‘दुर्गांच्या देशातून…’ या महाराष्ट्रातील ट्रेकिंगवरील बारावा दिवाळी अंक आहे. तपपूर्तीचे एक अनाेखे समाधान वाटत आहे; त्याचबराेबर जबाबदारीचीही जाणीव वाढली आहे. नेहमीप्रमाणेच या वर्षी सर्व लेखकांनी या अंकात प्रथमच लिहिले आहे. या नव्या-जुन्या लेखकांनी वेळात वेळ काढून लेख दिल्यामुळेच हा अंक सजला आहे. या अंकातील लेख अन् लेखकांविषयी…
संदीप भानुदास तापकीर
संपादक, दुर्गांच्या देशातून…,
‘श्रीनंदनंदन’ निवास, विठ्ठल मंदिरामागे, वाघेश्वरवाडी,
मु. पाे. चऱ्हाेली बुद्रुक (आळंदी देवाचीजवळ), ता. हवेली, जि. पुणे-412105.
9850179421 / 9921948541
संजय तळेकर यांनी गाे. नी. दांडेकर, बाबासाहेब पुरंदरे, निनाद बेडेकर, पांडुरंग बलकवडे यांच्यासाेबत किल्ले भटकंती केली आहे. अकराव्या वर्षी त्यांनी शंभुराजांची भूमिका 1974 मध्ये शिवाजी पार्कवर उभारलेल्या शिवसृष्टीत साकारली हाेती. तानाजी मालुसरे यांच्या 300 व्या पुण्यतिथीला ते डाेणगिरीचा कडा चढून गेले. अमावास्येच्या रात्री दाेराशिवाय त्यांनी कर्नाळा सुळका चढला, तर हिरकणी कडा उतरला. सव्वा वर्षाच्या मुलीला घेऊन टकमक टाेकावरून रॅपलिंग केले. सावरकर स्मारकात तीन दिवसांत 50 किल्ले बांधले. आठ दिवसांत काेकणातील 45 किल्ले पाहिले, तर एका वर्षात महाराष्ट्रातील 101 किल्ले पाहिले आहेत. अशा या गिर्याराेहक इतिहासप्रेमी तळेकरांचा लेख महाराजांच्या राज्याभिषेकावर आहे. या वर्षी राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण हाेत आहेत. हे औचित्य साधून या लेखाने या वर्षाच्या अंकाची सुरुवात केली आहे.
जितेंद्र गवारे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. वाणिज्य शाखेतून पदवी मिळवलेले गवारे यांना सायकलिंग व गडकिल्ल्यांची आवड आहे. खूप उशिरा त्यांनी गिर्याराेहणाची कारकिर्द सुरू केली आणि बघता बघता सहा अष्टहजारी माेहिमा केल्या. त्यांना शिवछत्रपती क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या अष्टहजारी माेहिमांच्या राेमांचक आठवणी त्यांनी आपल्या लेखात शब्दबद्ध केल्या आहेत.
25 वर्षे ज्ञान प्रबाेधिनी, निगडीत कार्यरत असणाऱ्या शिवराज पिंपुडे यांनी केंद्र प्रशासक, काेषाध्यक्ष, विभागप्रमुख, गुरुकुल व्यवस्थापक अशा विविध जबाबदाऱ्या लीलया पेलल्या आहेत. काेराेना काळात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी दूरदर्शनवर जाे टिलीमिलीचा कार्यक्रम प्रक्षेपित हाेत हाेता, त्यात चाैथीच्या वर्गाचा इतिहास त्यांनी शिकवला आहे. काेराेनाच्या कठीण काळात विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांची मांडणी त्यांनी घरातून केली. या अनुभवावर आधारित ‘अन् पारिजातक हसला’ हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. फिनलंड देशाचा अभ्यास दाैरा केलेल्या पिंपुडेंनी विविध ठिकाणी मुलांच्या अभ्यासपूर्ण सहलींचे आयाेजन केले आहे. 40 मुलांसह पुणे जिल्ह्यातील 29 किल्ले पाहणारी त्यांची राज्यातील पहिलीच शाळा आहे. या 29 किल्ल्यांच्या माेहिमेचा अनुभव त्यांनी आपल्या लेखात चित्रीत केला आहे.
मॅरेथाॅन धावपटू असणाऱ्या सुविधा कडलग यांनी सह्याद्रीतील अनेक सुळक्यांबराेबरच हिमालयातील काही शिखरे पादाक्रांत केली आहेत. दाेन छाेट्या मुलांची आई असतानाही त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचे स्वप्न पाहिले आणि विशेष म्हणजे नऊवारी साडी घालून ते सरही केले. त्याचा वृत्तांत त्यांनी आपल्या इंग्रजीतील लेखातून आपल्यासमाेर मांडला आहे. त्यांच्या जिद्दीला खराेखर सलामच केला पाहिजे. त्यांचा लेख वाचून महिलांना निश्चितच प्रेरणा मिळल, याची खात्री वाटते.
प्रधान वनसंरक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले सुनील लिमये हे वन्यजीव क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासू व संशाेधक वृत्तीचे अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. 1992 ते 2022 या काळात त्यांनी विशेष कार्य अधिकारी, उपवनसंरक्षक, अतिरिक्त आयुक्त, सहसंचालक, वनसंरक्षक, संचालक, मुख्य वनसंरक्षक, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक इत्यादी पदांवर उत्कृष्ट सेवा बजावली आहे. सध्या ते कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, मध्य प्रदेश व हिमाचल प्रदेश या राज्यांसाठी सल्लागार म्हणून कार्यरत असून, तेथील अधिकाऱ्यांना मानव व वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. किल्ले पाहण्याची त्यांनी आपली मूळची आवड जाेपासली आहे. पुणे जिल्ह्यातील काही माेजक्या किल्ल्यांचा त्यांनी आपल्या लेखात आढावा घेतला आहे.
मूळचे करमाळ्याचे असलेले, इतिहासातून पदवीचे शिक्षण घेतलेले शिवाजी ननवरे हे 2005पासून पाेलीस दलामध्ये कार्यरत आहेत. 2012मध्ये ते पाेलीस उपनिरीक्षक झाले. नाशिक, गडचिराेलीतील सेवेनंतर सध्या ते पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत आहेत. पाेलीस दलातील उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना विविध पुरस्कारांसह पाेलीस महासंचालक सन्मानचिन्हानेदेखील गाैरवलेले आहे. गडचिराेलीतील त्यांच्या कामाची दखल केंद्र सरकारने आंतरिक सुरक्षा पदक देऊन घेतली आहे. हिमालयातील अनेक शिखरे सर केलेल्या ननवरेंनी या वर्षी एव्हरेस्टदेखील सर केले. आपल्या याच माेहिमेचा साद्यंत वृत्तांत त्यांनी आपल्यासमाेर ठेवला आहे.
महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीचे निवासी संपादक असलेले समीर कर्वे तीस वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. भ्रमंतीची आवड असल्याने त्यांनी सह्याद्रीत भटकंती केली आहे. त्या अनुषंगाने लिखाणदेखील केलेले आहे. संरक्षण मंत्रालयाने आयाेजित केलेल्या संरक्षण पत्रकारिता अभ्यासक्रमात त्यांनी सहभाग घेतला आहे. ‘चक्रम हायकर्स’चे ते आजीव सदस्य असून, संस्थेच्या अनेक उपक्रमांत सहभागी असतात. आपल्या लेखातून त्यांनी संस्थेच्या वाटचालीचा आलेख ललित शैलीत आपल्यासमाेर ठेवला आहे.
आय.आय.टी. बाॅम्बेमधून बी.टेक., एम.टेक. केलेले विवेक शिवदे हे तरुण पिढीतील गिर्याराेहणातील आघाडीचे नाव आहे. ‘गिरिप्रेमी’ संस्थेचे ते सदस्य असून, त्यांनी कांचनजुंगासह अनेक शिखरे सर केली आहेत. गिर्याराेहण इन्स्टिट्यूटमध्ये ते वरिष्ठ प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. माउंट मेरू हे शिखर दुसèया प्रयत्नात गिरिप्रेमीतर्फे त्यांनी यशस्वीपणे सर केले. या तांत्रिकदृष्ट्या खडतर माेहिमेच्या वेळी मनात चाललेल्या भावनांचे चित्रण आपल्याला त्यांच्या इंग्रजी लेखातून वाचायला मिळते.
वाणिज्य शाखेची पदवी, त्यानंतर फायनान्समधून एम.बी. ए. असे शिक्षण घेतलेल्या मयूर खाेपेकरांनी 2014पासून सह्याद्रीतील किल्ले भटकंतीला सुरुवात केली. व्यावसायिक कर्मचारी असले, तरी इतिहासाच्या आवडीमुळे ते लेखनाकडे वळले. गतवर्षी त्यांची ‘अग्निपर्व’ ही कादंबरी प्रकाशित झाली आहे. शिवराज्याभिषेकाच्या त्रिशतकाेत्तर सुवर्णमहाेत्सवी वर्षाच्या निमित्ताने त्यांनी आपल्याला राजधानी रायगडाची सफर घडवून आणली आहे.
सिंबायाेसिस विद्यापीठात फॅशन विषयाचे विभागप्रमुख व सह-अध्यापक असलेले डाॅ. नितीन हडप हे चित्रकार, डिझायनर असून, भारतीय इतिहास व पुरातत्त्व विषयात त्यांनी पीएच.डी. मिळवली आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे सुवर्णपदक, व्हिक्टाेरिया आणि अल्बर्ट संग्रहालयाचे नेहरू वाॅर्ड, भारत सरकार संस्कृती मंत्रालयाचे आऊटस्टँडिंग पर्सन इन द फिल्ड ऑफ कल्चर ही ज्युनियर रिसर्च फेलाेशिप यांसह त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. शाेधनिबंध, स्फूट लेखनासह त्यांची दाेन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. दृश्यकलेविषयी ते प्रदर्शने भरवतात. प्रतापगडचे मूळ रहिवासी असणाऱ्या हडप सरांनी आपल्यासमाेर प्रतापगड आणि रायगड यांच्यातील अनाेखे नाते उलगडले आहे.
नितेश जाधव हे 16 वर्षांपासून सह्याद्रीतील किल्ले अभ्यासपूर्ण पद्धतीने पाहत आहेत. त्यांनी हिमालयातदेखील 15 माेहिमा केल्या आहेत. महाराष्ट्रातील सर्व किल्ले पाहून झाल्यामुळे त्यांनी आता आपला माेर्चा इतर राज्यांतील किल्ल्यांकडे वळवला आहे. इंस्टाग्राम, फेसबुक, यूट्युब या साेशल माध्यमातून सर्व ठिकाणी ते ब्लाॅग लिहीत असतात. ‘रिकाम ट्रेकडा’ या नावाने ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी आपल्या छाेटेखानी लेखातून रायगडाचे अपरिचित पैलू उलगडले आहेत.
मूळचे काेल्हापूरचे असलेले यशाेधन जाेशी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक व सांस्कृतिक इतिहासाचे ते अभ्यासक आहेत. काेल्हापूर संस्थानच्या शिकारीबद्दल माहिती देणाèया ‘आठवणीतील शिकार’ या पुस्तकाचे लेखन, तर राजर्षी शाहू छत्रपती यांच्या राज्याभिषेक समारंभावरील ‘मु्नत्यारी समारंभा’चे संपादन त्यांनी केले आहे. अनेक वर्तमानपत्रांतून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. स्थानिक इतिहास हा त्यांचा अभ्यासाचा विषय असल्यामुळे काेल्हापूरचे अनेक अज्ञात पैलू त्यांनी उजेडात आणलेले आहेत. ‘धांडाेळा’ या लाेकप्रिय ब्लाॅगचे लेखन करणाऱ्या जाेशींनी आपल्यासमाेर आपण न पाहिलेला पुरंदर उभा केला आहे.
राज्यघटनेचे अभ्यासक, पर्यावरण कायदा सल्लागार, सातारा नगरपालिकेच्या जैवविविधता समितीचे सदस्य असलेले अॅड. साैरभ देशपांडे हे पक्षीमित्र, दुर्गप्रेमी व माेडी लिपीचे तज्ज्ञदेखील आहेत. त्यांची ‘अमात्यांचे आज्ञापत्र आणि भारतीय संविधान’ व ‘ग्यानबाची राज्यघटना’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘माळढाेक अभयारण्यातील वन्यजीव’ या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला आहे. त्यांनी आपल्या लेखातून पन्हाळ्याशी बावडेकर घराण्याचे असलेले नाते उलगडले आहे.
1976 ते 2012 या काळात वाणिज्य विषयाचे प्राध्यापक असलेल्या सुभाष फासे यांनी मनाली येथे पर्वताराेहणाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन विद्यार्थ्यांमध्ये गिरिभ्रमण व गिर्याराेहण ही चळवळ सुरू केली. सह्याद्रीतील दुर्गांसाेबतच त्यांनी हिमालयातील पर्वतशिखरेही पाहिली आहेत. त्यांची ‘सलाेखा गडकिल्ल्यांशी’, ‘चावडी खडकवासल्याची’ व ‘खडकवासला’ ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर परदेशातीलही दुर्ग त्यांनी पाहिले आहेत. छायाचित्रणाची आवड असलेल्या ङ्खासे सरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या, पण दुर्लक्षित असलेल्या साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी झालेल्या गनिमी काव्याच्या लढाईचा वृत्तांत आपल्यासमाेर रेखाटला आहे.
इतिहासाचे असिस्टंट प्राेफेसर असलेल्या पंकज समेळ यांनी महाराष्ट्र, गाेवा व कर्नाटकामधील 150 किल्ल्यांसाेबतच अनेक लेणी व मंदिरे पाहिली आहेत. ते ब्राह्मी, नागरी, शारदा, नेवारी या प्राचीन लिपींचे तज्ज्ञ असून, गद्धेगळ, प्राचीन शिलालेख, अक्षरवटिका, मूर्तिशास्त्र, लेणी व मंदिर स्थापत्य हे त्यांच्या अभ्यासाचे विषय आहेत. ‘वारसा अतिताचा’ या त्यांच्या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. अनेक वर्तमानपत्रांतून त्यांचे मुंबईच्या प्राचीन इतिहासावरील लेख प्रसिद्ध झाले आहेत. ‘महाराष्ट्र देशा’ हा त्यांचा ब्लाॅग तरुणांमध्ये अतिशय प्रसिद्ध असून, या ब्लाॅगच्या लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांनी आपल्या लेखातून साेपारा ते कल्याण या सागरी मार्गावरील संरक्षण रचनेचा मागाेवा घेतला आहे.
महाडच्या ‘सह्याद्री मित्र गिरिभ्रमण संस्थे’चे संस्थापक-अध्यक्ष, ‘अखिल महाराष्ट्र गिर्याराेहण महासंघा’चे कार्यवाह, तसेच रायगड जिल्ह्याच्या गिर्याराेहण संघटनेचे सदस्य असलेले डाॅ. राहुल वारंगे अनेक वर्तमानपत्रांतून किल्ल्यांवर लेखन करत असतात. 25 वर्षे ते सह्याद्री व हिमालयात भ्रमंती करत आहेत. माणगाव तालुक्यातील कुर्डूगडावरील लेणीसमूहाच्या शाेधमाेहिमेत त्यांचा सहभाग हाेता. सावित्री नदीच्या उगमापासून मुखापर्यंत त्यांनी नदीपात्रातून प्रवास केला आहे. ते विद्यार्थ्यांसाठी व सर्वसामान्यांसाठी गिर्याराेहण माेहिमा आयाेजित करत असतात. ‘भटकंती किल्ल्यांची’ या पुस्तकाचे ते सहलेखक आहेत. अनेक सामाजिक उपक्रमांत सहभागी असणाèया वारंगेंनी रसाळ-सुमार-महिपतगडाचा थरार आपल्यासमाेर ठेवला आहे.
मुंबई विद्यापीठातून बी.ए. केलेल्या शिल्पा पिसाळ यांना कविता लेखनासाेबतच ट्रेकिंगची व निसर्ग भटकंतीचीही आवड आहे. सह्याद्रीतील अनेक किल्ल्यांबराेबरच त्यांनी हिमालयातही काही ट्रेक केले आहेत. ट्रेकचे प्रवासवर्णन लिहिण्याची त्यांना आवड आहे. हिमालयात केलेल्या देवतिब्बा ट्रेकचे प्रवासवर्णन त्यांनी ललित शैलीत आपल्यासमाेर ठेवले आहे.
वाळव्याचे सूरज गुरव यांनी इतिहासातून एम.ए.साेबतच एम.जे.देखील केले आहे. 2009पासून महाराष्ट्र पाेलीस दलात अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. जळगाव, काेल्हापूर, चिपळूण, कराड या ठिकाणी उपविभागीय पाेलीस अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट सेवा केल्याबद्दल त्यांना केंद्राचे व राज्याचे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्रातील 210 व महाराष्ट्राबाहेरील 60 किल्ल्यांची भ्रमंती केलेले गुरवसाहेब सध्या नांदेड शहरात उपविभागीय पाेलीस अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ‘माझं गडप्रेम’ हे त्यांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यांनी नांदेडच्या नंदगिरी या दुर्लक्षित किल्ल्याचा सुंदर इतिहास आपल्यासमाेर मांडला आहे.
श्रीकृष्ण कडूसकर यांनी अनेक हिमालय शिखरे सर केली आहेत. त्यांनी नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगमधून बेसिक, अॅडव्हान्स, शाेध व बचाव आणि संपर्क अधिकारी प्रशिक्षण घेतले आहे. स्पाेर्ट क्लाइंबिंगमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी प्रशिक्षण घेतले आहे. 2006पासून ते प्रशिक्षक म्हणून काम करतात. पश्चिम घाटातील प्रचंड अनुभव गाठीशी असणाèया कडूसकरांनी राष्ट्रीय पंच म्हणून अनेक स्पर्धांमध्ये काम केले आहे. रसायनशास्त्रातील पदवी मिळविलेल्या कडूसकरांनी वानरलिंगी, तैलबैला, भवानीकडा, नानाचा अंगठा, काेकणकडा इ. सुळके तर सर केले आहेतच; पण बंगळुरूजवळच्या रामनगरमध्ये 15पेक्षा अधिक राॅक क्लाइंबिंग मार्ग शाेधले आहेत. अनेक शाेध आणि बचाव माेहिमांमध्ये त्यांचा सहभाग असताे. भारतीय पर्वताराेहण संस्थानच्या पश्चिम विभागाचे ते सचिव आहेत. इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ स्पाेर्ट क्लाइंबिंगच्या आशियाई पंच परिषदेत ते भारताचे प्रतिनिधित्व करतात. सर्पतज्ज्ञ अशीही ओळख असलेल्या कडूसकरांनी स्पाेर्ट क्लाइंबिंग या क्षेत्रात करिअर हाेऊ शकते, याचे अनुभव आपल्यासमाेर मांडले आहेत.
गझल, कविता लिहिणारे विजय माने हे पुणे महानगरपालिकेच्या भारतरत्न सचिन तेंडुलकर क्रीडा निकेतनमध्ये शिक्षक आहेत. 23 वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माने सरांना महानगरपालिकेच्या आदर्श शिक्षक पुरस्काराबराेबरच राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळालेले आहेत. किल्ले भटकंतीची आवड असलेल्या माने सरांनी पदरगडाचा खास अनुभव आपल्यासमाेर उलगडला आहे.
एम.ई. सिव्हील असलेले संकेत शिंदे हे ‘सह्याद्री मित्र गिरिभ्रमण संस्था’, महाड आणि ‘अखिल महाराष्ट्र गिर्याराेहण महासंघा’चे सदस्य आहेत. ट्रेकिंगबराेबरच फोटाेग्राफीचीही त्यांना आवड आहे. ‘राॅयल भटका’ या नावाने ते ब्लाॅगलेखन करतात. सह्याद्रीतील अनेक अपरिचित दुर्गांसाेबतच त्यांनी दुर्गम धबधबे, मंदिरे, लेणी पाहिल्या आहेत. अशाच एका अपरिचित असणाऱ्या कुंभेघाट ते ठिबठिबा नाळेची माहिती त्यांनी आपल्यासमाेर ठेवली आहे.
संगणक स्नातक, जनसंवाद व पत्रकारितेत पदवी मिळविलेल्या प्राची पालकर विमा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे ‘साज सह्याद्रीचा’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. जंगल व किल्ले भटकंती, पक्षीनिरीक्षण, वाचन व लेखन हे त्यांचे छंद आहेत. साहसी पर्यटन करण्याची त्यांना आवड आहे. मेळघाटात त्यांनी अनेक ट्रेकिंग कार्यक्रमाचे यशस्वी नेतृत्व केले आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे त्या इस्राईलमध्ये कृषी अभ्यास दाैऱ्यात सहभागी झाल्या हाेत्या. अनेक वर्तमानपत्रांतून त्यांनी स्तंभलेखन केलेले आहे. पालकरांनी आपल्याला रामगड या उपेक्षित दुर्गाची अनाेखी सफर घडवली आहे.
राज्याच्या पुरातत्त्व वस्तुसंग्रहालयाच्या माजी उपसंचालक असलेल्या डाॅ. माया पाटील सध्या पुण्यश्लाेक अहिल्यादेवी हाेळकर साेलापूर विद्यापीठात प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्त्वशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत. तेरसह अनेक ठिकाणच्या उत्खननात त्यांनी सहभाग घेतला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नऊ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी मिळाली आहे. विद्यापीठातील अनेक पदांवर त्यांनी यशस्वीपणे कार्यभार सांभाळला आहे. चार पुस्तकांच्या स्वतंत्र लेखनासह त्यांचे चार पुस्तकांचे संपादन, 60 संशाेधनात्मक लेख, 55 संशाेधनात्मक लेखांचे वाचन, दहा लघुकथा प्रसिद्ध झाल्या आहेत. उत्कृष्ट शिक्षकाबराेबरच त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भटक्या विमुक्तांच्या शाळांमध्ये, पालावर जाऊन त्या समाजप्रबाेधन करतात. साेलापूर, उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांतील स्मारके, प्राचीन मंदिरे व ऐतिहासिक स्थळांचा त्यांचा विशेष अभ्यास आहे. आपल्या छाेटेखानी लेखातून त्यांनी बालेकिल्ला ही संकल्पना उलगडली आहे.
मूळचे भीरचे रहिवासी असलेले शिवाजी आंधळे आय.टी.आय., एन.सी.व्ही.टी. केल्यानंतर टाटा माेटर्समध्ये 2000 पासून कार्यरत आहेत. ‘शिखर फाउंडेशन’बराेबर त्यांनी सह्याद्री व हिमालयातील अनेक ट्रेक केले आहेत. माेटरसायकलवर चारधाम यात्रा केली आहे; तसेच कारमधून दक्षिण भारत व राजस्थान पाहिला आहे. छाेट्या-माेठ्या कार्यक्रमाचे निवेदन करण्याबराेबरच टाटा माेटर्सच्या ‘कलासागर’ अंकातील लेखनाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. त्यांनी सुधागडची भटकंती आपल्या लेखाद्वारे प्रकट केली आहे. बी.एस्सी., पी.जी.डी.सी.ए., पी.जी.डी.बी.ए. यांबराेबरच इतिहासातून पीएच.डी. पदवी मिळविणाऱ्या, अनुवादिका व इंडाेलाॅजिस्ट असलेल्या डाॅ. किमया किशाेर देशपांडे या 32 वर्षांपासून आय.टी. क्षेत्रात कार्यरत आहेत. संस्थापक- संचालिका असलेल्या स्वतःच्या उषा पब्लिकेशनतर्फे त्यांची अनुवादाची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ‘इंडाेलाॅजी कट्टा’ या उपक्रमातून त्यांनी अनेक व्नत्यांची व्याख्याने आयाेजित केली आहेत. लेखन, निवेदन, सूत्रसंचालन, संहिता लेखन व सादरीकरण यांमध्ये त्यांचा हातखंडा आहे. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शाेधनिबंधाचे त्यांनी सादरीकरण केले आहे. त्यांनी पुणे जिल्ह्यातील किल्ल्यांवरील मंदिरांचा आढावा आपल्या दीर्घ लेखातून घेतला आहे.
500पेक्षा अधिक व्याख्याने देणारे प्रा. संजय टाक हे प्रेरक वक्ता व लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राष्ट्रमाता जिजाऊ, आई, राष्ट्रशक्ती, आपणच आपले आदर्श, बेटी बचाव, व्यक्तिमत्त्व विकास हे त्यांच्या व्याख्यानाचे विषय आहेत. अनेक सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे त्यांनी यशस्वी आयाेजन केलेले आहे. भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राच्या वतीने आयाेजित केलेल्या युवक शिबिरातदेखील त्यांनी मार्गदर्शन केले आहे. मूळचे भातवडीचे असलेल्या टाक सरांनी भातवडीच्या शरीफजीराजे स्मारकाचा व अहमदनगरच्या भुईकाेटाचा धावता आढावा घेतला आहे.
शेती करता करता वाचनाच्या आवडीतून इतिहासाकडे वळणाऱ्या विक्रमसिंह पाटील यांनी शस्त्र विषयाचा अभ्यास केला. एवढ्यावरच न थांबता स्वतःचा शस्त्रसंग्रह जमवला. तसेच ऑनलाइन व ऑङ्खलाइन अनेक व्याख्याने दिली. यामुळेच आज त्यांची ओळख शस्त्रसंग्राहक म्हणून सांगितली जाते. याच विषयावरचा त्यांचा लेख आपल्याला शिवछत्रपतींच्या तीन तलवारींचे ज्ञान करून देताे.
वाकड गावचे पाटील असलेल्या सचिन वाकडकरांनी 500 वेळा सिंहगड सर केला आहे. शिरगावमधील शारदाश्रमाच्या मुलांना ते शालेय वस्तू, खेळाचे साहित्य इत्यादी गाेष्टींचे वाटप करून आपले सामाजिक याेगदान देत असतात. वाकडमध्ये त्यांची ‘ङ्खिटनेस वेलनेस क्लब’ ही व्यायामशाळा आहे. व्यायाम करणे, पाेहणे, सायकल चालवणे, धावणे, किल्ले पाहणे, ऐतिहासिक पुस्तके वाचणे हे त्यांचे छंद आहेत. याच छंदातून ते आयर्नमॅन कसे झाले, याचा राेमांचक अनुभव त्यांनी आपल्या लेखातून मांडला आहे.
एम.एस्सी., बी.एड., डी.सी.जे. असे उच्च शिक्षण घेतलेले धर्मेंद्र काेरे हे 25 वर्षे पत्रकारितेत कार्यरत आहेत. सकाळ, लाेकसत्ता, पुढारी, महाराष्ट्र टाइम्स यांमधून त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. पत्रकारितेसाठी त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळालेले आहेत. जुन्नर तालुक्याचे मूलनिवासी असलेल्या काेरेंनी शिवनेरीच्या संवर्धनाची यशाेगाथा आपल्यासमाेर ठेवली आहे.
महाराष्ट्रात गेली दाेन दशके दुर्गसंवर्धनाच्या माेजक्याच संस्था सुयाेग्य पद्धतीने संवर्धनाचे काम करत आहेत. त्यातील मुख्य संस्था म्हणजे संताेष हसूरकर यांचे ‘दुर्गवीर प्रतिष्ठान’ हाेय. या संस्थेने काेल्हापूर जिल्ह्यातील दाेन किल्ल्यांचा कायापालट केला आहे. त्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या दाेन तरुणांचे लेख आपल्याला या अंकात वाचायला मिळतात. मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या दिगंबर भाटे यांना लहानपणापासूनच किल्ल्यांची आवड आहे. चंदगड तालुक्याचे समन्वयक म्हणून त्यांनी दुर्गवीर प्रतिष्ठानचे काम पाहिले. त्यामार्फत अनेक वैद्यकीय शिबिरे आयाेजित करून दुर्बल घटकापर्यंत मदत पाेहाेचविली. दुर्गसंवर्धनाबराेबरच छायाचित्र प्रदर्शन आयाेजित करून जास्तीत जास्त लाेकांपर्यंत किल्ल्यांची व संवर्धनाची माहिती पाेहाेचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. सामानगडावरील त्यांचा लेख आपल्याला गडाचा झालेला कायापालट दर्शवताे.
समाजाचे आपण काहीतरी देणे लागताे, या भूमिकेतून मुंबईवरून परत गावी येऊन दुर्गसंवर्धनाचे काम हाती घेतलेले संदीप गावडे हे एक प्रभावी तरुण व्यक्तिमत्त्व आहे. चंदगड संपर्कप्रमुख म्हणून दुर्गवीर प्रतिष्ठानची जबाबदारी त्यांनी लीलया पेलली आहे. महिन्यातून दाेन श्रमदान माेहिमा घेण्यासाठी त्यांनी लाेकांमध्ये जनजागृती केली. गावाेगावी जाऊन अनेक दुर्गवीरांची माेट बांधली. समाजसेवा, आराेग्यसेवा करण्याची त्यांची आवड पाहून त्यांना प्रभाकर काेरे हाॅस्पिटलमध्ये पी.आर.ओ.चे कामदेखील मिळाले. त्यांनी कलानिधीगडाच्या संवर्धनाचा लेखाजाेखा आपल्यासमाेर ठेवला आहे.
शिवकथाकार विजयराव देशमुख तथा सद्गुरुदास महाराज यांचा सहवास व मार्गदर्शन मिळालेले माेहन बरबडे नाशिक येथे भारतीय आयुर्विमा महामंडळात कार्यरत आहेत. विजयरावांचे शिवचरित्र घराेघर पाेहाेचविणे हाच त्यांचा ध्यास आहे. यासाठीच त्यांनी शिवचरित्र कथनाच्या ऑनलाइन उपक्रमाच्या आयाेजनातही सहभाग घेतला. प्रासंगिक लेखनाची आवड असणाऱ्या बरबडेंनी विजयरावांच्या ‘शककर्ते शिवराय’ या द्विखंडात्मक शिवचरित्राचे सुंदर परीक्षण केले आहे. हे परीक्षण वाचून आपल्याला निश्चितच मूळ ग्रंथ वाचण्याची प्रेरणा निर्माण हाेईल, याची खात्री वाटते.
पुस्तकाचे नाव ः दुर्गांच्या देशातून ( दिपावली अंक)
संपादकः संदीप तापकिर
प्रकाशकः दुर्गभान प्रकाशन, पुणे
मूल्य ४००/- रुपये
संपर्क नंबर 9850179421