January 25, 2025
Jokes on women article by Yashwanti Shinde
Home » स्त्रियांवरील विनोद आणि सामाजिक मानसिकता
गप्पा-टप्पा

स्त्रियांवरील विनोद आणि सामाजिक मानसिकता

समाजजीवनात आपण नेहमी असे पाहत असतो. बर्‍याचदा स्त्रीची, पत्नीची चेष्टा/कुचेष्टा होते. कारण काहीही चालतं. पुरुषाची/पतीचीही चेष्टा होते; नाही असं नाही, पण दुय्यम दर्जाचे विनोद स्त्रियांवरतीच केले जातात. ना त्याला आड असते ना बूड. बर्‍याचदा विनोदाच्या माध्यमातून स्त्रियांचा अपमान केलेला असतो. कधी तिला अक्कल कमी असते, असं सुचवायचं असतं.

यशवंती शिंदे, कोल्हापूर
मो. 8830179157

काही आठवड्यांपूर्वी आमच्या ग्रुपमधील एक काकी आजारी होत्या, म्हणून त्यांना भेटण्यासाठी आम्ही सर्व मैत्रिणी त्यांच्या घरी गेलो होतो. काका-काकी एक खूप आनंदी जोडपे. काकांचा स्वभाव खूपच विनोदी, चेष्टेखोर. घरी गेल्यावर ते दोघेही होते. खूप दिवसांनी सगळ्या मैत्रिणी भेटत होतो. चहापाणी झाले आणि गप्पा सुरू झाल्या. गप्पांच्या ओघात काकी काही गमतीजमती सांगू लागल्या (अर्थात काकांबद्दलच्या). “मला ते इतक्या साड्या घेतात, नको म्हटलं तरी ऐकत नाहीत. मध्ये अशाच चार साड्या एकदम घेतल्या. त्यांचे ब्लाऊज अजूनही शिवले नाहीत. मी हा दागिना हवा, तो दागिना हवा असं म्हणते म्हणून मला सोनाराकडे घेऊन गेले आणि एकदम पंधरा तोळे सोन्याचे दागिने काकांनी घेतले बघा,” असं त्या नवर्‍याविषयी कौतुकाने सांगत होत्या. पुढे म्हणाल्या, “एकदा तर मला न विचारता त्यांनी एकाच वेळी चार चपलांचे जोड विकत आणले. घरात घालायला वेगळी, बाहेर घालायला वेगळी, शूज वेगळे असे चार जोड!”

असं काकू नवर्‍याचं गुणगान करत होत्या, इतक्यात तिथे जवळच बसलेले काका नेहमीच्या विनोदी शैलीत म्हणाले, “लागत्यात हो. एक मारायला घावला नाही तर दुसरा लगेच हाताला लागतो.” असं काकांनी म्हणताच काकींसहित सगळ्या मैत्रिणी काकांच्या या विनोदावर हसू लागल्या. मी मध्येच अडवत काकींना म्हणाले, “काकी, इतकं चपलेनं मारतात व्हय नवर्‍याला? नका मारत जाऊ!” त्यावर काका एकदम चिडीचूप. मैत्रिणी मात्र विजयी मुद्रेनं ‘बरोबर आहे, असाच टोमणा पाहिजे’, असं म्हणत आणखी मोठ्याने हसू लागल्या.

समाजजीवनात आपण नेहमी असे पाहत असतो. बर्‍याचदा स्त्रीची, पत्नीची चेष्टा/कुचेष्टा होते. कारण काहीही चालतं. पुरुषाची/पतीचीही चेष्टा होते; नाही असं नाही, पण दुय्यम दर्जाचे विनोद स्त्रियांवरतीच केले जातात. ना त्याला आड असते ना बूड. बर्‍याचदा विनोदाच्या माध्यमातून स्त्रियांचा अपमान केलेला असतो. कधी तिला अक्कल कमी असते, असं सुचवायचं असतं. उदा. काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाने स्त्रियांसाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसमध्ये अर्धे तिकीट अशी सवलत जाहीर केली आणि ती सुरूही झाली. स्त्रियांसाठी शासनाने अशी सवलत द्यावी, अशी मागणी स्त्रियांनी कधीही केली नव्हती; पण या निर्णयावरूनसुद्धा स्त्रियांवर विनोद करण्याचे पीक आले. अक्कल कमी असते म्हणून हाफ तिकीट वगैरे विनोदांचा सोशल मीडियावर पाऊस पडू लागला.

अशाच प्रकारचा एक विनोद समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. एका ज्येष्ठ नागरिकाच्या फोनवर अपरिचित व्यक्तीचा फोन येतो. त्या वेळी फोन त्या व्यक्तीच्या पत्नीकडे असतो. ती फोन उचलते आणि तो फोनवरचा अनोळखी माणूस तिला आपण बँकेतून बोलत असल्याचे सांगतो. आधार नंबर, पॅन नंबर मागून मोबाइलवर पाठवलेला एक पासवर्डही विचारतो. त्याच वेळी बाहेर गेलेल्या नवर्‍याच्या लक्षात येते की, आपला मोबाइल घरीच राहिला आहे. म्हणून तो पटकन घरी येतो. पत्नी त्याला घडलेली हकीकत सांगते. तो माणूस कपाळाला हात लावून तिला म्हणतो, “मेलो, बुडाले आपले सगळे पैसे. तू त्याला मोबाइलवर आलेला पासवर्डही सांगितला ना?” त्यावर त्या बाई म्हणतात, “अहो, मला काय वेडी समजता का? मी हाफ तिकीट आहे, मी पासवर्डचा हाफ नंबरच सांगितला!” आता मला सांगा, खरंच बायका इतक्या मूर्ख असतात का? तिने हाफ नंबर सांगितल्यामुळे पैसे वाचले हा भाग वेगळा; पण या गोष्टीला हाफ तिकिटाशी जोडण्याचा काय संबंध?

असेच विनोद नोटबंदीच्या काळातही स्त्रियांच्या पैसे साठवण्यावर केले गेले. ती हिशोब चुकवून नवर्‍याकडून जास्त पैसे कसे काढते आणि साठवते, यावर तर नेहमीच विनोद केले जातात. पण एक गोष्ट लक्षात येत नाही का, की बायका पैसे साठवून घरातच ठेवतात, घरातच एखादी वस्तू घेतात, दागिना घेतात, जो अडचणीच्या वेळी पुरुषांनाच (घरासाठी का असेना) उपयोगी येतो. ते तिने साठवलेले पैसे मुलाच्या/पतीच्या अडचणीच्या वेळी हक्काचे म्हणून मदतीला येतात. पुरुष ते पैसे वापरतातही, तरीही तिच्या या पैसे साठवण्यावर विनोद करायचे आणि तिला मूर्खात काढायचे, असे सररासपणे दिसून येते.

स्त्रीचे माहेर, तिचा भाऊ, बहीण, आईवडील आणि माहेरची माणसं हे तर नेहमीच विनोदाचे विषय असतात. ते मुलीकडे कसे येऊन राहतात, मुलीच्या घरी आले की परत जातच नाहीत, मुलीच्या संसारात माहेरचे विष कालवतात वगैरे प्रवाद तर या विनोदांचे हक्काचे विषय. परंतु यात सत्यता किती असते, याबद्दल प्रत्येकाने आत्मपरीक्षण करणेच चांगले.

स्त्रियांची साडीखरेदी, भाजीखरेदी, दागिने खरेदी, ते करत असतानाही तिची घासाघीस करण्याची सवय अशा सर्व विषयांवर विनोद होतात. स्त्रियांच्या नटण्या-मुरडण्यावर, मेकअपवर, साडी नेसण्यावर, ड्रेस घालण्यावर, गाऊन नेसण्यावर असे कुठलेही विषय विनोदासाठी/टर उडविण्यासाठी वर्ज्य नसतात. कधी तिच्या दिसण्यावर, तिच्या उंचीवर, जाडीवर, खाण्यावर, चालण्यावर, बोलण्यावर, रंगावर… असे कुठल्याही विषयाचे बंधन नसते. विनोद सर्वच पातळ्यांवर, स्त्री-पुरुष सर्वांवरतीच होतात; पण स्त्रियांवरच्या विनोदाचा दर्जा बर्‍याचदा हीन असतो.

पुरुषांवरतीही विनोद केले जातात, पण त्यात वास्तव किती असते हा वेगळाच अभ्यासाचा भाग! उदा. एका विनोदामध्ये आजी नातीला म्हणते, “अगं बाई, तू स्वयंपाक करणं शीक थोडासा. मुलीच्या जातीला स्वयंपाक करता यायला पाहिजे.” यावर नात म्हणते, “पण का?” आजी म्हणते, “अगं, कधी नवरा घरी नसला तर काय उपाशी झोपत जाशील का?” आता या विनोदामध्ये किती तथ्य आहे? किती नवरे स्वयंपाक करतात? आणि किती बायका नवर्‍याने स्वयंपाक केला नाही म्हणून उपाशी झोपतात? जी गोष्ट कधीच घडत नसते किंवा घडलेली नसते, ती खरी म्हणून पसरवणे याला प्रोपगंडा म्हणतात. तो यामधून पसरविला जातो.

अशीच गोष्ट नवर्‍याने भांडी घासण्याच्या विनोदामध्ये असते. बायकोने/आईने पाणी दिल्याशिवाय कित्येकांना पाणी पिण्याचे माहीत नसते आणि त्यांच्यावर जोक होतात की, एक पत्नी नवर्‍याला म्हणते, “मी तुला लग्नाच्या आधी भांडी घासताना पाहिले होते, म्हणून मी तुझ्याशी लग्न केले.” गंमत आहे ना! मला वाटते, असे खोटे प्रवाद पसरवून विनोद निर्माण करण्यामागे एक तर जे काम स्त्रिया करतात, ते हलक्या दर्जाचे आहे असे भासवायचे किंवा जी गोष्ट कधीच खरी नसते ती खरी आहे असे दाखवून आम्ही हे काम करतो म्हणजे आम्ही किती ग्रेट हे दाखवायचे, असाच हेतू असावा.

दुसरा एक आमच्या मैत्रिणींमध्ये घडलेला किस्सा मला आवर्जून सांगावासा वाटतो. आमच्या एका मैत्रिणीने आणि तिच्या नवर्‍याने नवीन घर घेतले. नव्या घरात बर्‍याच नव्या वस्तू ते दोघे निवडत होते. मग गमतीने तिला मैत्रिणींपैकी एकजण म्हणाली, “काय गं, नवीन घर, नवे फर्निचर, मग साहेबांना नव्या घरात नवीन बायकोही आणायला सांगू का आम्ही?” यावर एकच हशा पिकला. पण आमची हजरजबाबी मैत्रीण म्हणाली, “नव्या घरात, साहेबांनाच नवी बायको लागते? मला नव्या घरात नवा नवरा नको का?” हे ऐकून सगळ्यांचे चेहरे गंभीर झाले. कायपण बोलते ही! बाईने कुठं नवा नवरा मागतात का? चेष्टेत असलं म्हणून काय झालं, असं कसं म्हणावं? इतकी कशी ही निर्लज्ज! असाच जणू सगळ्यांच्या चेहर्‍यावरती आविर्भाव दिसत होता.

म्हणजे पुरुषाला पहिली बायको असताना त्याने नवी बायको करणं आपण सहजपणे स्वीकारतो, पण तेच स्त्रियांच्या बाबतीत कल्पना करणंही निलाजरेपणाचं मानलं जातं. स्त्रियांनासुद्धा हे इतकं सहज आणि सवयीचं झालं आहे की, त्याचं त्यांना काहीच वावगं वाटत नाही. कारण समाजात अशा घटना आपण कुठे ना कुठेतरी पाहिलेल्या असतात. तसं बाईने पहिला नवरा असताना, एकाच घरात दुसरा नवरा केल्याचं कधी ऐकिवातही नसतं. अशा स्वतःवरच्या विनोदांना स्त्रिया कधीही गांभिर्याने घेत नाहीत.

समाजात असे घडताना पाहिलेले असल्यामुळे बाईने दुसरा नवरा मागणं हे विनोद म्हणूनही पचत नाही. विनोदातही बाईने तसं बोलणं म्हणजे आपली संस्कृती बुडण्यासारखं (?) असतं, असभ्य, निर्लज्ज, अश्लील असणं असतं. कितीही झालं तरी तो पुरुष आहे, त्याने म्हणणं चांगलं दिसतं. आपण बायामाणसं! असलं कसं बोलावं? असं म्हणत थेट त्या स्त्रीच्या चारित्र्यापर्यंत जायला लोक मागेपुढे पाहात नाहीत.

आणखी एक स्त्रियांच्या बाबतीत बहुधा प्रत्येकीच्या वाट्याला एकदा तरी येणारा विनोद म्हणजे, घरातला नवरा किंवा इतर कुणीतरी मुलांना गमतीने म्हणतात, ‘तुला आपण नवी मम्मी आणू या. ही मम्मी रागावते, भांडते, मारते’ इत्यादी. पण असा विनोद कधी कुणा पुरुषाच्या बाबतीत घडत नाही की, ‘हा बाबा वाईट आहे. आपण नवीन बाबा आणू या.’ हीच बाब ‘साली, आधी घरवाली’सारख्या विनोदांमध्ये येते. अशा विनोदांमधून स्त्रियांवरती मालकी हक्क दाखविण्याचा प्रकार दिसून येतो. पण मुलीने ‘देवर, आधे शौहर’ म्हटलं की भुवया उंचावतात.

या सगळ्या स्त्रियांवरती केल्या जाणार्‍या विनोदांमध्ये निखळ विनोद असता तर काही लिहिण्या/बोलण्यासारखं किंवा तक्रार करण्यासारखं नाही; पण हे सगळे अशा प्रकारचे विनोद स्त्रीचे समाजव्यवस्थेतील स्थान आपल्या नजरेस आणून देतात, असे मला वाटते. याला पुरुषसत्ताक व्यवस्थेचं सांस्कृतिक राजकारण म्हणतात. एखाद्यावरती विनोद केल्याने त्याचे गौण असणे अधोरेखित केले जाते. त्या व्यक्तीची गुणवत्ता, क्षमता, बुद्धिमत्ता यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मग विनोद करायचे आणि स्त्रियांच्या क्षमतांवरती प्रश्नचिन्ह उभे करायचे ! बायका अशाच असतात, निर्णयक्षमता नसलेल्या, अक्कलहीन, मूर्ख, खर्चिक, भांडखोर; बायांच्या पोटात काही राहात नाही, असे विनोदांमधून नकळतपणे रुजवायचे. अशा रुजलेल्या गोष्टी आपोआपच पक्क्या होत जातात आणि समाजव्यवस्थेमध्ये स्त्रीची एक प्रतिमा निर्माण करतात.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

1 comment

Sukhada October 5, 2023 at 11:31 AM

Very nice 👍👍

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading