November 21, 2024
Vittal Bhakta P Savalaram article by Mahadev Pandit
Home » विठ्ठल भक्त सावळाराम…
विश्वाचे आर्त

विठ्ठल भक्त सावळाराम…

विठूरायाच्या दर्शनाला जाणारी सर्व वारकरी मंडळी सरळ, साधी, भोळी भाबडी आणि सांसारिक असतात त्याचप्रमाणे ते सर्व वारकरी अगदी विठूरायाच्या स्वभावात मिळते जुळते असतात. जनकवी पी. सावळाराम सुध्दा एक साधे सरळ, भोळे प्रतिभावंत वारकरी सांप्रदायात अगदी तंतोतंत बसणारे ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व, अगदी विठूराया सारखेच.

महादेव ई. पंडीत

स्थापत्य अभियंता

4 जुलै 1914 रोजी, सांगली जिल्ह्यातील येडे निपाणी या खेडेगावी जन्मलेला निवृत्ती रावजी पाटील हा मुलगा पुढे त्याच्या सरळ, साध्या व सुरेल शब्द रचणेतील भावस्पर्शी अक्षय भक्ती व भावगितांमुळे पी सावळाराम झाला. नंतर त्यांच्या अक्षय भक्ती व भावगितांनी अख्ख्या मराठी रसिकजनांच्या अंतःकरणालाच भुरळ पाडली आणि मग पी सावळाराम मराठी रसिक जनांचे दादा झाले.

तिथीप्रमाणे दादांचा वाढदिवस आषाढी एकादशीचा आणि आषाढी एकादशी पंढरीच्या विठूरायाचा वाढदिवस – जनु दुग्ध शर्करा योगच. पंढरीचा विठूराया अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत अगदी तसेच पी सावळाराम उर्फ दादा हे सुद्धा अख्ख्या मराठी रसिकजनांचे आराध्य दैवतच आहे असे म्हणनेच येथे सार्थ ठरते. पृथ्वीतलावर जशी पंढरीच्या राजाची आषाढीवारी वारकऱ्यांसाठी अजरामर आहे अगदी त्याच धर्तीवर दादांची अक्षय भावस्पर्शी भावगीते व मराठी रसिक जनांचे दादा अजरामर राहतील यामध्ये तीळ मात्र देखील शंखा नाही.

विठूरायाच्या दर्शनाला जाणारी सर्व वारकरी मंडळी सरळ, साधी, भोळी भाबडी आणि सांसारिक असतात त्याचप्रमाणे ते सर्व वारकरी अगदी विठूरायाच्या स्वभावात मिळते जुळते असतात. जनकवी पी. सावळाराम सुध्दा एक साधे सरळ, भोळे प्रतिभावंत वारकरी सांप्रदायात अगदी तंतोतंत बसणारे ऋषीतुल्य व्यक्तीमत्त्व, अगदी विठूराया सारखेच.

पंढरीचा विठूराया हे कोणाही एका जाती धर्माचे दैवत नाही. प्रत्येक माणसांचे पंढरीची वारी एकदा तरी करण्याचे एक सुंदर स्वप्न असते. निसर्गाच्या नियमित ऋतुचक्रामध्ये रोहीणी मृग व आद्रा‌‌ ही पावसाची प्रारंभिक तीन नक्षत्रे आहेत. ह्या तिन्ही नक्षत्रामध्ये शेतीची लावणी व पेरणी उरकून आषाढी एकादशीच्या दरम्यान सर्व सामान्य शेतकरी वर्ग थोडासा उसंतीच्या मुडमध्ये असतो आणि अश्या मोकळ्या उसंतीच्या वेळामध्ये त्याला विठूरायांचीच आठवण येते. मग त्वरीत स्वारी आषाढीच्या वारीला जाण्यास सज्ज होते. बघा आपल्या सर्वांचा अन्नदाता सुद्धा आपल्या रोजच्या कामाच्या रामरगाड्यापासून थोडीशी उसंत घेऊन आषाढी एकादशीला पांडूरंगाच्या भेटीला जातो. सर्वच वारकरी पांडूरंगाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेले असतात. ते सर्व तहान भुख सुध्दा विसरलेले असतात. अश्या प्रकारच्या वृत्तीला वेड असे म्हणतात. अगदी असेच पांडूरंगाच्या भेटीचे वेड पी सावळारामांना सुध्दा लागले होते.

खरेतर दादांचा जन्मच मुळी वारकरी कुटूंबातील त्याचप्रमाणे आषाढी एकादशीचाच होता. वडील व काका दरवर्षी न चुकता पंढरीची वारी करत असत, तर आई सुध्दा सहज अभंग भजनाच्या रचना करत असे. मग अशा वारकरी सांप्रदायात लहानाचे मोठे झालेल्या दादांना पांडूरंगाच्या भेटीचे वेड लागणारच आणि यात नवल ते काय ? मुळच्या निवृत्तीला पी सावळाराम हे टोपण नांव देणाऱ्या गुरुवर्यांच्या नावांत सुध्दा विठ्ठल हे नांव आहे. त्याच्या गुरुवर्यांचे नाव गुरुवर्य वि. स. पागे आणि वि म्हणजे विठ्ठल. सर्वसाधारणपणे विठूराया प्रत्येकाला आपल्या भेटीला बोलवितो, पण ती वेळ येण्याची वाट पहावी लागते असे समाजात सर्रास बोलले जाते. अगदी याच चाली बोलीप्रमाणे सन 1941 साली पंढरपूरच्या जिल्ह्यामध्ये म्हणजेच सोलापूरमध्ये मराठी साहित्य संमेलन भरलं आणि त्या संमेलनाला तरुण कवी पी. सावळारामांनी हजेरी लावली.

विठूरायाचे पंढरपूर सोलापूरजवळच असल्यामुळे परतीच्या प्रवासात पांडूरंगाचे दर्शन घेऊनच जायचे असा बेत कवीच्या मनात रुजला. अशा मनात रुजलेल्या बेतांमुळेच उंचा पूरा, गोरा गोमटा, राजबिंडा तरुण कवी विठूरायाच्या दर्शनासाठी व भेटीसाठी गाभाऱ्यात जाऊन विठूरायाच्या चरणी आपले मस्तक व हात ठेवतो न ठेवतो तेवढ्याच त्यांच्या मस्तकावरील हॅट एका बडव्याने भिरकावली तर दुसऱ्या बडव्याने त्यांना जोरात धक्का देऊन पुढे जाण्यास प्रवृत्त केले. खरे तर कोल्हापुरी ठसका मनात आणि अंगात रुजलेल्या मराठी माणसाला त्यातल्या त्यात तरुणाला असे मंदीरातील अरेरावीचे वर्तन कधीच सहन होत नाही, पण पी. सावळाराम वारकरी सांप्रदायामध्ये रुजलेले असल्यामुळे मिळालेल्या क्षणात पांडूरंगाचे डोळे भरून दर्शन घेतले आणि अगदी शांतपणे गाभाऱ्याबाहेर पडले. खरे, पण त्याचक्षणी त्यांच्या मस्तकात चक्क विचारांच्या ठिणग्या पडल्या होत्या. त्या ठिणग्या त्या तरुण गोऱ्या गोमट्या होतकरू प्रतिभासंपन्न कवीच्या मनात खदखदत आणि बोचत होत्या.

कोल्हापुरात वाढलेल्या तरुणाची ही अवस्था असेल तर मग वयोवृध्द सर्वसामान्य भोळ्या भाबड्या वारकऱ्यांच्या आषाढीवारीमध्ये काय अवस्था असेल ? ही व्यथा त्यांच्या मस्तकात सतत विजेसारखी चकमकत होती. पंढरपुरातील बडवे, व्यापारी, खानवळवाले तसेच मठवाले सरळ भोळ्या भाबड्या वारकऱ्यांना तर उसाच्या चिपाडाप्रमाणे पिळूनच काढत असतील. ह्याची पुर्ण कल्पना सावळारामांना विठूरायाच्या भेटीच्या वेळी लक्षात आली. विठूरायाभोवती नागोबाप्रमाणे बडव्यांच्या विळखा पडलेला आहे याची पुर्ण कल्पना त्यावेळी सावळारामाना आली.

विठूरायाच्या भेटीचा सर्व व्याप व व्यथा सहन करून सावळाराम थांबले नाहीत. त्यांच्या डोक्यात सतत एक महाभयंकर विचार चक्र सुरू झाले होते. बडव्यांच्या विळख्यातून पांडूरंगाला सोडवायचे कसे ? त्यासाठी कोणाची मदत घ्यायची ? वारकऱ्यांचे प्रबोधन कसे करावयाचे ? असे असंख्य नानाविध प्रश्न तसेच व्यथा त्यांच्या समोर ठाण मांडून बसलेल्या होत्या. ह्या सर्व व्यथा पांडूरंगापर्यंत कोण पोहचवू शकेल ? ह्याचे उत्तर मिळण्यास सावळारामांना जवळ एक तप लागले. छत्रपती शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्वीजयांच्या मोहीमेतून शंभूराजांना माघारी खेचण्यासाठी जसे येसूबाईस मदतीस घेतले. अगदी त्याच धर्तीवर सावळारामांनी आपल्या सर्व व्यथा पांडूरगापर्यंत पोहचविण्यास रखुमाईची वाणी वापरली. या सर्व व्यथा एका अजरामर भक्तीगितांमार्फत पंढरीच्या विठूरायापर्यंत पोहचविल्या.

दादांचा विठ्ठल भेटीचा प्रसंग किती महाभयंकर होता पण सावळारामानी एका तपानंतर एका साध्या सोप्या भक्ती गितामधून तो मांडला आहे. यावरूनच सावळारामांच्या प्रतिभेची उंची आभाळा इतकी उंच तर शब्द रचना किती उच्च कोटीची होती याची आपणास प्रचिती येईल. त्या भक्ती गीताची रचना किती साधी, सोपी आणि सरळ आहे. सावळारामांनी विठूरायावर यापूर्वी सुध्दा अनेक भक्ती गीते लिहीली आहेत.

पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला
विनविते रखुमाई विठ्ठला

ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरि तुक्याचा
याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्तजनांचा
भक्त थोर ते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा
विक्रय चाले देवपनाचा, रहायचे मग इथे कशाला

धरणे धरुणी भेटीसाठी, पायारीचा हरिजन मेळा
भाविक भोंदू पूजक म्हणती, केवळ आमचा देव उरला
कलंक आपल्या महानतेला, बघवेना हो रखुमाईला
यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला.

या गीतानं खरोखरच अवघ्या मराठमोळ्या महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. खरेतर या भक्ती रचनेतून सावळारामांनी समाजातील अनिष्ठ व महाभयंकर प्रथावर आपल्या साध्या, सोप्या व गोड पण कडक व परखड भाषेत कोरडे ओढवलेले आपल्या निदर्शनास येईल.

सन 1940 – 45 म्हणजे खरेतर पारतंत्र्यात सर्वसामान्य भोळ्या भाबड्या वारकऱ्यांची पिळवणून तसेच पंढरी मधील देवपणाचा बाजार सावळारामांनी प्रत्यक्ष अनुभवला होता. पण आणखी शे – पाचशे हे वर्षांनी पंढरपूरची काय स्थिती असेल ? याची नुसती कल्पनाच केलेली बरी ! आषाढी वारीच्या वेळी पंढरीमध्ये स्वच्छता, आरोग्य, वाहतुक, पाणी पुरवठा, शाळा महाविद्यालयांचा तसेच सुरक्षेचा भयंकर तसेच भिषण प्रश्न निर्माण झालेला आहे. त्यात आणखी भर घालण्याचा प्रयत्न आपले मुख्यमंत्री महोदय प्रथम वारकऱ्यासोबत महापूजा करण्यासाठी हवाई वाहतुकीद्वारे पंढरीत दाखल होतात आणि महाराष्ट्राच्या सुख समृद्धीसाठी विठूरायाला साकडे घालतात, पण ह्या गाऱ्हाण्यासाठी केवढा मोठा भार राज्याच्या तिजोरीवर टाकतात हे आपणास कळेल का ? या सर्व प्रश्नांचा दृष्ठांत सावळारामांना सन 1941 सालीच झाला होता म्हणूनच त्यांच्या अंतःकरणातील आभाळाएवढ्या उंच प्रतिभेने रखुमाईच्या गोड व प्रेमळ वाणीने साक्षात विठूरायलाच पंढरी सोडण्याचे साकडे घातलेले आहे. भोळ्या भाबड्या रखुमाईची प्रेमळ व गोड विणवणी ऐकून पांडूरंगाने केव्हाचेच पंढरपूर सोडले आहे आणि विठूरायाने प्रत्येक वारकऱ्याच्या तसेच भक्तांच्या अंतःकरणात आपले मंदीर बांधलेले आहे. तरी सुध्दा आपले मंत्री महोदय भला मोठा सरकारी ताफा घेऊन आषाढीवारीला पंढरीत दाखल होतात आणि भोळ्या भाबड्या वारकऱ्यांच्या आधी पांडूरंगाची भेट घेतात. आपल्या मुख्यमंत्री महोदयांनी आषाढी एकादशीला आपल्या मंत्रालयातील कार्यालयातूनच विठूरायाची महापूजा केली तरी ती पूजा पंढरीच्या विठूरायाला नक्कीच मान्य होईल व माऊली महाराष्ट्राला सुख समृध्दीचा आशिर्वाद देईल.

सावळारामाच्या घरी वारकरी संप्रदायाचे तसेच विठ्ठल भक्तीच वातावरण होते, तरीसुध्दा पंढरीनाथा झडकरी आता ह्या गीताच्या अगोदर साधारणपणे एक वर्षे म्हणजेच सन 1951 च्या सुमारास सावळारामांनी आपल्या आणखी एका अक्षय भक्तीगीतांमधून समाजाचे प्रबोधन केलेले आहे त्या गीताचे बोल आहेत

विठ्ठल रखुमाई परी
आईबाप हे दैवत माझे असता माझ्या घरी कशाला जाऊ मी पंढरपूरी?!!धृ!!

साक्षात पंढरीचा विठूराया व रखुमाई आपल्या आई – वडीलांच्या रूपामध्ये प्रत्येकांच्या घरातच आपल्या भेटीसाठी सदैव उपलब्ध असताना सुध्दा प्रत्येक मनुष्य प्राणी आषाढी वारीचे स्वप्न उरांशी बाळगुन पंढरीच्या वारीचे तसेच अनेक धार्मिक स्थळांना आटापिटा करुण भेट देण्याचे स्वप्न पहात जीवन व्यतित करतो.बघा केवढी मोठी विसंगती आहे समाजामध्ये व मानसिकतेमध्ये ! कशाला जाऊ मी पंढरपूरी हे गीत प्रत्येकाने रोज एकदा तरी गाईले तरी विठ्ठल रखुमाईची गोड भक्ती भेट आपल्या घरीच स्वतःच्या आई – वडिलांकडून मिळेल. पण आज बरोबर याउलट परिस्थिती आपल्या निदर्शनास येईल. समाजात आज बऱ्याच भक्तांना स्वतःच्या जन्मदांत्याचा विसर पडलेला आहे तर काहींनी आपल्या विठ्ठल रखुमाईला वृद्धाश्रमात धाडलेले आहे.

पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला अशा प्रकारची गळ साक्षात विठूरायाला घालणारे पी. सावळाराम खरोखरच विठूरायाचे निस्सीम भक्त असणार यात तीळ मात्र देखील शंखा नाही. याचे कारण विचाराल तर ते एकदम सोपे आहे. फक्त निस्सीम भक्तच साक्षात पांडूरंगाला आपले स्थान सोडण्याची गळ घालू शकतात. त्याचप्रमाणे कशाला जाऊ मी पंढरपूरी ? अशा प्रकारची भक्ती रचना करु शकतात, आणि म्हणूनच पी. सावळाराम हे स्वतः विठूरायाच्या भक्तीभावामध्ये मंत्रमुग्ध झालेला खराखुरा निस्सीम वारकरीच त्याचप्रमाणे भक्त असणार हे मात्र येथे काळ्या दगडावरच्या रेषेप्रमाणे माऊलीच्या साक्षीनेच सिध्द होते.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

3 comments

सिंधू शिवाजी पाटील, सातारा June 16, 2021 at 12:41 PM

खूपच छान लेख.पुढील महिन्यात आषाढी एकादशी आहे.त्याच धर्तीवर पी सावळाराम दादा, विठ्ठलाचे निस्सीम भक्त यांच्याविषयी वाचायला मिळाले.खूप छान वाटले.तसेच पंढरीनाथा झडकरी आता हे गित मनाला खूप भावले.

Reply
P.B.JOSHILKAR- QA/QC Manager ( HEISCO - Kuwait) June 14, 2021 at 12:12 AM

Nice Article as usual.
Mostly focusing on our seasonable festivals & current situation. Pandharichi ‘Ashadi Vari’ is the one of the favorite devotion place for peoples ( Varkari mandali’ on every year. Your deep readings & best collectively knowledge & information provide us well feelings.
Jankavi ‘P. Sawlaram’ expressed his self experience in front of ‘Vitthuraya’.
Good Wishes for New Article.

Reply
Adv. Sarita Patil June 11, 2021 at 5:23 PM

पुढील महीन्यात येणारया आषाढ वारीच्या पार्श्वभूमीवर लिहीलेला लेख अगदी सार्थ वाटतो. यावर्षी कोरोनामध्ये सुद्धा पायी वारी घेण्यास परवानगी द्यायची अशी चर्चा चालली आहे. पण आषाढामधील मुसळधार पावसात पायी वारीला परवानगी देणे म्हणजे आपणहून कोरोनाला आमंत्रण देण्यासारखेच आहे. म्हणून वारीला सरकारने परवानगी देऊ नये. लेखकने सावळारामांच्या निस्सीम विठ्ठल भक्तीचे सार्थ वर्णन केले आहे. पुढील लेखनास मनःपूर्वक शुभेच्छा👍👍👌👌

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading