बंजारा समाजातील म्हणीवर मराठी आणि हिंदी भाषेचा प्रभाव दिसून येतो. काही म्हणी हिंदी, मराठीतून भाषांतरित झालेल्या वाटतात; पण अनेक म्हणी वेगळ्या तर आहेत तसेच जातीचा अभिमान दाखवणाऱ्या म्हणीही आहेत. यातून या भाषेचे सौंदर्यही दिसून येते. काय आहेत या भाषेतील म्हणी व त्यांची वैशिष्ट्ये काय हे जाणून घेऊया या लेखातून…
डॉ. भाऊसाहेब राठोड
बोली भाषेतील म्हणी कोणी तयार केल्या, कोठे तयार केल्या, कधी तयार केल्या हे सांगणे कठीण आहे; पण त्यांतील अनुभवाची सत्यता सार्वत्रिक असल्याने त्या सर्वत्र पसरलेल्या पाहायला मिळतात. बंजारा बोली भाषेत मराठी, हिंदीप्रमाणे म्हणी पाहायला मिळतात. केंणावट म्हणजे म्हणी. हिंदीतील कहावत या शब्दाशी साम्य यामध्ये दिसून येते. यावर डॉ. भाऊसाहेब राठोड यांनी संशोधन केले आहे. म्हणींचे स्वरूप म्हणीतून सांगावयाचे झाल्यास गागर मे सागर असे आहे, असे मत राठोड यांनी त्यांच्या संशोधनात मांडले आहे. राठोड यांनी डॉ. शरद व्यवहारे, दुर्गा भागवत यांनी या संदर्भात केलेल्या संशोधनाचे पुरावे दिले आहेत.
बंजारा भाषेतील म्हणींचे वर्गीकरण असे –
- नात्यासंबंधीच्या म्हणी
- पशु-पक्षी-प्राणीविषयक म्हणी
- विरोध व उपहासात्मक म्हणी
- धर्म व नीतिविषयक म्हणी
- व्यवहारदर्शक म्हणी
- शरीर अवयवावरून प्रचलित असलेल्या म्हणी
- व्यक्तिस्वभाव सूचक म्हणी
- अतिशयोक्तीयुक्त म्हणी
- जातीवाचक म्हणी
प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा अभिमान असतो. देशाचा, प्रांताचा, भाषेचा अभिमान हा असतोच. आपल्या संस्कृतीबद्दल आपुलकी ही असतेच. मराठी माणसाला प्रोत्साहित करणारे रांगडेपण मराठी भाषेत आहे. त्यामुळे प्रत्येक मराठी माणसामध्ये त्याच्याबद्दल अभिमान असतो. मनाला प्रोत्साहित करणाऱ्या म्हणी, भाष्य हे मराठीत आहे. तसे बंजारा समाजातही स्वतःच्या जातीचा अभिमान आहे. हा अभिमान म्हणीतूनही दिसून येतो. बंजारा स्वतःला गोर म्हणवतात. यावरूनच बंजारामध्ये म्हणी पाहायला मिळतात.
जातीचा अभिमान असणाऱ्या म्हणी
गोरूमाई गौर कर (गोर समाजामध्ये लक्ष घाल)
गोरमाटी भाई, व्हेगो लाही लाही (गोर भाई, झाले लाही लाही)
गोरमाटीर आटा, माचळीर काटा (गोर समाजाची अक्कड, जसे माशांचे काटे)
गोरमाटी भिया जरा फोडन देख, आचो बला भाटा पाणिम मत फेक (गोरबंधू जरा निरखून पाहू. बरा-वाईट धोंडा पाण्यात नको टाकू)
गामेन गे अन् गंवार व्हेगे (गावात गेले अन् अडाणी बनले)
जाते सारू खाणू माती, परजातेर न खाणू बोल ! (जातीसाठी माती खावी, परजातीचे न खावे बोल !)
धास जाय कोर वत रे जाय गोर (इतर पळून जातील तिथं गोर राहतील)
भाटा भाटान हमारी खुने छ, इ काळे भाटार लकीर छ (दगडा दगडावर आमच्या खुणा आहेत की, काळ्या दगडावरची लकीर आहे)
नात्यासंबंधीच्या म्हणी –
धडबेटी धगडीरो बंदो रपिया (घरची शालीन नारी म्हणजे बंदा रुपया अर्थात खरी पतिव्रता)
धणी गोणीरी जोडा अन् कमान खोरे भडा (नवरा-बायकोचा जोडा अन् कमवून खा मर्दा)
धणीरो खायेरो अन् विरानं गायेरो (नवऱ्याचं खायचं अन् भावाचं गायचं)
कणगिरो खावं अन् इरलान गावं (कणगीचं खायचं अन् इरल्याचं गायचं)
पेलो बेटा, कपाळी गोटा (पहिला पुत्र, कपाळी गोटा अर्थात तापदायक)
पेल बेटी, घी रोटी (पहिली पुत्री, तूप रोटी अर्थात आनंददायी)
बाप बलवान वोरो बेटा पहिलवान (बाप बलवान, त्याचा पुत्र पहिलवान)
बाप मारं मिटकी बेटा तीरनदाज (बाप मारतो बडकं त्याचा पुत्र तिरंदाज)
वकत पडो बाका गधान केणू काका (प्रसंग आला बाका तर गाढवाला म्हणावे काका)
सगासेण, छातीरो देण, नितो खाळ्यारो वेण (सोयरे – धायरे प्रेमाचे गोड नसता नदीनाल्याची ओढ)
खोटो पिसा, रूटो भाई, वेलावकतेरो साई (खोटा पैसा, रूसलेला भाऊ, वेळेला कामी येतात)
पशु-पक्षी, प्राणीविषयक म्हणी –
आपसेर लढाई कांई कमाई, भारेरो कतरा लेगो मठाई (आपापसातील लढाईत कसली कमाई, बाहेरच्या कुत्र्याने नेली मिठाई)
उपर वाघोबा, हेट नागोबा, छेटी आगोबा (वर वाघोबा, खाली नागोबा, आजूबाजूला आगोबा)
गोरमाटीर आटा, माचळीर काटा (बंजारा समाजाची अक्कड जसे माशांचे काटे)
घरेम सांडीया, भार रांडीया (घरात सांडासारखा, बाहेर हिजड्यासारखा)
ठाम न ठिकाण अन् बिली मांडी दकान (ठाव ना ठिकाण अन् मांजराने टाकले दुकान)
विरोध, उपहास आणि विसंगतीदर्शक म्हणी –
आजेर बाटी-खोडी, सवारेर माडी, जलमेर पिढी (आजची चटणी-भाकर, उद्याची माडी-हवेली, जन्माची पिढी)
एक दनेरो पामणो, दुसरे दन पई, तिसरे दन अकल गई (एका दिवसाचा पाहुणा, दुसऱ्या दिवशी पाहुणपण, तिसऱ्या दिवशी अक्कल गहाण)
एक तो आंगळी घालणू न, घाले तो काढणू न, काढे तो सुंगणू न (एक तर बोट घालूनी, घातले तर काढूनी, काढले तर हुंगुनी)
कम बुद्धी, अक्कल थोडी, भेसी वेचन लिदो घोडी (कमी बुद्धी, अक्कल थोडी, म्हैस विकून घेतली घोडी)
तीन वासार झुपडी अन् वाते बडी-बडी (तीन वास्याची झोपडी अन् गोष्टी बड्या बड्या)
व्यवहारदर्शक म्हणी –
आप भलो तो जग भलो (आपण चांगले तर जग चांगले)
आंग पाच देकन वाग (मागे-पुढे पाहून वागावे)
उच भाटा फेकन हेट मातो मत मांड (वर दगड फेकून खाली डोकं धरू नको)
कल देखन वाते करणू अन् झोक देखन काम करणू (कल पाहून बोलावे अन् झाकझोक पाहून काम करावे)
करो मसलत न तो गफलेतेमा फसगत (मसलत करा. नसता गाफिल राहून फसगत होईल)
खोडी बाटी खान पेट भरणू पण केन भिक न मांगणू (चटणी-भाकर खाऊन पोट भरावे; पण कोणाला भिक मागू नये)
छाती करीय वोन साती व्हिय, हाय खाय वोर ढेर पडीय (साहसीला साथ मिळेल, हाय खाल्ली तो ढेर होईल)
जगेमा गण प्यारो, मनक्या प्यारो छेई (सर्वांना गुण प्यारा, माणूस नाही)
जाणजो, छाणजो पच मानजो (जाणा, छाणा, नंतर माना)
धासेती दाडो आतमेनी अन् रोयेती राज मळेनी (पळून दिवस मावळत नाही अन् रडून राज मिळत नाही)
दम छ तो सम छ (दम आहे तर सम आहे)
तज्ज्ञांची म्हणीसंदर्भातील मते –
- म्हणीची मांडणी आटोपशीर, सूत्रबद्ध, साहित्यिक धाटणीची असते.
- शैली पद्यमय असून आकार आखूड असतो.
- प्रास आणि पद्माभास यामुळे म्हणींचे रूप आकर्षक बनते.
- पूर्वसुरीच्या अभ्यासावरून म्हणींची परंपरा पुरातन काळापासून असल्याचे मत.
- म्हणींचा संबंध नीतिकथांशी, सुभाषितांशी, उखाण्यांशी, चालीरीतीशी, धर्म परंपरा, रुढीशीही असतो.
- पाश्चिमात्य देशातील म्हणींची परंपरा प्राचीन असून समृद्धही आहे.
संशोधकांच्या मते बंजारा म्हणीची वैशिष्ट्ये-
- मुलापेक्षा मुलीलाच महत्त्व देतात हा आदर्शवाद म्हणीमधून समोर येतो.
- कष्ट करण्याची, नवरा-बायकोने एकत्र राबायची वृत्ती स्पष्ट होते.
- नीतिकथा, लोककथेतूनही म्हणींची निर्मिती.
- मार्गदर्शक सल्ले किंवा संकेत, सुसंगत विचार, मौलिक सूचना म्हणीतून मांडले गेले आहेत.
- जीवनातील अडीअडचणींमध्ये माणूस गोंधळून जातो. अशा परिस्थितीमध्ये म्हणी मार्गदर्शक ठरू शकतात.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.