November 12, 2024
Story of P Savalaram Ganga Jamuna Song
Home » “गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ?… हे गीत पी सावळाराम यांना कसे सुचले..
मुक्त संवाद

“गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ?… हे गीत पी सावळाराम यांना कसे सुचले..

दादांची अनेक गाणी सुरेल व मन प्रसन्न करणारी आहेत, पण ह्या गाण्याने दादांना प्रत्येक माणसाच्या घरात तसेच मनात अक्षय स्थान मिळाले. हे गाणे ऐकले गाईले तरी प्रत्येक माणसाच्या अंतःकरणाला पाझर फुटतो आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने त्याचक्षणी पी. सावळाराम जनकवी बनले.

महादेव ईश्वर पंडीत

9820029646

प्रसंग एकदम साधा, सन 1948 मधील मे महिना. पुण्यावरून एक माहेरवासीन सासरकडे रेल्वेमधून निघाली होती. त्याचवेळी पी सावळाराम (माझे दादा) पण पुण्यावरून मुंबईकडे निघाले होते. मुलीची आई मुलीला सासरमध्ये सुखी रहा आणि आता तू जास्त रडू नकोस असा निरोप देत तिला समजावत होती. जन्माला आलेल्या प्रत्येक कन्यारत्नाच्या जीवनात हा प्रसंग येत असतो. दादांनी तो प्रसंग अगदी जवळून पाहीला आणि चांगलाच आत्मसात केला, आणि त्या प्रवासातच तो प्रसंग अत्यंत साध्या, सुरेल आणि अंतःकरणाला भिडतील अशा संगीतमय शब्दांनी साकारत एक अविस्मरणीय आणि अक्षय गाणे तयार केले. प्रसंग एकदम साधा, शब्द साधे सुरेल आणि एकदम साधे जीवन असणारा एक कवी असा एकूणच त्रिवेणी संगम तयार झाला, आणि त्या संगमातून एक नशीबवान व अक्षय गाणे जन्माला आले ते असे

“गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ?
जा मुली जा दिल्या घरी तु सुखी रहा”

पुढे त्या गाण्याला संगीत देण्यासाठी दादांनी वसंत प्रभूंची निवड केली. वसंत प्रभूं – नावातच वसंत आणि प्रभू असल्यामुळे त्याच्या संगीताची जनमानसाला भुरळ नाही पडली तर नवलच आणि जिच्या स्वरांनी मराठी रसिकजन अगदी मंत्रमुग्ध होत असत अश्या त्या गाणकोकीळा लता मंगेशकर यांच्याकडून दादांनी ते गाणे स्वरबध्द करूण घेतले. प्रतिभावंत पी. सावळाराम, आपल्या संगीताने मराठी रसिकावर राज्य करणारे संगीतकार वसंत प्रभू आणि मंत्रमुग्ध सुरेल आणि मधूर आवाजाची दैवी देणगी लाभलेली गाणकोकीळा लता दिदी – अशा महान, प्रतिभाशाली सच्छिल त्रिमुर्तीचा संगम गंगा जमुना डोळ्यात उभ्या का ? ह्या गाण्याला लाभला आणि ह्या त्रिमुर्तीमुळेच ते गाणे अमृतापेक्षाही मधूर व गोड बनले आणि त्याचक्षणी पी. सावळाराम, वसंत प्रभू आणि लता मंगेशकर ही त्रिमुर्ती पृथ्वीतलावरील प्रत्येक मराठी माणसांच्या अंतःकरणात जाऊन बसली आणि त्यांना अढळ तसेच अक्षयस्थान प्राप्त झाले.

दादांची अनेक गाणी सुरेल व मन प्रसन्न करणारी आहेत, पण ह्या गाण्याने दादांना प्रत्येक माणसाच्या घरात तसेच मनात अक्षय स्थान मिळाले. हे गाणे ऐकले गाईले तरी प्रत्येक माणसाच्या अंतःकरणाला पाझर फुटतो आणि त्याचमुळे खऱ्या अर्थाने त्याचक्षणी पी. सावळाराम जनकवी बनले.

दाखलारुपी आशिर्वाद

मी व दादांचे चिरंजीव संजय मुंबईमधील एका खाजगी कंपनीमध्ये एकत्र नोकरीला असल्यामुळे आमची चांगली दोस्ती झाली होती आणि त्यामुळेच माझी व दादांची चांगली ओळख झाली होती. पुढे मार्च 1993 मध्ये मुंबई महानगरपालिकेमध्ये सब इंजिनियर ह्या पदांच्या भरतीसाठी जाहीरात वृत्तपत्रात आली होती आणि जाहीरातील अटी व शर्तीमध्ये उमेदवाराने स्वतःचा चारित्र्य दाखला जोडावा असे नमुद केले होते. मी सरकारी नोकरी करावी अशी माझ्या वडीलांची तीव्र इच्छा होती आणि त्यामुळेच मी मुलाखतीसाठी विशेष प्रयत्न करत होतो. मी मुंबईमध्ये अगदी नवीनच असल्यामुळे मला हा चारित्र्य दाखला कोण देईल बरे ? असा विचार करत होतो आणि त्याचक्षणी मला माझ्या प्रतिभावंत लाडक्या दादांची आठवण झाली आणि असा दाखला मला दादा नक्की देतील अशी मनात खात्री पटली. त्वरीत संजय यांच्याशी संपर्क साधला आणि 7 मार्च 1993 रोजी मी दादांच्या घरी पोहोचलो. संजय यांनी मला चारित्र्य दाखला हवा आहे हे आपल्या परमपुज्य आणि ऋषीतुल्य दादांना सांगितल्याबरोबर लगेचच दादांनी आपले लेटरपॅड व लेखनी घेतली आणि लिखाणास सुरुवात केली.

हा मुलगा गेली चार वर्षे माझ्या परिचयाचा असून तो अत्यंत कष्टाळू, प्रामाणिक आणि कुलिन घराण्यातील आहे, असे त्यामध्ये लिहीले यावरूनच बघा की मी दादांच्या किती जवळ पोहोचलो होतो आणि ते फक्त कोल्हापूर ह्या गावामुळेच, कारण दादांची जडणघडणच अंबाबाईच्या परीसरात म्हणजेच करवीरनगरी कोल्हापूरात झालेली होती, परमेश्वराने माझ्या दादांना समोरच्या व्यक्तीचे अंतर्मन जाणण्यासाठी आणि बरोबर नेहाळण्यासाठी मार्गदर्शक डोळे दिले होते.

दादांनी माझ्या पहिल्या भेटीमध्येच त्यांच्या स्नेहल तसेच शीतल नजरेने चांगलेच न्याहाळले होते आणि अगदी त्यामुळेच माझ्या चारित्र्य दाखल्यात काय मजकूर लिहायचा ते क्षणार्धात कागदावर उतरविले आणि ते दादाना अगदी सहजशक्य होते कारण दादा प्रसंग बघून अजरामर भावगीते लिहीत असत मग माझ्यासारख्या चाकरमाण्या माणसाला चारित्र्य दाखला देणे दादांसारख्या प्रतिभावंताला अगदी साधे व सरळ काम कारण चारित्र्य दाखल्याला चाल व संगीताची गरज नाही. पण बघा दादांनी अगदी मोजून चारच ओळींमध्ये माझी सर्व कारकीर्द म्हणा किंवा कुडंली म्हणा सादर करून चारित्र्य दाखला माझ्या हातात सुपुर्द केला.

दाखल्यातील शेवटची ओळ अशी आहे कोणतेही काम याजकडे सोपवल्यास हा मुलगा ते काम यशस्वीरीतीने पार पाडील अशी खात्री आहे आणि ही ओळच सर्वच काही सांगून जाते. अगदी आजसुध्दा ह्या ओळीसारखेच माझे कामकाज चालले आहे. गेली 28 वर्षे हा दाखला मला आभाळाएवढा आधार पर्वताएवढी शक्ती देत आहे. मी एक मध्यम वर्गीय सामान्य माणूस तसेच विशेष श्रेणीमधील स्थापत्य अभियंता आहे आणि आजसुध्दा सामान्य माणसाला फक्त एका प्रतिभावंत असामान्य व्यक्तीची प्रेमळ शाबासकी हवी असते बाकी काही नको पण आज ती शाबासकी खुप महाग आणि दुर्मिळ झालेली आहे.

दादांनी दिलेला तो दाखला मी आजपण माझ्या सर्व मार्कलिस्ट व सर्टीफिकेटच्या फोल्डरमध्ये जतन करून ठेवलेला आहे. दादांचा तो दाखला म्हणजे माझा प्राणवायू आहे. एवढेच मी येथे म्हणू शकतो. दादाच्या कल्पवृक्ष कन्येसाठी ह्या अजरामर गीतामधील लतादिदिने आपल्या बाबांना गाण्याच्या शेवटी – या हो बाबा एकच वेळा अशी साद घातली आहे अगदी त्याचप्रमाणे दाखल्यामार्फत प्राणवायु देणाऱ्या प्रतिभावंत, ऋषीतुल्य, सच्छिल जनकवी पी. सावळाराम उर्फ दादाना “याल का हो दादा आम्हा सर्वाच वैभव पाहायला ? “ अशी साद आजसुध्दा कंठातुन गुजगुज करत आहे.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

3 comments

P.B.JOSHILKAR- QA/QC Manager ( HEISCO - Kuwait) June 14, 2021 at 12:40 AM

Dear MI,
Your are the best composer same like ‘P. Sawlaram’ (DADA) .
I think Dada given you Character Certificate that exactly I have experienced.
You are Brilliant, Hard worker, Honesty, Quality & Ability to do anything.
I wanted to thank you for your help in my Engineering life .
Best Wishes for New different Subjects …!!

Reply
श्रीमती उज्वला देशपांडे , ठाणे June 8, 2021 at 10:29 AM

सु-प्रभात. दादांचे हे पत्र लाख मोलाचे आहे.तुझ्या आयुष्याची दिशा या पत्राने बदलुन गेली. असाच यशस्वी यापुढील आयुष्यातही होशील . शुभाशीर्वाद.

Reply
सिंधू शिवाजी पाटील, सातारा June 7, 2021 at 12:55 PM

खूप सुंदर लेख.दादा एक प्रतिभावंत कवी होते.तसेच त्यांच्याकडे समोरच्या माणसाचे गुण ओळखण्याची स्नेहल नजर होती.त्यांच्या स्नेहल नजरेने तुझ्यातील प्रामाणिकपणा,हुशार व कष्टाळू व्यक्तीमत्व हे गुण जाणले हे त्यांनी तुला दिलेल्या चारित्र्य दाखल्यातून दिसून येते.

Reply

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading