१४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. त्यांनी भारतीय संविधानाचा मसुदा लिहिला व संविधानाचे शिल्पकार झाले. त्यांनी वंचित समाजासाठी मोठा लढा दिला. त्यासाठी त्यांनी विविध आयुधे वापरली. डॉ. बाबासाहेबांना घडवण्यामध्ये अनेकांचे योगदान आहे. खास करून केळुस्कर गुरुजी ज्यांनी त्यांना स्वलिखित बुद्ध चरित्र दिले, महाराजा सयाजीराव गायकवाड, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचेही मोलाचे योगदान आहे. बाबासाहेबांनी तुकोबांची गाथा वाचली होती. तुकोबांविषयी त्यांना आदर होता. वेळोवेळी त्यांनी तुकोबांचे अभंग आपल्या कार्याची प्रेरणा म्हणून वापरल्याचे आपणास आढळून येते. त्याचा मागोवा आपण आजच्या लेखात घेणार आहोत….
श्रीकृष्णमहाराज उबाळे
मो.9405344642
१. काळाराम मंदिर सत्याग्रह:
२ मार्च १९३० रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काळाराम मंदिर सत्याग्रह केला. दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा, मानवी हक्क, सामान न्याय, समता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांनी हा लढा दिला होता.
तुकाराम महाराजांचे समतेविषयी काही विचार आपण पाहूया-
” सकाळची येथे आहे अधिकार”
” विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म l भेदाभेद भ्रम अमंगळ ll”
“यारे यारे लहान थोर l याती भलते नारी नर ll’
”भेदाभेद मते भ्रमाचा संवाद l आम्हा नको वाद त्यांशी देऊ ll”
याप्रमाणे मानव म्हणून उचनीचता नष्ट व्हावी सर्वांना सारखी वागणूक मिळावी हा तुकोबांचा विचार आहे. हा विचार नक्कीच बाबासाहेबांनी वाचलेला होता.
२. मूकनायक:
जगात मुक्याची कोणीच दखल घेत नाही. त्यामुळे लाज, भीड सोडून निर्भीडपणे उत्तरे देता आली पाहिजेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजामध्ये जागृती करण्यासाठी ३१ जानेवारी १९२० रोजी ‘मुकनायक’ पाक्षिक सुरु केले. त्याचे ब्रीदवाक्य म्हणून त्यांनी तुकारामांचा अभंग त्याच्या पहिल्या पानावर छापला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे उत्तम वाचक, विश्लेषक आणि समीक्षकही होते. त्यांनी तुकारामांची गाथा वाचली होती. ‘मूकनायक’ हा शब्दच या अभंगातून आलेला आहे. ‘मूकियाचा जाण’ मुक्यांना जाणणारा ‘मूकनायक’….! तो पूर्ण अभंग पाहूया-
‘काय करूं आता धरुनिया भीड । निःशंक हे तोंड वाजविले ॥१॥
नव्हे जगी कोणी मुकियाचा जाण । सार्थक लाजोन नव्हे हित ॥ध्रु.॥
आले ते उत्तर बोलो स्वामीसवे । धीट नीट जावे होऊनियां ॥२॥
तुका म्हणे मना समर्थासी गाठी । घालावी हे मांडी थापटूनी ॥३॥’
आता भीड धरुन मी काय करु ? मी आता तुझी कोणतीही भीड न धरता नि:शंक मनाने तोंड वाजवीत आहे. जगामध्ये शांत बसून आपले म्हणणे कोणीही ऐकणार नाही. जर आपण बोलण्यास लाजलो तर आपले हित कधीही होणार नाही. आता मी जीवावर उदार होऊन जसे जमेल तसे शब्द माझ्या स्वामीशी मी बोलत आहे. तुकाराम महाराज म्हणतात, “हे मना अरे तुला भांडायचे असेल तर मांडी थोपटून थेट जो सामर्थ्यशाली भगवंत आहे त्याच्याशी भांडण कर यामुळे तुझे हीतच होईन.”
३.मराठी साहित्याविषयी मत:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मराठी साहित्याबद्दलचे मत अत्यंत टोकाचे आहे. मराठी साहित्य विश्वाने त्यावर चिंतन, विचार करण्यासारखे आहे. मराठी साहित्यामध्ये काही अपवाद वगळले तर सामाजिक क्रांतीची भाषा त्यांना आढळली नसावी म्हणून ते म्हणतात, “ज्ञानेश्वरी आणि तुकोबांची गाथा सोडून अन्य सर्व मराठी ग्रंथ समुद्रात बुडवले तरी फारसे बिघडणार नाही.” या ठिकाणी आवर्जून लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तुकोबांच्या गाथेविषयी त्यांना असलेला आदर सहज आपल्या लक्षात येतो.
४.तुकोबांची ‘दया’ योग्य:
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते दया म्हणजे कोणालाही माफ करणे नव्हे. अहिंसाची संकल्पना ही दुहेरी स्वरूपाची असायला हवी. ती संकल्पना सांगताना ते तुकोबांचा अभंग वापरतात.
‘दया तिचें नांव भूतांचें पाळण । अणीक निर्दळण कंटकांचें ॥१॥
धर्म नीतीचा हा ऐकावा वेव्हार । निवडिले सार असार तें ॥ध्रु.॥
पाप त्याचें नांव न विचारितां नीत । भलतें चि उन्मत्त करी सदा ॥२॥
तुका म्हणे धर्म रक्षावया साठीं । देवासही आटी जन्म घेणें ॥३॥’
सर्व जीवांचे पालन करणारी आणि दृष्टांचे निर्दालण करणारी जी आहे, तिला दया असे म्हणतात. धर्मनितीचे अवलोकन करून मला योग्य आणि अयोग्य याची खूण पटली आहे, ते निवडले आहे. अनितीने आचरण, उन्मत्तपणा म्हणजेच पाप आहे. सर्व जीवांच्या पालना बरोबर दुष्ट, कंटकांचा नाश करणे हा सुद्धा अहिंसेचा भाग आहे. इतर अहिंसा तत्त्वांपेक्षा बाबासाहेब आंबेडकरांना तुकोबांची अहिंसा परिपूर्ण वाटते.
५.इतर अभंग वचनांचा वेळोवेळा उपयोग:
तुकाराम महाराजांच्या विविध वचनांचा त्यांनी आपल्या भाषणांमध्ये, लिखाणांमध्ये वेळोवेळी उपयोग केलेला आढळून येतो. त्यामधील काही उदाहरणे आपण पाहूया-
” नवसे कन्या पुत्र होती l तरी का करणे लागे पती ll”
लेकर बाळ होण्यासाठी लोक नवस बोलतात. समाजामध्ये पसरलेली ही अंधश्रद्धा यावर प्रहार करण्यासाठी तुकोबांच्या वरील ओळींचा उपयोग त्यांनी केलेला आढळतो.
“ऐसी कळवळ्याची जाती l करी लाभावीन प्रीती ll”
त्यांनी या ओळीचा उपयोग ‘कळवळ्याची जाती आणि लाभाविन प्रीती’ असा म्हणी सारखा करीत असत.
“यातीकुळ येथे असे या प्रमाण l गुणांचे कारण असे अंगी ll”
माणूस कोणत्या जातीमध्ये जन्मला यावरून तो श्रेष्ठ ठरत नाही. त्याच्या अंगी असणाऱ्या गुणांवरून तो श्रेष्ठ ठरतो. हे सांगताना त्यांनी तुकोबांच्या वरील ओळी वापरलेल्या आहेत. तुकाराम महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची अनेक बाबतीमध्ये विचारधारा पूर्णतः भिन्न जरी असली तरी मानवी नैतिक मूल्ये ही वैश्विक स्वरूपाची असतात. ती सर्वांना ग्राह्य असतात. महाराष्ट्रामध्ये पुरोगामी, प्रतिगामी, डावी, उजवी कसलीही चळवळ असली तरी त्यामध्ये तुकोबाराय हे नेहमीच वंदनीय ठरलेले आहेत. खासकरून सामाजिक न्यायाच्या, सामाजिक हक्काच्या, वंचितांच्या चळवळी जेव्हा उभा राहतात, कष्टकऱ्यांचे प्रश्न ज्यावेळेस उभे राहतात त्यावेळी तुकोबाराय सर्वांना आपलेसे वाटतात. ही बाब आवर्जून सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.