October 5, 2024
The creation of Kavyamrita from Madhughta review of book eiypail
Home » Privacy Policy » मधुघटातून झालेले काव्यामृताचे शिंपण
मुक्त संवाद

मधुघटातून झालेले काव्यामृताचे शिंपण

उन्हात चांदणे फुलवण्याची किमया या कवितेत आहे. ही कविता सर्जनशीलतेचा अलंकारिक साक्षात्कार घडवणारी आहे. काव्यदेवतेने पायात नुपूर बांधावेत आणि कानावर त्याचा मंजुळ नाद कानी पडावा असा अनुभव देणा-या या कविता आहेत

सुहास रघुनाथ पंडित, सांगली.

          सुप्तकोषातील कवितेला जागृत करुन वृत्तबद्ध काव्याचा मधुघट हाती देणा-या हरिश्चंद्र कोठावदे यांचा ‘ ऐलपैल ‘ हा एकशेबावन्न कवितांच्या संग्रहाचा आस्वाद  घेतल्यानंतर  त्यातील काही अमृतकण रसिकांपर्यंत पोहोचावेत याहेतूने केलेले हे लेखन ! खरे तर प्रत्येक ओळीचा आस्वाद  स्वतः घ्यावा असा हा काव्यसंग्रह. मुक्तछंदाची वाट न चोखाळता वृत्तबद्ध, छंदोबद्ध  काव्यलेखन करणारे पुण्याचे श्री.कोठावदे यांनी या काव्यसंग्रहाद्वारे काव्यानंदाचा लाभ घडवून आणला आहे.

       शब्दसाधना करता करता शब्दसिद्धी प्राप्त करुन कधी आत्मरंजनी तर कधी विश्वरंजनी  रमणा-या या कविने पादाकुलक, हरिभगिनी, आनंदकंद,अनलज्वाला,बालानंद,समुदितमदना,केशवकरणी अशा विविध वृत्तांत तसेच छंदात केलेल्या रचना वाचताना त्यातील अंतर्गत लयीमुळे मन काव्यलतेवर नकळतपणे डोलू लागते. खरे तर कवीने मनाशी साधलेला संवाद काव्याच्या रुपाने शब्दबद्ध झाला आहे.यातील कविता म्हणजे आयुष्याने दिलेल्या अनुभवांचा काव्यात्मक आलेख आहे.या कवितेत काय नाही ?,उन्हात चांदणे फुलवण्याची किमया या कवितेत आहे. ही कविता सर्जनशीलतेचा अलंकारिक साक्षात्कार घडवणारी आहे. काव्यदेवतेने पायात नुपूर बांधावेत आणि कानावर त्याचा मंजुळ नाद कानी पडावा असा अनुभव देणा-या या कविता आहेत. स्वताला कवी म्हणून फारशा गांभीर्याने कधीच घेतले नव्हते असे कवीने मनोगतात म्हटले असले तरी छंद जोपासता जोपासता छंदोबद्ध कवितांचा नजराणाच कविने रसिकांना सादर केला आहे. कवितेतून आयुष्याचा सूर मिळवताना कविला कवितेचाही सूर सापडत गेला आहे.लयबद्ध  शब्द रचनेने केवळ कवितेचीच नव्हे तर जगण्याची लयही सापडली आहे. स्वप्नात रंगताना, सत्याचे रंग कितीही भयावह असले तरीही त्यांच्या उग्र रूपाकडे काणाडोळा न करणा-या या कविता आहेत. या कवितांमधून वास्तवावर प्रखर प्रहार  तर केले आहेतच पण लयबद्ध गेयता बहार  वाढवणारी आहे.

आशा, निराशा, खंत, खिन्नता, ध्येयपूर्ती, अपुरेपणा, सुसंगती, विसंगती अशा संमिश्र भावनांनी भरलेल्या जीवनाचे यथार्थ दर्शन या कवितांतून घडत आहे.’ ऐलपैल ‘ मधील कविता म्हणजे नवरसांचा शाब्दिक नवोन्मेश आहे.काव्यगंगेच्या ऐलतटापासून पैलतटापर्यंत अलंकारांची हिरवळ लेऊन सजलेलं वृत्तबद्ध काव्याचं बेट म्हणजे ‘ ऐलपैल ‘ हा काव्यसंग्रह!

         कविने म्हटल्याप्रमाणे अश्रू असोत, पानझड असो, संकटाची घोर रात्र असो, उन्ह असो वा चांदणे , हार असो वा झुंजणे, एकांत असो वा कोलाहल कवीची कविता ही विदेह यात्रा आहे.दुःखाला भडकपणे रंगवून त्याचे प्रदर्शन करण्याचा आततायीपणा या कवितेत नाही आणि सुखाच्या लाटेवर आरूढ होतानाही कविच्या शब्दांत उन्माद नाही.

          श्री.कोठावदे यांची कविता ही सुखदुःखाचा करुणरम्य उत्सव शब्दांनी रंगविणारी कविता आहे.कविने म्हटल्याप्रमाणे  ती कविला नव्याने जन्माला घालणारी आहे. ती नित्य साधनेची जाणीव करुन देणारी कविता आहे. अनुप्रासात्मक शब्दांनी काव्यातून चिंब पाऊस पाडणारी कविता आहे. अश्रूत नाहलेल्या, कंठात दाटलेल्या आणि ह्रदयात पेटलेल्या प्रीतीची जखम गोंदणारी ही  कविता आहे.ही कविता स्वार्थांध बेफिकीरी पाहून उद्विग्न होणारी आहे.भोंदुगिरीच्या जमान्यात संयम,तपस्या आणि अध्यात्म  यांचे स्मरण करुन देणारी ही कविता आहे.उरात ओल जपत परदुःखाशी संवाद साधणारी आहे.मुखवट्याच्या जगात अविरत झुंजत राहण्याचे सामर्थ्य देणारी कविता ‘ऐलपैल ‘ मध्ये आपल्याला वाचायला मिळते.

                   सर्वच्या सर्व संग्रह आपल्यासमोर ठेवणे शक्य नाही.पण संग्रहाचे कोणतेही पान उघडावे आणि त्यावरील काही पंक्ती समोर ठेवाव्यातच असा मोह होतो. 

सांगायाचे बरेच होते, बरेच काही सांगुन झाले
काळजातले सुरुंग काही,फुटावयाचे राहुन गेले
दिवसाढवळ्या डोळ्यांदेखत, इथे खलांचा नंगा नाच
संत महात्मे साधू सज्जन,किती उदासिन किती लाचार 

ध्वस्त कराया तुझी अस्मिता
सुसज्ज सैनिक दहा दिशांचे
आरपारची अता लढाई 
भय कसले रे शत मरणांचे 

ध्यास असू दे नंदनवन पण,परसामधली बाग फुलू दे
नित्य नभाशी संभाषण पण,घरट्याशी संवाद असू दे

युद्ध लादले जर नियतीने 
नियतीशीही झुंजत राहू
अखेरच्या अन् चिंधिलाही 
निशाण बनवुन फडकत ठेऊ

जीवन ही तर गळकी घागर
किती भरावी तरी रिती रे
दैवाकडुनी शापालाही 
उ:शापाची कधी हमी रे

   तुटू पाहती तट तेजाचे,
तरीही जळती दिवट्या काही
अजून असतिल परंतु शोधा,
भांगेमधल्या तुळशा काही

                 

कविते तुझीच बाधा,आजन्म भोवणार
वणव्यात चांदण्याची, मी गोष्ट सांगणार

                 

मन ग्रासते मनांना,होऊन राहुकेतू 
मन जोडते मनांना, होऊन दिव्य सेतू                   

एकावर एक वीट
जावी रचित दुःखांची
होत रहावी अभेद्य 
तटबंदी काळजाची 

परि नच काळजाला
कळा पाषाणाची यावी
परदुःखांशी संवादी 
ओल उरात जपावी

                 

आम्ही मेंढरे आंधळी
नाही बूड,नाही शेंडा
ज्याच्यामागे गर्दी त्याचा
खांद्यावर वाहू झेंडा

                   *.

प्रीतीचा गंगौघ असा की
मनी मलिनता उरली नाही
विश्व प्रीतिचे दोघांचे जरी
कुंपण क्षितिजा उरले नाही

                  *

प्रतिसादाविण विदीर्ण हाका
तरी जळू दे दिव्यात ज्योती 
थेंब स्वातिचा कधीतरी रे
शिंपल्यातला होइल मोती !

                  *

पहिलावहिला पाऊस उत्कट
सहस्त्र हस्ते धरेस कवळी
अशा बरसती धो धो धारा
जन्मांतरिचे वणवे विझती

                  *

क्षितिजकरांनी शिंपित जीवन
गगन धरेवर झुकले रे
किती दिसांनी आभाळाला 
फुटला ऐसा पाझर रे

                  *

घ्यावे दत्तक दुःखांना 
तुझे दुःख दुःख माझे
गच्च भरल्या गाड्याला 
सुपाचे का होते ओझे

                  *

अशा किती काव्य पंक्ती सांगाव्यात? त्यापेक्षा त्या वाचून आनंद  घेणे हेच श्रेयस्कर. कवीही म्हणत आहे,

  ” स्वान्तःसुखाय जरि ही कवने 
    दाद द्यावया दर्दी यावे
    अज्ञेयातिल रानफुलेही 
    कुणी तयांना ह्रदयी घ्यावे “

        वृत्तबद्ध  काव्य रचना करत असताना येणा-या बंधनांचे व मर्यादांचे भान ठेऊन या कवितांचा आस्वाद  घेणा-याला काव्यानंदाची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही.अशात कसदार कवितांची अपेक्षा श्री.हरिश्चंद्र कोठावदे यांच्याकडून आहे.पुढील लेखनासाठी त्यांना शुभेच्छा !

काव्यसंग्रह :  ऐलपैल
कवी          : हरिश्चंद्र कोठावदे    9423862226
प्रकाशक    : मधुश्री प्रकाशन पुणे 9850962807
मूल्य          : रु.300/_


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading