December 13, 2024
Sakharpa City Market Free From Flood
Home » साखरप्याची बाजारपेठ पुरमुक्त…!
काय चाललयं अवतीभवती

साखरप्याची बाजारपेठ पुरमुक्त…!

जलसाक्षरतेने बदल घडतोय हे खरंच आहे. यंदाच्या वर्षी (2021) मध्ये अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली. पण दरवर्षी पुरात बुडणारी साखरप्याची बाजारपेठ यंदा मात्र पुरात बुडाली नाही. कोकणातील साखरप्याला पुरापासून मुक्तीचा मार्ग गवसला आहे. ‘नाम फाउंडेशन ‘ आणि गावकऱ्यांनी नदी खोलीचा प्रकल्प राबवून हे कार्य केले आहे.

पश्चिम घाटातून वाहत कोकणातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा येथे येणारी काजळी नदी पावसाळ्यात आपत्ती घेऊन येते. संपूर्ण बाजारपेठ आणि रहिवासी भाग पुरात जातो. पण या वर्षी हे घडलेच नाही. साखरपा पुरापासून वाचले ! याला कारण गावकऱ्यांनी नदीतील गाळमुक्तीचा निश्चय केला. दगड गोट्यांच्या स्वरूपात येणाऱ्या गाळाने निर्माण झालेल्या उथळपणाने पुराच्या छायेत असलेल्या साखरप्यातील काजळी नदीची खोली वाढवून गावात घुसणाऱ्या पुराला नियंत्रित करण्यात गावकऱ्यांना यश आले आहे. असा दावा तज्ज्ञांनी केला आहे.

साखरपा या गावातून काजळी ही नदी वाहते. चिपळूणच्या वाशिष्ठी नदी एवढा तिचा विस्तार नाही. पण अत्यंत वेगाने पश्चिम घाटातुन आंबा घाटातून वाहत येते आणि वेगाने जाऊन ती रत्नागिरीच्या समुद्राला मिळते. वरून मोठे नर्मदेतले गोटे येतात. तसेच साचणाऱ्या गाळामुळे नदीचे पात्र उंचावले होते. या नदीच्या दोन्ही बाजूला गाव आणि बाजारपेठ आहे. उथळ झालेल्या पात्रामुळे गावाला पुराचा धोका निर्माण झाला होता. मागील काही वर्षात म्हणजे 2005 च्या पुरात गावाचे खूप हाल झाले. 2019 साली गावच्या लोकांनी एकत्र येऊन या प्रश्‍नावर तोडगा काढता येईल का याची चर्चा केली. यासाठी जलनायक डॉ. अजित गोखले यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. त्यांनी नदीचा शास्त्रीय अभ्यास केला. नेमके काय काम करायचे हे निश्चित केले. त्याची दिशाही ठरली.

Join Us :  फेसबुक पेज लाईक करा - इये मराठीचिये नगरी । Follow Twitter - इये मराठीचिये नगरी 

नाम फौंडेशन ने विनामूल्य यंत्र (पोकलेन) उपलब्ध करून दिले आणि गावकऱ्यांनी इंधनाचा खर्च केला. लोकसहभागातून काही निधी उभारला. १२ लाखाचे कर्ज देखील या कामासाठी घ्यावे लागले. असे एकूण ३५ लाख रुपये खर्च झाले. १ किलोमीटर परिसरात नदीचे पात्र खोल करून गाळ काढण्यात आला. खोली ४ मीटर करण्यात आली. पात्र दीडशे फूट रुंद करण्यात आले.

मुग्धा सरदेशपांडे, प्रसाद सरदेशपांडे, गिरीश सरदेशपांडे, श्रीधर कबनुरकर तसेच नाम फाउंडेशनच्या सहकार्याने गावकऱ्यांनी हे आव्हान पेलले. अजून ४ वर्ष काम करत राहावे लागणार आहे. मे अखेर काम संपलं पण त्या कामाने देखील आज साखरपा या गावाला पुराची दाहकता तेवढी जाणवली नाही. म्हणजे थोडक्यात स्थानिक स्तरावरील लोकांनी पुढाकार घेऊन तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन समाजाचे सहकार्य घेऊन काम केल्यास बदल निश्चित घडतो, असे जलसाक्षरता केंद्र यशदाचे माजी कार्यकारी संचालक डॉ. सुमंत पांडे यांनी सांगितले.

कोकणातील ‘हाय फॉल रेन एरिया’ मध्ये काम करताना ‘नाम फौडेशन’ ला आम्ही तांत्रिक सल्ला देतो. साखरपा प्रकल्पात आमच्या’नॅचरल सोल्युशन्स’ टीमने तेच केले. कोकणात ७० वर्षातील वृक्ष तोडीने नद्यात गाळ साठला आहे. त्या उथळ झाल्या आहेत. नद्या आता २०० फुट रुंद झाल्या आहेत. त्यामुळे पूर गावात येत आहेत. साखरप्यात हेच होत होते. साखरप्याचे सर्वेक्षण करून आराखडा केला, गावकऱ्यांनी काम केले. आणि पूर गावात यायचा थांबला.

डॉ अजित गोखले

संस्थापक
नॅचरल सोल्युशन्स

कोकणात पावसाच्या पाण्याला वाहायला जागा केली पाहिजे, पावसाळ्यानंतर पाणी अडवायला सुरुवात केली पाहिजे. इतर ठिकाणचे जलसंधारणाचे तंत्र कोकणात चालणार नाही, कोकणसाठी वेगळा विचार आणि तंत्र वापरले पाहिजे’. आता नुकताच वशिष्ठी नदीने आपल्या प्रकोपचे दर्शन घडवले आहे आणि चिपळूण शहरात आठ फूट उंच पाणी होतं त्यामुळे झालेली वित्त आणि मनुष्य हानी खूप दुःखद आहे. पण साखरप्याच्या गावकऱ्यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. कोकणातील अनेक नद्यांसाठी हा आशेचा किरण नक्कीच आहे, असेही डॉ. गोखले यांनी सांगितले.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading