कृत्रिम बुद्धिमतेने क्षणात सर्व समस्या सुटू शकतील. क्षणात सर्व काही सहज उपलब्ध होऊ शकेल. पण त्यालाही मर्यादा आहेत हे लक्षात घ्यायला हवे. तो स्व चा विकास कसा करायचा याचे तंत्रज्ञान सांगू शकेल, पण स्व चा विकास हा आपणास स्वतःच करावा लागतो हे लक्षात घ्यायला हवे.
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406
मग अलिंगिला पूर्णिमा । उणीव सांडी चंद्रमा ।
तैसे होय वीरोत्तमा । गुरुकृपा तया ।। ९६९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा
ओवीचा अर्थ – पौर्णिमेने आलिंगलेला चंद्र ज्याप्रमाणे आपल्या स्वरुपांतील कलेचा कमीपणा ठेवीत नाही त्याप्रमाणे अर्जुना, त्या साधकाला गुरुकृपेने पूर्णत्व प्राप्त होते.
अमावशेनंतर चंद्र हळूहळू कलेकलेने वाढत असतो, अन् पौर्णिमेला तो पूर्ण दिसतो. त्याच्यात कोणतीही कमतरता राहात नाही. अध्यात्मातही साधकाची प्रगती अशीच होत असते. अज्ञानाचा अंधार ज्ञानाच्या उजेडाने हळूहळू नष्ट होतो. अन् साधकही ज्ञानाने परिपूर्ण होतो. ही वाढ ही चंद्राच्या कलेप्रमाणे असते. पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राप्रमाणे साधकही ज्ञानाने परिपूर्ण होतो. त्याच्यात कोणतीही कमतरता राहात नाही. ज्ञानाच्या प्रकाशाने तो उजळून निघतो. त्याच्यातील शितल प्रकाशाने तो मग सृष्टीलाही आनंदी करतो.
गुरुंनी दिलेल्या सोहम मंत्राने शिष्यामध्ये अशी ही आध्यात्मिक प्रगती होत असते. याच गुरुकृपेने शिष्याचा पूर्ण विकास होतो. कलेकलेने विकसित होण्यासाठी साधकाला मात्र याचा अभ्यास प्रत्येक टप्प्यावर करावा लागतो. सावधानता, अवधान, विषय वासनांपासून मुक्ती असे हे विविध टप्पे त्याला पार करावे लागतात. सद्गुरुंच्या अनुभुतीतून नित्य विकासाकडे आगेकुच त्याला ठेवावी लागते. यासाठी स्वतःच्या मनाचा विकासही घडवावा लागतो. सध्याच्या युगात सर्वकाही झटपट उपलब्ध होते. पण हे ज्ञान मात्र हळूहळू विकसित होते. हा बदल लक्षात घ्यायला हवा.
कृत्रिम बुद्धिमतेच्या युगात आध्यात्मिक ज्ञानाची गरज वाटू लागणार नाही. तंत्रज्ञानाने विकसित झालेल्या या युगात अध्यात्म म्हणजे थोतांड वाटू शकते. पण विज्ञानाच्या मर्यादा लक्षात घ्यायला हव्यात. कृत्रिम बुद्धिमतेने क्षणात सर्व समस्या सुटू शकतील. क्षणात सर्व काही सहज उपलब्ध होऊ शकेल. पण त्यालाही मर्यादा आहेत हे लक्षात घ्यायला हवे. तो स्व चा विकास कसा करायचा याचे तंत्रज्ञान सांगू शकेल, पण स्व चा विकास हा आपणास स्वतःच करावा लागतो हे लक्षात घ्यायला हवे. कृत्रिम बुद्धिमत्ता काय चुकते हे सांगू शकेल, योग्य मार्गदर्शन करू शकेल पण स्व च्या विकासातील अनुभूती ही सद्गुरुकृपेनेच प्राप्त होऊ शकते. कारण अध्यात्म हे अनुभव शास्त्र आहे.
स्वतःचा विकास साधण्यासाठी, स्वची अनुभुती घेण्यासाठी स्वतःलाच परिश्रम करावे लागतात. हे ज्ञान परंपरेने चालत आले आहे. अनादी कालापासून चालत आलेली ही परंपरा आहे. गुरु-शिष्य परंपरेचा हा विकास अभ्यासायला हवा. समस्त मानवाच्या कल्याणासाठीचा हा मार्ग समजून घ्यायला हवा. कृत्रिम बुद्धिमतेने मानवाची बुद्धिमताच हरवत चालली आहे. अशाने तो खरंतरं अधिक अस्वस्थ अन् उग्र होऊ लागला आहे. त्याची ही दाहकता चंद्राच्या शीतलतेमध्ये बदलण्याचे सामर्थ्य हे अध्यात्म शास्त्रात आहे. मानवाला अमरत्व प्राप्त करून देणारा हा मानवतेचा मार्ग अनुभवायला हवा. स्वरुपाची ओळख आपणास कोणीही सांगू शकेल, पण ही ओळख अनुभवावे आपण करून घ्यायची आहे अन् अमर व्हायचे आहे. आत्मज्ञानी व्हायचे आहे. हे नैसर्गिक शास्त्र आहे. कृत्रिमता त्यात नाही. हे जाणून घेऊन याचा अभ्यास हा करायला हवा. गुरुकृपेने हे शास्त्र विकसित करायला हवे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.