April 3, 2025
Rules of Good thoughts can overcome bad habits
Home » विचाराने विषयांना मारण्यासाठीच शास्त्रीय नियम
विश्वाचे आर्त

विचाराने विषयांना मारण्यासाठीच शास्त्रीय नियम

झाडपाला हा शेळीसाठी आवश्यक असला तरी सुबाभूळामध्ये मायमोसीन व इतर सर्व झाडपाल्यामध्ये टॅनिन हे अपायकारक पदार्थ आहेत. प्रमाणापेक्षा जास्त झाडपाला खाल्ल्यास जनावरांच्या शरीरात अपायकारक पदार्थांचे प्रमाण वाढते. सुबाभळीचा पाला जास्त खाऊ घातल्यास जनावरांच्या अंगावरील केस गळून पडतात.

राजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406

परदारादिक पडे । परी विरुद्ध ऐसें नावडे ।
मग शेळियेचेनि तोंडे । सैंध चारी ।। 229 ।। ज्ञानेश्वरी अध्याय 14 वा

ओवीचा अर्थ – परस्त्री वैगरेंशी प्रसंग आला असतां, या गोष्टी शास्त्रनिषिद्ध आहेत, असे त्यास वाटत नाही व मग शेळीप्रमाणें इंद्रियांना बरं वाईट विषय सरसकट चारतो.

शहराच्या आसपास असणाऱ्या जनावरांना योग्य प्रकारचा चारा मिळत नाही अशी स्थिती आहे. जनावरांच्या पोटात प्लास्टिकचे कागद मिळाल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. कचराकुंड्यामध्ये पडलेला ओला कचरा खाता खाता ह्या पिशव्या त्यांच्या पोटात गेल्या. अशी ही जनावरे दूध तरी कोणत्या प्रतीचे देणार ? ग्रामीण भागातही आता हीच स्थिती निर्माण होत आहे. अशावेळी आता वेळीच सावध होण्याची गरज आहे.

जनावरांच्या शरीरास पोषक आहार देणे हे पशुपालकाचे कर्तव्य आहे. तरच ते जनावर योग्य ते दुधाचे उत्पादन देईल. दिसेल त्याला तोंड लावायची जनावरांना सवय असते. यासाठी जनावर कोठे चरते यावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. काही काही जनावरांची वैशिष्ट्ये असतात. ती ठराविकच पाला खातात. शेळी करंज, रुई, निरुगुंडी, सीताफळ, लिंब, घाणेरी, गारवेल, अडुळसा, बेल, कणेरी यांचा पाला हिरवागार असला तरी त्याला तोंड लावत नाहीत. एक लिटरपेक्षा अधिक दुध देणाऱ्या शेळ्यांना प्रतिदिन तीन ते चार किलो हिरवा चारा लागतो. वाळलेला चारा एक किलो लागतो. तसेच 100 ते 200 ग्रॅम खुराक देणे आवश्यक आहे.

शेळीला शेवरी, अंजन, हादगा, बाभूळ, सुभाबुळ, बोर, वड, पिंपळ इत्यादी झाडांचा पाला व शेंगा आवडतात. शेळींची पैदास शास्त्रीयदृष्ट्या करणे महत्त्वाचे आहे. हे शास्त्रीय नियम पाळावेत, असे ज्ञानेश्वर माऊलीचेच सांगणे आहे. योग्यवेळी भोजन, आहार याची गरज आहे. झाडपाला व चवदार खाद्य पचविण्याची क्षमता शेळीमध्ये उत्तम असते. शेळीसाठी जवळपास 70 टक्के चारा हा झाडपाल्याचा असतो. चाऱ्याच्या टंचाईच्याकाळातही योग्य खुराक देण्यासाठी बेजमी करून ठेवणे आवश्यक आहे.

झाडपाला व झाडाच्या चिकातील शेंगा दोन प्रकारे साठविता येतात. पहिल्या पद्धतीत झाडपाल्यापासून मुरघास तयार केले जाते तर दुसऱ्या पद्धतीत फुलोऱ्यावर आलेला झाडपाला व चिकात आलेल्या शेंगा डहाळून सावलीत वाळविल्या जातात. अशा प्रकारे साठविलेला झाडपाला व झाडाच्या शेंगा, चारा व खुराक म्हणून टंचाईच्या काळात वापरता येते. यासाठी मेढपाळांनी नियोजन करणे आवश्यक आहे.

झाडपाला हा शेळीसाठी आवश्यक असला तरी सुबाभूळामध्ये मायमोसीन व इतर सर्व झाडपाल्यामध्ये टॅनिन हे अपायकारक पदार्थ आहेत. प्रमाणापेक्षा जास्त झाडपाला खाल्ल्यास जनावरांच्या शरीरात अपायकारक पदार्थांचे प्रमाण वाढते. सुबाभळीचा पाला जास्त खाऊ घातल्यास जनावरांच्या अंगावरील केस गळून पडतात. जनावरांची वाढ खुंटते. जनावरे रोज चारा व खुराक खात नाहीत इत्यादी अपायकारक परिणाम दिसून येतात. दिवसभरात खाऊ घातलेल्या चाऱ्यात सुबाभळीच्या चाऱ्याचे प्रमाण एक तृतीयांशपेक्षा कमी ठेवल्यास कोणताही अपाय होत नाही.

शास्त्रीय नियम पाळले तर आरोग्य उत्तम राहाते. परस्त्रीशी संबंध ठेवणे हे शास्त्र निषिद्ध गोष्ट आहे. शास्त्राला ती मान्य नाही. विचार केला तर असे लक्षात येईल की काही रोग हे अशा संबंधातून होतात. एड्स हा रोग कशामुळे होतो ? हे आता वेगळे सांगण्याची गरज नाही. भारतीय संस्कृती ही शास्त्रावर आधारित आहे हे यासाठीच म्हटले आहे. परस्त्री माते समान ही शिकवण ही यासाठीच आहे. विचाराने विषयांना मारता येते यासारखे उत्तम उदाहरण काय सांगता येईल.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading