April 17, 2024
Jatila Jat Vairee Poetry Book Review
Home » माणुसकीच्या अस्ताचे शल्य अन् समाजातील वास्तवता…
काय चाललयं अवतीभवती

माणुसकीच्या अस्ताचे शल्य अन् समाजातील वास्तवता…

माणूसकी जेंव्हा गेलेली असते, भाऊच भावाचा जीव घेतो, आईवडील जेंव्हा वृद्धाश्रमात जातात, हुंड्यासाठी मुली मरतात, स्त्रीभ्रूण हत्या होते, बलात्कार, लुटालूट, शेतकरी आत्महत्या करायला लागतो, डोनेशनमुळे नोकरी जाते, पांढऱ्या कपड्यात वावरणारी ही भुजगावणे जेंव्हा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कतात. तेंव्हा तिथे माझ्या कवितेचा जन्म होतो असे कवी म्हणतो.

प्रा. रामदास केदार उदगीर

वेदनेचे गाठोडं बांधून परिवर्तनाच्या प्रवाहात माणसं कशी वाहून जात आहेत ? बोकाळलेली समाजव्यवस्था आणि सांस्कृतिकतेतला चंगळवाद चव्हाट्यावर येऊन मानव आणि मानवी समूहातील सामान्य प्रजातीचा अस्त कसा होतो ? आपलीच माणसे आपलाच गळा कसे घोटतात ? हे कवी मनाला बोचते तेव्हा अशा कवितेचा जन्म होतो. माणुसकीच्या अस्ताचे शल्य व समाजातील वास्तवता मांडणारी कविता डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे यांच्या ‘जातीला जात वैरी’ या कवितासंग्रहात दिसून येते.

डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे हे उदगीर येथील श्री हावगीस्वामी महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख आहेत. त्यांची साहित्य समीक्षा आणि संदर्भ, साहित्य विविधा आणि समीक्षा, कविता रुचलेली व पचलेली, मसणजोगी इत्यादी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. डॉ. चिमोरे यांची पहिलीच कविता संयुक्त महाराष्ट्र अखंड राहावा म्हणून जनजागृती केलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ यांच्या कार्यांचा गौरव करणारी आहे. तर समाजात वावरताना जातीसाठी माती खात बंडाचा झेंडा रोवणारी माणसे पावला पावलावर भेटतात. याचे दुःख कवीमनाला बोचते आहे, काट्यांप्रमाणे टोचते आहे. याचा शाप या लोकशाहीला आहे. असे कवी लिहितो आहे.

खातात माती
जातीसाठी लोक
गातात गाणी
समतेची

कशी जाईल जात
पेरणारे जास्त
जातीचा शाप
लोकशाहीला

चिंता आणि चिंतन करायला लावणारी कविता जगण्यासाठी माणसांच्या मनात आशावाद पेरु पाहणारी नक्कीच आहे. रात्रंदिवस काम करत घाम गाळून पोट भरण्यासाठी भाकरीचा चंद्र शोधणाऱ्या माणसांना भाकर देऊया तर माणुसकीला आकार देऊया. माणसांच्या जीवनातील अंधार नाहीसा व्हावा म्हणून मावळत्या सूर्याला उद्या येण्यासाठी कवी विनंती करतो आहे.

भूकेल्यांना भाकर देऊ
माणुसकीला आकार देऊ
समतेचा विचार
पेरत जाऊ गावोगावी
मावत्या सूर्यालाही
उद्या येण्याची विनंती करु

जयंतीच्या भाषणात संघटित होऊ चला म्हणणारी ही आजची पिढी माणसा माणसात फुट पाडतात. ही समाजातील विदारका कवी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. ‘भारत माता की जय म्हणायला’ या कवितेत धर्मग्रंथ हाती घेण्यापेक्षा बाबासाहेबांचे संविधान हाती घ्या, राज्यघटना हाती घ्या. ते आपणास वाचवू शकतात. तर ‘जातीला जात वैरी ‘ या कवितेत आपलीच माणसं आपणाला कसे फसवतात, लुबाडतात, पुढे जाणाऱ्यांचे पाय मागे ओढतात. कुंपणच कसे पीक खाल्ले ? रक्षकच भक्षक बनू पाहतो. एकीकडे सारे भारतीय माझे बांधव आहेत असे गोडवे गात जायचं आणि तीच गोडवे गाणारी माणसं या माणुसकीला काळिमा फासत लोकशाहीला पायदळी तुडवायचं. म्हणूनच कवी जातीला जात वैरी आहे असे म्हणतो.

कसे करावे परोपकार
नाही जाणीव उपकाराची
दिली झाडाने सावली
त्याने त्यावर कुऱ्हाड चालवली

अशीच साथ जातीची
स्वार्थाने माती केली
जातीला जात वैरी
ही म्हण गरी निघाली.

शिक्षणव्यवस्था कशी बाजारु झाली ? धनधांडग्यांच्या दारात उभा राहीली, दफ्तरांच्या ओझ्यांने हसत्या खेळत्या वयातील मुलांची कंबरडे मोडली.

किती कुत्तरओढ
शिक्षणापायी
आधिक गुण घेण्यासाठी
हाल हाल केले लेकरांचे

कोरोनाला लेकरांची दया आली, करूणा आली अभ्यास करणे, परीक्षा देणे बंद झाले आणि परीक्षा न देताच पास होण्याचे आनंदाचे दिवस मुलांच्या वाट्याला आले असे कवीला वाटते.

माझ्या कवितेचा जन्म कसा झाला हे सांगताना कवी म्हणतो की, माणूसकी जेंव्हा गेलेली असते, भाऊच भावाचा जीव घेतो, आईवडील जेंव्हा वृद्धाश्रमात जातात, हुंड्यासाठी मुली मरतात, स्त्रीभ्रूण हत्या होते, बलात्कार, लुटालूट, शेतकरी आत्महत्या करायला लागतो, डोनेशनमुळे नोकरी जाते, पांढऱ्या कपड्यात वावरणारी ही भुजगावणे जेंव्हा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कतात. तेंव्हा तिथे माझ्या कवितेचा जन्म होतो असे कवी म्हणतो.

कवीचे मन कवीला अस्वस्थ करून टाकते. ही अस्वस्थता कवीला जागरूक करायला भाग पाडते. तेंव्हाच माणसांच्या मनातला वेदनेचा हुंकार आणि झंकार कवितेत शब्दशस्त्रांच्या माध्यमातून उमटतो. कवी चिमोरे यांच्या कवितेतून वेदनेचा हुंकार दाटलेला आहे. माणसांच्या जगण्याचे संदर्भ बदलत असताना त्यांचे अंतरंग फाटलेले आहे. हे अधोरेखित करणारी कविता आहे. कवी माणसांचा अहंकार कसा कोरोनाने गळून पडला हे ही सांगायला विसरत नाहीत.

बाप हा कुटूंबाचा कणा असतो. तो ढगाआड दडलेल्या तळपत्या सूर्यासारखा असतो. संसाराच्या गाडीचा चाक आणि कुटुंबाचा धाक हा बाप असतो. बापाची महती कवी गातो आहे. हत्तीच्या कळपासारखे चळवळीच्या झुंडीच्या झुंडी बाहेर पडताना दिसत आहेत. तेंव्हा कवी चपराक ही देतो आहे आणि मार्ग ही दाखवतो आहे.

ज्यांना जमत नाही चळवळ
त्यांनी करु नये वळवळ
शेणातल्या किड्यासारखे

कवी पुढाऱ्यांना पाढऱ्या बगळ्यांची उपमा देतो. वेगवेगळ्या झेंड्याखाली ठाण मांडून बसलेल्या बगळ्यांनी या देशाची स्वीस बँकांमध्ये काळे पैसे ठेवून लुटून झाली. याबद्दल किती आणि काय लिहावे असा प्रश्न कवीला पडतो आहे. शेवटी हे पुढारी माझेच खरे आहे असे म्हणून सामान्यावर धाक दाखवून आपली पोळी भाजून घेतात.

काय लिहावे, तेवढे कमीच आहे
गवश्यापासून नवश्यापर्यत
हीच सगळी चाल आहे
माकड म्हणतो, माझीच लाल आहे

वेदावरुन भेद करणारा धर्म हा मानवतेला कलंक असतो. तर येथे माणसांच्या सावलीचाही विटाळ पडतो. असे कवीला वाटते. माणसांनेच माणसावर प्रहार करत जगत असतील तर त्या जगण्याला काय किंमत असते. आपणच मुडदा पाडून आपणच सरणावर रडणे आणि मी नाही त्यातला म्हणत श्रद्धांजली अर्पण करणे ही कसली मानवता आणि संस्कृती आहे ? सोंग करून ढोंग रचणारी लबाड लांडग्यांची सुशिक्षीत जात आज गल्लीबोळात वाढत आहे. धर्माच्या नावाखाली विस्तवांचे केंडे घेऊन जाळपोळ करणारी माणसं या मातीतून उगवत आहेत. म्हणून इथल्या मातीवरचाही माणसांचा विश्वास उडतो आहे. समाजातील प्रखर वास्तव चित्र कवी कवितेतून उभा करतो आहे. या संग्रहातील कविता वाचल्यानंतर कवीच्या मनाची होरपळ झालेली आहे. मनाला चटके बसलेले आहेत. त्या वेदना आणि संवेदना मांडण्याचा प्रयत्न कवी करतो आहे.

पी. विठ्ठल याची पाठराखण आहे. ते लिहितात, जात आणि धर्माधिष्ठित राजकारणामुळे माणसांच्या मनात द्वेष वाढत चालला आहे. विचार आणि आचारांच्या पातळीवर माणसांचे असे पूर्वग्रहदूषित होत जाणे, लोकशाला कधीच पोषक नसते. मानवतेच्या विरोधातल्या या गोष्टी अंतिमत: माणसाला विनाशाकडेच घेऊन जातात. अशावेळी माणुसकीला सर्वोच्च मूल्य आणि समता व संविधानाला आपली अस्मिता माननारी डॉ. चिमोरे यांची कविता मला महत्त्वाची वाटते. प्रस्तावना डॉ. फुला बागूल यांची आहे. प्रमोदकुमार अणेराव यांनी शिर्षकाला अनुसरून सुंदर मुखपृष्ठ रेखाटले आहे.

पुस्तकाचे नाव – जातीला जात वैरी (कवितासंग्रह)
कवी – सुशीलप्रकाश चिमोरे
प्रकाशन – बीज प्रकाशन
पृष्ठे – ७२, मूल्य – १९९

पुस्तक परिचय आणि परिक्षणासाठी आपणही आपली पुस्तके जरुर पाठवा आम्ही त्याची जरूर दखल घेऊ आणि योग्य ती प्रसिद्धी देऊ…
पुस्तके पाठविण्याचा पत्ता –
राजेंद्र कृष्णराव घोरपडे, संपादक, इये मराठीचिये नगरी
श्री अथर्व प्रकाशन, १५७, साळोखेनगर, कोल्हापूर ४१६००७. मोबाईल – ९०११०८७४०६

Related posts

जल, जंगल, जमीन यांचा समतोल साधण्याची गरज

स्वागत फाऊंडेशनतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

गाभण कालावधीत गायीच्या गोमूत्रातील घटकात कोणता बदल होतो ? जाणून घ्या..

Leave a Comment