आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका. आपल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तरे देऊ.
माणिकराव खुळे,
जेष्ठ सेवानिवृत्त हवामान तज्ञ, भारतीय हवामान खाते पुणे.
९४२३२१७४९५, ९४२२०५९०६२.
प्रश्न – राज्यात वळवाच्या पावसाचा जोर कसा राहील ?
माणिकराव खुळे – मुंबई सह कोकण व संपूर्ण महाराष्ट्रात भाग बदलत दिवसागणिक, शनिवार दि. ३१ मे पर्यन्त मान्सूनपूर्व (मान्सून चा नव्हे) वीजा, वारा वावधनासहितचा केवळ मान्सूपूर्व अवकाळी पावसाची शक्यता ही कायम आहे.
मुंबईत जोरदार पाऊस- बुधवार ( दि. २१ मे ) ते शनिवार ( दि. ३१ मे ) पर्यंतच्या दहा दिवसात मुंबई सह संपूर्ण कोकणातील ७ जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
उर्वरित महाराष्ट्रातील पाऊस – कोकणाबरोबरच मध्य महाराष्ट्रातील १० व मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात आज पासून पुढील आठवडाभर म्हणजे रविवार ( दि. २५ मे) पर्यन्त जोरदार तर विदर्भातील ११ जिल्ह्यात ह्या दरम्यान मध्यम पावसाची शक्यता जाणवते.
विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, खान्देश, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड अश्या सतरा जिल्ह्यात ह्या आठवड्यात वळवाच्या पावसाचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता जाणवते.
प्रश्न – या कालावधीत शेत मशागती संबंधी काय सांगाल ?
माणिकराव खुळे – महाराष्ट्रात ह्या पावसामुळे केवळ पेरणपूर्व शेतीच्या मशागतीचाच विचार व्हावा, असे वाटते. कपाशी व टोमॅटो लागवडी करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी पाण्याची व्यवस्था असेल तरच लागवडीचा विचार करावा, अन्यथा लागवडीवर विपरीत परिणामही होवु शकतो. अर्थात हा निर्णय शेतकऱ्यांनी स्वतःच्याच हिमतीवर घ्यावा, असे वाटते. कारण मान्सून अजूनही टप्प्यात नसुन दूर आहे. कारण त्याच्या सरासरी तारखेचा विचार केल्यास, महाराष्ट्रात येण्यास अजुन २५ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. आणि त्याच्या आगमनानंतर त्याची स्थिती काय असेल, त्याच वेळेस व्यक्त करता येईल
प्रश्न – ह्या आठवड्यातील पावसाचा जोर कश्यामुळे?
माणिकराव खुळे – एकाच वेळी, अरबी समुद्र, बं. उपसागर, व दक्षिण चीनच्या प्रशांत महासागर अश्या तीन समुद्रात १७ ते २० डिग्री उत्तर अक्षवृत्तदरम्यान, तिन्हीही ठिकाणी तयार होणारे कमी दाब क्षेत्रे व त्यातून तयार होणारी चक्रीय वाऱ्यांची स्थिती आणि ह्या तिन्ही ठिकाणी त्यांचे उत्तरेकडे होणाऱ्या मार्गक्रमणामुळे वळवाच्या गडगडाटी पावसाची शक्यता ह्या आठवड्यात निर्माण झाली आहे.
अरबी समुद्रात गुजराथ व महाराष्ट्र किनार पट्टी समोर तर बं. उपसागरात प. बंगाल व ओरिसा किनारपट्टी समोर तर प्रशांत महासागरात चीनच्या गूएन्गडॉन्ग राज्याच्या माकू शहराजवळील किनारपट्टी समोर ह्या चक्रीय वाऱ्यांच्या स्थिती तयार होणार आहे.
अरबी समुद्रातील गुजराथकडे तर बं. उपसागारातील ओरिसा छत्तीसगडकडे चक्रीय वाऱ्यांचे मार्गक्रमण होणार आहे. म्हणून महाराष्ट्र व गुजराथ ओरिसा बंगाल येथे अवकाळी पावसाची शक्यता जाणवत आहे.
प्रश्न – महाराष्ट्रातील तापमाने व आल्हाददायकपणा कसा असेल ?
माणिकराव खुळे – वळवाच्या वातावरणामुळे महाराष्ट्रात दिवसाचे कमाल तापमान, त्याचबरोबर पहाटेचे किमान तापमानही सरासरीच्या खालीच असुन, अश्याच पद्धतीने राहण्याची शक्यता ही कायम आहे.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.