उत्तम शेती , मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हे करिअरचे सूत्र कधीच इतिहासजमा झाले आणि समाजात नोकरीला प्रतिष्ठा मिळाली. अनेकांनी नोकरीचा हा राजमार्ग चोखाळत यशाच्या शिखरांना गवसणीही घातली. सद्यस्थितीत नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या पाहता सर्वांनाच चांगली व स्वप्नवत नोकरीची संधी उपलब्ध होणार नाही असेच अनेकांचे मत आहे. पण योग्य नियोजन, स्वतःच्या कौशल्यांचा वापर आणि इतरांपेक्षा काही वेगळ्या तंत्राचा वापर केल्यास नक्कीच एक चांगली नोकरी तुम्ही मिळवू शकता. त्यासाठी गरज आहे नोकरी मिळवण्याची कला शिकण्याची.
एखादी पदवी, पदविका किंवा डिप्लोमा केला की आपण नोकरीस पात्र झालो असाच अनेकांचा समज असेल. पण फक्त डिग्री घेऊन नोकरी मिळवण्याचे दिवस कधीच गेले. अपेक्षित कौशल्य व पदवी असल्यास नोकरी मिळते हीच आज – काल अंधश्रद्धा ठरते आहे. कारण वेगाने बदलणारे तंत्रज्ञान, विकासाचा वाढणारा वेग, झपाट्याने बदलत जाणारे व्यवसायिक पर्यावरण, नोकरीत येणारे नवनवीन ट्रेण्ड, पाहता नोकरी मिळवणे व असलेली नोकरी टिकवणे हेच सध्या मोठे दिव्य बनले आहे.
जर आपण अथवा आपल्या पाल्याने एखाद्या व्यावसायिक अथवा अव्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर नोकरी आपल्याकडे चालत येईल याची वाट बघत बसू नये. तर थोडीशी हुशारी, नोकरी मिळवण्याची योग्य तंत्रे वापरून एखादी चांगली नोकरी पदरात पाडून घ्यावी. कारण बाजारपेठेत उपलब्ध संधी आणि इच्छुक उमेदवारांची संख्या याचे प्रमाण व्यस्त बनत चालले आहे .अनेक उद्योगाना मंदीची चाहूल लागल्याने कंपन्या नोकर भरती बाबत निरुत्साही आहेत. अशा अस्थिर वातावरणात व प्रचंड जीवघेण्या स्पर्धेत टिकून राहणे व स्वतःला सिद्ध करणे हेच मोठे आव्हान आहे .म्हणून योग्य वेळी परिस्थितीशी जुळवून घेण्याची व नोकरी मिळवण्याची कला आत्मसात केल्यास विद्यार्थी अस्थिर वातावरणात ही यशस्वी करिअर करू शकतो. अन्यथा ज्ञान कौशल्य व चांगला दृष्टिकोन असूनही आपण करियर मध्ये मागे पडू शकता. पात्रता असूनही केवळ अज्ञान,आळस ,योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे करिअरच्या शर्यतीत मागे पडलेली अनेक मुले तुमच्या आजूबाजूला असतील.अशा बेरोजगारांच्या पंगतीत आपल्याला बसायचे नसेल तर शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याने योग्य वेळी नोकरी मिळवण्याची कला शिकायलाच हवी.
या टिप्स आपल्याला नक्कीच उपयोगी ठरतील
१. नोकरी देणाऱ्या प्रत्येक कंपनीच्या उमेदवाराकडून ज्ञान कौशल्य व पात्रतेबद्दल काही अपेक्षा असतात. विद्यार्थ्यांनी त्या अपेक्षांचा अभ्यास करून अशी पात्रता स्वतः निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.
२. सध्या बऱ्याच कंपनीमध्ये उमेदवाराची निवड ओळखीच्या व्यक्तींकडून केली जाते. आपणाला चांगली नोकरी मिळवायची असेल तर दांडगा जनसंपर्क असणे गरजेचे आहे. या ओळखीच आपल्याला संधी मिळवून देतात.
३. नोकरीच्या जाहिरातीची वाट पहात बसू नका. कंपनीच्या एच आर पर्यंत स्वतःचा बायोडाटा पोहोचवण्याची व्यवस्था करा.
४. ऑनलाइन नोकरी पोर्टलवर स्वतःच्या शिक्षण आणि पात्रतेची नोंदणी केल्यास नक्कीच चांगली संधी मिळू शकेल.
५. कंपनीद्वारे विविध इनोव्हेटिव्ह स्पर्धांचे आयोजन केले जाते अशा स्पर्धेत जरूर भाग घ्यावा.
६. विविध कॉलेजमध्ये आयोजित केलेल्या कॅम्पस इंटरव्यू मधूनही करिअरची चांगली संधी मिळू शकते.
७. नोकरीच्या शोधात असाल तर सदैव जागृत राहा, वर्तमानपत्राचे दैनंदिन वाचन, कंपन्यांच्या वेबसाईट पाहणे, विविध कंपन्यांच्या पोर्टल वर स्वतःची माहिती भरणे, जॉब पोर्टल वर माहिती भरणे, करियर कन्सल्टन्सीमध्ये नोंदणी करणे, कंपन्यांच्या एच आर ची ओळख करून घेणे, कंपनीत काम करणाऱ्या मित्रांच्या संपर्कात राहणे, अशा काही सवयी जाणीवपूर्वक लावून घ्यावे लागतील.
याशिवाय आपणही काही नवनवीन तंत्रे शोधून एक चांगले करिअर आकाराला आणू शकता. कारण लक्षात ठेवा सध्याचा जमाना मार्केटिंगचा आहे. आपणच आपली जाहिरात केल्याशिवाय आपले ज्ञान कौशल्य खपत नाही .
संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथाचा अभ्यास एक तरी ओवी अनुभवावी असा या ग्रुपचा उद्देश आहे. मग होताय ना सहभागी..त्यासाठी लिंकवर क्लिक करा. https://www.facebook.com/groups/ShriDnyneshwariStudy
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.