डॉ. प्रतिमा इंगोले यांचा सातबारा हा कविता संग्रह शेतकरी महिलांमध्ये जागृती अन् हक्कासाठी लढायला बळ देणारा असा आहे. राबणाऱ्या महिलांची नावे सातबाऱ्यावर नसतात त्यामुळे बऱ्याचदा त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. नवऱ्याच्या पश्चात कष्टाचा जीण त्यांच्या पदरी पडते. शेतकरी नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्या महिलेला किती हालअपेष्टा सोसाव्या लागतात. त्यांच हे दुःख इंगोले यांनी या कविता संग्रहात मांडले आहे. यातीलच एक कविता पुढे दिली आहे. सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी महिलांना जागे करणारी ही कविता…
करायला सांगा, बदल नवा
सातबारावर स्त्रीचं, नाव लिहा
सखू बकू तुम्ही, छाया माया तुम्ही
हाच आग्रह, धरायला हवा
लग्न जुळविती, पाहून शेती
खरं तर शेती, दोघांची संपत्ती
नवरा चोरून, विकता वावर
बाई समजतो, चरणांची चाकर
बाईला देवघेव, कळत नाही
नवरा व्यवहार, सांगत नाही
अन्याय असा, मोडायला हवा
वाटा संपत्तीत, मिळायला हवा
नवऱ्यानं टाकलं. बायको भिकारी
न्याय, पैसा नाही, हिंडते दारोदारी
हक्काच्या घरी, तिची चाकरी
तरी फिरून परतून, येई माहेरी
त्यासाठी बदल, अवश्य हवा
सातबारावर तिचंही, नाव लिहा
लढून झगडून, करायला लावा
हक्काचा बदल, हवाच हवा
- कवयित्री – डॉ. प्रतिमा इंगोले