April 5, 2025
Shailaja Barure Comment on Amar Habib speech
Home » शेतीभान देणारे संमेलनाध्यक्ष अमर हबीब
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतीभान देणारे संमेलनाध्यक्ष अमर हबीब

21 व 22 जानेवारी 2023 रोजी घाटनांदुर येथे होत असलेल्या पहिल्या मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अमर हबीब यांची निवड करण्यात आली आहे. पहिल्या मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांच्या निवडी मागे अमर हबीब यांचे ‘शेती आणि शेतकऱ्यांच्या’ संदर्भातील आजपर्यंतचे कार्य आणि किसान पुत्र आंदोलन ही चळवळ नक्कीच आहे. अमर हबीब पत्रकार ,साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. तिन्ही व्यवसायाचे व्रत म्हणजे सदसद विवेकबुद्धीला बांधील राहून, आपल्या धारदार लेखणी आणि वाणी, वक्तृत्व याच्या आधारे समाजातील दोषांची चिकित्सा व गुणांची रुजवणूक करण्यासाठीच झिजले पाहिजे.

प्रा.डॉ. शैलजा भारतराव बरुरे,
कोषाध्यक्ष
मराठवाडा साहित्य परिषद अंबाजोगाई

आपल्या अध्यक्षीय भाषणात साहित्याचा बदलत्या सामाजिक परिस्थितीत, अस्वस्थतेच्या कालखंडात विचार करण्याची आवश्यकता अमर हबीब यांनी व्यक्त केली आहे. लेखकाला आपल्या भोवतालचे भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळातील चांगुलपण आणि अस्वस्थता टिपता आली पाहिजे.
पत्रकार आणि सामाजिक चळवळीतून पुढे आलेला कार्यकर्ता म्हणून समाजाच्या प्रश्नांकडे पाहण्याची एक चिकित्सक वृत्ती अमर हबीब यांच्यामध्ये भिनली आहे.

‘ शेतकरी आणि स्त्रिया’ या दोन सर्जकाबरोबर साहित्यिक असणाऱ्या तिसऱ्या सर्जक घटकांनी पहिल्या दोन सर्जक घटकांचा विचार करणे आणि आपल्या साहित्यातून संदर्भासहित व्यक्ती, समाज, शासन आणि साहित्यिक चळवळीने दखल घेणे आवश्यक आहे. यासाठीचा अध्यक्षीय भाषणात अत्यंत आग्रह दिसून येतो.

अमर हबीब आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये शेती व शेतकऱ्याच्या जीवघेण्या वर्तमानाची ही दखल घेतात. शेतकरी आत्महत्यांचा आलेख सातत्याने वाढतो आहे. जिवंत असणाऱ्या शेतकऱ्यांची झालेली कोंडी ही विविध कारणांनी आहे.

वर्तमानपत्र, राज्य व केंद्र सरकारी शेती व शेतकऱ्याच्या या अवस्थेला शेतकऱ्याचे अज्ञान, अंधश्रद्धा, दुष्काळ ,निसर्ग खाजगी सावकारी ,व्यसनाधीनता यांना दूषणे देत असतात. कार्ल मार्क्सने ज्याप्रमाणे मानवी इतिहासाचे टप्पे मांडत असताना माणसाचा इतिहास हा केवळ वर्ग संघर्षाचा इतिहास आहे असे म्हटले होते किंवा मानवी नातेसंबंधांना आर्थिकता हा पायाभूत घटक अत्यंत महत्त्वाचा असतो अशी एक त्या काळामध्ये कोणीही मांडणी न केलेली नव्याने इतिहासाची मांडणी केली होती. त्याचप्रमाणे भारताच्या शेती व शेतकऱ्यांच्या दुरावस्थेसाठी अमर हबीब हे नवीन मांडणी करताना दिसतात. सातत्याने राज्यकर्त्यांनी शेती व शेतकऱ्याला शोषणाचे साधन मानले आहे.

शेती व शेतकऱ्याचा दर्जा निम्न राहण्या मध्ये मध्ययुगीन कालखंडापासूनच शासन कर्त्याच्या शेतीविषयक धोरणांचा मोठा समावेश असल्याची संदर्भासहित मांडणी अमर हबीब करतात. राज्य कर्त्यांना अनुकूल अशा लोकांचे हितसंबंध जपण्यासाठी शेती व शेतकऱ्यावर कठोर कायद्यांचे निर्बंध लादून ,त्यांचे अनेक पिढ्यांचे शोषण करण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यातील जगण्याचा जीवन रस शोषून घेतला गेला आहे. तसेच आता नव्याने यामध्ये अनेक शासकीय धोरणांचा परिणाम म्हणून विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकऱ्याची नवनिर्माण शक्ती काढून घेणारे विविध कायदे अस्तित्वात आहेत. याशिवाय शहरी मध्यमवर्गीयांसाठी जगण्याच्या सर्व व्यवस्था अनुकूल असून शेतकऱ्यांना मात्र सातत्याने अभावग्रस्त जीवन जगण्यासाठीच सर्व व्यवस्था धडपडत असतात. त्याला कायदे व्यवस्थेने अधिक हातभार लावला आहे.

कोणत्याही एका राजकीय पक्षाच्या ध्येयधोरणावर ,शासनावर टीका न करता भारत स्वतंत्र झाल्यापासून सर्व पक्षीय सरकार यांना आपल्या टीकेचे केंद्र बनविले आहे. अमर हबीब यांनी लिहिले आहे की शासनकर्त्यांनी शेती व शेतकऱ्यांना दुर्लक्षित ठेवले आहे, एवढेच नव्हे तर विविध जाचक कायदे निर्माण करून न्यायालयाची, न्याय मागण्यासाठी चे रस्ते आणि दारही बंद करून टाकले आहेत ,हे सत्य अजूनही अनेक शेतकरी व शेतकरी पुत्रांपर्यंत पोहोचलेले नाही.

साहित्य संमेलनाच्या निमित्याने ग्रामीण भागातील विशेषतः शेतीवर अवलंबून राहणाऱ्या सामान्य माणसाला आपल्या जगण्यातल्या प्रश्नांची ओळख करून देणे व भोवतालाची समज वाढविणे, आपल्या भूमिकांच्या माध्यमातून पुढच्या संघर्षाच्या दिशा ठरविण्यासाठी हे अध्यक्षीय भाषण अत्यंत मोलाचे ठरणार आहे.

आरोग्य आणि शिक्षणासारखे मूलभूत अधिकार, भागवण्याची ऐपत शेतकऱ्यांकडे नाही आणि दुसरीकडे मात्र हाच तो काळ आहे, हीच ती पिढी आहे, ज्यांनी आधुनिकीकरण, शहरीकरण आणि जागतिकीकरणाने निर्माण केलेले प्रचंड बदल पाहिले आहेत. एकीकडे या बदलांमुळे उपभोक्तावादी झालेला समाज आणि दुसऱ्या बाजूला मात्र स्वतःच्या जीवनावश्यक गरजाही न भागवू शकणारा बहुसंख्य शेतकरी अथवा शेतीवर अवलंबून असणारा समाज. यांच्यातली दरी वाढते आहे .ही नवीनच एक विषमता अस्तित्वात येत आहे.

अमर हबीब यांनी भारताच्या अर्थ, समाज व सांस्कृतिक व्यवस्थांच्या बाबतीत वर्गसंघर्ष अथवा वर्णसंघर्ष या फसव्या कल्पना असल्याचे म्हटले आहे .खरी विषमता अथवा खरी विषमतेची दरी ही नवनिर्माण करणारे सर्जक आणि परोपजीवी बांडगुळ यांच्यामधील आहे असे म्हटले आहे. सर्जक म्हणजे जे आपल्या घामातून, श्रमातून इतरांचं जीवन समृद्ध करत असतात अथवा त्यांना जगण्यासाठी चे मूलभूत द्रव्य घटक पुरवीत असतात आणि दुसरीकडे मात्र सातत्याने आपण फक्त उपभोग घेण्यासाठी जन्माला आलो आहोत ,अशी एक बांडगुळांची , परावलंबी अथवा दुसऱ्यांचे शोषण करणाऱ्या लोकांची जमात तयार झाली आहे. या दोन घटकातील सातत्याने वाढत जाणारी दरी आणि यातून शेतकऱ्यांच्या जीवनाचं होत असलेलं अवमूल्यन त्यातून होणाऱ्या वाढत्या आत्महत्या आणि या पार्श्वभूमीवर ग्रामीण साहित्य संमेलनाच औचित्य काय असलं पाहिजे, हे त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये नमूद केले आहे.

आतापर्यंत साहित्यात साहित्यिकांनी केलेल्या शेतकरी चित्रणाचे दाखले देत, साहित्य आणि साहित्यिकांनी शेतकऱ्यांचं विद्रूप अथवा विकृत चित्रण केल्याचा आरोपही अमर हबीब करतात. मुळात शेती कधीही आदर्श जीवन पद्धती अथवा सर्वश्रेष्ठ संस्कृती राहिलेली नाही परंतु ग्रामीण जीवन रेखाटत असताना विविध साहित्यिकांनी या शेतकरी आणि शेतीच अतिशय रसभरीत वर्णन करून त्याच्या दारिद्र्य व दुराअवस्थेकडे दुर्लक्षच केले आहे .मुळामध्ये शेतकऱ्याच्या दुःखापर्यंत साहित्यिकाची लेखणी पोहोचू शकली नाही. शेतीला स्वर्गीय सुखाच्या उपमा देणारे लोक स्वतः मात्र शेती करीत नाहीत, ही विसंगती सुद्धा अमर हबीब यांनी नोंदवलेली आहे.

शेतकऱ्याचं असलेलं पारतंत्र्य ,दुरावस्था यालाच शेतकऱ्याने उदात्त भावनेने स्वीकारून स्वर्गीय सुखाचा आनंद घेत आहोत असं व्यक्त करणं, त्याच्या साक्षी देणे यासाठीच हे साहित्य निर्माण झाले आहे की काय अशी शंका वाटते आहे, असे लिहिले आहे. शेती ही स्वतःच्या इच्छेने स्वीकारलेले , उदरनिर्वाहाचे साधन असलं पाहिजे, भारतात मात्र शेती करणे ही सक्ती ठरते आहे. जगभरातील विविध देशांमध्ये शेती करण्यासाठी शासनाकडून प्रोत्साहन दिले जाते याचे कारण बाहेर देशात शेती करण्यासाठी कोणीही उत्सुक नाही.

भारतात बहुसंख्य लोक शेतकरी असूनही त्यांनी मर्जीनुसार शेती करावी व त्यातून आनंदी सुखमय जीवन व्यतीत करावे यावर शासन नेहमी शेती व शेतकरी विरोधी राहिलेले आहे. अमर हबीब लिहितात की शासनाचा अतिरेकी हस्तक्षेप व शेतकऱ्यांना गळफास ठरलेले महत्त्वाचे तीन कायदे यामध्ये कमाल जमीन धारणा कायदा, जमीन अधिग्रहण कायदा, आवश्यक वस्तू कायदा या कायद्यानशिवाय अन्य कायद्यांचाही वापर केवळ शेतकऱ्यांच्या गळ्याचे फास आवळण्यासाठी झालेला आहे. शेतकरी आणि समाजातील सर्वच घटकांनी याचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे आणि आपल्या साहित्यात शेतकऱ्यांचे वास्तव चित्र, त्याच्या जगण्यातील खरे प्रश्न, ताण -तणाव रेखाटले पाहिजे. शेतकऱ्याला अडाणी अथवा त्याला काही वेळेला विनोदी ,शूद्र पात्र बनवून येथील शोषित घटक बनविण्याचे कार्य शासन, साहित्यिक व समाजातील सर्वच लोकांनी केल्याचे अमर हबीब यांनी म्हटले आहे.

साहित्याची भूमिका दुहेरी असते .एकीकडे समाजातील सर्जनशील तेला प्रोत्साहन देणे आणि दुसरीकडे एक स्वतंत्र कला म्हणून साहित्याची निर्मिती करणे. आत्तापर्यंतच्या साहित्यिकांनी साहित्याला केवळ कला म्हणून पाहिले आहे. साहित्याने समाजातील बहुसंख्य असणाऱ्या भारतीय शेतकरी, शेती यांची सर्जनशीलता संपविणाऱ्या घटकांकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे .उलट साहित्यिकांनी प्रस्थापित, शोषक ,राजे यांच्या दावणीलाच आपल्या लेखण्या वाहिलेल्या होत्या.
संमेलन अध्यक्ष अमर हबीब यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रस्थापित ,समाजमान्य साहित्यिक यांच्यावर टीका केली आहे .याचबरोबर लेखनाच्या विविध प्रेरणांचा ही उल्लेख केला आहे.

कोणत्याही व्यक्तीमध्ये सर्जनाच्या प्रेरणा या कोषांतरा नंतर उदयास येतात, असेही कोषांतराचा सिद्धांत या मुद्द्यांमध्ये अमर हबीब यांनी लिहिले आहे .एखादी व्यक्ती उद्योग, व्यवसाय, सेवा याच्या निमित्ताने जेव्हा स्थलांतर करते तेव्हा त्याचे मूळ गाव आणि त्याची नंतरची असलेली कर्मभूमी यातील तुलना, यातील सांस्कृतिक, सामाजिक पोषण तत्त्व यामुळे त्या व्यक्तीच्या मध्ये अनेक सर्जनाच्या किंवा उत्कृष्ट साहित्य निर्मितीच्या प्रेरणा निर्माण होतात. याची उदाहरणे सांगत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘गाव सोडा’ या आवाहन दिला गेलेला लोकांकडून चा प्रतिसाद आणि त्यानंतर दलितांच्या जीवनामध्ये झालेले परिवर्तन व त्यातून दलित साहित्याची झालेली निर्मिती, याचेही संदर्भ मृदगंध पहिले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अमर हबीब यांनी दिले आहेत .विशेषतः जेव्हा विदेशातून पाश्चात्य अथवा मोगल आक्रमक इथे आले. त्यांनी भारतामध्ये उत्कृष्ट साहित्य निर्माण केल्याचेही दाखले दिले आहेत.

स्वतंत्र होणे, स्वतंत्र विचार करणे, स्वतःचा अवकाश निर्माण करणे, समाजाला नाविन्याचा अलंकार चढविण्यासाठी, सर्जन व सृजनाचा अविष्कारासाठी साहित्य निर्माण झाले पाहिजे. मृदगंध पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची साहित्याच्या संदर्भात भूमिका काय आहे याचा मागवा घेतला तर प्रामुख्याने एक गोष्ट आपल्या कायम स्मरणात राहील की साहित्याने शेती आणि शेतकऱ्याच्या जीवना विषयी, त्यांच्या जगण्याविषयी, त्यातील प्रश्नांविषयी, त्यातील उत्तरांसाठी गांभीर्याने दखल घेणे ,प्रयत्न करणे आणि कृती करणे आवश्यक आहे.

अशा विचारपिठांची निर्मिती एखाद्या प्रश्नाच्या अथवा जीवघेण्या समस्येचा सर्वांगांनी विचार करावा, यामध्ये शिक्षक, विद्यार्थी स्वतः शेतकरी ,साहित्यिक समाजकारणी आणि उपस्थितांमध्ये असलेल्या विविध क्षेत्रातील संवेदनशील व्यक्तींनी हे समजून घेऊन, त्याचा अर्थ लावून आपल्या व्यवहाराला उच्च व विचारी, कृतिशील ठरविण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. या आवश्यकतेची अपेक्षा व्यक्त करून अमर हबीब येथे थांबत नाहीत तर महात्मा फुले यांच्याप्रमाणेच साहित्य संमेलनातून सामाजिक -आर्थिक परिवर्तनाची, क्रांतीची सुरुवात झाली पाहिजे, यासाठी पुन्हा एल्गार पुकारण्याची गरज व्यक्त करतात आणि वर्षानुवर्ष, अनेक पिढ्या शेतकरी भावाच्या समृद्धीची ,राज्याची मनोकामना करणारी तिसरी सर्जक घटक स्त्री,बाई ओवाळतानाची प्रार्थना ‘इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ या प्रार्थनेने हे अध्यक्षीय भाषण संपविले आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading