जीवन बदलवून टाकणारी योजना असून या योजनेतून हाती काम करणाऱ्या कलाकारांना आणि कारागिरांना आधुनिक हत्यारे आणि तंत्रज्ञान पुरवण्यात येते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेतील लाभार्थ्यांशी संवाद साधला. विकसित भारत संकल्प यात्रेचे देशभरातील हजारो लाभार्थी, केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार यांच्यासह स्थानिक पातळीवरील प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील निवासी लक्ष्मी प्रजापती यांचे कुटुंब टेराकोटा उत्पादनांचा व्यापार करते. प्रजापती यांनी पंतप्रधानांना 12 सदस्य आणि अंदाजे 75 सहयोगी असलेल्या आणि 1 कोटी रुपयांच्या आसपास सामूहिक वार्षिक उत्पन्न असलेल्या लक्ष्मी बचत गटाच्या स्थापनेबद्दल माहिती दिली. एक जिल्हा एक उत्पादन उपक्रमाचे लाभ घेण्याबद्दल पंतप्रधानांनी केलेल्या चौकशीला उत्तर देताना, प्रजापती यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. प्रत्येक कारागिराला टूलकिट, वीज पुरवठा आणि माती तयार करण्यासाठीची यंत्रे मोफत मिळाली आहेत अशी माहिती त्यांनी दिली. या कारागिरांना, राष्ट्रीय पातळीवर आयोजित होणाऱ्या विविध प्रदर्शनांमध्ये भाग घेण्याची संधी देखील दिली जाते असे त्यांनी सांगितले.
विविध योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात पूर्वीच्या सरकारांशी तुलना करत प्रजापती यांनी, शौचालयांची सुविधा, पंतप्रधान किसान सन्मान निधी, ओडीओपी या योजनांचा उल्लेख केला आणि वर्तमानपत्रांतील जाहिराती तसेच सरकारी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन या योजनांच्या बाबतीत निर्माण केलेल्या जागरुकतेवर देखील त्यांनी अधिक भर दिला.
केवळ मोदी की गॅरंटी की गाडीच नव्हे तर या प्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन या दोन्ही गोष्टी गावात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेकडे प्रचंड प्रमाणात गर्दी खेचून आणण्यात उपयुक्त ठरतात अशी माहिती प्रजापती यांनी दिली.
ते म्हणाले की त्यांची टेराकोटा उत्पादने बेंगळूरू, हैदराबाद, लखनौ, दिल्ली यांसारख्या महानगरांमध्ये तसेच महाराष्ट्र, गुजरात आणि तामिळनाडूसारख्या राज्यांमध्ये देखील विकली जातात.
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमागील संकल्पना विषद करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की ही जीवन बदलवून टाकणारी योजना असून या योजनेतून हाती काम करणाऱ्या कलाकारांना आणि कारागिरांना आधुनिक हत्यारे आणि तंत्रज्ञान पुरवण्यात येते. पंतप्रधानांनी प्रजापती यांना पंतप्रधान विश्वकर्मा योजनेविषयी त्यांच्या भागातील कारागीरांमध्ये जागरुकता निर्माण करण्याची विनंती केली. पंतप्रधानांनी यावेळी बोलताना ‘व्होकल फॉर लोकल’ आणि ‘एक जिल्हा एक उत्पादन’ या उपक्रमांवर सरकारने दिलेला भर अधोरेखित केला आणि या योजना यशस्वी करण्यासाठी जनतेने घेतलेला सहभाग आणि गुंतवणूक याबद्दल समाधान व्यक्त केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.