गेल्या काही वर्षात अनेक सामाजिक बदल होत आहेत. बदलती आर्थिक स्थिती, झपाट्याने बदलत चाललेली संस्कृती अन् परदेशी संस्कृतीचे आक्रमण अशाने भारतीय संस्कृतीत मोठे बदल होऊ घातले आहेत. अशाने आपल्या संस्कृतीचे महत्त्व काही ठिकाणी कमी होऊ लागले आहे तर काही ठिकाणी त्याचे महत्त्व अधिक प्रकर्षाने जाणवत आहे. बदल हा काळाचा नियम आहे. परिवर्तन हे होतच राहाते पण यातून निर्माण होणाऱ्या समस्यांना आपणालाच सामोरे जावे लागते. अशाच बदलत्या काळातील समस्यावर अन् संस्कृतीचा घेतलेला हा एक कानोसा…
अॅड. सौ. सरीता सदानंद पाटील,
ठाणे, मुंबई
मुळात हिंदू धर्मामध्ये माणसाच्या जीवनातील सोळा संस्कारांपैकी विवाह हा चौदावा आणि अत्यंत महत्वाचा संस्कार आहे. लग्न हे एक पवित्र बंधन आहे. “विवाह” हे एक पुरुष व स्त्री अश्या दोन व्यक्तीमधील सामाजिक बंधन आहे. विवाह हा संतती किंवा वंश पुढे नेण्यासाठीचा कायदेशीर व सामाजिक मार्ग आहे. ‘विवाहसंस्था’ ही संस्कृतीस आणि उपसंस्कृतीस अनुलक्षून विविध पद्धतींनी पतीपत्नीमधले जवळीकीचे आणि लैंगिक नाते मान्य करते. ही संस्था मानवी समाजातील लैंगिक जीवनावर नियंत्रण आणि नियमन करण्यासाठी स्थापित केली जाते. विवाहामुळे दोन व्यक्तींचे नव्हे तर दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक नात्याने जोडले जातात. या नात्यास लग्नगाठ म्हणतात. त्यामुळे लग्न हि संकल्पना भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्वाची मानली जाते.
लग्न म्हणजे खरे तर दोन मनांचे, दोन स्वभावाचे, दोन कुटुंबाचे मिलन आहे. फार पूर्वी म्हणजे हजारो वर्षापासून प्रत्येकाने मुलगा असो वा मुलगी असो लग्न हे केलेच पाहिजे अशीच परंपरा होती. त्यामुळे अगदी नव्वदच्या दशकापर्यंत तरी असेच होते. त्यामुळे वयात आलेल्या प्रत्येकाने लग्न हे केलेच पाहिजे असेच पूर्वजांकडून प्रत्येकाच्या मनावर बिंबवले गेले होते आणि तीच परंपरा अगदी २०-३० वर्षापूर्वीपर्यंत तरी होती. नव्वदच्या दशकापर्यंत कुटुंबातील मुले किंवा मुली आई-वडील, आज्जी-आजोबा म्हणजेच कुटुंबातील मोठ्या माणसांवर अवलंबून होते. म्हणजेच प्रत्येकजण पालनपोषण, शिक्षण, नोकरी व काही महत्वाचे निर्णय ई.साठी कुटुंब व समाजावर अवलंबून होते. म्हणजे आपण कुटुंबाच्या व ज्या समाजात राहतो त्या समाजाच्या सर्व रितीभाती पाळत होतो. म्हणजे आपण लग्न नाही केले तर कुटुंबातील आणि समाजातील लोक काय म्हणतील किंवा आपल्याला नावे ठेवतील असेच वाटायचे. त्यामुळे लग्न न करता तसेच म्हणजे अविवाहित राहणे हि कल्पना करणे म्हणजे समाज किंवा कुटुंबाकडून आश्चर्य व्यक्त केले जायचे किंबहुना थोडक्यात विचित्र वा असामान्य ठरवले जायचे. त्यामुळे मी लग्न करणार नाही असे म्हणायचे कोणी धाडस करत नव्हते.
पूर्वी म्हणजे तीन-चार दशकापूर्वी उपवर मुलामुलींची लग्ने समाजातील किंवा गावातील शिक्षक किंवा प्रतिष्ठीत व्यक्ती दोन्ही घरांमधील मधला माणूस म्हणून दोन्ही घरांच्या मोठ्या व्यक्तींशी चर्चा करुन, मुलगा- मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम करुन लग्ने जमवत असत आणि तेही कोणताही मोबदला न घेता समाजसेवा म्हणून करत असत. म्हणजेच ई एस बोगार्द्स यांच्या म्हणण्यानुसार विवाह ही दोन माणसांची एक विवाह संस्थाच होती. त्याकाळी लग्ने जमवण्यासाठी वधूवर सूचक मंडळांची गरज लागत नव्हती त्यांचा अजून जन्म व्हायचा होता. त्या काळात सर्व मुले- मुली पण एकदा का लग्नबंधनात अडकले कि आपल्याला आता खूप वर्षे एकत्र राहून एकमेंकाशी जुळवून घेऊन, विश्वासाने चांगला संसार करायचा आहे हे मनात ठेवून, सर्व वडीलधारया माणसांचे ऐकत असत. तेव्हा स्त्रीने घर सांभाळायचे आणि पुरुषाने पैसा कमवून आणायचा असे ठरलेलेच होते किंबहुना हा समाजाचा अलिखित नियमच आहे म्हणून कोणतीही तक्रार न करता गप्पगुमान आपापली कामे करत असत.
फार पूर्वी तर स्त्रीने फक्त ‘चूल आणि मूल’ करायचे असे होते. पण नव्वदच्या दशकानंतर आर्थिक उदारीकरण, संगनिकीकरण आले आणि काळ झपाट्याने बदलला. तरुण मुले-मुली उच्च शिक्षण घेऊ लागले, नोकरीत पॅकेज पद्धत आली, हातात पैसा खुळखुळू लागला आणि सामाजिक व्यवस्था झपाट्याने कुटुंब केंद्रीत झाली आणि त्याच वेगाने कुटुंबे व्यक्तिकेंद्रित कधी झाली हे कळले सुद्धा नाही. परिणामी तरुण मुले -मुली स्वकेंद्रित होऊन स्वतःचे निर्णय स्वतःच घेऊ लागले. नव्वदच्या दशकानंतर स्त्री-पुरुष समानतेची जाणीव झाली आणि मोठ्या प्रमाणावर मुली पण उच्च शिक्षण घेऊ लागल्या आणि त्यांच्याही ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या तरीसुद्धा मुलींना/ स्त्रियांना फक्त शाळा, महाविद्यालय, बँक, पोस्ट इ. ठिकाणी आणि त्याही फक्त सरकारी ठिकाणीच नोकऱ्या करण्याची परवानगी होती. पण एखादीला खाजगी संस्थेमध्ये नोकरी असेल ती लग्नानंतर हमखास सुटली जायची कारण मुले झाल्यावर मलाच त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे असे स्त्रीलाच वाटायचे कारण आपल्याकडे त्यावेळी पुरुष प्रधान संस्कृतीच होती. पण त्यानंतर मात्र साधारणपणे विसाव्या शतकाच्या शेवटी आणि एकविसाव्या शतकाच्या सुरवातीला खेड्यातील तरुण-तरुणी नोकरी व शिक्षणासाठी शहरांकडे धाव घेऊ लागले आणि हळूहळू शहरातच स्थिरावले. शहरांमध्ये विभक्त आणि चौकोनी कुटुंबे उदयास आली.
जसजसी चौकोनी कुटुंबे शहरातून फ्ल्याटमध्ये राहू लागली तसतसा लोकांचा संपर्क कमी झाला आणि त्यांच्या मुलांची लग्ने जमवणे कठीण होऊ लागले आणि त्यातून सामाजिक हितासाठी वधूवर सूचक मंडळांचा जन्म झाला. मग शहरातून अनुरूप, लग्नगाठ, योगमराठा ,राधिकासंगम, विवाहसोहळा ई. वधूवर सूचक मंडळे अस्तित्वात आली. मग शिकलेले आई-वडील आपल्या लग्नाळू मुला-मुलींची नावे तिथे नोंदवून लग्ने ठरवू लागली. तिथेही आपापल्या भागातील, स्वजातीतील स्थळे सुचवून, ठरवून लग्ने जमू लागली व तोपर्यंत वधूवर सूचक मंडळे लग्नसंस्था टिकवण्याचे चांगले काम करत होते.
आणखी दहा वर्षांनी डिजिटल युग आले आणि कॉर्पोरेट व खाजगी क्षेत्रात मुले-मुली नोकऱ्या करू लागले. स्त्री-पुरुष समानतेचे वारे वाहू लागले. शहरातल्या आई-वडीलाना आपल्या मुलामुलींनी उच्च पदावरील चांगल्या नोकऱ्या कराव्या असे वाटू लागले आणि त्यात वावगे काहीच नाही. कारण त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी खूप खस्ता खाल्लेल्या असतात. त्यानंतर आय.टी. व संगणक क्षेत्रातील कंपन्या भले मोठे पॅकेजेसचे गाजर दाखवून नोकऱ्यांमध्ये तरुणपिढीला आकर्षित करू लागले. साहजिकच तरुण पिढी करीअर केंद्रित बनली आणि आजपर्यंत आई-वडिलांच्यावर अवलंबून असलेली तरुणपिढी खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनली. चांगल्या पगारांमुळे हातात पैसा खुळखुळू लागल्यामुळे अर्थातच साथीदारही भल्या मोठ्या पगाराचा, सर्व बाजूंनी स्थिर-स्थावर, ओळखीचा असावा असे वाटू लागले. आपल्या आयुष्याचे निर्णय आपणच घेऊ लागली. मित्र-मैत्रिणी व मैत्री संकल्पना खऱ्या अर्थाने दृढ झाल्या आणि एकमेकांच्या वाढदिवसाच्या, सहलीदरम्यान भेटीगाठी होऊन मैत्रीचे रुपांतर प्रेमात होऊन स्वतःची लग्ने स्वतःच जमवू लागली. त्यातूनच मग सध्या ८०% प्रेमविवाह व २०% ठरवून लग्ने होऊ लागली आहेत.
जोपर्यंत लग्न करणे ही संकल्पना गरजेची आणि अपरिहार्य होती तोपर्यंत लग्नसंस्था अबाधित होती. अलीकडे खरे तर दहा वर्षापासुनच ‘हम दो हमारा एक’ ही संकल्पना अस्तिवात आल्यामुळे आई-वडिल एकुलत्या एक मुलाचे नको तितके लाड करू लागले. त्यामुळे मुलांमध्ये वेगळ्या स्वभावाच्या मुला-मुलीशी जुळवून घेणे कठीण जाऊ लागले. आपसूकच उपवर मुलामुलींची संख्याच कमी झाली परिणामी विवाह कमी होऊ लागले आणि तेही वयाच्या तीसीला. शिवाय पत्रिका बघून व योग्य गुण जुळवून लग्ने जमवणे यात लग्नाची वये निघून जात आहेत. आपोआपच वधूवरसूचक मंडळमधून नोंदणी कमी झाली आणि लग्नसंस्थेचे भवितव्य हळूहळू धोक्यात येऊ लागले आणि हीच लग्नसंस्थेला धोक्याची घंटा ठरली.
तीस-पस्तीस वर्षापूर्वी पर्यंत विवाह वयाच्या २०-२५ वर्षाला होत असत त्यामुळे लग्नानंतर आपले आयुष्य खूप सुखात जाणार असेच वाटायचे आणि लग्न हे टिकलेच पाहिजे असे मनावर बिंबवले किंबहुना बिंबले होते. त्यामुळे लग्नानंतर एक-दोन वर्षात अपत्य व्हायचे आणि होऊ पण दिले जायचे. मुलांसाठी सर्व दुःख, त्रास विसरून दोघांनी एकमेकांशी जुळवून घेऊन प्रसंगी त्रास सहन करुन मुलांची जडणघडण केली जायची. पण मुली नोकरी करू लागल्या त्यामानाने पुरुषी मानसिकता म्हणावी तशी बदलली नाही आणि मुलांच्या पालनपोषणाचा प्रश्न ऐरणीवर आला. परिणामी मुले पाळणाघरात ठेऊन, घर सांभाळून मुली नोकऱ्या करू लागल्या पण त्यामुळे नोकरीतील बढती, बदली स्त्रिया नाकारू लागल्या आणि जो काही त्याग करायचा तो स्त्रीनेच हे समीकरण काही बदलले नाही. त्यामुळे घराघरात वाद चालू झाले आणि हळूहळू करीअर केंद्रित मुला-मुलींना लग्न म्हणजे नुसता त्रास, कटकट व अनावश्यक लादलेली जबाबदारी वाटू लागली. मग माझ्याकडे भल्या मोठ्या पगाराची नोकरी आहे, सर्व सुखे मी पैशाने विकत घेऊ शकतो मग त्यासाठी लग्न बंधनात कशाला अडकायचे, लग्न म्हणजेच सर्व काही नाही असा विचार दृढ होऊ लागला आणि खरोखरच आज समाजात कित्येक मुले-मुली अविवाहित राहत आहेत.
विवाहाने माणूस खऱ्या अर्थाने परिपूर्ण होतो व गृहस्थाश्रमात प्रवेश करतो हा विचार केव्हाच मागे पडू लागला. कारण आता काळ झपाट्याने बदलत आहे आणि मुलींनापण त्यांचे आर्थिक व वैचारीक स्वातंत्र्य गरजेचे वाटले. अलीकडे प्रेमविवाह सुद्धा टिकेनासे झालेत हे आपल्याला पावलोपावली जाणवत आहे. जरी प्रेमविवाह झाला तरी जोडीदाराने मित्रासारखे राहणे आणि मातृत्वाची जबाबदारी जेव्हा मुलीला वाटेल त्यावेळी तिने घ्यावी हा विचार अलीकडे दृढ होत आहे. त्यामुळे मातृत्वाची जबाबदारी जोडीदाराने लादणे गैर वाटू लागले. म्हणून सध्या दोघानाही मुलांची जबाबदारी घेणे अवघड वाटत आहे म्हणून झाले तर एकच अपत्य नाही तर ‘सिर्फ हम दो’ म्हणजे ‘डबल इन्कम नो किड्स’ असित्वात येत आहे आणि हीच गोष्ट लग्नसंस्थेचे अस्तित्व संपवायला पुरेशी आहे असे मला वाटते. अलीकडे तर प्रेमविवाह असो वा ठरवलेले लग्न असो एकमेकांसी किरकोळ कारणावरून पटत नाही म्हणून परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. अगदी ठाणे महानगरपालिकेच्या क्षेत्रात कौटुंबिक न्यायालयात रोजच्या १०० ते १५० केसेसची नोंदणी होते आहे. यावरुन लग्नसंस्थेचे भवितव्य किती भयानक आहे ह दिसते आहे.
मी आज स्वावलंबी, सक्षम आहे तर मला वाटेल त्या वस्तूंवर मी खर्च करेन असेच आजकाल तरुण पिढीला वाटत आहे. दूरदर्शनवरील मालिका, चित्रपट पाहून मध्यम वर्गातील मुलामुलींना आपले लग्न पण दोन-तीन दिवस (संगीत, हळदी, लग्न व स्वागत-समारंभ) चालावे आणि तेही दणक्यात व्हावे असे वाटत आहे. त्यासाठी वारेमाप खर्च करण्यासाठी एकतर दोन्ही कुटुंबांची परिस्थिती पाहिजे किंवा दोघानाही गलेलठ्ठ पगाराच्या नोकऱ्या पाहिजेत. मग मुलांच्या हौसेसाठी प्रसंगी कर्ज काढून मध्यमवर्गीय आई-वडील लग्न करुन द्यायला तयार होतात. शहरामधून मग लग्न हे लग्न न राहता एक ‘इव्हेंट’ होतो. शहरामध्ये विवाह लांबणीवर पडण्याचे हेसुद्धा एक कारण आहे. अर्थात याला काही अपवाद आहेत. खेडयातून अजून शहरापेक्षा बरी परिस्थिती आहे. एवढा खर्च लग्नात होतो मग थोडी वर्षे मुलाची जबाबदारी नको कारण मूल झाल्यानंतर नोकरीमध्ये सुट्ट्या घ्याव्या लागतात आणि खाजगी नोकरी जाण्याची भिती असते. एवढे कष्ट करुन चांगली नोकरी मिळवलेली असते आणि लगेच मातृत्वामुळे ती गमवावी लागते असही मुलींना वाटत आहे.
अलीकडच्या दहा वर्षात तर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ही संकल्पना अस्तिवात आली आहे. त्यामुळे लग्न आणि मुले ह्या बंधनांचे जोखड नको असे तरुण पिढीला वाटत आहे. यामुळे पण काही प्रमाणात का होईना ‘लग्नसंस्था आणि लग्न’ ही संकल्पना सुद्धा धोक्यात आल्यावाचून राहणार नाही.
यावरुन मला लग्नसंस्थेचे भवितव्य धोक्यात येण्याची काही कारणे नमूद कराविशी वाटतात.
- तरुणपीढी करीअर केंद्रित व स्वकेंद्रित होणे.
- करीअर केंद्रित झाल्यामुळे आर्थिक स्वातंत्र्य येणे व विवाहाचे वय वाढणे.
- ८०% प्रेमविवाह व २०% ठरवून लग्ने होणे.
- लग्न हे एक बंधन आहे असे वाटणे.
- ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ संकल्पनेचा स्वीकार.
- तरुणपीढीची सहनशीलता व जुळवून घेण्याची भूमिका नसणे. त्यामुळे घटस्फोटाचे वाढलेले प्रमाण.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
