माझे चौथे आध्यात्मिक गुरु प्राचार्य भगत यांचे निधन झाल्याचे कळाले आणि नयन पटलावर त्यांच्या आठवणीच्या चित्रे तराळली. अस्वस्थ झालो आणि अश्रूंनी भावनेला वाट मोकळी केली.
डॉ. योगेश साळे
प्राचार्य,
आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर.
प्राचार्य रा. तु. भगत आणि माझा अगदी अलीकडच्या दहा महिन्यापासूनचा परिचय दिनांक 8 जानेवारी 23 रोजी सकाळी नऊच्या दरम्यान मला एका अनोळख्या व्यक्तीचा फोन आला. “मी प्राचार्य भगत बोलतोय, माझ्याकडे संत गाडगेबाबा अध्यासन असून तुम्ही संध्याकाळी चार वाजता माझ्याकडे या” असा निरोप दूरध्वनीवरून मला त्यांनी दिला. सुरुवातीला मी त्याकडे फारच गांभीर्याने बघितलं नाही. पुन्हा सायंकाळी पावणे चारच्या दरम्यान परत फोन आला आणि “तुम्ही येणार आहात का?” असा निरोप परत आला. मला वाटलं काहीतरी आध्यात्मिक बैठक असावी. पंचवीस तीस लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन करायचा असेल, या हेतूने माझ्याकडील चैतन्यामृत व अनंतानुभूती हे काव्यसंग्रह सोबत घेतले आणि त्यांच्या घराकडे निघालो.
रंकाळ्याच्या बाजूला त्यांचे घर असल्याने व पहिल्यांदा मी त्या ठिकाणी जात असल्याने, मला घर शोधायला अडचण आली म्हणून मी त्यांना परत फोन केला की ‘मला घर सापडत नाही’ ते म्हणाले की “तुम्ही ज्या ठिकाणी रस्त्यावर दोन बाकडे आहेत तेथे या, मी तेथे येतो आणि थोड्याच वेळात त्या ठिकाणी मी पोहोचलो. तेवढ्यात एक 90 वर्षाहून अधिक असणारी व्यक्ती माझी वाट त्या ठिकाणी पाहत उभी होती. मी त्यांना विचारलं, आपण प्राचार्य भगत का?’ त्यावेळी त्यांनी होकारार्थी मान हलवली. माझ्या टू व्हीलर वर बसले आणि आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. पण घराजवळ कुठे कुणी माणसं नव्हती. म्हणून घरात अंधाऱ्या पायऱ्यावरून वाट काढत त्याने मला वरच्या दिशेने वरच्या मजल्यावर नेले. लाईट लावून त्यानी दरवाजा उघडला आणि त्यांनी त्यांच्या जीवन कार्यात लिहिलेल्या सर्व साहित्याचा प्रकाश माझ्या संपूर्ण मनपटलावर पडला आणि मी तेजोमय झालो.
सरांचा आध्यात्मिक व्यासंग, त्यांनी केलेल्या कार्याचे व आठवणींचे फोटो सहित माहिती कात्रणे बघायला मिळाली. सर्व संतांची चरित्रे, संत ग्रंथ, आणि विविध संतांचे फोटो पाहून अचंबित झालो. त्यानंतर त्याने मला बसायला खुर्ची दिली. त्यांनी केलेले सर्व कार्य दाखवले व मी ‘ वाचून काढले. अभिप्राय नोंद वहीत माझा अभिप्राय नोंदवला. संत गाडगेबाबांच्या जीवनावर त्यांनी लिहलेली दोन पुस्तक मला भेट दिली.
संत गाडगेबाबा अध्यासन निर्माण करून श्री भगत सरानी आपले संपूर्ण जीवन या कार्यासाठी समर्पित केले होते. त्यांनी लिहिलेल्या असंख्य पुस्तकापैकी 42 हून अधिक पुस्तके संत गाडगेबाबा याच्या चरित्रावर आहेत. गाडगेबाबा यांच्या जीवनावरील अनेक व्याख्याने सुद्धा बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात दिलेली आढळून आली. त्याची एक झलक म्हणून वऱ्हाडी भाषेत संत गाडगेबाबा कशा पद्धतीने लोकप्रबोधन करायचे याचे प्रत्यक्ष त्यांनी माझ्यासमोर कला सादर केली हे पाहून तर मी अक्षरशः भारावून गेलो. हा तपस्वी जगला कसा असेल ! आपलं संपूर्ण जीवन संतचरित्र, संतसाहित्य व संत गाडगेबाबा अध्यासन याकडे त्यांनी समर्पित केलेले आढळून आले. या वयात सुद्धा त्यांच्या बोलण्यातील स्पष्टता, आवाजातील चढ उतार, भाषेवर असणारे त्यांचे प्रभुत्व, ओघावती भाषा तसेच आपुलकीने आणि जिव्हाळ्याने माणसं जोडणारा हा अवलिया माझ्याकडून कोल्हापुरात राहत असताना सुद्धा कसा राहून गेला याचे शल्य मला त्या ठिकाणी झाले.
मी त्यांच्या चरणी नतमस्तक झालो. सरांना विनंती केली की, “मी अध्यात्मिक साहित्याचे लिखाण करत असतो. अध्यात्मिक साहित्यामध्ये गुरूंचे स्थान अनन्यसाधारण आहे. आपला व्यासंग, आपले अध्यात्म आणि आपले संत गाडगेबाबा यांच्यावरील प्रेम हे पाहून मी या क्षणापासून आपल्याला गुरुस्थानी मानत आहे. असे म्हणून मी त्यांचे चरण धरले. त्यांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला, जणू काय मी त्यांचा अत्यंत जवळचा प्रिय शिष्य आहे, असे मला वाटू लागले. त्यांनी त्या दिवशी भरपूर त्यांच्या आठवणींना उजाळा हे दिला. त्यांच्याकडून ज्ञानाची शिदोरी घेऊन मी नंतर घरी पोहोचलो.
पुन्हा करवीर साहित्य परिषदे कडून माझ्या काव्यसंग्रहाला पुरस्काराची घोषणा झाली. त्या कार्यक्रमात सुद्धा मी उपस्थित होतो. प्राचार्य भगत सर यांच्याकडे बोलण्याचं कौशल्य असल्याने स्टेजवर ते बोलताना अनेक अशी उदाहरण स्पष्टीकरण करून कार्यक्रमाची रंगत वाढवत होते. त्यानी अचानक पणे मलाही बोलण्याची त्या ठिकाणी संधी दिली. मी स्टेजवर त्यांच्या पाया पडलो आणि अध्यात्मिक व्यासंग व भगतसरांचे माझ्या जीवनातील महत्त्व यावरती मी त्या ठिकाणी माझे मनोगत व्यक्त केले.
त्यानंतर पुन्हा आमच्या भेटी होत गेल्या. माझी मुलगी आसावरी हिच्याशी तरी आजोबांच्या नात्याने त्यांनी खूप प्रेम दिले. मी एकटा दिसलो तर ते स्पष्ट म्हणायचे, आज मुलगी आसावरी दिसत नाही. या वयात सुद्धा त्यांची स्मरणशक्ती वाखाणण्यासारखी होती . ते प्रत्येकाला ओळखत होते तसेच प्रत्येकाच्या नात्याला ओळखत होते.
मागील महिन्यामध्ये माझ्या चार काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी मी त्यांना अध्यक्षस्थानी निमंत्रित केले. त्यावेळी डॉक्टर साळे हे माझ्या हृदयातच आहेत असे सांगून एका गुरुचे आपल्या शिष्यावरील अतूट प्रेमाचे प्रचिती दिली. त्यांचे प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताचे भाषण ऐकून मी दंग झालो. आणि त्या दिवशी माझ्या सोबत बसून त्यांनी भोजनाचा सुद्धा आस्वाद घेतला. हीच ती आमची शेवटची भेट. त्यांच्या घरात असणारी संत गाडगे महाराजांची भव्य दिव्य मूर्ती एखाद्या समाज मंदिरामध्ये द्यावी अशी त्यांची इच्छा होती. त्यांची ही इच्छा अर्धवट राहिली.
संत गाडगेबाबांचे विचारधारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहचवणारा हा अवलिया कायमचा काल आपणा सर्वांना सोडून निघून गेला. आजच्या या कलियुगामध्ये अशी माणसं आपणास पाहावयास मिळाली, अनुभवास मिळाली. मला गुरुस्थानी लाभले हे निश्चितच माझे भाग्य आहे. त्यांच्या जाण्याचं जरी आपणास दुःख झाले असले तरी त्यांनी केलेले कार्य पुढे घेऊन जाणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरू शकेल. त्यांना मनोभावे वंदन करतो.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.