October 4, 2023
Namrupacha Vistar Swami Swaroopanand Abhang Dnyneshwari article by Rajendra Ghorpade
Home » नामरुपाचा विस्तार…
विश्वाचे आर्त

नामरुपाचा विस्तार…

आपल्या शरीरातही सोऽहमचा नाद सुरू असतो. मन आपले फक्त दुसरीकडे धावत असते. आपण या नादाकडे लक्ष दिले तर तो नाद निश्‍चितच आपणाला ऐकू येतो. या नादात रमले तर त्याचा निश्‍चितच विस्तार होतो. स्वरुपाचे दर्शन घडते. फक्त हा स्वर आपण मनाने उच्चारायला हवा.

राजेंद्र घोरपडे

करी पार्था, नाम – ।
रुपाचा विस्तार । सर्वथा साचार । प्रकृतिच ।। 51 ।।

स्वामी स्वरुपानंद अभंग ज्ञानेश्‍वरी अध्याय 7 वा

नामात काय आहे ? आपण साधना करतो पण फक्त तोंडाने नाम उच्चारतो पण मनाने ते उच्चारत नाही. मन मात्र भटकत राहाते. नामावर त्याचे लक्ष केंद्रित नसते. नाम हे मनाने उच्चारायला हवे. तरच साधना होते. अन्यथा ती केवळ बडबड होते. स्वरूपाचे दर्शन घडायचे असेल तर नामाचा जप मनाने करायला हवा. मनात स्वरुप पहायला हवे. साधना करताना अनेक अडचणी येतात. कधी वेळच मिळत नाही. तर कधी सर्दी पडसे झालेले असते. अशा अनेक कारणांनी साधनेत व्यत्यय येत राहातो. पण साधना सोडायची नाही. या अडचणी ह्या क्षणिक असतात.

आज सर्दी झाली आहे. उद्या वेळ नाही. परवा डोक दुखत आहे. अशी अनेक कारणे असतात. पण विचार केला तर ती सर्व क्षणिक असतात. मोठा आजार किंवा मोठा आघात झाल्यानंतर मात्र देव लगेच आठवतो. भीती पोटी देवाकडे आपण वळतो. तेव्हा देवाचे स्मरण होते. स्वाभाविक आहे. गरजेच्या वेळी तरी त्याचा आधार आहे असे वाटते. मनाला आधार मिळतो. पण गरज संपली की पुन्हा त्याचे विस्मरण होते.

हे ही खरे आहे की साधना मारून मुरगुटून होत नाही. साधनेसाठी मनाची तयारी असावी लागते. जबरदस्तीने साधना करता येत नाही. पण मनाला साधनेला बसण्याची सवय लावावी लागते. ही सवय आपणास जरूर लागते. चांगल्या सवयी लागण्यास थोडा वेळ लागतो. धकाधकीच्या जीवनामुळे आता असल्या सवयी लागत नाहीत. फावला वेळच नसतो. असला तरी टि. व्ही. किंवा मोबाईलवर चॅटींग करण्यातच सारा वेळ जातो. वाचण्यासाठीही सध्या लोकांना वेळ नाही. मग देवाचे स्मरण करायला, साधना करायला वेळ कोठून येणार. पण एकक्षण जरी स्मरण केले तरी पुरेसे आहे.

बसल्या बसल्या देव आठवला तरी दर्शन घडते. नामाचा एक शब्दही देवाचे दर्शन घडवतो. इतके नामामध्ये सामर्थ्य आहे. नाम देवाच्या रुपाचा विस्तार करते. आपण जरी देवाचे स्मरण केले नाही तरीही त्याचा उच्चार मात्र सतत सुरू असतो. सोऽहम, सोऽहम चा नाद सदैव सुरू असतो. फक्त आपण त्याकडे लक्ष द्यायला हवे. अवधान द्यायला हवे. आपले लक्ष नसले तरी ते सुरूच असते.

सायकल चालवताना दोन्ही पायांची हालचाल सुरू असते. लक्ष जरी दुसरी कडे असले तरी ही क्रिया सुरू असते. मध्येच आडवा कोणी आला तर लगेच ही क्रिया थांबते. ब्रेक मारला जातो. तसे आपल्या शरीरातही सोऽहमचा नाद सुरू असतो. मन आपले फक्त दुसरीकडे धावत असते. आपण या नादाकडे लक्ष दिले तर तो नाद निश्‍चितच आपणाला ऐकू येतो. या नादात रमले तर त्याचा निश्‍चितच विस्तार होतो. स्वरुपाचे दर्शन घडते. फक्त हा स्वर आपण मनाने उच्चारायला हवा. मनाने ऐकायला हवा. मनाने जाणायला हवा. मन त्यामध्ये रमवायला हवे. तरच हे शक्‍य आहे.

Related posts

लसणात तामस गुण, पण तो विकार घालवण्यासाठी उपकारक

मन साधनेत रमण्यासाठी हे करा

यश प्राप्तीसाठी जीवनातील आमिषे ओळखायला हवीत

Leave a Comment