September 9, 2024
Sachin Suryawanshi Warasa Ajay Kandar article
Home » सचिनचा…’वारसा’
मनोरंजन

सचिनचा…’वारसा’

सचिनचा…’वारसा’

आपल्याकडे ज्या इतिहासकालीन गोष्टी जतन व्हायला पहिजेत त्या जतन केल्या जात नाहीत आणि इतिहासाच्या नावाखाली नको त्या गोष्टींचे बाजारीकरण केले जाते. या पार्श्वभूमीवर सचिन सुर्यवंशी या तरुणाने शिवकालीन युद्ध कलेवर ‘वारसा ‘ हा लघु चित्रपट बनवला. ही महत्वाची इतिहासकालीन नोंद आहे. ‘वारसा’ला यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.ही अभिमानाची घटना आहे

अजय कांडर,
लेखक विख्यात कवी, व्यासंगी पत्रकार आहेत. ९४०४३९५१५५

कोल्हापूरचा तरुण सचिन बाळासाहेब सुर्यवंशी हा आता कोल्हापूर पुरता मर्यादित राहिलेला नाही, तर त्याचे नाव आता मराठी लघु (माहिती) चित्रपटाच्या परंपरेत अभिमानाने घेतले जाईल. त्याने बनवलेल्या ‘वारसा ‘ या लघु चित्रपटाला नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सन्मान प्राप्त झाला आणि पुन्हा त्याच्या कामाकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले. यापूर्वी कोल्हापुरकरांच अलौकिक फुटबॉल प्रेम याविषयावर त्याने बनवलेल्या ‘द सॉकर सिटी’ या माहितीपटाला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.त्यानंतर त्याने शिवकालीन युद्धकला अभ्यासक्रमात यावी आणि तिला पुन्हा एकदा प्रतिष्ठा मिळावी या इच्छेतून वारसाची निर्मिती केली आणि वारसाला खणखणीत यशही मिळाले. याबद्दल सचिन व त्याच्या सहकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच.मात्र असे असले तरी आपल्याकडे माहितीपटांना अजून हवी तेवढी प्रतिष्ठा मिळत नसल्याची खंतही त्याच्या मनात आहे.

आपल्याकडे ज्या इतिहासकालीन गोष्टीं जतन करायला पाहिजे, त्यांचं जतन होत नाही आणि नको त्या गोष्टींचं स्तोम माजवले जाते.नीट इतिहास समजून घेतला, तर आपला इतिहासच आपली खरी प्रेरणा आहे हे लक्षात येईल; पण इथली नतध्रष्ट राजकीय व्यवस्था इतिहासाचं बाजारीकरण करण्यात गुंतलेली.महाराजांचे पुतळे उभारा आणि अल्प बुध्दी लोकांना भावनिक संवेदनशीलतेवर संमोहित करा.एवढाच यांचा इतिहासाशी संबंध. त्यामुळे इतिहास म्हणजे आज एवढ्याच उद्याच्या जगण्याचीही समृध्दी हेही या व्यवस्थेला माहीत नाही.परिणामी मागील पिढीकडून पुढील पिढीकडे या अलौकिक इतिहासाचा वारसा पोहचविण्याची जबाबदारीच आपण स्वीकारत नाही म्हणूनच महाराष्ट्र राज्याच्या शालेय क्रीडा अभ्यासक्रमात थांगता, कलरी फाईट, तायंकादो अशा परदेशी युद्धकलांचा समावेश असला, तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध केलेला अभ्यासात स्थान नाही. ही गोष्ट सचिनला त्रासदायक वाटत होती.त्यातून शिवकालीन युद्धकला अर्थात मर्दानी खेळ जतन करण्यासाठी कोल्हापूरमधील काही तालमींची वस्तादांची व मूठभर मर्दानी खेळाडूंची चाललेली धडपड हा विषय घेऊन” वारसा” हा माहितीपट सचिनने बनवला आणि या कलेकडे त्याने पुन्हा तरुणाईला आकर्षित केले.

चित्रपट माध्यम हे जगभर आपला विचार पोहचवण्याचं महत्वाचं माध्यम आहे; पण सचिन याला अगदी कॉलेज पूर्ण होईपर्यंत माहिती नव्हतं, की सिनेमा कसा बनवतात किंवा सिनेमा बनवायचं कॉलेज असतं वगैरे. या सगळ्या गोष्टी त्याला कॉलेज संपल्यावर समजल्या. व्यक्त होण्याची गरज हे त्याचं सिनेमा या माध्यमाकडे वळण्याचं मुख्य कारण आहे.त्याला असं वाटलं ,की ज्या गोष्टींचा आपल्याला त्रास होतो, आपल्या आजूबाजूच्या, समाजाच्या काही अडचणी आहेत, काही समस्या आहेत, वैयक्तिक पातळीवर माणसांची घुसमट आहे. त्या किमान आपलं मन मोकळं करण्यासाठी आणि त्या गोष्टी समाजापर्यंत पोहचविण्यासाठी मांडायला हव्यात. यातून तो सिनेमा माध्यमाकडे वळला. याआधीचा माहितीपट सॉकर सिटी बनवतानाही त्याचा हाच विचार होता.

कोल्हापूरातले जे फुटबॉल खेळाडू आहेत, त्यांना चहाच्या गाडीवर काम करायला लागते. दिवसभर एमआयडीसी मध्ये, चहाच्या गाडीवर काम करणारी मुलं संध्याकाळी फुटबॉलग्राउंडवर जाऊन फुटबॉल खेळतात आणि हजारो माणसांची मनं जिंकतात. युरोपियन देशात जशी फुटबॉलला प्रतिष्ठा आहे तशी आपल्याकडे नाही हे त्याला जाणवलं आणि ते मांडायला पाहिजे असंही त्याला वाटलं. त्याच पद्धतीने मग शिवाजी महाराजांच्या हातातली काठी आहे, तलवार आहे तिचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे किंवा याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे म्हणूनच वारसाही लघु चित्रपट त्याने बनवला. आपल्याला होणारा त्रास मांडायचं सगळ्यात चांगलं माध्यम त्याला सिनेमा हेच वाटतं.

पूर्ण लांबीची फिल्म किंवा शॉर्ट फिल्म असो शेवटी त्या मागचा विचार महत्त्वाचा असतो. तरी जेव्हा राष्ट्रीय पुरस्कार मिळतो तेव्हा पूर्ण लांबीच्या चित्रपटाच्या यशाचं अधिक कौतुक केल जातं. शॉर्ट फिल्मच्या यशाकडे थोडं दुर्लक्ष होतं या अनुषंगाने बोलताना सचिन म्हणतो, पूर्ण लांबीची फिल्म बनवण्याची प्रोसिजर खूप मोठी आहे. खर्च मोठा आहे आणि त्याचा आवाका पण दांडगा आहे. त्यामुळे फिल्मच्या तुलनेत शॉर्टफिल्म तशी कमी महत्वाची किंवा कमी दखल घेण्यासारखी जर वाटत असेल तर त्याच्याबद्दल काय हरकत असण्याचं कारण नाही.

चित्रपटांच्या तुलनेत माहितीपटांना आपल्याकडे कमी महत्व व कमी प्रतिष्ठा आहे. जगभरात डॉक्युमेंटरी व डॉक्युमेंटरी मेकर्सची मोठी चळवळ आहे. तिकडे खास महितीपटांचे मोठे मोठे फेस्टिवल्स भरवले जातात. आपल्याकडे मनोरंजनाला जास्त महत्व दिलं जातं.प्रेक्षकाला काय बघायला आवडतं ? याचाच अधिक विचार केला जातो. त्यांच्या आवडीच्या काल्पनिक गोष्टी मांडल्या जातात. माहितीपटांमध्ये तसं नसतं. तिथे फॅक्ट मांडावी लागते. पुरावे दाखवावे लागतात. मनघडण गोष्टींना तिथे थारा नसतो. खरं तर चित्रपटापेक्षा माहितीपटांना जास्त प्रतिष्ठा मिळाली पाहिजे कारण तो वास्तव दाखवतो. आपल्याकडे माहितीपटांना फार प्रतिष्ठा नसल्याने तिकडे वळणारी माणसंसुद्धा फार कमी आहेत. ज्यांना खरोखरच काहीतरी व्यक्त होण्याची किंवा महत्वाचं मांडायची आस आहे आणि विशेष म्हणजे जे मांडल्याशिवाय झोप लागत नाही अशीच लोकं त्याकडे वळतात.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

राष्ट्रीयकृत बँका, रिझर्व्ह बँकेकडून केंद्राला भरघोस लाभांश

वडणगेचा गणेशोत्सव

रत्नागिरीत रंगला मराठी गझल मुशायरा

1 comment

The Bridge August 28, 2024 at 11:04 AM

दुर्दैवाने असे निर्माते त्यांच्या ध्येय विषायाशी संबंधित व्यक्ति आणि संस्थांच्या संपर्कात नसतात,
महाराष्ट्र जगाचे गोडवे गाण्यात मग्न असतो,
सचिन यांना जर त्यांनी मराठा लाइट इन्फ्रट्रि च्या कर्नल ना संपर्क केला तर बराच उपयोग होईल.

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading