शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांना आंतरराष्ट्रीय यूके पेटंट प्राप्त
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधकांनी बायोमासपासून औषधनिर्माण क्षेत्रासाठी अत्यंत उपयुक्त असणाऱ्या संयुगांची निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. त्यांच्या या संशोधनाला यूकेचे पेटंट प्राप्त झाले आहे. प्रतिजैविके व कर्करोगावरील चाचण्यांमध्ये त्यांचे उपयोजन शक्य आहे.
विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. शंकर हांगिरगेकर आणि अक्षय गुरव व ललित भोसले या संशोधकांनी ग्राइंडस्टोन केमिस्ट्री वापरुन बायोमासपासून हायड्रॉक्झी मिथाईल फुरफुराल हे मूलद्रव्य वापरून नवीन हायड्राझिनिल थायाझोल संयुगे तयार करण्याची पद्धती शोधली आहे. या शोधाला संयुक्त राष्ट्रांचे (यूके) प्रतिष्ठित पेटंट मिळाले आहे.
डॉ. हांगिरगेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संशोधनात नवीन हायड्राझिनिल थायाझोल संयुगे तयार करण्यासाठी ग्राइंडस्टोन केमिस्ट्री या अत्यंत सोप्या आणि पर्यावरणपूरक पद्धतीचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे, या नव्या पद्धतीमध्ये कोणत्याही उत्प्रेरकाचा किंवा द्रावणाचा वापर न करता कमी वेळेत उत्कृष्ट उत्पादन मिळवता आले. बायोमासपासून निर्मित फाईव्ह-हायड्रॉक्सी मिथाइल फुरफुराल याचा महत्त्वपूर्ण घटक म्हणून वापर करून संशोधकांनी औषधनिर्माण क्षेत्रात उपयुक्त असलेल्या हायड्राझिनिल थायाझोल संयुगांचा संग्रहच तयार केला आहे. हे संशोधन औषधनिर्माण क्षेत्रासाठी अभिनव ठरले असून पर्यावरणपूरक रसायनशास्त्रातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. शिवाजी विद्यापीठाच्या संशोधन क्षेत्रातील नवकल्पना आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाच्या विकासासाठीची वचनबद्धता या यशातून अधोरेखित होते. या पद्धतीच्या वापरामुळे शाश्वत विकासाला चालना मिळेल तसेच हा शोध हरित संशोधनाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल, असे मत डॉ. हांगिरगेकर यांनी व्यक्त केले.
संशोधनाचे महत्त्व असे…
जैव-नविकरणीय स्रोतांपासून प्राप्त होणाऱ्या संयुगांमध्ये 5-हायड्रॉक्सी मिथाइल फुरफुराल (HMF) हे महत्त्वाचे जैव-आधारित रासायनिक मध्यवर्ती असते. लिग्नोसेल्युलोसिक बायोमास आणि अन्न कचऱ्यापासून ते सहज उपलब्ध होऊ शकते. पर्यावरणपूरक दृष्टिकोनातून, रासायनिक प्रक्रिया अधिक शाश्वत करण्यासाठी 5-हायड्रॉक्सी मिथाइल फुरफुराल (HMF) सारख्या बायोमास-आधारित संयुगांचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. तसेच, त्यापासून तयार केलेल्या हायड्राझिनिल थायाझोल या रसायनाचा संशोधन क्षेत्रात अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-कॅन्सर या चाचण्यांसाठी देखील उपयोग झाला आहे. हायड्राझिनिल थायाझोलचे संशोधन औषध उत्पादनात मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरले आहे आणि त्याचे औषधी फायदेदेखील आढळले आहेत. अन्न सुरक्षा आणि पर्यावरणीय शाश्वततेसाठी हे महत्त्वपूर्ण ठरू शकते, असे डॉ. हांगिरगेकर यांनी सांगितले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.