विश्व मराठी संमेलन २०२३ च्या निमित्ताने….
’मराठी ३६०’ ह्या संकल्पनेतून, अवघ्या विश्वातील मराठी माणसांना एका व्यासपीठावर आणत, मराठी भाषिकांना जोडत – माय मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहत ‘एक वैश्विक मराठी ब्रँड’ बनविण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न खरोखरीच स्तुत्य होता.
शैला धाबे, स्टॉकहोम, स्वीडन
महाराष्ट्र शासनाच्या, मराठी भाषा विभागातर्फे ‘मराठी तितुका मिळवावा’ ह्या विश्व मराठी संमेलनात सहभागी होण्यासाठी ४ जानेवारीला मुंबई येथील वरळीच्या सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात पोहचले. दालनाच्या आवारात चाललेलं लोककलांचं -लोकसंगीताचं प्रदर्शन डोळ्यांचे पारणे फेडत होतं.. ह्यात पहाटेची भूपाळी म्हणणारा वासुदेव होता, डोक्यांवर तुळशीवृंदावन घेऊन टाळ मृदूंगाच्या घोषात निघालेली पालखी होती, ढोलताशांचा दणदणीत ठेका होता , पताका घेऊन, ‘रामकृष्ण हरी’ म्हणत निघालेली वारकऱ्यांची दिंडी होती, जात्या वरच्या ओव्या होत्या, उखळावरची गाणी होती.. जोगवा होता.. पोवाडा होता.
सुहास्य स्वागत करून , तत्परतेने नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणारी चमू, आकर्षक सजावटीने नटलेलं प्रशस्त प्रवेश दालन, त्यात मराठमोळी वातावरण निर्मिती करणारे सनईचे मंजुळ स्वर, नऊवार साडी-केसांमध्ये माळलेला गजरा आणि ठसठशीत नथ अशा मराठमोळ्या पारंपरिक वेशात मिरवणाऱ्या भगिनी, गेल्यागेल्या चहापानाचं आगत्य आणि सभागृहात प्रवेश करताच, कानी पडलेले.. ‘स्वतंत्र ते भगवती… ’ चे उंच स्वर!
अंगावर हर्षाचे रोमांच उभे राहिले!!
एकीकडे संत तुकारामांच्या ‘ आम्हां घरी धन .. शब्दांचीच रत्ने ‘ तर दुसरीकडे संत ज्ञानेश्वर माऊलींच्या ‘माझा मऱ्हाठाची बोलू कौतुके -परी अमृतातेहि पैजा जिंके ‘ ही ठळक वचन मिरवणारे भव्य फलक व्यासपीठाची शोभा वाढवत होते.
सभागृहात शिवगर्जना घुमत होत्या .. इतक्या गर्दीतहि केसरी फेटे उठून दिसत होते.
देशोदेशातून आलेल्या प्रतिनिधींशी हळूहळू ओळखी झाल्या. मग अनेक समान धागे गुंफत गप्पा सुरु झाल्या.
अचानक कुणीतरी आपल्याच जिल्ह्यातली भेटली.. कुणी मैत्रिणीची मैत्रीण .. तर कुणी आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी होता हे कळलं.
एकत्रित जोडण्याची, गप्पा मारण्याची संधी मिळाली. त्या त्या प्रांतात, त्या त्या देशात मराठी भाषा टिकविण्यासाठीची ज्याची त्याची चाललेली धडपड कळली.
कुणी ‘ग्रंथ तुमच्या दारी’ मधून मराठी पुस्तकांची पेटी घरोघरी पोहचवून लहान मुलांना वाचनाची कशी गोडी लावतय ते कळत होतं.. कुणी संस्कार वर्गांबद्दल भरभरून सांगत होत.. एखादा कुणी आपल्या मंडळाच्या सांस्कृतिक मंचाबद्दल बोलत होता.. तर कुणी पटकन पुढे येऊन, स्वत:च्या कवितांचं पुस्तक भेट देत – ‘वाचून अभिप्राय कळवं हं’ म्हणत होतं.
मध्येच , नवी पिढी मराठी बोलतांना लिहितांना-बोलतांना कशा गमती जमती करते ह्यावरहि हास्याचे फवारे उडाले. मुलांसाठीच्या ’हसत खेळत मराठी’च्या वर्गांबद्दल बोललं गेलं.
स्वाध्याय परिवाराचं कुणी पटकन हातात-हात घेऊन म्हणालं – आम्हीही परिवार मिलन- मनुष्यगौरव दिन, गीता जयंती साजरा करतो बरं का आमच्याकडे. मग मुलं कसे एकत्र गीतापठण करतात, श्लोक पाठ करतात ते सांगून झालं.
हिंदू स्वयंसेवक संघाच्या आमच्या शाखेत आम्ही सूर्यनमस्कार महायद्य वा महाखेलोत्सव केला हे सांगीतल्यावर .. मिळणारा ‘अरे वाह! ‘ चा प्रतिसाद हुरूप वाढवत होता.
कुणी बाप्पाची मोठ्ठी मूर्ती आम्ही भारतातून कशी मागवली ते आम्ही वर्षभर ती कशी एकेकाकडे सांभाळतो .. सांगत असतांना ‘अहो आमच्या राज्यात मूर्तिपूजेला विरोध- त्यामुळे गणपती बाप्पा बसवायला किती खटपट करावी लागली म्हणून सांगू? ’
असं म्हणत कुणी त्यांचे अनुभव सांगत होता !
आमच्या गप्पा रंगलेल्या असतांना, चक्क मुक्तीसंग्रामात योगदान देणाऱ्या एक आजी काठी टेकवत-टेकवत जवळ येऊन म्हणाल्या .. ‘आज- आमच्या कष्टांचं सोनं झालेलं दिसतंय बरं का बाळांनो’!
माहितीचं आदानप्रदान झालं, अनुभवांची देवाणघेवाण झाली.
‘गर्जे मराठी’ संघाला भेटून अभिमानाने उर भरून आला तर अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाचा विस्तार आणि प्रगती पाहून वा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय परिवाराचा उत्साह पाहून थक्क व्हायला झालं.
मंचावर तर वेगवेवेगळे परिसंवाद, मुलाखती, सांस्कृतिक कार्यक्रमांची सलग ३ दिवस रेलचेल होती.
आपल्या कित्येक आवडत्या कलाकारांना जवळून ऐकता आलं, पाहता आलं, अनुभवता आलं.
मराठी भाषा, मराठी संस्कृती, साहित्य, उद्योग आणि मराठी खाद्य संस्कृतीचा वैभवशाली वारसा पुढे नेण्याच्या कित्येक पर्याप्त शक्यतांच्या चर्चा झाल्या.आवडत्या जुन्या लेखक कवींना वाचता तसेच ‘नव्या लेखकांना वाचा’ हे आव्हान देखील हृदयाला भिडलं.
उदघाटनपर भाषणांमधून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी ह्यांनी जगभरातून मायभूमीत आलेल्या पाहुण्यांचं दमदार स्वागत करत , मराठीच्या वैभवशाली भविष्यासाठी राज्यसरकार तत्पर राहील असा दिलासा दिला.
‘संकटांनाही संधीत परावर्तित करा’ असं सांगून मराठी मुलांना ‘उद्योजक बनण्याचा मंत्र’ देतांना आदरणीय नितीनजी गडकरींनी ह्या मंचावरून संतांची -समाजसुधारकांची -संशोधकांची आपली संपन्न महाराष्ट्रभूमी आता ‘संपत्ती निर्माण करणाऱ्यांचीहि होवो अशी आशा श्रोत्यांच्या मनात पेरली.
पाठोपाठ माननीय उदय सामंतजींनी – उद्योगशीलतेसाठी दिलेलं मार्गदर्शन प्रोत्साहक होतं.
ह्यात नीलमताईनी देशोदेशीच्या विद्यापीठांना जोडणाऱ्या संधींबद्दल भाष्य केलं तर मनीषाताई म्हैसकरांनी – मराठी संवर्धनासाठी ‘एकीचं बळ’ धारण करण्याचं आवाहन केलं.
मराठीच्या जागराचा हा कार्यक्रम चालू असतांनाच एका मराठी माणसाला – नोबेल पारितोषिक जाहीर व्हावं – हा सर्वोच्च सुखाचा क्षणही येथेच अनुभवला.
सत्कार म्हणून मंत्रिमहोदयांनी त्यांना तुळशीचं रोपटं द्यावं .. आणि ते नम्र स्वीकारून ते स्थानापन्न झाल्यावर – त्यांच्या कोटावर ठसठशीत मोठया दोन तुळशीमाळा झळकत दिसाव्यात हे चित्र भारावून टाकणारं होतं !
हे संमेलन घडून येण्यात मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर ह्यांचा पुढाकार आणि ते यशस्वीरित्या संपन्न व्हावं ह्यासाठी त्यांच्या चमूचे सगळे प्रयत्न ठळकपणे संमेलनभर दिसत होते. भेटणाऱ्या प्रत्येकाशी दीपकजी आत्मीयतेने बोलत होते, त्यांचं म्हणणं ऐकून घेत होते आणि पुढे एकत्र काम करू म्हणून आपल भेटकार्ड देत होते.
मुलांना ‘महाराष्ट्र दर्शन’ घडवून आणण्याचा उपक्रम वा मुलांसाठी मराठी प्रशिक्षणाचा दर्जेदार अभ्यासक्रम तयार करून मराठी भाषा शिक्षकांना त्यासाठी प्रोत्साहन देण्याचा मराठी राज्य भाषा विभागाने संमेलनात जाहीर केलेला मानस खरोखरीच मराठी पालकांचा हुरूप वाढविणारा होता.
आम्हा परदेशातून आलेल्यांचे त्या तीन दिवसांत, माहेरच्या मायेने सगळे लाड झाले.जेवणात ‘सांबारवडी- -उकडीचे मोदक-श्रीखंडपुरी – पिठलं भाकरी, बासुंदी’ सारख्या पदार्थांची रेलचेल ठेवून, रोज भरभरून पाहुणचार देखील झाला.
सभागृहात थाटात लावलेल्या वेगवेगळ्या प्रकाशनाच्या दालनातून फिरतांना – उत्कृष्ट पुस्तके चाळता आलीत – विकत घेता आलीत.
’मराठी ३६०’ ह्या संकल्पनेतून, अवघ्या विश्वातील मराठी माणसांना एका व्यासपीठावर आणत, मराठी भाषिकांना जोडत – माय मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील राहत ‘एक वैश्विक मराठी ब्रँड’ बनविण्याचा राज्य सरकारचा हा प्रयत्न खरोखरीच स्तुत्य होता.
२०२१ मध्ये विश्व मराठी परिषदेने घेतलेल्या ऑनलाईन विश्व संमेलनाने मराठी माणसांना एकत्र जोडण्याची भक्कम सुरुवात केली होती. तिला पुढे नेत महाराष्ट्र शासनाने निव्वळ महिन्या-दोन महिन्याच्या छोट्या कालावधीतही उत्कृष्ट नियोजन करून, देशोदेशीच्या मराठी बांधवांना एकत्र आणत, हे भव्य संमेलन यशश्वी केलं !
संमेलनाचं आमंत्रण मिळाल्यापासूनच्या आमच्या सगळ्या छोट्यामोठया प्रश्नांना क्षितिज पाटुकले ह्यांनी न थकता, उत्तर दिलीत. उत्तराताई मोने ह्यांच्या चमूने कार्यक्रमातील सहभागासाठी सहाय्यक सूचना केल्या. त्यांचेही मनोमन आभार.
भेटत राहू – संपर्कात राहू म्हणत नव्याने भेटलेल्या मित्रमैत्रिणींचा निरोप घेतांना – मन हेलावून गेलं – हे खरं असलं तरीही ह्या संमेलनात मिळालेली ऊर्जा घेऊन, बाहेर पडलेला प्रत्येकजण आपापल्या देशी प्रयत्नांची शिकस्त करेल आणि मराठीचा झेंडा- अटकेपार पोहचवेल ह्यात वाद नाही.
ह्या संपन्न करणाऱ्या अनुभूतीसाठी – महाराष्ट्र शासनाचे अनेकानेक आभार !
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.