July 21, 2025
डॉ. सुकृत खांडेकर यांच्याकडून डॉ. दीपक टिळक यांना भावपूर्ण श्रद्धांजली – मित्र, मार्गदर्शक आणि पत्रकारिता जीवनातील सहप्रवासी.
Home » डॉ. दीपक टिळक – मित्र आणि मार्गदर्शक : डॉ. सुकृत खांडेकर
मुक्त संवाद

डॉ. दीपक टिळक – मित्र आणि मार्गदर्शक : डॉ. सुकृत खांडेकर

माझ्या पत्रकारीतेच्या जीवनात केसरी आणि जयंतराव टिळक व दीपक यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळे घडलो, हे मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या पाच दशकाच्या वाटचालीत दीपक यांचा माझे मित्र व मार्गदर्शक म्हणून मोठा वाटा आहे.

डॉ. सुकृत खांडेकर

सोळा जुलै, २०२५ रोजी पहाटे पावणे सहा वाजता मुंबईतील मुलुंड येथील माझ्या घरातील जिओचा लँडलाइन नंबर खणखणू लागला. अंथरूणावरून उठून मी फोनकडे भराभरा गेलो. काही तरी वाईट बातमी असणार अशी माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि तेच नेमके झाले. पुण्याहून माझे मित्र विजय उर्फ बंडू बारभाई याचा फोन होता, अरे वाईट बातमी, आपला दीपक गेला… त्याने मला कापऱ्या आवाजात सांगितले.

मी एकदम हबकलोच, काय करावे मलाही काही क्षणभर सुचेना,  दुपारी बारा नंतर पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होईल, असे त्याने मला सांगितले होते. मी भराभरा आवरून घराबाहेर पडलो. मुलुंडवरून नवी मुंबईत जाऊन रबाळे पोलीस चौकी येथे गेलो. तिथे मला आठ वाजता ठाण्याहून पुण्याला जाणारी शिवनेरी बस मिळाली. बस वेळेवर पोचू दे, अशी मनात अनेकदा प्रार्थना केली. चार तासाच्या प्रवासात दीपक टिळकांच्या आठवणींनी माझ्या मनात खूप गर्दी केली होती.

दुपारी बारा वाजता वैकुंठ स्मशानभूमिवर पोचलो आणि दीपक यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना मनाने गलबलून गेलो. दीपक यांच्या प्रकृती विषयी मी अरविंद व्यं गोखले व बारभाई यांच्याकडे सतत चौकशी करीत होतो. पण शेवटच्या दोन महिन्यांत त्यांची माझी भेट झाली नाही, याची खंत मनाला खूप लागली आहे.   

माझ्या पत्रकारीतेच्या जीवनात केसरी आणि जयंतराव टिळक व दीपक यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळे घडलो, हे मी कधीच विसरू शकत नाही. माझ्या पाच दशकाच्या वाटचालीत दीपक यांचा माझे मित्र व मार्गदर्शक म्हणून मोठा वाटा आहे.

दीपक, मी आणि विजय बारभाई आम्ही तिघेही शाळेपासूनचे मित्र. पुण्यातील नवीन मराठी शाळा, नंतर न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, ही आमची शालेय जीवनाची वाटचाल. बृहन्महाराष्ट्र कॉलेजमधेही आम्ही एकत्र होतो. शाळेपासूनच दीपक हा मितभाषी. कमी बोलायचा. पण टिळक या नावाचे त्याच्या भोवती वलय मोठे होते. शाळेत असताना रमणबागेसमोरच आम्ही दुपारच्या सुट्टीत केसरी वाड्यातील विहिरीवर थंड पाणी पिण्यासाठी जात असू.  केसरी वाड्यात रहाणारा व लोकमान्य टिळकांच्या घराण्यातील असलेला दीपक आमचा वर्गमित्र आहे याचा आम्हा शाळेतील मित्रांना नेहमीच  अभिमान वाटत असे.

मी बीएमसीसीला तिसऱ्या वर्षाला असताना मला वृत्तपत्र  वाचनाची गोडी वाढली. माझ्या घरी तेव्हा केसरी येत असे. माझा मित्र रविकिरण साने हा सकाळमधे कॉलेजच्या घडामोडींवर वृत्त देत असे व त्यावर त्याचे नाव प्रसिध्द होत असे. आपणही असे काही करावे असे मी ठरवले. एके दिवशी सायंकाळी मी केसरी वाड्यावर दीपककडे गेलो व मला केसरीत शिकायचे आहे असे सांगितले. तेव्हा त्याचे वडील जयंतराव टिळक घरीच होते. तेव्हा ते केसरीचे संपादक होते व संसदेत खासदारही होते. पुण्यातील एक मोठे मान्यवर म्हणून सारे त्यांना ओळखायचे. दीपक यांनी मला थेट जयंतरावांकडे नेले व व त्यांना म्हणाले, दादा, सुकृतला केसरीत शिकायचे आहे. त्यांनी माझी थोडी विचारपूस केली व लगेचच खालच्या मजल्यावर असलेल्या केसरी कार्यालयात फोन करून माझी शिफारस केली.

दादांनी मला तत्कालीन वृत्तसंपादक चंद्रकांत घोरपडे यांना भेटायला सांगितले. त्यांना मी लगेचच त्यांच्या कार्यालयात जाऊन भेटलो व त्यांनी मला उद्यापासून केसरीत ये असे सांगितले. माझ्या पत्रकारीतेचा श्रीगणेशा गिरवायला. ५३ वर्षापूर्वी दीपक यांच्यामुळे  सुरूवात झाली हे मी कधीच विसरू शकणार नाही. नंतर मी केसरीत वार्ताहर झालो, मुंबईला विशेष प्रतिनिधी, दिल्लीला विशेष प्रतिनिधी नंतर केसरीला कार्यकारी संपादक झालो. दोन दशकाहून अधिक काळ पत्रकारीता मी केसरीत केली, याचे श्रेय जयंतराव टिळक व दीपक यांनाच जाते.

मी मुंबईत लोकमत, नवशक्ति, प्रहार या वृत्तपत्रात संपादक म्हणून काम केले. लोकसत्तासाठी दिल्लीत विशेष प्रतिनिधी म्हणून काम केले. महाराष्ट्र टाइम्ससाठी वरिष्ठ सहाय्यक संपादक म्हणून मुंबईत काम केले. पण या काळातही दीपक यांच्याशी माझा संपर्क होता. मी लोकमतला संपादक असताना दीपक काही कामासाठी मुंबईला आले होते. पुण्याला जाताना  ते मला सानपाडा येथील कार्यालयात मला भेटायला आले. त्यांच्याबरोबर विजय बारभाई होते. लोकमतमधील माझे कॉन्ट्रक्ट संपत आले होते, वयाची साठी झाली होतीच. दीपक मला निघताना म्हणाले, इथल काम संपले की दुसऱ्या दिवशी केसरीत काम सुरू कर…

केसरीत कार्यकारी संपादक म्हणून काम करीत असताना मी आठवड्यातील दोन दिवस पुण्याला येत असे व इतर दिवस मुंबईतील सरदारगृहातून काम करीत असे. एक दिवस पुण्यात केसरी कार्यालयात काम करीत असताना त्यांनी मला दुपारी त्यांच्या केबिनमधे बोलावून घेतले. मला म्हणाले, अरे तुला पीएचडी करायची आहे ना, विदयापीठात अर्ज दाखल करायचा आज शेवटचा दिवस आहे. सायंकाळी पाच वाजण्यापूर्वी ऑन लाइन अर्ज भरून पाठव… दीपक हे संपादक, विश्वस्त, टिळक विद्यापीठाचे कुलगुरू होते. या पदावरील कोणती व्यक्ती, कोणता मालक आपल्या सहकाऱ्याला पीएचडीसाठी अर्ज तातडीने भर, शेवटचा दिवस आहे, याची आठवण करून देईल ? मी महाराष्ट्र टाइम्समधे काम करीत असताना माझे मित्र व संपादक भारतकुमार राऊत यांनी टिळक विद्यापीठातून पीएचडी केली. त्यांनीच मला पीएचडी कर असे सांगितले होते. केसरीत आल्यावर दीपक यांनी मला त्यासाठी उत्तेजन दिले, मार्गदर्शन केले म्हणूनच मला विद्यावाचस्पती मिळवता आली. पीएचडीसाठी नेमका कोणता विषय घ्यावा म्हणून मी स्वत: गोंधळलेलो होतो. मास कम्युनिकेशनमधे संशोधन करायचे हे नक्की होते.

वृत्तपत्रांतील पन्नास वर्षातील वाचकांची पत्रे विशेषत: केसरीतील, असा एक विषय मनात घोळत होता. त्यासाठी केसरीचे ५० वर्षातील अंकही ग्रंथालयात उपलब्ध होते.  पण दीपक यांनी मला दैनिक सामना: राजकीय पक्षाचे मुखपत्र हा विषय संशोधनासाठी दिला. तो विषय मला खूप आवडला. मी मुंबईत असल्याने सामना रोज वाचतोच, पत्रकार म्हणून सामना प्रथम वाचतो तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याशी माझा संपर्क चांगला असल्याने हा विषय मला खूप भावला. दीपक टिळक हे स्वत: माझे गाईड होते. दर दिड-दोन महिन्यांनी मी पुण्याला येऊन माझे संशोधन- विश्लेषण त्यांना सादर करीत असे. कोविड मुळे माझ्या संशोधन कामाला विलंब झाला पण सहा वर्षानंतर प्रबंध पूर्ण झाला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या तत्कालीन ग्रंथपाल डॉ. धनिष्ठा खंदारे आज हयात नाहीत, त्यांचे मला मोठे सहकार्य लाभले. आता माझे मार्गदर्शक डॉ. दिपक टिळकही हयात नाहीत. पण गुरूवर्य म्हणून त्यांनी केलेल्या ऋणातून मला कधीच मुक्त होता येणार नाही.

दीपक हे संपादक व मी कार्यकरी संपादक  म्हणून केसरीवर दाखल झालेल्या न्यायालयीन खटल्यामध्ये आम्हा दोघांनाही सोलापूर व सांगलीच्या न्यायालयात अनेकदा जावे लागले. सोलापूर न्यायालयाने आमची निर्दोष मुक्तता केली. सांगली न्यायालयातील सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. न्यायालयीन खटल्याच्या निमित्ताने आम्ही दोघांनी अनेकदा एकत्र प्रवास केलाय. प्रवासात त्यांच्याबरोबर संवाद साधण्याची व त्यांना समजावून घेण्याची मला खूपदा संधी मिळाली. मनाने साधे, विचाराने पक्के, नेहमी दुसऱ्याचा विचार करणारे, संकटावर मात करून नेहमी जिद्दीने पुढे जाणारे, कोणत्याही अडचणीतून मार्ग शोधणारे, निश्चयी आणि आश्वासक नेतृत्व असलेले दीपक टिळक आपल्यात नाहीत हा विचारच मनाला खूप वेदना देणारा आहे. लोकमान्य टिळकांचा वारसा, जयंतराव व इंदुताईंचे संस्कार ही मोठी पुंजी त्यांच्याकडे होतीच पण टिळक नावाचे मोठे वलय सांभाळण्याची जबाबदारीही त्यांनी  आयुष्यभर यशस्वीपणे पेलली. दीपक हे माझे तर फ्रेंड, फिलॉसॉफर व गाईड होते. त्यांचा मुलगा डॉ.  रोहीत व कन्या  डॉ. गीताली यांना केसरी, टिळक विद्यापीठ व विशाल परिवाराचे शिवधनुष्य यापुढे संभाळायचे आहे. दोन्ही मुले कर्तबगार आहेत. ते यशस्वी होतील असा मला विश्वास आहे. दीपक यांच्या स्मृतिला मनापासून आदरांजली…


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading