ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! ..
सध्या नागपूर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या वसीमा शेख या मूर्ती ‘लहान पण किर्ती महान’ असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
ॲड. शैलजा मोळक
लेखक, कवी, समुपदेशक, व्याख्याता
अध्यक्ष शिवस्फूर्ती प्रतिष्ठान व जिजाऊ ग्रंथालय पुणे
मो. 9823627244
पुण्यात एका कार्यक्रमात त्यांचा प्रवास ऐकला आणि तेव्हाच ठरवलं या दुर्गेचा प्रेरणादायी प्रवास समाजापर्यंत पोहोचला पाहिजे. जोशीसांगवी, जि. नांदेड या जवळपास दोन हजार लोकसंख्या असणाऱ्या गावात जन्मलेल्या वसीमा आई वडील आणि सहा भावंडासह त्यात दोन भाऊ आणि चार बहीण अशा परिवारात वाढल्या. वडील जवळपास वीस वर्षापासून मनोरुग्ण त्यामुळे सर्व भावंडांची व संसाराची जबाबदारी आईवर होती. आठ जणांचे कुटुंब एका लहानशा विटा असलेल्या खोलीमध्ये राहत होते. ताईंच्या घरात लाईटचे कनेक्शन त्या बारावी झाल्यानंतर घेतले. सारी भावंडे फक्त दिवसा उजेड असताना अभ्यास करायची. रात्री केरोसीनच्या दिव्यावर अभ्यास करावा लागत असे.
ताईंची आई लोकांच्या शेतात जाऊन मजुरीने काम तसेच घरोघरी जाऊन गावातील बायकांना बांगड्या भरण्याचा व्यवसायही करत असे.सर्व मुलांचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी आईने प्रचंड कष्ट घेतले. वसीमाताईंची बारावी झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी लागणारा खर्च तसेच दोन बहिणींचा खर्च आईसाठी झेपणारा नव्हता त्यामुळे ताईंच्या मोठ्या भावाने त्याचे पदवीचे शिक्षण अर्धवट सोडले व तो रिक्षा चालवायला लागला, जेणेकरून बहिणींच्या शिक्षणाला आर्थिक पाठबळ मिळेल, या उद्देशाने तो स्वतःच्या स्वप्नांना मुरड घालून कुटुंबासाठी मेहनत करू लागला.
घरी अठरा विश्व दारिद्र्य त्यातच समाजाची प्रतिगामी मानसिकता या दोन्ही गोष्टींना ताईंना सामोरे जावे लागले. ज्या गावात आजही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अर्थात एसटी महामंडळाची बस अजूनही सुरू झालेली नाही, आजही जवळपास आठ तासांची विजेची लोड शेडिंग असते. जवळपास तीस वर्षांपूर्वी जशी परिस्थिती होती त्यापेक्षा थोडीफार आज सुधारली आहे. पण ग्रामीण भागातील अडचणी, समस्या, लोकांची प्रतिगामी विचारसरणीचा सामना रोज करावा लागत होता.
ग्रामीण भागातील अठरा विश्व दारिद्र्य, बेरोजगारी, व्यसनाधीनता, हुंडा पद्धती, बालविवाह, बालमजुरी या सर्व समस्या सभोवताली पाहत व अनुभवत ताईंच्या मनात चीड निर्माण झाली होती. अगदी शालेय जीवनापासून ताईंना शाहू फुले आंबेडकर यासारख्या महापुरुषांचे विचारच आदर्श होते. शालेय जीवनातच ताईंनी ठरवले की आपण जर एखाद्या मोठ्या पदावर अधिकारी म्हणून गेलो तर समाजातील अनेक समस्या सोडवू शकू. स्वतःचा खारीचा वाटा समाजाच्या विकासामध्ये देऊ शकू.
ग्रामीण भागात मुलींचे वय सोळा वर्ष झाले की कुटुंबाकडून आणि नातेवाईकाकडून तिच्या लग्नाचा विषय घेतला जातो. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ताईंच्या बाबतीतही असेच घडत होते. ताईंनी या गोष्टीला ठामपणे विरोध केला तेव्हा काही नातेवाईक तसेच समाजातील तथाकथित प्रस्थापित लोकांनी ताईंच्या शिक्षणाला विरोध केला. त्यांच्या परिवाराचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करू लागले. प्रसंगी ताईंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा व बदनाम करण्याचा प्रयत्न काही जवळच्या नातेवाईकांनी केला, जेणेकरून शिक्षण थांबेल. त्याकाळी हा एक मोठा संघर्ष ताईंच्या आयुष्यात सुरु झाला. ताईंची स्वप्न मोठी होती. समाजासाठी काहीतरी करायचे होते. समाजाची विचित्र मानसिकता बदलायची होती. त्यासोबतच स्वतःला सिद्ध करायचे होते, अशा अनेक स्तरावर ताईंचा अगदी लहान वयापासूनच संघर्ष सुरू झाला.
समाजातून एवढा विरोध होण्याचे कारण केवळ एकच होते ते म्हणजे ‘मी एक मुलगी होते आणि माझ्या कृतीतून समाजाच्या प्रस्थापित प्रतिगामी विचारसरणीला विरोध करत होते. मी समाजातील लोकांना बोलून उत्तर देऊ इच्छित नव्हते,तर मला माझ्या कृतीतून त्यांना उत्तर द्यायचे होते आणि त्यांचे विचार किती संकुचित आणि प्रतिगामी आहेत हे दाखवून द्यायचे होते.’ ताई आज हे निर्भिडपणे सांगत होत्या.
लहानपणापासूनच शिक्षणाची आवड असल्याने शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि समाजासाठी काही करता येईल अशी ताईंची धारणा पक्की होत होती. कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी ताई आपल्या विचारावर ठाम राहिल्या. प्रत्येक अडथळा हा तत्कालीन असून त्यावर मात करू शकते असा आत्मविश्वास ताईंमध्ये निर्माण झाला. संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले तरीही माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी या सर्व स्तरावर ताईंनी कायम आपली गुणवत्ता सिध्द केली. यातूनच स्पर्धा परीक्षा विषयक इमारतीचा पाया पक्का झाला होता. त्यामुळे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना खूप कमी कालावधीमध्ये ताईंना यश प्राप्त झाले. अवघ्या दोन वर्षांमध्ये प्राथमिक शिक्षक, तलाठी, राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्यकर निरीक्षक अशा जवळपास तीन ते चार पदांसाठी ताईंची निवड झाली.
२०१७ या वर्षी राज्यकर निरीक्षक या पदावर नियुक्ती झाली. पण ताईंचे स्वप्न वेगळे होते. नोकरी करीत असताना अभ्यासाचे नियोजन करून मिळेल तेवढ्या वेळेचा सदुपयोग करून दुसऱ्या वर्षी ताई महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा परीक्षेमधून महिला संवर्गात दुसऱ्या क्रमांकावर येऊन उपजिल्हाधिकारी पदी विराजमान झाल्या. या प्रवासात मात्र त्यांचे पती हैदरसाब शेख यांनी त्यांना प्रचंड पाठिंबा दिला. लातूर जिल्ह्यातील पाटोदा बु॥ या गावात रहात असतानाही त्यांनी ताईंच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. आणि ताईंनी संधीचे सोने केले.
‘कितीही कठीण प्रसंग आले, कितीही अडथळे आले तरी आपण आपल्या मार्गावर अढळ राहून आत्मविश्वास कमी न होता सतत कठीण परिश्रम करत राहिलो तर यश नक्कीच मिळते. तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी तुमच्या मार्गात अडथळा न बनता तुमच्यासाठी यश मिळवण्यासाठी प्रेरणा झाल्या पाहिजे. मी माझ्या संपूर्ण प्रवासामध्ये कधीही आर्थिक सामाजिक परिस्थितीचा बाऊ न करता आहे त्या परिस्थितीला तोंड देत पुढे जात राहिले आणि म्हणतात ना इच्छा तेथे मार्ग त्याप्रमाणे मला पुढचे मार्ग दिसत गेले आणि मी ते पादाक्रांत करून यशोशिखर गाठले. मी ईश्वराची खूप आभारी आहे की मला सदैव साथ देणारे कुटुंब लाभले.
माझे माहेर तसेच सासरचे मला पूर्ण सहकार्य आहे. मला माझ्या संपूर्ण प्रवासामध्ये माझ्या कुटुंबाने सदैव साथ दिली. माझी आई, भाऊ, बहिणी, माझे पती यांचे सहकार्य लाभले, त्यामुळे माझ्यामध्ये आत्मविश्वास कायम राहिला आणि जिद्द जिवंत राहिली. माझ्या पतीचा खाजगी व्यवसाय असून माझी एक दोन वर्षाची मुलगी आहे. तिची देखभाल करणे, संगोपन करणे या जबाबदाऱ्यांमध्ये देखील माझ्या पतीचे मला खूप सहकार्य लाभते. प्रत्येक अडचणीमध्ये मला माझ्या पतीचे सहकार्य लाभते. त्यामुळे माझा कौटुंबिक कार्यभाग सुकर झाला आहे. प्रत्येक महिलेला जर तिच्या कुटुंबाची अशी साथ असेल तर तिला तिच्या व्यावसायिक जीवनामध्ये प्रगती करणे शक्य होईल.’ असा संदेश त्या आज समाजाला देत आहेत.
कुटुंबाच्या साथीने मुस्लीम समाजातील अनेक रूढी परंपरांना छेद देत आपली गुणवत्ता सिध्द करत, बिकट परिस्थितीवर मात करत अतिशय कष्टाने उपजिल्हाधिकारी पदावर विराजमान होऊन जनतेची सेवा करणाऱ्या या आधुनिक नवदुर्गेस मानाचा मुजरा..!!
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.