April 15, 2024
Home » अहो ! आर्ट्स शाखेतूनही होतं करिअर
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अहो ! आर्ट्स शाखेतूनही होतं करिअर

कला शाखेतून करिअर करणाऱ्या मुलांनी स्वतःबरोबरच दुसऱ्यांचे आयुष्य समृद्ध करण्याचा विडा उचलला आहे. जर आपल्यालाही या शाखेतून करिअर करावेसे वाटत असेल तर नक्कीच ही शाखा करिअरचा उत्तम पर्याय आहे.

रवींद्र खैरे ( करिअर सल्लागार)

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याची क्षमता असूनही उपेक्षित राहिलेली शाखा म्हणजे कला शाखा. या शाखेत शिकणार्‍या मुलांचे पुढे काही होत नाही. असाच दृष्टिकोन अनेक वर्ष आम्ही कवटाळला. परिणामी करिअरची निवड करताना या शाखेला थोडे गौण स्थान दिले गेले. विज्ञान व वाणिज्य शाखेच्या तुलनेत कला शाखेला आम्ही फार गांभीर्याने घेतले नाही. तरीही आज कला शाखेतून शिक्षण घेतलेल्या हजारो विद्यार्थ्यांनी देशाच्या समाजकारण, राजकारण, शिक्षण, चित्रपट, संस्कृती व अर्थकारणात वेगळा ठसा उमटवला आहे. म्हणून केवळ यशस्वी करिअरच नव्हे तर विद्यार्थ्याला आदर्श नागरिक व चांगला माणूस बनवायचे असेल तर कला शाखेला पर्याय नाही.

जेव्हा शिक्षणाचा सरळ संबंध भाकरीशी जोडला गेला तेव्हा शिक्षण ही नोकरी मिळवून देण्याचे प्रभावी साधन बनले. विज्ञान व वाणिज्य या शाखेतून शिकलेला विद्यार्थी पटकन नोकरी मिळवतो, त्याचे करिअर होते अशीच समाजाची धारणा आहे. केवळ व्यावसायिक व तांत्रिक शिक्षण घेऊन विद्यार्थीला नोकरी मिळेल ही. पण करिअरचा मुख्य उद्देश असलेली जीवन समृद्ध करण्याची कला त्याला आत्मसात होईलच असे नाही. कला शाखेतून करिअर करणाऱ्या मुलांनी स्वतःबरोबरच दुसऱ्यांचे आयुष्य समृद्ध करण्याचा विडा उचलला आहे. जर आपल्यालाही या शाखेतून करिअर करावेसे वाटत असेल तर नक्कीच ही शाखा करिअरचा उत्तम पर्याय आहे.

या शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना समाजशास्त्र, राज्यशास्त्र, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भूगोल, इतिहास, भाषाशास्त्र यासारखे विषय शिकवले जातात. सध्याच्या काळात या प्रत्येक विषयात स्वतंत्रपणे करिअर करता येते. धकाधकीच्या जीवनात माणसांच आयुष्यं यंत्रवत झाले आहे. ताण तणाव, भीती, नैराश्य अशा अनेक समस्यांनी माणूस त्रस्त झाला आहे. मानसशास्त्राचा अभ्यास करणारा विद्यार्थी या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय शोधू शकतो. अशा मानसशास्त्रज्ञांची सध्या प्रचंड गरज आहे. अर्थकारणातले बदलते संदर्भ, देशाबरोबरच जगाचे बदलत जाणारे अर्थकारण यामुळे आर्थिक क्षेत्रात सल्ला देणाऱ्या, त्यांचा अभ्यास असणाऱ्या माणसांची निकड निर्माण झाली आहे. ही निकड ओळखून जर आपण अर्थशास्त्रात करियर केले तर नक्कीच एक अर्थपूर्ण करियर आकाराला येऊ शकते.

इतिहास विषयात आर्किऑलॉजिस्ट, पुरातत्व खात्यातील नोकरी, जुन्या व दर्जेदार संदर्भा ग्रंथांचे लेखन, संशोधन, विविध विद्यापीठात शाळा-कॉलेजमध्ये, स्पर्धा परिक्षा ॲकॅडमी मध्ये शिक्षक म्हणून काम करता येते., आजकालच्या राजकारणाचे बदलते कंगोरे पाहिले तर राजकीय क्षेत्रातही प्रसिद्धी तज्ञ, व्यूहरचना तज्ञ, राजकीय सल्लागार, माध्यम तज्ञ म्हणूनही करिअर करता येते.

भारतीय प्रशासकीय क्षेत्रात क्लास वन ,क्लास टू ,क्लास थ्री अधिकारी व्हायचे असेल तर कला शाखा अत्यंत उपयुक्त शाखा आहे. कारण प्रशासकीय सेवेत साठी घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत कला शाखेतून सर्वाधिक प्रश्न असतात. त्यामुळे या शाखेचा अभ्यास करणारी मुले स्पर्धा परीक्षेत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करू शकतात.. स्पर्धा परीक्षा बरोबरच भाषाशास्त्रात कला शाखेच्या मुलांनी विशेष प्राविण्य मिळवले आहे .मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषांचा अभ्यास याचबरोबर विदेशी भाषांचा अभ्यास असेल तर सध्याच्या जागतिकीकरणाच्या युगात अशा माणसांचे मूल्य प्रचंड वाढते.

चित्रपट, नाटक, साहित्य, संगीत , विविध कला यांची आवड असणारे व अशा कला जोपासणारे विद्यार्थी कला क्षेत्रातूनच स्वतःला सिद्ध करतात. अशा विविध कलांसाठी सध्या देशातल्या अनेक कॉलेज व विद्यापीठातून स्वतंत्र पदवी आणि पदविका ची सोय करण्यात आली आहे. भूगोल मधून टूर्स अँड टुरिझम क्षेत्राला मोठ्या प्रमाणात वाव आहे. याशिवाय एमबीए, इव्हेंट मॅनेजमेंट यासारख्या विविध कोर्सेस व डिप्लोमा ही उपलब्ध आहेत. गरज आहे आर्ट्स शाखेकडे थोड्या सकारात्मक नजरेने पाहण्याची.

कोल्हापुरातील संस्कृती, ताज्या घडामोडी आदी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा कोल्हापूर प्रतिबिंब फेसबुक पेजवर
 https://www.facebook.com/groups/KolhapurCulture/

Related posts

…तर मुलं कधीच अपयशी होणार नाहीत

गिर्यारोहणातल्या करिअर संधी…

स्पर्धा परीक्षा – आकर्षण अन् वास्तव

Leave a Comment