ते आलेच
पसरलेही बघता बघता
स्थिरावलेही
बरेचसे
दृष्टी त्यांची,
विचार त्यांचा,
आकर्षक
रांगोळ्या त्यांच्या
काढणारे
हात त्यांचे
चालणारे,
चालवले जाणारे,
डोके तेवढे नाही
त्यांचे
ही तर
आयुधे, सामुग्री त्यांची
त्यांच्या पालकांची,
पोषिद्यांची
लाख मरोत,
पण पोषिंदा जगो
अशी एक
म्हण आहे
संस्कार आहे लोकांवर
तिचा
जगत जगत लाखो
तसेच दाखवतात प्रत्यक्षात मरून, लोक
त्यांच्यावरील प्रभाव
तिचा
त्याच्याच बाजूने
उभे राहिले पाहिजे
असे आता
तथाकथित पत्रपंडितही
सांगू लागले आहेत
पापी नव्हेत ते
पुण्यवानच कसे आहेत
ते समजावून
सांगू लागले आहेत
देईल जे
भरभरून,
पीक त्याचेच
तेवढे आणले
पाहिजे म्हणतात
सरसरून
आवळा देऊन
कोहळा काढणे म्हणजे
काय,
म्हणींचा असतो
अर्थ
कळतो तरी
काय?
अभ्यासक्रमच सारे
बदलून झाल्यावर,
हे
कळणार तरी
कसे काय?
- श्रीपाद भालचंद्र जोशी
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.