चंदगडी बोलीभाषा, माती आणि माणसाचं मार्मिक चित्रण करणारे पुस्तक : उंबळट
कोल्हापूर येथील कमला महाविद्यालयाचे प्रा.डॉ. गोपाळ गावडे लिखित ‘उबळट’ या चंदगडी बोलीभाषेतील पहिल्या व्यक्तिचित्रणात्मक पुस्तकाचे शुक्रवारी (ता. ११ नोव्हेंबर 22) रोजी शिवाजी विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांचे हस्ते प्रकाशन होत आहे. त्या निमित्त…
प्रा.डॉ. सुजय पाटील
मराठी विभागप्रमुख, कमला कॉलेज, कोल्हापूर मो. 8421668406
कोणत्याही भाषेचा मुख्यप्रवाह हा एकाएकी समृद्ध होत नसतो. विविध भागात बोलल्या जाणाऱ्या बोली भाषेच्या सहयोगातून मुख्यभाषा ही समृद्ध होत जात असते. मराठी भाषा तर कोकणी, अहिरणी, खानदेशी, चंदगडी अशा अनेकविध बोलीभाषांनी समृद्ध झालेली दिसून येते. या बोलीभाषांच्या भौगोलिक परिघातून घडत जाणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक यांनी बोलींचे अंतरंग समजून घेणे. बोली भाषांचा उत्सव आपल्या कथा, कादंबऱ्या, कविता, व्यक्तिचित्रणे मांडून जागता ठेवणे आवश्यक आहे. असे झाले तरच बोलीभाषाचे वैभव नव्या पिढीसमोर उभे राहिल यात शंका नाही. असाच प्रामाणिक प्रयत्न प्रा. डॉ गोपाळ गावडे यांनी आपल्या ‘उंबळट’ या व्यक्तिचित्रण संग्रहातून केलेला दिसतो.
चंदगडी बोली भाषेतील पहिलच व्यक्तिचित्रण म्हणून या पुस्तकाचे एक वेगळे महत्त्व अधोरेखित होते. या पुस्तकाचे एकूण नऊ व्यक्तिचित्रण आहेत. ही व्यक्तिचित्रणे वाचकांच्या भेटीला येतात ती तिथली भाषा, कौटुंबिक, सामाजिक ऋणानुबंध, ताणतणाव, गुरुंढोर, मानवी जीवनातील कृतज्ञता व कृतघ्नता या सगळ्यांचे उभे आडवे ताणेबाणे घेऊन ही व्यक्तिचित्र वाचकाला भेटतात त्यामुळे ती प्रभावी वाटतात. प्रत्येक व्यक्ती चित्रण करताना लेखकाने चंदगडी बोली भाषेचा अत्यंत प्रभावी वापर केल्यामुळे ही व्यक्तीचित्रणं वाचकांच्या मनाची ठाव घेतात.
उदाहरणार्थ ‘किंवडा तुक्का’ याचं वर्णन करतांना लेखक लिहितो – ‘तुक्यास आयकोस कमी यी. माग्नं हळ्ळी मारली तेला आयकोस यऊस नसे. म्होरणं, तेबी मोठ्यान् बोल्लं तरच त्यास आयकोस जाई. म्हजेन तो किंवडाच व्हत्ता म्हूण्णच लोकं तेला किंवडा तुक्का’ म्हणीत’ हे वर्णन वाचत पुढे जाताच ‘किंवडा तुक्का’ संपूर्णपणे वाचकांपुढे उभा राहतो.
चंदगडी मातीतला माणूस तांबूस माती इतकाच चिवट व स्वाभिमानी आहे. त्यामुळेच गुराढोरांच्यावर जीवापाड प्रेम करणारा मुलाबाळांसाठी शेतजमीन सांभाळून ठेवणारा ‘आण्णूबाबा’, मुलांच्या, सुनांच्या स्वार्थी, लोभीपणामुळे बेवारशा सारखा मरतो. मुलांचा स्वार्थीपणा ओळखून मरणाआधी स्वतःच्या कफनासाठी पैशांची व्यवस्था करून मरतो हे वाचल्यावर चंदगडी रानामालातील झाडांच्या जुन्या खोडा इतकी ताठर कणखर असणारी जुन्या पिढीतील ही चंदगडी माणसं वाचकाला अस्वस्थ करून जातात.
आज ग्रामीण भागात शहरं घुसलेली आहेत. प्लॉट पाडून शेती नष्ट केली जात आहे, गावचं गावपण नष्ट होत आहे. या पार्श्वभूमीवर चंदगड सारख्या दऱ्या डोंगरांच्या माथ्यावरील हिरवीगार माळरान, गायरान, गवतांची कुरणं, भातशेतीची कुरणं याचं लेखकानं व्यक्तिचित्रणाच्या पार्श्वभूमीवर केलेलं वर्णन शेतमाळ्यांचे हिरवे पदर वाचकांसमोर उभा करते. हिरवाईचा नेत्रसुखद अनुभव देऊन जाते.
प्रमाण मराठी भाषा बोलण्यास सरावलेलो आपण आपल्याला चंदगडी बोलीमधील काही शब्द कळत नाहीत. त्याचे अर्थ लागत नाहीत, याची सोय म्हणून लेखकाने प्रत्येक व्यक्तीचित्रणाच्या शेवटी शब्दांचे अर्थ दिलेले आहेत ही एक जमेची बाजू म्हणता येईल. चंदगडी बोली मधील ही व्यक्तिचित्रे वाचताना प्रथम दर्शी वाचक अडखळतो पण शब्दावरील लोभ जसा वाढत जातो तशीही बोली समजून येऊ लागते. ती इतकी समजत जाते की, इथलं प्रत्येक व्यक्तीचित्र नंतर वाचकांशी गप्पाच मारू लागते. हेच या व्यक्तीचित्र संग्रहाचे यश आहे असं म्हणावं लागतं
पुस्तकाचे नाव – उंबळट
लेखक – गोपाळ गावडे
प्रकाशक – स्वच्छंद प्रकाशन, कोल्हापूर
पुस्तकासाठी संपर्क – 94211 00562
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.