्या पायाची म्हटले जाते. तिच्या आयुष्याचे धिंडवडे काढले जातात. आता बायकाेआधी नवऱ्याने मरावे किंवा नवऱ्याआधी बायकाेने मरावे, याचा काय कुणी परमेश्वराकडून दाखला आणला हाेता काय ? असा खडा सवालही ताराबाई विचारतात. कुणाला केव्हा मरण येईल ते का सांगता येते ? मरण काय वय, वैभव, जात – पात, पाहून येते काय ? ते आले की कुणालाही जावेच लागते ! ताे ईश्वराघरचा मळा आहे. तेथे स्त्रीचे काेण ऐकताे ? असे असेल तर पुरुषाच्या मरणाला स्त्रीला का कारण धरले जाते ? असे अनेक तर्काला पटणारे प्रश्न ताराबाई विचारतात.
जिथे रामाचे काही चालले नाही या तर गरीब स्त्रिया ! शिवाय न आवडता नवरा असला तरी त्या मरणाची अपेक्षा करणार नाहीत कारण विधवेची स्थिती पाहून त्यापेक्षा मरण परवडले. एखादी स्त्री विधवा झाली की बाईचे हाल कुत्रा खात नाही.
ताराबाई म्हणतात, ‘‘माथ्यावरील एकदा सर्व कुरळे केसावर नापिकाचा हात फिरला म्हणजे तुमचे डाेळे थंड झाले. सर्व अलंकार गेले. सुदंरपण गेले. सारांश, तिला सर्व तऱ्हेने उघडी करून देशाेधडी केल्याप्रमाणे नागवून सांदीचे खापर करावयाचे. तिला काेठे लग्नकार्यात, समारंभात, जेथे काही साैभाग्यकारक असेल तेथे जाण्याची बंदी, ती बंदी का? तर तिचा नवरा मेला. ती अभागी, करंट्या कपाळाची. तिचे ताेंड पाहू नये. अपशकुन हाेताे. मग ही विशेषणे तिला! अरे पण तिचा पती मेला. नाही काेण म्हणताे? पण ताे तिने का मारिला?’’
ताराबाई म्हणतात, ‘‘एकदा साैभाग्य गेले म्हणजे स्त्रियांनी आपली ताेंडे अगदी एखाद्या महान खुन्यापेक्षाही महाजबर अपराध्याप्रमाणे काळी करून सर्व आयुष्यभर अंधारकाेठडीत रहावे. नवरा मेला त्यात बाईची काय चूक ? देवाजवळ या नवऱ्याला लवकर न्याहाे. असा काही तिने अर्ज केला हाेता?’’ असाही खाेचक प्रश्न त्या विचारतात. जाे नियम स्त्रीला ताे पुरुषाला का नाही. ताे काही दाढीमिशी भादरून अंधारात का बसत नाही.
जशी सावित्री सत्यवानाच्या प्राणासाठी यमाकडे गेली तसा काेणी बायकाेच्या प्राणासाठी गेला आहे का? उलट त्याला दुसऱ्या लग्नाची घाई! बायकाे नवऱ्याबराेबर सती जाते. तसा बायकाेबराेबर कुणी ‘सता’ गेला का? कधीच नाही. तरीही स्त्रीलाच सारे दाेष का? काेणत्याच गाेष्टीसाठी पुरुष जबाबदार नाही.
विधवा पुनर्विवाह
स्त्रीपुरुषतुलना या ग्रंथाचा प्रारंभच मुळी स्त्रियांच्या दुष्कृत्याबद्दल जे बोलले जाते त्याच्या मुळाशी जे आहे ताे महाअनर्थ मिटवून टाकायला पुढे काेणी येत नाही या विषयाने हाेते. बालविवाह हाेत असल्याने अनेक स्त्रिया बालपणीच विधवा हाेत. नैसर्गिक वासनांच्या पूर्तीची गरज ती अनैसर्गिकपणे दाल्यास हाेणारे अनीतीकारक वर्तन हे स्त्री आणि पुरुष दाेघांमध्येही तितकेच आहे. या सगळ्यांचा दाेष मात्र ङ्खक्त स्त्रीवर टाकला जाताे. हे घडायचे नसेल तर पुनर्विवाहाला परवानगी दिली गेली पाहिजे.
ताराबाई म्हणतात, ‘‘दुसरे लग्न करण्याची चाल जर चालू ठेवली असती तर त्या राज्याला दुप्पट बळकटी येऊन लक्षावधी लहान लहान मांडलीक राज्य, जहागिरी, इनामे, देशमुख्या वगैरे बुडून आपला देश भिकारी झाला नसता. कित्येकांना औरस वारस नसल्यामुळे त्यांची सर्व जिनगी सरकारी खजिन्यात जाऊन पडली. कित्येक बायका बाेडक्या झाल्या. त्यांचा बाजार पाहायला काेणीच नाही.’’
इंग्रज सरकारने दत्तक वारस नामंजूर करून संस्थाने ताब्यात घेतली. ही राजकीय परिस्थिती आपल्या बाैद्धिक सामर्थ्याने ताराबाई आपल्या समाेर मांडतात.
पुनर्विवाहाच्या बाबतीत त्या पुराणांचेही दाखले देतात. पराशराबराेबर संंध येऊन सत्यवतीस मुलगा झाला त्यानंतर तिने शंतनूबराेबर लग्न केले. कुंतीलाही काैमार्यदशेत कर्ण झाला. तिचाही विवाह पंडूबराेबर झाला. म्हणजेच पुनर्विवाह झाला. रामाच्या सल्ल्याने तारेचा सुग्नीबराेबर दुसरा विवाह झाला हाेता. ही सारी उदाहरणे पुनर्विवाहाची असल्याचे त्या नाेंदवितात. मग अलीकडेच पुनर्विवाहाला का बंदी ? असा त्यांच्यासमाेरचा प्रश्न आहे आणि पुनर्विवाहाला परवानगी मिळाल्याशिवाय आपला समाज सुधारणार नाही, स्त्रियांची दु:खे कमी हाेणार नाहीत, हे त्या आवर्जून नाेंदवितात. पुढे एका ठिकाणी हा मुद्दा त्यांनी आणखी व्यापक दृष्टीने म्हणजे भारतीय दुर्दशेच्या पातळीवर मांडला आहे.
बाहेरून कमावून आणण्याचं काम पुरुष करत असला तरी त्याचा नीट विनियाेग करण्याचं काम स्त्रियाच करतात. घराचं व्यवस्थापन ही काही साेपी गाेष्ट नाही, पण त्याचंही श्रेय त्यांना नीट दिलं जात नाही. ताराबाई म्हणतात, पुरुषानं त्यांच्या कामाचं थाेडं तरी काैतुक केलं तरी स्त्रिया किती सुखावून जातील. त्यांना किती आनंद हाेईल. पुरुष तसं करत नाहीत. काैतुकाच्या भुकेल्या असलेल्या स्त्रियांची भूक भागविली जात नाही. त्यांना कायम दूषणं दिली जातात.
स्त्रियांना पुष्कळ तऱ्हेचे दाेष दिलेले वाचण्यात व राेजच्या वहिवाटीत ऐकू येतात. पण जे दाेष स्त्रियांचे अंगी आहेत तेच पुरुषांत अजिबात नाहीत काय? जशा बायका लबाडी करितात तसे पुरुष करीत नाहीत काय ? चाेरी, शिंदळकी, खून, दराेडे, दगाबाजी, सरकारी पैसा, लांच खाणे, खऱ्याचे खाेटे, खाेट्याचे खरे करणे, यातून एकही अवगुण पुरुषात नाही काय ?
असा खडा सवाल ताराबाईंनी विचारला आहे. भर्तृहरीने त्रिशतकात एक श्लाेक देऊन त्यात स्त्रियांवर लावलेल्या सर्व दाेषांचा प्रतिवाद आपल्या पुस्तकाच्या उत्तरार्धात ताराबाईंनी केलेला आहे. या श्लाेकात स्त्रियांवर नऊ आराेप ठेवण्यात आले.
1) स्त्रीरूप यंत्रामध्ये जारणमारणापेक्षा बलिष्ठता आहे.
2) स्त्रिया अनेक संशयाचा परिभ्रम भाेवरा आहेत.
3) स्त्रिया उद्धटतेचे केवळ गृहच आहेत.
4) स्त्रिया अविचार कर्माचे आगर आहेत.
5) स्त्रिया सकल दाेषांचे निधान आहेत.
6) स्त्रिया शतश: कपटांनी व्यापलेल्या आहेत.
7) स्त्रिया दुर्गुणांचे उत्पत्तीस्थान आहेत.
8) स्त्रिया म्हणजे स्वर्गद्वाराचा नाश करणारे यमनगरीचे द्वारच आहेत.
9) स्त्रिया म्हणजे सर्व कपटलीलांनी असे पात्र.
या आराेपांचे त्या खंडन करतात.
1) स्त्रीपेक्षा बलिष्ठतेत पुरुषाचाच क्रमांक वरचा असताना स्त्रियांवर असा आक्षेप घेणे म्हणजे निव्वळ द्वेषबुद्धीचाच भाग आहे.
2) स्त्रियांच्या मनात अनेक संशय असतात. त्या अशिक्षित आहे, त्यांच विश्व मर्यादित आहे. तुमच्या दगाबाजीला तर अंतच नाही. पुरुषांनी वर्षानुवर्षे ज्ञानाचे किरण स्त्रियांपर्यंत पाेहाेचूच दिले नाहीत. त्यामुळे त्या अज्ञानाच्या अंधारात तशाच खितपत पडल्या. बाहेर ज्ञानाच्या प्रकाशाच्या जगात काय चालले आहे त्याचा पत्ताच पुरुषांनी यांना लागू दिला नाही.
3) हा आराेप तर अतीच आहे. यात आपली जाती काय कमी आहे. स्त्रियांना उद्धट म्हणणे म्हणजे अतीच झाले. कारण स्त्रिया नम्रतेचा आणि शालीनतेचा आदर्श असतात.
4) अविचार – स्त्रियांचेच हातून अविचार घडतात? आणि तुम्ही पाजी, बेईमान भरवसा देऊन केसांनी गळा कापणारे जे तुम्ही त्या तुमच्या हातून कधीच अविचार हाेत नाही? स्त्रिया तर गाेठ्यातील म्हशीप्रमाणे मुर्ख त्यांना ना लिहिणे ना वाचणे, म्हणून का ईश्वराने यांना काहीच बुद्धी दिली नसेल काय? तरी त्या अविचारी असूनही तुमच्यापेक्षा बऱ्या, पण पुरुष तर शहाणे ना पण इकडे कारागृहात जावून पाहावे ताे पाय ठेवण्यासदेखील जागा मिळत नाही. इतकी तेथे आपल्या देशबांधवांची दाटी असते. स्त्रियांची संख्या पहा. ती बिचारी प्रेम करणारा नवरा मिळाला तर झाेपडीतही सुखी राहतात.
5) स्त्रिया सकल दाेषांचे निधा – याला तर पुरुषच जबाबदार आहे.
वडील आपल्या मुलीला संपत्ती व पैसा पाहून मुलीला म्हाताऱ्याच्या हवाली करतात. ऐन तारुण्यातच ती विधवा हाेते. ती जर दाेषपूर्ण वागली तर चूक कुणाची?
काही मुली सवतीवर देतात. पुरुष दाेघींना समान वागणूक देत नाही. अशावेळी तिच्या हातून चूक घडली तर दाेष कुणाचा. काही ठिकाणी जाेड विजाेड असताे, पुढे त्यांचे पटत नाही. संसार माेडताे. त्यापेक्षा आधीच नीटनेटका नवरा बघून दिला तर हे घडणार नाही. तुम्हाला जशी वाईट, कुरूप, दुर्गुणी, घाणेरडी, गांवढळ बायकाे आवडत नाही, तसा बायकाेला तरी या मासल्याचा नवरा आवडेल का? जशी तुम्हाला बायकाे चांगली पाहिजे, तसा तिला चांगला नवरा नकाे का?
6) कपट – कपट तर पुरुषाच्या मनात असते. गाेसावी, ङ्खकीर, हरदास, ब्रह्मचारी, साधू, दुधाहारी, गिरीपुरी, भारती, नानक, कानङ्खाटे, जाेगी, जटाधारी, नंगे इत्यादी साेंगे घेऊन जगाला फसवत फिरणाऱ्या काय स्त्रिया आहेत काय? ही सर्व साेंगे तर पुरुषच घेतात ना?
7) दुर्गुण – दुर्गुणांची उत्पत्ती तर पुरुषापासून हाेते. दारू पिणे, जुवा खेळणे, रांडा ठेवणे इ. वाईट आणि घाणेरडी आचरणे तुम्ही करता. असा आराेप ताराबाई करतात. स्त्रियांना भुलवून, ङ्खसवून घराबाहेर काढता. तिला ङ्खूस लावून भ्रष्ट करून अंगाशी आल्यावर नामानिराळे हाेतात. मग तिला रांड हाेण्याशिवाय पर्याय नाही. ‘रांडाची काही खाण नाही.’
8) स्त्रीजाती यमनगरीचे द्वार – तुम्हाला जन्म देणारी स्त्रीच ना? आईचं महत्त्व सर्व जगाने आणि प्रत्यक्ष परमेश्वरानेही मान्य केले आहे. तिची सेवा केली तरी स्वर्गद्वार प्राप्त हाेते. ती यमनगरीचे द्वार कशी? परखड सवाल.
9) कपट लीलायुक्त – कुणाची जहागिरी, राजपट तर आपल्या मित्राच्या पत्नीवरही डाेळा ठेवणारे ठक तुम्ही स्त्रियांना कपटी कसे म्हणू शकता?
याच आक्षेपाचा प्रतिवाद करताना यानंतर सुरू हाेते ती ताराबाईंची, त्यांच्या समकालीम वाङ्मयाची स्त्रीवादी समीक्षा. मराठीतली ही अशी प्रकारची चिकित्सा पहिलीच आहे.
ताराबाईंचे वाचन
ताराबाईंचे वाचन अफाट हाेते. त्यांनी समकालीन एक कथा संग्रह, एक नाटक, आणि दाेन कादंबऱ्यांची चिकित्सा केली आहे.
1) स्त्रीचरित्र – रामाेजी गणाेजी
या पुस्तकावर त्यांनी बीभत्स, शृंगारिक लेखनाचा आराेप केला आहे. यात दाखवल्याप्रमाणे अशा स्वरूपाचा व्यभिचार स्त्रिया करणं शक्य नाही.
2) मंजुघाेषा – नाराे सदाशिव रिसबूड
मनाेरंजनपर, कपाेलकल्पित कादंरीवर ताराबाईंनी सडकून टीका केली आहे. स्त्रियांचे अस्वाभाविक दर्शन आणि विज्ञानाचा अत्नर्य उपयाेग आणि बुद्धीला न पटणाऱ्या गाेष्टी या सगळ्याचा वास्तवाशी काहीही संंध नाही असे त्या म्हणतात. बापाला फसवणारी मंजुघाेषा त्यांना पटत नाही.
3) मुक्तामाला – लक्ष्मण माेरेश्वर हळबे
मुक्तामाला ही माेठ्या कुलवंत सरदाराची मुलगी. दृष्ट भद्राक्ष तिचे हाल वनवास करून तिला निबीड अरण्यात ठेवताे. तिचा पती कारावासात आहे. हालअपेष्टातही तिने स्त्रीधर्म साेडला नाही, पण तरीही पुरुष शक्तीपुढे स्त्री मुंगीप्रमाणे निर्बल आहे. हेच त्यांना सांगायचे आहे.
4) मनाेरमा – महादेव बाळकृष्ण चितळे
या नाटकातील सर्व निरीक्षणे, प्रसंग आणि विचार ताराबाईंना पटत नाही. याशिवाय रामायण-महाभारतासारखी पुराणं, रामविजय, हरीविजय, पांडवप्रताप, मराठ्यांचे इतिहास, इंग्रजी, उर्दू वाङ्मयाचं अवलाेकन, अकर-बिरबलाच्या कथांची आणि इसापनीतीच्या गाेष्टींची पुस्तकं, समकालीन कथा-कादंऱ्या-नाटकं (‘मुक्तामाला’, ‘मंजुघाेषा’, ‘मनाेरमा’), नियतकालिकं आणि वृत्तपत्रं, संस्कृत ग्रंथ इत्यादींचे उल्लेख त्यांच्या लेखनात सतत आलेले आहेत. उल्लेख केल्याच्या दहापट जास्त त्यांचं प्रत्यक्ष वाचन नक्कीच असेल.
Join Us : फेसबुक पेज लाईक करा - इये मराठीचिये नगरी । Follow Twitter - इये मराठीचिये नगरी ।
ताराबाईंच्या लेखनाचं काैतुक करण्याचं आणखी एक कारण म्हणजे भल्या माेठ्या दगडी वाड्याच्या आत गाेष्यात राहणारी, मराठा समाजातील एक स्त्री एवढं जहाल, वैचारिक, तात्त्विक लेखन कसं करू शकते. शिवाय बुलढाण्यासारख्या त्यामानाने आडगावी. पुण्या-मुंबईत हे लेखन झाले असते तर अनेक चळवळींचे माहेरघर, प्रसिद्धीमाध्यमांचे केंद्र म्हणून समजून घेतले असते. पण वऱ्हाडसारख्या मागास प्रांतात केलेले हे लेखन ही माेठी नवलाची गाेष्ट हाेती. त्या काळी मराठा समाजातील स्त्रियांचे क्षेत्र चुल आणि मूल यापलीकडे नव्हते. शिवाय परंपरेने विंलेले संस्काराच्या बेड्या ताेडून अत्यंत जहाल आणि सप्रमाण विचार मांडणं हीसुद्धा कसाेटीच हाेती. एवढे ग्रंथ कुठून जमा केले असतील. त्यावेळी त्यांनी केलेली स्त्रीपुरुष तुलना, स्त्री-पुरुषाच्या नात्याची व्याप्ती, समज याचा अभ्यास हा आजच्या अभ्यासकांसाठी निबिड अरण्यातून प्रकाशाकडे येण्यासाठी तयार झालेली पाऊलवाट आहे. या पुस्तकातील काही गाेष्टी त्यांचा स्वानुभव असू शकताे. पण एकूण संध निबंध म्हणजे संपूर्ण स्त्रीजातीच्यावतीने संपूर्ण पुरुषवर्गाशी केलेला संवाद हाेय.
ताराबाई शिंदे यांनी उपस्थित केलेले प्रश्न मूलगामी स्वरूपाचे आहेत, प्रखर आत्मभान असणाऱ्या स्त्रीने एकंदर समाजव्यवहारात स्त्रीच्या असणाऱ्या भूमिकेसंंधीचे आहेत याकडे ङ्खारसे काेणी लक्षच दिले नाही. वयाच्या एकतीस-त्तीसाव्या वर्षी इतके ओजस्वी तेजस्वी लेखन करणाऱ्या स्त्रीने पुढील वीस-बावीस वर्षांच्या आयुष्यात काही का लिहिले नाही. एखादी वृत्तपत्रीय टीका आणि व्यापक उपेक्षा यांमुळे त्यांची लेखनाची उमेद खचली असेल काय ? एक करारी स्त्री इतकी नाउमेद झाली का, की तिने लेखनच थांबवावे ? पुस्तक निर्मितीनंतर त्यांनी पुढे माैन का पाळले, हे गूढ आहे. ताराबाई पुढे मूक झाल्या व त्यांनी आपल्या अंतर्यामातील विचारकलह नि:शब्दच ठेवला.
अशा कितीतरी तारा असतील ज्यांचे विचारकलह दाबले असतील. पण चेंडू जास्त दाबल्यावर उंच उडताे तसे पुढच्या काळात स्त्रीवादाची, स्त्रीप्रश्नांची साेडवणूक करण्यासाठी अनेकांनी याेगदान दिले. आजचे समानतेचे युग (काही अंशी) हे त्याचे फलित हाेय.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.