February 29, 2024
For spiritual progress we need the teachings of enlightened gurus
Home » अध्यात्मिक प्रगतीसाठी हवा आत्मज्ञानी गुरुंचा उपदेश
विश्वाचे आर्त

अध्यात्मिक प्रगतीसाठी हवा आत्मज्ञानी गुरुंचा उपदेश

आणि तेचि समयी । सद्गुरु भेटले पाहीं ।
तेवींचि तिहीं काही । वंचिजेना ।। ९९७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – आणि पाहा, त्याच वेळी सद्गुरू भेटले व त्याचप्रमाणें त्यांनी कांहीही ज्ञानाचा उपदेश करण्यात प्रतारणा केली नाही.

सद्गुरु आत्मज्ञानी असावा. सध्या असे व्यक्तिमत्व भेटणे मुश्किल झाले आहे. असे असले तरी भारतीय गुरु-शिष्य परंपरा ही खंडीत होणारी नाही. कारण यामध्ये गुरू व शिष्य दोघेही एकमेकांचा शोध घेत असतात. आत्मज्ञानी गुरू ज्ञानदानासाठी खऱ्या शिष्याच्या शोधात असतो तर खरा शिष्य आत्मज्ञानी गुरूंच्या शोधात असतो. दोघांची भेट ही महत्त्वाची आहे. शिष्याच्या शोधात फिरणारे गुरू शिष्याला नित्य अनुभुती देत राहातात. त्याला नित्य जागृत करण्याचा प्रयत्न करत असतात. खरा शिष्य सुद्धा येणाऱ्या अनुभुतीनुसार गुरूंच्या शोधात असतो. ज्ञानदानासाठी नित्य आतुर असणाऱ्या गुरूंना शिष्य भेटतो, तेंव्हा लगेच काही शिष्य आत्मज्ञानी होत नसतो. जमिनीत बी पेरल्यानंतर लगेचच काही त्याला फळे येत नसतात. ते बी रुजावे लागते. तो फुटलेला अंकूर वाढून त्याचे वृक्षात रुपांतर व्हावे लागते. त्यानंतरच मग त्याला फळे लागतात. म्हणजेच काही ठराविक कालावधी जावा लागतो. रुजलेले बी वाढण्यासाठी त्याची काळजी घ्यावी लागते. त्याला खते, पाणी द्यावे लागते. काही वृक्ष स्वबळावर वाढत असतात. जंगलात कोण पाणी आणि खते घालायला जाते. तेथे तर बी पडतेही, रुजते अन् त्याचा वृक्षही होतो. असे स्वयंभू गुरूही असतात. पण त्याला तसे भाग्य असावे लागते.

गुरु-शिष्य यांच्यात आंतरिक ओढ असते. आपण अध्यात्माकडे केंव्हा वळतो ? सर्वच जणांना आध्यात्मिक विचार पटतात असे नाही. काहींना हे शास्त्र थोतांड वाटते. वेळ फुकट घालवण्याचा प्रकार वाटतो. त्यांना तसे वाटणे स्वाभाविक आहे. कारण हे शास्त्र अंतकरणातून समजून घ्यावे लागते. मनातून, हृद्यातून ते प्रकट व्हावे लागते. गुरूंनी दिलेल्या अनुभवाच्या आधारावर हे शास्त्र शिष्य आत्मसात करत असतो. म्हणजेच त्यांचात आंतरिक ओढ असते. तळमळ असते. शिष्याला ज्ञान घेण्याची अन् गुरुला ज्ञान देण्याची ओढ लागलेली असते. तेंव्हाच हे शास्त्र खऱ्या अर्थाने समजून येते. पडणाऱ्या प्रश्नांना उत्तरे मिळत नसतात तेंव्हा मार्गदर्शन करणारा कोणी तरी असावा असे वाटत असते. असाच एखादा मार्गदर्शन भेटतो अन् तो त्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो. अंतरज्ञानातून त्यांनी दिलेली ही उत्तरे शिष्याला मार्गदर्शक ठरतात. अशा गुरूमध्ये आपले पूर्वज, वडिलधारी मंडळी, आई-वडील यांचाही समावेश होतो. शाळेत, महाविद्यालयात शिकवणाऱ्या गुरुंचाही समावेश होतो. मित्र-सख्या सोबतींचाही अशा गुरुमध्ये समावेश असतो. वेळप्रसंगी आपणास त्यांचे मार्गदर्शन भेटत असते. पण यात आत्मज्ञानी गुरुंनी दाखवलेली वाट ही शिष्याला अधिक मार्गदर्शक ठरते कारण त्यात दुरदृष्टी असते.

असा आत्मज्ञानी गुरु शोधणे गरजेचे आहे. मग तो गुरू समाधीस्थ असला तरी तो मार्गदर्शन करू शकतो. कारण त्यांची समाधी ही संजिवन असते. सध्या अंगाला भस्म लावून, भगवी वस्त्रे घालून फिरणारे असे अनेक गुरु भेटतात. पण ते आत्मज्ञानी असतात असे नाही. भगवी वस्त्रे घातली, भस्म लावले म्हणजे गुरु झाला असे कधी होत नाही. गुरू हा मनकवडा असावा लागतो. अन् हे ज्ञान त्याला परंपरेने मिळालेले असते. अनुवंशिकतेच्या वारसा हक्काने हे ज्ञान मिळेलच असे नाही. म्हणजे आत्मज्ञानी गुरूची मुले ही आत्मज्ञानी असतीलच असे नाही. कारण हे ज्ञान अनुभुतीने मिळत असते. त्यातूनच शिष्याची प्रगती होत असते. यासाठी रक्ताचा वारसा लागतो असे कधीच नसते. हे बोधशास्त्र आहे. बोधातून शिष्य घडत असतो. यासाठी शिष्याला प्रसंगी भटकंतीही करावी लागते. वेड्यासारखे त्याला शोधही घ्यावे लागतात. म्हणजे तो वेडा असतो असे नव्हे. पण या अनुभुतीने त्याला झपाटलेले असते. उत्तर मिळत नाही तोपर्यंत त्याचा शोध संपत नसतो. यासाठी प्रसंगी त्याग करण्याचीही वृत्ती ठेवावी लागते.

सद्गुरुंकडून मिळणारे अनुभव हे शिष्याची आध्यात्मिक गोडी वाढवत असतात. बोधामृतातून शिष्याचे तेज वाढत असते. यासाठी शिष्याने अभ्यासू वृत्ती सोडता कामा नये. अभ्यासात दक्षतेला अधिक महत्त्व आहे. म्हणजे घरदार सोडायचे असे नाही. संसारात राहूनही या शास्त्राचा अभ्यास करता येतो. हे शास्त्र आत्मसात करता येते. संसार हा होत असतो. मात्र परमार्थ करावा लागतो. संसारात राहून परमार्थ साधायचा असतो. गुरू भेटल्यानंतर, त्यांचा उपदेश भेटल्यानंतर लगेचच आत्मज्ञानी कोणी होत नसते. तो वृक्ष वाढावा लागतो. अन् योग्य वेळ आल्यानंतर त्या वृक्षाला फळे ही लागतात. याचा अभ्यास करतच बोधातून आत्मज्ञानी व्हायचे असते. सद्गुरुच हे ज्ञान देत असतात. त्यांच्यातूनच ते प्रगट होत असते.

Related posts

गुरूंची आवश्यकता कशासाठी ?

रुतला बाई काटा…

चौकुळ येथे हजारो वर्षापूर्वीच्या अशनी विवराचा शोध: डाॕ.अतुल जेठे

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More