भक्ताला आत्मज्ञानी करण्यासाठी त्याला विविध अनुभूतीतून प्रेरित करीत असतात. समाधी सुखाचा लाभ प्रत्येक भक्ताने घ्यावा, अशी त्यांची इच्छा असते. हेच तर खरे योगियांचे समाधिधन आहे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 9011087406
हा योगियांचे समाधिधन । कीं होऊनी ठेलें पार्था अधीन ।
यालागीं विस्मयो माझें मन । करीतसे राया ।।१७४।। ज्ञानेश्वरी अध्याय ११ वा
ओवीचा अर्थ – योगी ज्यांचे सुख समाधीतच भोगतात, असा हा योग्यांच्या समाधीत भोगण्याचें ऐश्वर्य असून, तो अर्जुनाच्या अगदी आधीन झाला आहे. याकरितां राजा धृतराष्ट्रा, माझें मन आश्चर्य करते.
रणभूमीवर मनाने खचलेल्या, युद्ध न करण्याच्या मनःस्थितीत असलेल्या अर्जुनाला भगवान कृष्ण युद्ध करण्यासाठी प्रेरित करत आहेत. अर्जुनाची मनःस्थिती सुधारण्यासाठी भगवंतांना स्वतःचे विश्वरूप दाखवावे लागले. हे सर्व प्रसंग पाहण्याचे भाग्य भगवंताच्या कृपेने संजयाला मिळाले आणि याचे सर्व वर्णन संजय अंध धृतराष्ट्राला सांगत आहे; पण धृतराष्ट्रावर याचा काहीही परिणाम झाला नाही. यामुळे कौरव कुळाचा सर्वनाश झाला. यासाठी नुसती सद्गुरूंची कृपा असून चालत नाही, तर योग्य दृष्टी असावी लागते.
भगवंत अर्जुनासाठी विश्वरूपमय झाले. यासाठी अर्जुनासारखी भक्ती असावी लागते. दुष्ट-दुर्जनांचा नाश करण्यासाठी भगवंताचा अवतार आहे, पण हे कृत्य ते आपल्या परमभक्ताकडून करवून घेऊ इच्छित आहेत. यासाठी केवळ निमित्तमात्र होण्याचे आवाहन भगवंत अर्जुनास करत आहेत. माऊली दृष्ट-दुर्जनांच्या मनातील दुष्टपणा काढून प्रेमाची शिकवण देऊ इच्छित आहेत. यासाठी अर्जुनासारखे परमभक्त होण्याचे आवाहन ती करत आहे. जगात सुखशांती, समृद्धी नांदावी यासाठी आत्मज्ञानी सद्गुरू नेहमीच प्रयत्नशील असतात. हाच तर त्यांचा धर्म आहे. हीच तर खरी भारतीय संस्कृती आहे.
सद्गुरू आत्मज्ञानाचा ठेवा कसा मिळवायचा, हे सांगत आहेत. तो मिळविण्यासाठीच युद्ध करण्याची प्रेरणा ते देत आहेत. अपयशाने दुःखी कष्टी होऊन, मनाने खचल्यानंतर अनेक जण अध्यात्माकडे वळतात. तसा ते योग्य मार्ग स्वीकारतात, यात शंकाच नाही, पण धृतराष्ट्रासारखी दृष्टी नसावी. अर्जुनासारखी वेध घेणारी नजर असावी. खऱ्या जीवनाचा अर्थ समजून घेण्याचे सामर्थ असावे. तरच ते या अपयशातून योग्य मार्गावर येतील. सद्गुरू योगीरूपाने त्यांना योग्य वाटेवर आणतात.
अर्जुनासारखा भक्त भेटला तर ते त्याला आपल्या पदावर बसविण्यासाठी धडपडतात. भक्ताने मात्र यासाठी निमित्तमात्र व्हायचे असते. सद्गुरू समाधिस्थ झाले तरीही ते आपल्या परमभक्तांना अनुभव देत असतात. भक्ताला आत्मज्ञानी करण्यासाठी त्याला विविध अनुभूतीतून प्रेरित करीत असतात. समाधी सुखाचा लाभ प्रत्येक भक्ताने घ्यावा, अशी त्यांची इच्छा असते. हेच तर खरे योगियांचे समाधिधन आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.