March 29, 2024
amar-habib-speech-in-first-mrudgandh-rural-literatee-samhelan-ghatnandur
Home » ग्रामीण साहित्याने एल्गार पुकारण्याची गरज
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ग्रामीण साहित्याने एल्गार पुकारण्याची गरज

पहिले मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलन घाटनांदूर येथे २१ व २२ जानेवारी २०२३ रोजी होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी अमर हबीब यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनात सादर होणारे त्यांचे अध्यक्षीय भाषण…

भावांनो आणि बहिणींनो,
आज आपण घटनांदूर येथे जमलो आहोत. शिक्षण पंढरी मानल्या गेलेल्या सोमेश्वर विद्यालयाच्या परिसरात आहोत. परिसरातून शेतकरी आले आहेत, त्यांची मुलं म्हणजे किसानपुत्र ही आले आहेत. ग्रामीण भागात शिक्षणाची परंपरा अलीकडची आहे. त्यातही साहित्य कला क्षेत्रात राबणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या एवढी, पण या मुलांचे कौतुक करण्याची मोठी दानत आपल्यात आहे. त्यासाठी आपण येथे जमलो आहोत. ही मुलं काय लिहित आहेत. आपल्या जीवनाशी त्याचा काही संबंध आहे का ? हे पाहण्यासाठीही आपण जमलो आहोत. ही साहित्य जत्रा नाही. हे साहित्य संमेलन आहे. आपल्या परिसरातील प्रतिभांचा आपण आस्वाद घेत लेखाजोखाही करणार आहोत.
काय चालले आहे आपल्या आवतीभोवती ? त्यात नवे काय आहे ? नवे म्हणजे काल नव्हते आणि आज आहे, असे काय काय आहे ? त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होत आहे. याचा आपल्याला विचार करायचा आहे. कारण सामान्यपणे हाच साहित्याचा विषय असतो.

पूर्वी कधी तरी कोठून कोणी आत्महत्या केल्याची खबर यायची. आज मात्र त्याचे प्रमाण इतके वाढले आहे की, अशी बातमी शिवेच्या आत घडू शकते, उद्या कदाचित उंबऱ्याच्या आत देखील. अशी भीती वाटावी असे झाले आहे. ‘शेती हे ज्याचे मुख्य उत्पन्नाचे साधन आहे ते शेतकरी’ अशी शेतकरी या शब्दाची व्याख्या आहे. शेतकरी हवालदिल आहे. आस्मानी संकट आहेच. पण सुलतानी संकट त्याहून जास्त भयंकर आहे. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षात शेतकरी सुखी झाला नाही. दु:ख वाढतच गेले. आज अनेक जण जीव देत आहेत व जे जीव देत नाहीत ते मरण जगत आहेत. अनेकाना वाटते की, हे गरिबीमुळे घडत आहे. वास्तविकता तशी नाही.

भारतीय शेतकऱ्यांची दुर्दशा गुलामीमुळे झाली आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न गुलामीचा आहे, हे अजून बऱ्याच लोकाना कळलेले नाही. सरकारला तर अजिबात नाही. आपल्या देशातील सर्व समस्यांच्या तळाशी ‘शेतकऱ्यांची गुलामी’ हे कारण आहे. ही गुलामी पिढ्यानपिढ्याची आहे. राजे बदलले की गुलामीचे स्वरूप बदलायचे. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही गुलामी राहिली. फक्त स्वरूप बदलले. राजे , वतनदार घरात घुसून धान्य उचलून न्यायचे. आता कायदे करून शेतकऱ्यांना गुलाम बनवले जाते. सीलिंगचा कायदा, आवश्यक वस्तू कायदा आणि जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे आज शेतकऱ्यांचा गळफास बनले आहेत. हे कायदे रद्द व्हावे यासाठी धडपडणारा एक कार्यकर्ता तुम्ही या व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून आणून बसविला आहे. त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे आभार मानतो.

जीवघेणे वर्तमान

शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. त्याला पदोपदी निखाऱ्यावर चालावे लागते. अत्यल्प भु धारणा असणाऱ्या शेतकऱ्यांना कुटुंबाचा खर्च कसा भागवावा ही चिंता सतावते. अलीकडे दोन क्षेत्रांत खर्च वाढलेला दिसतो. एक आरोग्य आणि दुसरे शिक्षण. मध्यंतरी कोरोनाची साथ पसरली होती. कुटुंबात कोणी आजारी पडले आणि त्याला दवाखान्यात नेले की, कुटुंब-कारभार्‍याचे कंबरडेच मोडते. हल्ली नवे नवे आजार निघत आहेत आणि सामान्य माणसाला दवाखान्याचा खर्च पेलवण्याच्या पलीकडे गेला आहे. गरिबांना आजारपणाची चैन परवडणारी नाही, हे बुजुर्गांचे म्हणणे पटू लागले आहे. वैद्यकीय सुविधा निर्माण झाल्या आहेत. पण ते पेलण्याची कुवत शेतकऱ्यांमध्ये आलेली नाही. शेतीचे चाक रुतल्या गेल्यामुळे शेतकरी देशोधडीला लागला

शेती परवडत नाही. लेकरांच्या नशिबी हे जीणे येऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी पदरमोड करून मुला-मुलींना शिकवायला सुरुवात केली. पण आता शिक्षणाचा खर्चही परवडण्याच्या पलीकडे गेला आहे. मुलां-मुलींना शिकविणे भाग आहे. मोकळे सोडता येत नाही. प्राथमिक शिक्षणाचे थोडे बहुत भागते. पण लेकरू आठवी-नववीला आला की खर्च सुरु होतो. दहावी बारावीला तो वाढतो आणि पुढचे शिक्षण तर विचारूच नका. मुलगा शिकून शहाणा होतो की नाही, हे पाहण्यापेक्षा त्याला मार्क किती पडतात, हे पाहिले जाते. स्पर्धा जीवघेणी आहे. पुण्यात एम.पी.एस.सी.ची तयारी करणारी मुलं मी पाहिली आहेत. बाप जमिनीचा तुकडा विकून पोराच्या शिक्षणाची व्यवस्था करतो. पोरगं जीव तोडून अभ्यास करतो. काहीजण पास होतात. पण त्यांनाही नोकरी मिळत नाही. सरकार किती लोकांना नोकर्‍या देऊ शकते ? दहा हजारात दोघांना सरकारी नोकर्‍या मिळू शकतात. पण आशा असल्यामुळे मुलं नाद सोडत नाहीत. का? एकदा सरकारी नोकरी लागली की आयुष्याची चिंता मिटते. त्याहीपेक्षा वरकमाई रग्गड करता येईल ही अपेक्षा असते. या अपेक्षांचा पैसा करायला लोक टपलेले असणारच. शिक्षणाच्या बाजारात एक फेरफटका मारून पहा. तेथे तुम्हाला ट्युशनच्या दुकानांच्या रांगाच रांगा लागलेल्या दिसतील. सोन्याच्या दुकानाच्या जाहिराती कमी पण ट्युशनच्या दुकानाच्या जाहिराती जास्त, असे समीकरण दिसत आहे.

आरोग्य आणि शिक्षणावरचा खर्च पेलण्याची कुवत शेतकर्‍यांची राहिलेली नाही. पण त्यांना हा खर्च करणे भाग पडत आहे. काही लोक आरोग्य आणि शिक्षण स्वस्त करावे, असा सल्ला देतात पण शेतकर्‍याची ऐपत वाढण्यासाठी लावलेले कुंपण नाहीसे करावे, असे कोणी म्हणत नाही. शेतकऱ्यांच्या पायात बेड्या कायम ठेवून होणाऱ्या सर्व सुधारणांचा लाभ बिगर शेतकऱ्यांनाच होतो, असे आपण पाहीले आहे. आजही पाहतो आहोत.

आपल्या लहानपणी नव्हत्या अशा कोणकोणत्या गोष्टी आज व्यवहारात आल्या आहेत? असा विचार करून एक यादी करा म्हणजे तुम्हाला झालेले बदल लक्षात येतील. आपल्या लहानपणी टीव्ही नव्हता, आज आहे; मोबाईलची आपण कल्पना सुद्धा केली नव्हती, आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. पूर्वी सरपण आणूनच स्वयंपाक केला जायचा. आता घरोघरी गॅसच्या शेगड्या झाल्या आहेत. आपल्या कपड्यांची संख्या वाढली. मंदिराच्या दारातून होणार्‍या चपलांच्या चोऱ्या थांबल्या. घरात प्लास्टिकचे भांडे नसायचे, आता ते आले आहे. पॉलीथिन पिशव्या नावाची गोष्ट नव्हती. आता पदोपदी दिसते. मेलेल्या जनावरांच्या पोटात पॉलीथिन पिशव्या सापडल्या नाहीत असे घडत नाही. बॅंका आल्या, पतपेढ्या आल्या, फायनान्स आले, ए.टी.एम. आले. मोट गेली, मोटार आली. शेतीत बैलांचा वापर कमी झाला. नांगर गेले, ट्रँक्टर आले. आमच्या लहानपणी भूइमूग घेतला जायचा. नंतर सूर्यफूल आले. कापूस आला. आता सोयाबीन घेतले जाते. सोयाबीन काढायला माणसं मिळत नाहीत. माझ्या पिढीने गावरान वाण (घरचे बियाणे) वापरून शेती केली. त्या काळात अन्नाचा अभाव बघितला. अमेरिकेतून आलेली व तेथे म्हणे डुकरांना खाऊ घातली जाणारी मिलो आम्ही खाल्ली. त्या नंतर आली संकरित बियाणे आणि रासायनिक खते. त्यांचा वापर केला. उत्पादन वाढले. दोनच्या ठिकाणी एकरी आठ पोते ज्वारी होऊ लागली. पण शेतकऱ्यांची परिस्थिती बदलली नाही. उत्पादन वाढले पण उत्पन्न वाढले नाही. त्या वेळेस एक तोळे सोने घ्यायला एक क्विन्टल कापूस पुरायचा. आता पाच नव्हे दहा दहा, वीस वीस क्विंटल कापूस विकला तरी एक तोळा सोने घेता येत नाही. पैसे फार वाढले नाहीत पण पैश्याची किंमत मात्र कमी झाली. जग बदललं म्हणतात, पण कोणाचे जग बदलले हे पाहायला नको का? त्या बदलांचा लाभ झाला की यामुळे ताण वाले? याचा विचार करावा लागेल.

एका बाजूला परिस्थिती खूप बदलली आहे, कोणत्याच पिढीने एवढे बदल पाहिले नाही तेवढे बदल आपल्या पिढीने पाहीले आहेत. सोयीसुविधा एवढ्या मुबलक झाल्या तरी आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च शेतकरी पेलू शकत नाहीत. हे वास्तव आपण समजून घेतले तर साहित्य आणि त्याची दिशा समजायला अडचण येणार नाही.

ग्रामीण साहित्य-

खरे तर साहित्य हे फक्त साहित्य असते. समीक्षकांनी त्यांच्या सोयीसाठी त्याचे भाग केले आहेत. आपल्या कंपूला सत्तेत कोठे तरी स्थान मिळावे म्हणून काही महाभागांना ते सोयीचे असल्यामुळे त्यांनी त्याला हवा दिली. आपलाच साहित्यप्रकार थोर असल्याचा दावा केला किंवा आमच्या साहित्यप्रकारावर अन्याय होतो असा विलाप करून सत्तेच्या कमिट्या आणि पुरस्कार मिळविले. वाचकांना त्या प्रकारांशी काही देणे घेणे नसते. ते साहित्याला कलाकृती म्हणून पाहात असतात. त्याचा आस्वाद घेतात. साहित्यातून आनंद आणि ज्ञान मिळत असेल तर ते ग्रामीण असो, दलित असो, आदिवासी असो की आणखीन कोणते असो; वाचकाला काही फरक पडत नाही. वाचक हा कोणत्याही साहित्यप्रकाराचा पुरस्कर्ता किंवा विरोधक नसतो.

आरोग्याच्या क्षेत्रात देखील पॅथींचे वाद आहेत. रोगी त्या वादात पडत नाही. ज्या कोणत्या औषधाने रोग बरा होणार असेल, ती पॅथी तो चालवून घेतो. तसेच सामान्य वाचक साहित्याकडे पहात असतो.

आपण ग्रामीण साहित्य संमेलन घेत आहोत, म्हणजे काय ? ज्या साहित्यात ग्रामीण जीवन व्यक्त होते, त्या साहित्याचा आपण अधिक विचार करणार आहोत. आपण गाव, शेती आणि शेतकर्‍यांच्या जीवनाशी निगडीत असलेले साहित्य आपल्या अजेंड्यावर घेतले आहे. आपण आपल्या साहित्य संमेलनाचे नाव ‘मृदगंध’ ठेवले आहे. मृदगंध म्हणजे मातीचा गंध. पहिला पाउस पडल्यावर जो गंध येतो त्याला ‘मृदगंध’ म्हटले जाते. याचा अर्थ एवढाच आहे की, आपण साहित्यातील केवळ ग्रामीण जीवन रेखाटणाऱ्या कलाकृतींचा विचार करणार आहोत. पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, आम्ही जरी ग्रामीण साहित्याचा या संमेलनाच्या निमित्ताने विचार करीत असलो तरी आम्ही साहित्यात भेदाभेद – श्रेष्ठ-कनिष्ठ असे काही मानीत नाहीत. आम्ही साहित्याला साहित्य म्हणूनच जाणतो.

मुळात साहित्याचा उगम हाच ग्रामीण जीवनाशी निगडित होता. प्रणयरत क्रौंच पक्ष्याची एका राजाने हत्या केली, तेव्हा त्या पक्ष्याने जो टाहो फोडला तो साहित्याचा पहिला उदगार मानला जातो. ही घटना कोण्या फाइव्ह स्टार हॉटेलात घडली नसावी, हे उघड आहे. ती कोठे तरी जंगलात घडली असावी. तेव्हा ग्रामीण जीवन वगळून साहित्याचा विचार होऊ शकत नाही.

ग्रामीण जीवनावर सातत्याने लिहिले गेले. कथा-कादंबरीत, कवितेत ग्रामीण भागाचे, निसर्गाचे चित्रण झालेच आहे. संस्कृत असो की पाली, देशी भाषा असो की विदेशी – कोणत्याही भाषेतील सनातन साहित्याचा परिवेष ग्रामीण आहे. त्याचे कारण उघड आहे. त्या काळात औद्योगिकीकरण झाले नव्हते. जे होते ते सगळे ग्रामीण होते. त्यामुळे ग्रामीण संदर्भ नाही, अशी भाषा नाही. जशी भाषा असते तसे साहित्य निर्माण होते. सर्व भाषांतील सनातन साहित्यात निसर्ग रेखाटला गेला आहे. औद्योगिकीकरणानंतर मात्र तफावत पडू लागली. कारखाने उभे राहिले. त्या भोवती मजूर राहू लागले. या मजुरांना लागणार्‍या वस्तू पुरवणारे लोक आले. शहरे वाढू लागली. हे जीवन ग्रामीण जीवनापेक्षा वेगळे होते. काय होते वेगळेपण? येथे शेती आणि शेतकरी नव्हते. वेगवेगळ्या भागातून आलेले, वेगवेगळी भाषा बोलणारे लोक वस्ती करून राहू लागले.

लोकांनी स्थलांतर केले. गाव सोडले पण त्यांची गावाशी असलेली नाळ तुटली नव्हती. कच्चा माल असो की खाण्यासाठी लागणारे अन्न, ते मात्र त्याच शेतकर्‍यांकडून यायचे. ते स्वस्त मिळाले तर त्यांना हवेच होते. सरकार मध्ये पडले. त्यांनी स्वस्तात माल पुरविण्याची व्यवस्था केली. तसे कायदे केले. सरकारने बिबा घातला. कारखानदारांनाही हे हवेच होते. कारण अन्नधान्याच्या किमती कमी राहिल्या तर त्याना मजूर स्वस्त मिळतो. नुसत्या अन्नधान्याच्या किमती कमी ठेवल्या तर शेतकरी अन्नधान्य पिकवायचे बंद करतील. मग काय ? सगळ्याच शेतमालाच्या किमती कमी राहतील, अशी व्यवस्था करण्यात आली. कच्चा माल व कामगार स्वस्तात मिळू लागला म्हणून कारखानदार आनंदी झाला. कामगारांना देखील स्वस्त अन्नाचा आनंदच व्हायचा. त्यामुळे शेती आणि शहरे यात जो सुसंवाद असायला हवा होता तो तुटला. अशा शहरात जन्मलेल्या लेखकांनी ‘झुळझुळ वाहणारे निर्झर, शुद्ध हवेचा झोका, हिरवी शालू नेसलेली शेती, निसर्गाचे सौंदर्य’ असे गावांचे वर्णन केले.

औद्योगिकीकरणाच्या सुरुवातीच्या काळात शहरी लेखकांनी शेतीचे ग्रामीण जीवनाचे लोभसवाणे चित्र रंगविले. हे लेखक शिक्षणाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातील होते. त्यांनी शेतकरी अडाणी, वेडा, विदुषक दाखविला. गावंढळ हा शब्द तेव्हाच निर्माण झाला असावा. शेतीतील हाल-अपेष्टांचे वर्णन मात्र त्यांनी केले नाही.

शेतकऱ्यांचे साहित्य का नाही?

कामगार चळवळींचा जोर वाढल्यानंतर डाव्यांच्या साहित्याला रंग चढला. त्यांनी शेतकरी खलनायक म्हणून प्रस्तुत केला. तेही विकृतीकरणच होते. हे सगळे साहित्य बिगर शेतकर्‍यांचे आहे. आजही जे ग्रामीण म्हणून साहित्य ओळखले जाते ते बहुतेक प्राध्यापकांनी, नोकरदारांनी लिहिलेले आहे. दलितांचे साहित्य दलित लिहितात, आदिवासी साहित्य आदिवासी लिहितात. शेतकर्‍यांचे साहित्य मात्र दुसरेच लिहितात, असे का ? शेतकर्‍यांचे साहित्य शेतकरी का लिहीत नाहीत, हे आपण समजावून घेतले तर शेतकरी म्हणा की ग्रामीण साहित्याचा उलगडा होईल. त्यासाठी थोडे मागे जावे लागेल.

शेतीचा शोध लागण्यापूर्वी माणसाला फक्त अन्नाची भ्रांत होती. रानावनात भटकायचे. कंद-मुळे शोधायची, शिकार करायची आणि भूक भागवायची, यात तो व्यस्त असे. या काळात ना संस्कृती निर्माण झाली, ना ग्रंध लिहिले गेले, ना विज्ञान विकसित झाले. कालांतराने शेतीचा शोध लागला. असे म्हणतात की, शेतीचा शोध स्त्रीने लावला. शेती आली म्हणून माणसाच्या अन्नाची भ्रांत मिटली. मानवी जीवनाला स्थैर्य प्राप्त झाले. शेतीच्या शोधामुळे मानवजातीची जगण्याची पद्धत बदलून गेली. रानावनात भटकणारी माणसे वसाहती करून राहू लागली. नवनव्या वस्तू निर्माण होऊ लागल्या. त्यांची एकमेकांशी देवणघेवाण सुरु झाली. या प्रक्रियेत भाषेचा विकास झाला. त्यातून साहित्य जन्माला आले. अन्नाची भ्रांत मिटल्यानंतरच भाषा, साहित्य, कला, विज्ञान आदींच्या विकासाला चालना मिळाली.

सर्व कला व साहित्याच्या तळाशी शेतीतून निर्माण होणारे अतिरिक्त अन्न आहे. त्याला वगळले तर कोणत्याच प्रकारचे साहित्य निर्माण होऊ शकत नाही. शेतकरी शेतीत राबला, त्याने घाम गाळला आणि तुमच्या अन्नाची तजवीज केली म्हणून तुम्ही निवांतपणे साहित्याची निर्मिती करु शकलात. दुर्दैवाने साहित्यिकांनी शेतकर्‍यांविषयी जो कृतज्ञताभाव ठेवायला हवा होता, तो ठेवला नाही. उलट, राबणे हा शेतकऱयांचा धर्म आहे व त्याने पिकविलेले फुकट खाणे आमचा अधिकार आहे, अशी समजूत करून घेतली. साहित्यिकांनी शेतकर्‍यांशी नाळ जोडण्या ऐवजी शेतकर्‍यांना लुटणाऱ्या राजेराजवाड्यांत वावरणे पसंत केले. राजे आणि त्यांच्या दरबार्‍यांना रिझविण्यासाठी आपली सारी प्रतिभा खर्ची घातली. संवेदनशीलतादेखील कशी पक्षपात करते, हे प्रतिभावंतांच्या वर्तनाकडे पाहिले की लक्षात येते.

साहित्यात शेतकर्‍यांचे जे चित्रण आले आहे, ते ढोबळमानाने तीन गटात विभागता येईल.
1) कृषी जीवनाचे उदात्तीकरण करणारे
2) शेतकर्‍यांचे विदुषकीकरण करणारे आणि
3) शेतकर्‍यांना खलनायक म्हणून रेखाटणारे.

कृषी जीवन ही आदर्श जीवन पद्धती आहे, कृषी ही संस्कृती आहे, ती सर्वश्रेष्ठ आहे, असा दावा करून काही लोकांनी ग्रामीण जीवन रेखाटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रसभरीत निसर्ग वर्णने केली. ‘जोंधळ्याला लटकलेले चांदणे’ दिसणे काय किंवा ‘हिरवे सपान पाहणे’ काय सारखेच. शेतकऱ्यांचे दु:ख या वर्गाला उमगले नाही. या वर्गातील साहित्यिकांनी केलेले चित्रण कैद्याने तुरुंगाचे बहारदार वर्णन करावे, तसे हास्यास्पद झाले आहे. एखादा कैदी म्हणाला की, “पहा त्या उंच भिंती, आकाशाला भिडणारे मनोरे, बलदंड गज, साखळदंड हत्तीलाही वाकविता न येणारे गज. घोर अंधार, खोलीतील एकांत कोण्या साधूला ना मिळे, आमचे जेवण असे, राजाच्याही नशिबी नसणारे.” वगैरे. ही जशी आत्मवंचना आहे तशीच ग्रामीण जीवनाविषयी करण्यात आली.

अनिच्छेने शेती करावी लागणे म्हणजे वेठबिगारी. आज बहुसंख्य शेतकरी अनिच्छेने शेती करतात; विलाज नाही म्हणून करतात. आदर्श जीवनशैली वगैरे म्हणून आपण आपली प्रतारणा करीत राहिलो. स्वामीनाथन समितीने ’40 टक्के लोक नाविलाजाने शेती करतात, त्यांना संधी मिळाली तर ते लगेच शेती सोडतील.’ असा निष्कर्ष काढला आहे. कृषीजीवनाचे उदात्तीकरण करून अशा साहित्यिकांनी शेतकर्‍यांना शेतीत नादावून ठेवण्याचे पाप केले आहे. मी त्यांना म्हणालो, ‘कृषी जीवनाचे तुम्ही एवढे उदात्तीकरण करता, तर तुम्ही शेती का करीत नाही?’. तर पळ काढतात!

कृषी ही जीवनशैली मानली की, ती परवडते का नाही, याचा माणूस विचार करीत नाही. शेती हा एक व्यवसाय आहे, असे मानले तरच ती परवडते का नाही, हे पाहता येईल. शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन विकसित न होऊ देण्यात इतर घटकांसोबत अशा साहित्यिकांनी केलेले उदात्तीकरण हे एक कारण मानावे लागेल.

सवर्णांनी शेतकऱ्याला शूद्र मानले. चतुवर्णांत शेतकर्‍यांचे स्थान ब्राह्मण, वैश्य किंवा क्षत्रिय नाही. ‘मातीशी ज्यांचा संबंध येतो, ते सगळे शूद्र.’ या नात्याने शेतकरी शूद्र ठरले. महात्मा जोतिबा फुले यांनी ‘शेतकऱ्यांचा असूड’ मध्ये याबाबत स्पष्टीकरण केले आहे. शेतकऱ्याला अडाणी समजून अनेक विनोद रचले गेले. अनेक कादंबर्‍यांमध्ये शेतकरी हे एक विनोदी पात्र बनविले आहे. हे सर्व साहित्य शेतकर्‍यांना एकेकाळी शूद्र मानणाऱ्या सवर्ण लेखकांनी लिहिले आहे.

सवर्णांनी शेतकरी विदुषक रंगविला तसे डाव्या लोकांनी शेतकरी खलनायक रंगविला. गावचा पाटील घोड्यावर बसून रानात जातो व तेथे दिसेल त्या सुंदर मुलीवर बलात्कार करतो, अशी वर्णने डाव्या विचारांचा प्रभाव असणाऱ्या अनेक लेखकांनी केले आहे. शेतकरी मालक आहे, कारण सात-बारा त्याच्या नावाने आहे. तो मजुरांचा वर्गशत्रू आहे. अशी डावी विचारसरणी. या विचारसरणीचा पुरस्कार करणाऱ्यांनी शेतकर्‍यांचे चित्र रंगविताना भडकपणे त्याला खलनायक रंगविले. महात्मा जोतिबा फुले, प्रेमचंद, साने गुरुजी, बहिणाबाई आदी काही सन्मानीय अपवाद वगळले तर शेतकऱ्यांचे वास्तव चित्र अभावानेच रेखाटले गेले.

सर्वसाधारणपणे शेतकऱ्यांबद्दल मनात आकस ठेवूनच लिखाण झालेले दिसते. याचे कारण काय ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी, ‘पुस्तके कोण वाचतो ? कोण विकत घेतो ?’ या प्रश्नांची उत्तरे विचारात घ्यावी लागतील. वाचणारा वर्ग शहरी आहे. बिगर शेतकरी आहे. प्रामुख्याने नोकरदार आहे. त्याला कांदा स्वस्तात हवा. कांदा महागला की तो सरकार उलथून टाकतो. त्याला साखर, तेल, दाळी, भाजीपाला महाग झालेला चालत नाही. त्याला दुप्पट पगारी वाढवून हव्यात, मात्र शेतकाऱ्याला भाव वाढवून मिळालेला चालत नाही. हा मुंबई-पुण्यात राहणारा वर्ग प्रामुख्याने पुस्तके वाचतो. तोच विकत घेतो. त्याला न आवडणाऱ्या पुस्तकांना तो हात लावत नाही. पुस्तके विकली जाणार नसतील तर प्रकाशक ती कशाला छापतील ? या वर्गाच्या अभिरुचीला जुळेल असेच लेखन छापले जाते. म्हणून लेखकही तशीच पुस्तके लिहितात. या वाचकांच्या पसंतीला उतरलेले पुस्तक आणि पुस्तकाचा लेखक डोक्यावर घेतला जातो. त्याला पुरस्कार मिळतात. सरकारी कमिट्या मिळतात. त्याचा नावलौकिक होतो. पैसाही मिळतो. शेतकर्‍यांबद्दल शहरी वाचकवर्गाच्या मनात एक अढी आहे. शेतकऱ्याला नायक करून लेखन केले तर शहरी वाचक त्या पुस्तकाला हात लावत नाही. म्हणून जोपर्यंत शेतकरी पुस्तकाचा ग्राहक बनत नाही, तोपर्यंत शेतकरी कधी खलनायक तर कधी विदुषक म्हणूनच चित्रित केला जात राहील. तो नायक दिसणार नाही.

ग्रामीण साहित्य म्हणून जे काही प्रकाशित झालेले आहे, ते शेतकरी कुटुंबात बालपण गेलेल्या व पुढे नोकरी करीत असलेल्या लोकांनी लिहिलेले साहित्य आहे. त्यातही प्राध्यापक, शिक्षक अधिक आहेत. शेती सोडून नोकऱ्या करीत असलेल्या लोकांनी शेतकऱ्यांविषयी सहानुभूतीने लिहिलेले हे साहित्य आहे. यात आठवणीत जे राहिले ते आले असल्यामुळे ते धूसर आहे. शेतकऱ्यांचे खरे चित्र सादर करणे सोपे नाही. तळहातावर निखारा घ्यावा लागतो. शेतकरी नायक करायचा असेल तर सत्ताधारी खलनायक करावा लागतो. सत्ताधाऱ्यांना खलनायक करायला जिगर लागते. ही जिगर घेऊन अवतरलेला सहसा कोणी दिसत नाही. लेखकाचे ते काम नाही असे सोयीस्कर उत्तर देऊन ते मोकळे होतात. बुडत्या माणसाचे व्हिडीओ काढणाऱ्याला विचारले की तू त्याला का वाचवले नाहीस ? तेंव्हा तो म्हणाला, ते माझे काम नाही ! इतका निगरगट्टपणा साहित्यिकांमध्ये कोठून येतो ?
आजचे बहुतेक ग्रामीण लेखक नोकरदार आहेत. सरकारला ते मायबाप समजतात. शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहायचे तर आपल्याला पगार देणारे मालक नाराज होतील अशी त्यांना भीती वाटत असावी त्यामुळे ते ठाम पणे उभे राहत नाहीत.

साहित्यिक आज शेतकरी नाहीत. दलित साहित्य व ग्रामीण साहित्य यांच्यात हाच तफावतीचा मुद्दा आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेला माणूस नोकरदार झाला की त्याचे हितसंबंध बदलतात. मात्र दलित माणसाने गाव सोडले, व्यवसाय बदलला तरी त्याची जात बदलत नाही. काल तो ज्या जातीचा होता, तीच जात आजही चिकटलेली असते. शेतकरी कुटुंबातून आलेला प्राध्यापक आणि दलित जातीतून आलेला प्राध्यापक यांमध्ये जाणिवांच्या स्तरात फरक पडलेला असतो. जात जाणिवांच्या बदलांचा वेग अत्यंत मंद असतो, आंतरजातीय विवाह केला तरी काही पिढ्यांनंतर फरक पडतो. मात्र एका आर्थिक गटातून दुसऱ्या आर्थिक गटात स्थलांतर करणाऱ्यांच्या हितसंबंधीय जाणिवा मात्र चटकन बदलतात. म्हणून शेतकऱ्यांचा मुलगा शेतीच्या बाहेर पडला की शेतकऱ्यांचा गळा कापायला मागेपुढे पहात नाही. याच कारणामुळे राजकारण गेलेली शेतकऱ्यांची पोरं बेईमानी होतात!

कोषांतराचा सिद्धान्त –

जसे दलित साहित्य निर्माण होते तसे शेतकऱ्यांचे साहित्य का निर्माण होत नाही हे जर अधिक खोलात जाऊन समजावून घ्यायचे असेल तर कोषांतराचा सिद्धांत समजून घ्यावा लागेल.

आदिवासींचा उठाव झाला की त्यांची गाणी होतात, दलित चळवळीत तर खूप गाणी आहेत. स्त्रीवादी चळवळीलाही गाण्यांची कधी वाणवा पडली नाही. कामगार चळवळींनी असंख्य गाणी रचली. शेतकरी आंदोलनात मात्र शेतकाऱ्यांचे गाणे तयार झाले नाही. साने गुरुजींनी स्वातंत्र्य आंदोलनात लिहिलेले ‘आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान’ हे ७०-७५ वर्षांपूर्वीचे गाणे गावे लागे. नारायण सुर्वे आणि इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली एक दोन गीते शेतकरी चळवळीने उचलली खरी, पण जशी इतर चळवळीत गाणी तयार होतात तशी शेतकरी आंदोलनात गाणी निर्माण झाली नाही. हे वास्तव आहे. असे का ? शेतकऱ्यांच्या चळवळीची गाणी का तयार होऊ शकली नाहीत ?

विदेशातून मोगल आले, त्यांनी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती केली. एके काळी ब्राह्मणांनी गाव सोडले, त्यांनीही सुंदर लेखन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘गाव सोडा’ आवाहनाला प्रतिसाद देऊन दलितांनी गाव सोडले. १९६० नंतर त्यांच्या लिखाणाला धार चढली. आत्मचरित्रे, नाटके, कविता, कादंबर्‍या या सर्व क्षेत्रांत दलित साहित्याने आपले वेगळेपण ठसविले. बलुतेदार बाहेर पडले, त्यांनीही विपुल लेखन केले. माहेरातून निघून सासरी गेलेल्या बायांनीही खूप गाणी रचली.

या सर्व उदाहरणांवरून एक गोष्ट सिद्ध होते की, जे स्थलांतर करतात ते मोठ्या प्रमाणात साहित्य निर्माण करतात. स्थलांतरामुळे त्यांच्यातील प्रतिभावंतांना अनुकूलता मिळते व ते लिखाण करू लागतात. शेतकऱ्यांना स्थलांतर करता येत नाही. ते जमिनीशी बांधले गेलेले असतात. गावात जन्मायचे, गावात जगायचे, गावातच मरायचे, असा त्यांचा जीवनक्रम असतो. लेखनासाठी ‘परकाया प्रवेशाची’ क्षमता महत्त्वाची मानली जाते. स्थलांतर केलेल्यांना ही अनुभूती सहज मिळते. ते अधिक सुलभपणे ‘परकाया प्रवेश’ करू शकतात. शेतकर्‍यांना जमीन, गुरे आदि कामांमुळे स्थलांतर करता आले नाही म्हणून शेतकर्‍यांनी लिहिलेले साहित्य तयार होऊ शकले नाही.

कुटुंब, जात, गाव, देश या समाजशास्त्रीय संस्था एक प्रकारचे कोष आहेत. या कोषांतून बाहेर पडणाऱ्यांना सर्जनाचे वातावरण मिळते. कोषांतर करणारे समूह सांस्कृतिक पातळीवर तुलनेने अधिक सक्रीय दिसतात. शेतकऱ्याला हे वातावरण मिळत नाही म्हणून शेतकर्‍यांचे साहित्य निर्माण झालेले नाही, असे म्हणता येईल.

बांडगुळी साहित्य –

प्रगत देशांकडे पाहिले तर असे लक्षात येते की, त्या देशांत शेतीवर जगणारे लोक खूपच कमी आहेत. काही देशांत तर, कोणी तरी शेती करावी म्हणून सरकारद्वारा प्रोत्साहन (Incentive) दिले जाते. आपल्या देशात शेतीवर जगणाऱ्यांची संख्या एकेकाळी ९० टक्के होती. अलीकडे स्थलांतराचे प्रमाण वाढले असले तरी अजूनही ५५ ते ६५ टक्के लोक शेतीवर जगतात. देशाची अर्ध्याहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. १९४७ साली ९० टक्के लोक शेतीवर होते. त्यावेळी लोकसंख्या फक्त ३५ ते ४० कोटी होती. त्याच्या नव्वद टक्के म्हणजे जवळपास ३४ ते ३६ कोटी लोक शेतीवर जगत होते. आज टक्केवारी कमी झाली असली तरी शेतीवर जगणार्‍यांची संख्या मात्र वाढली आहे. आज ७० ते ७५ कोटी लोक शेतीवर जगतात. जमीन तेवढीच राहिली पण त्यावर अवलंबून असणार्‍यांची संख्या मात्र वाढली. शेतीच्या होल्डिंगचे प्रमाण पाहिले तर अजून भयंकर स्थिती दिसून येते. कारण ८५ टक्के जमीन जास्त होल्डिंगवाल्यांकडे आहे आणि १५ टक्केत बाकीचे. जास्त जमीन कोणाकडे आहे ? ते शेतकरी आहेत का ? तुम्ही विचार करून पहा. कोणी नोकरीत असेल, कोणी पुढारी असेल, कोणाकडे नंबर दोनचा धंदा असेल. इन्कम टॅक्स वाचवायला या लोकांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. सरकारने शेतकर्‍यांच्या जमिनी अधिग्रहण करून हजारो एकर जमिनी कारखानदारांना दिल्या आहेत. म्हणजेच, फक्त शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांच्या जमिनींचे तुकडे अत्यंत लहान झाले आहेत. त्यातील बरेच लोक अर्धवेळ मजूर झाले आहेत.

१९९० च्या नंतर स्थलांतराचा वेग वाढला. शेतकरी (यात मजूरही आले) शहरांकडे धाव घेत आहेत. शहरात पोचलेली किसानपुत्रांची ही पहिली पिढी आहे. ती अजून नवखी आहे. 10-20 वर्षात ते स्थिर होतील. तो पर्यंत त्यांची गावाशी असलेली नाळ तुटून जाईल. दलित युवकांनी शहरात गेल्यानंतर जो दबदबा निर्माण केला होता, तसा या किसनपुत्रांना अजून तरी निर्माण करता आला नाही. या वर्गाचा साहित्य क्षेत्रावर प्रभाव पडलेला दिसून येत नाही.

शेतीवरचा भार कधी ना कधी कमी होणारच आहे. चार भावांपैकी तीन भाऊ इतर क्षेत्रांत जातील. एक भाऊ तेवढा शेती करेल. ७५ टक्के लोक शेतीच्या बाहेर पडणार आहेत. त्या काळात खेड्यांचे चित्र पार पालटून गेलेले असणार आहे. ग्रामीण साहित्याला या परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे.

१९९० च्या नंतर नवे तंत्रज्ञान आले. या तंत्रज्ञानाने सारे जग बदलून टाकले. एकदम नवी परिस्थिती निर्माण होत आहे. शेतीचा शोध लागला तेव्हा मानवी जीवनाला एक प्रकारची कलाटणी मिळाली होती. आता नव्या तंत्रज्ञानामुळे पुन्हा जग बदलांच्या उंबरठ्यावर येऊन उभा ठाकला आहे. या नव्या जगाचे प्रश्न नेमके कसे राहतील ते सांगता येणार नाही, परंतु ते आजच्यासारखे असणार नाहीत, हे निश्चित. हा संक्रमण काळ टिपण्याचा जो जोरकस प्रयत्न व्हायला हवा, तेवढा होतांना दिसत नाही. तरीही काही ताकदीचे लेखक समोर येत आहेत. १९९०च्या आधीच्या लिखाणाच्या तुलनेत मराठी ग्रामीण लेखक नवे लिहिण्याचा प्रयत्न करतांना दिसतात. ही आशादायक आणि दिलासादायक बाब आहे. नवे टिपणाऱ्या लेखकांच्या पाठीशी आपण उभे राहिले पाहिजे.

सर्जक –

एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो.
तुलसीदास म्हणाले होते, ‘ढोल, गँवार, शुद्र, पशु, नारी, यह सब है ताडन के अधिकारी.’
यात ते काय म्हणतात, त्याचा संदर्भ काय, ते आपण बाजूला ठेवू. आपल्याला ढोल, गँवार, शूद्र, पशु, नारी हे सर्व घटक सर्जक आहेत हे महत्वाचे आहे. ढोल म्हणजे कलावंत, गँवार किंवा शूद्र म्हणजे शेतकरी, पशु म्हणजे जनावरे, आणि नारी म्हणजे स्त्री हे सर्व घटक सर्जक आहेत. यात नव्या जगातील शास्त्रज्ञही जोडता येईल.

सर्जक म्हणजे काय ? सर्जक म्हणजे जे नव्या अशा गोष्टीला जन्म देऊ शकते जी पुन्हा नव्या गोष्टीला जन्म देते. शेतकरी एक दाणा पेरतो. त्यातून शंभर दाणे निर्माण होतात. ते शंभर दाणे पेरले तर हजारो दाणे जन्म घेतात. ही प्रकिया सर्जनाची आहे. ही प्रक्रिया करणारा सर्जक. अशीच प्रक्रिया प्राण्यांत घडते आणि स्त्रियांत घडते. म्हणून तेही सर्जक आहेत.

जगाचा गोल कोणी तोलला आहे ? असा एक सनातन प्रश्न आहे. शेषाच्या शिरावर पृथ्वीचा गोल आहे अशी कल्पना पुराणात केली गेली. ती आता कालबाह्य झाली आहे. औद्योगिक क्रांतीनंतर जेव्हा डावे मोठ्या प्रमाणात लिहू लागले होते, तेव्हा ते म्हणाले, जगाचा गोल कामगारांच्या तळहातावर तोलला आहे. खरेच कामगारांच्या तळहातावर जगाचा गोल तोलला गेला आहे का?

जगाचा गोल कोणी तोलला आहे, याची कल्पना करायची असेल तर साधा प्रश्न आपल्या मनाला विचारा. कोण नष्ट झाले तर जग नष्ट होऊन जाईल ? जेव्हा औद्योगिक कामगार अस्तित्वातच नव्हते तेंव्हा देखील हे जग अस्तित्वात होतेच की. कामगार नसल्यामुळे जग नष्ट होत नाही. इतर घटकांचा विचार करून पहा. डॉक्टर, वकील, शिक्षक, सरकारी कर्मचारी, राजकीय पुढारी इत्यादी. उत्तर मिळेल, नाही काही फारसा फरक पडणार नाही. पण विचार करा एके दिवशी सगळे शेतकरी नष्ट झाले तर ? काय खाणार ? खायला अन्न आणणार कोठून ? दगड, कोळसा किंवा लोखंड खाऊन पोट भरत नसते. माणसाला जगण्यासाठी अन्नच खावे लागते व ते पिकवितो शेतकरीच. तुम्हाला किंवा मला शेतकरी झाल्याशिवाय मानवजात वाचवता येणार येणार नाही. म्हणून पहिला घटक शेतकरी आहे. आणि जगातील सर्व स्त्रिया संपुष्टात आल्या तर ? नवीन जनन होणार नाही व हळूहळू मानवजात नष्ट होऊन जाईल. हे दोन घटक सर्वात जास्त महत्त्वाचे आहेत. म्हणून मी म्हणतो, जगाचा गोल दोन हातावर तोलला आहे- एक शेतकर्‍यांचा आणि दुसरा हात स्त्रियांचा आहे.

लक्षात घ्या, हेच दोन घटक आज सर्वांत जास्त संकटात आहेत. शेतकरी आत्महत्या करतात आणि स्त्रियांची भ्रूणहत्या होत आहे. एकाच काळातील या घटना आहेत. या दोन्ही घटकात एकच साम्य आहे. दोघे सर्जक आहेत.

कोणत्याही जाती-धर्माच्या संघटनेच्या नेत्याला विचारा, तुझ्या जाती-धर्मात सर्वात जास्त वाईट परिस्थिती कोणाची आहे? एकसारखेच उत्तर मिळेल- शेतकरी आणि स्त्री! सगळ्याच जाती-धर्मांत जर शेतकरी आणि स्त्री समान संकटात असतील तर आपसात का भांडत बसता? त्यांची परिस्थिती सुधारेल असे काही करा.

वर्णसंघर्ष खोटा आहे; फसवा आहे. आपल्या जाती-धर्माचा आडत्या जास्त भाव देत नसतो. शेतकऱ्यांचा गळा कापायला आणि स्त्रियांचा छळ करायला सगळेच टपलेले असतात. तेथे जात धर्म, गरीब-श्रीमंत सगळे सारखेच असतात. वर्गसंघर्ष देखील खोटाच. ज्यांचे हितसंबंध शेतीत नाहीत ते सगळे एक होतात. कच्चा माल कारखानदाराला स्वस्त हवा असतोच. कामगारांनादेखील स्वस्त अन्नधान्य हवे असते. शेतकऱ्याला लुटायला ते कमी करीत नाहीत.

खरा संघर्ष आहे, सर्जक आणि भक्षक यांच्यात. सारी व्यवस्था सर्जकाना लुटायला बसली आहे. छळायला बसली आहे. त्याविरुद्ध ग्रामीण साहित्याने एल्गार पुकारला पाहिजे. हीच काळाची गरज आहे.

साहित्य संमेलन स्वरूप –

साहित्य संमेलन केवळ एक घटना (इव्हेंट) न राहता एक चळवळ (मूव्हमेंट) व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. साहित्य संमेलन ही चळवळ व्हायची असेल तर त्याची तशी रचना करावी लागेल. हे पहिले संमेलन होते म्हणून त्यात काही उणीवा, काही चुका राहिल्या असतील. पण ‘मृदगंध’ सतत चालणारा प्रवाह करायचा असेल तर त्यात लोकसहभाग वाढविणे फार गरजेचे आहे. लोकसहभाग म्हणजे केवळ उपस्थिती नव्हे. लोकांना निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घ्या. रसिकांनी पुढाकार घेऊन साहित्य संमेलने व्हायला हवीत.

मोठे किंवा गाजलेले लोक किती येतात यापेक्षा छोट्यांना मोठे करण्यात आपण किती हातभार लावतो, हे जास्त महत्त्वाचे मानले पाहिजे. मृदगंध म्हणजे मातीचा दरवळ. याचा अर्थ असा की, स्थानिक प्रतिभावंतांना आपण पुढे आणले पाहिजे. माझा लोकल कलावंत, साहित्यिक ग्लोबल झाला पाहिजे, असा विचार करून मृदगंध साहित्य संमेलनाने वाटचाल केली पाहिजे.

एकाच व्यक्तीचा पैसा असेल तर त्याचेच चालेल. ते चालायला लागले तर चळवळ बाद होऊन जाते. सर्वांच्या पैश्याने संमेलने झाली पाहिजेत. शंभर शंभर रुपये गोळा करा. जेवढे पैसे गोळा होतील तेवढ्यात संमेलन करा. कशाला हवी झगमगाट? कशाला हवेत तगडे लोक? येथे का आपल्याला कुस्ती खेळायची आहे? नव्या प्रतिभावंतांना व्यासपीठ देण्याचे ध्येय असेल तर फारसा पैसा लागत नाही. जेवढा गरजेचा असतो, तेवढा पैसा लोक देतात, असा माझा अनुभव आहे.

‘संमेलनाध्यक्षांचे साहित्य’ हा विषय आपण प्रत्येक संमेलनात अनिवार्य केला आहे. तेव्हा संमेलन अध्यक्ष असाच निवडावा लागेल ज्याच्या साहित्यावर किमान तीन चार वक्ते तास दोन तास बोलू शकतील. उगीच बिनकामी ठोंब्याला आपण अध्यक्ष करणार नाही. परिसंवादाच्या विषयांच्या बाबतीतदेखील सावध रहायला हवे. स्थानिक बाबींचे काही दस्तावेजीकरण करता येईल, असेच विषय घ्यावेत. ज्या विषयावर वारंवार विविध स्तरांवर चर्चा होते ते विषय तुम्ही का घेता? जे विषय इतर कोणी घेत नाहीत, असे आपल्या मातीशी निगडित असलेले विषय घ्यायला हवेत. मला वाटते, मृदगंध साहित्य संमेलन इतर साहित्य संमेलनांची नक्कल असता कामा नये. नवे काही तरी करा. तरच तुमच्याकडे जगाचे लक्ष वेधले जाईल. या संमेलनात काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. या पुढे तिचा विस्तार व्हावा अशी माझी अपेक्षा आहे.

माझे संकल्प-

संमेलन अध्यक्ष हे पद मानाचे किंवा मिरवण्याचे असता कामा नये; हे पद जबाबदारीचे मानले पाहिजे. मी या संमेलनापुरता अध्यक्ष नाही. दोन वर्षाने होणार्‍या दुसर्‍या संमेलनात मी नव्या अध्यक्षांना हे पद बहाल करणार आहे. दोन वर्षे मी अध्यक्ष राहणार आहे. मृदगंध साहित्य संमेलनाचा अध्यक्ष म्हणून आगामी दोन वर्षात मी व्यक्तीश: काय करणार आहे ? या बाबत मी बराच विचार केला. मला वाटते, या बाबत मी केलेला संकल्प येथे नोंदवले गेले पाहिजेत.

१) ग्रामीण भागातील प्रतिभांचा शोध घेण्यासाठी १०० शाळांमध्ये साहित्यविषयक कार्यक्रम घेईन. उपक्रम चालवेन. व्याख्याने देईन.
२) अंबाजोगाई तालुक्यात बाल साहित्य संमेलनाच्या आयोजनात पुढाकार घेईन.
३) अंबाजोगाई तालुक्यातील आत्महत्याग्रस्त कुटुंबांना भेटी देऊन त्याचा दस्तावेज तयार करीन.
४) आंबाजोगाई तालुक्यातील महिलांचा प्रातिनिधिक कवितासंग्रह प्रकाशित करेन.

आभार-

पहिल्या मृदगंध ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजक सोमेश्वर शिक्षण संस्था व मराठवाडा साहित्य परिषद, अंबाजोगाई यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. संमेलनाची तयारी करणे किती जिकीरीचे काम आहे याची मला कल्पना आहे. अंबाजोगाईच्या दहा संमेलनाचा मला अनुभव आहे. ज्या मित्रांनी संमेलनाच्या तयारीत कष्ट घेतले त्या सर्वांचे मी अभिनंदन करतो. एक नवी सुरुवात तुम्ही करून दिली आहे. पुढील पाचपन्नास वर्षे ही संमेलने होत राहणार आहेत. तुमची नातवंडे सांगतील की, ‘पहिले मृदगंध साहित्य संमेलन माझ्या आजोबांनी घेतले होते.’ हेच अशा आयोजनाचे फळ असते. ते तुम्हाला मिळणार आहे.

या संमेलनाच्या विविध सत्रांत जे भूमिका बजावणार आहेत, कोणी व्याख्याते असतील, कोणी कवी असतील, कोणी कथाकार असतील, कोणी सूत्रसंचालक असतील, त्या सर्वाना मी शुभेच्छा देतो. त्यांच्यामुळेच या संमेलनाला सौंदर्य प्राप्त होणार आहे.

संमेलनाचे यशापयश श्रोते ठरवत असतात. त्यांच्यामुळेच सर्वांची मेहनत कारणी लागत असते. मला विश्वास आहे की, आज आलेले सर्व श्रोते यापुढे होणार्‍या सर्व कार्यक्रमांत उपस्थित राहून आस्वाद घेतील. एवढेच नाही, मूल्यमापनही करतील. या श्रोत्यांकडून मला खूप अपेक्षा आहेत.

या संमेलनाच्या निमित्ताने मला साहित्य चळवळीत काही योगदान करण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. मी केलेले संकल्प पूर्ण करण्यासाठी तुमच्या शुभेच्छा आणि सहकार्य मला मिळावे, अशी अपेक्षा करून मी माझे हे अध्यक्षीय भाषण समाप्त करतो.

इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो।

अमर हबीब,
अंबर, हाऊसिंग सोसायटी,
आंबाजोगाई- 431517 (जि.बीड)
मो . 8411909909
habib.amar@gmail.com

Related posts

आत्म्याला जाणण्यासाठीच सोsहम साधना

नैसर्गिक प्रेमातूनच शाश्वत ज्ञानानुभव

समई मानवतेची…

Leave a Comment