- अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कारासाठी वसा केशवाचा या आत्मचरित्राची निवड.
- एक भाकर तीन चुली, जळताना भुई पातळी,आणि उसवण या साहित्यकृतींचा होणार विशेष सन्मान
नांदेड – समकाळातील लेखकांच्या लेखनाचा उचित सन्मान व्हावा व त्यांच्या लेखणीतून सकस साहित्यनिर्मिती व्हावी या हेतूने आपुलकी चॅरिटेबल ट्रस्ट नांदेडच्यावतीने दिवंगत अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्काराची सुरुवात केली आहे. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून ७३ साहित्यिकांच्या कथा, कादंबरी, आत्मचरित्र व कविता या वाङ्मयप्रकारातील साहित्यकृती आल्या होत्या.
पुरस्कारासाठी प्राप्त झालेल्या कलाकृतीतील आशय, अविष्कार, भाषाशैली, मुल्यात्मकता, निर्मिती मूल्य, मुखपृष्ठ आणि कलाकृतीचा एकात्म परिणाम या मूल्यमापन निकषांच्या आधारे सन्माननीय परीक्षकांनी मूल्यमापन केले. पुरस्कारासाठी एकच साहित्यकृती निवडायची असल्याने हे मूल्यमापन दोन टप्प्यात करण्यात आले.
पहिल्या टप्प्यात आत्मकथन या वाङ्मय प्रकारातील कलाकृतीचे परीक्षण महाराष्ट्रातील प्रख्यात कवी, समीक्षक व पुणेस्थित डॉ. केशव सखाराम देशमुख यांनी, कादंबरी वाङ्मय प्रकारातील कलाकृतीचे परीक्षण संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावतीच्या मराठी विभागातील प्राध्यापक व सुप्रसिद्ध लेखक साहित्याचे चिकित्सक अभ्यासक डॉ. माधव पुटवाड, कथा वाङ्मयप्रकारातील कलाकृतीचे परीक्षण मराठी साहित्यातील आश्वासक समीक्षक व नांदेड येथील के. आर. एम. महिला महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ व्यंकटी पावडे आणि कवितासंग्रहातील कलाकृतीचे परीक्षण हे महाराष्ट्रातील महत्वाचे समीक्षक व कवी डॉ. कमलाकर चव्हाण मराठी विभागप्रमुख श्री योगानंद स्वामी महाविद्यालय , वसमत जि. हिंगोली यांनी केले आहे.
यामध्ये पहिल्या टप्प्यात आत्मकथन विभागातून केशव बा वासेकर यांचे वसा केशवाचा ही कलाकृतीची निवड करण्यात आली आहे, कादंबरी विभागातून देवा झिंजाड यांची एक भाकर तीन चुली ही कलाकृती तर कथा विभागातून लक्ष्मण दिवटे यांचा उसवण हा कथासंग्रहाची निवड केली आहे. कविता या वाङ्मय प्रकारातून तान्हाजी बोऱ्हाडे यांचा जळताना भुई पायतळी हा कवितासंग्रहाची निवड केली आहे. परिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्यात या सर्वप्रथम आलेल्या चारही कलाकृतींचे सर्व परीक्षकांनी पुन्हा परीक्षण करून पुरस्कारासाठी एका कलाकृतीची निवड केली आहे.
परीक्षणाच्या अंतिम टप्प्यात सर्व परीक्षकांच्या परीक्षणातून केशव बा. वसेकर यांच्या वसा केशवाचा या आत्मकथनाची ‘अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार २०२४’ साठी निवड करण्यात आली आहे. तर कादंबरी विभागातून देवा झिंजाड यांची एक भाकर तीन तीन चुली ही कादंबरी, कविता विभागातून तान्हाजी बोऱ्हाडे यांचा जळताना भुई पायतळी हा कावितासंग्रह आणि कथा विभागातून लक्ष्मण दिवटे. यांचा उसवण हा कथासंग्रह प्रथम आल्यामुळे त्यांचा पुरस्कार प्रदान सोहळ्यात विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजक माधव जाधव यांनी दिली.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.