स्वच्छ समृद्ध गाव हे राष्ट्रसंतांचे स्वप्न – ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर
मुर्झा येथील २८ व्या झाडीबोली साहित्य संमेलनात परिसंवादांची मेजवानी
कुरझा पारडी जि.भंडारा (मुकूंदराज साहित्य नगरी) – थोर तत्त्वज्ञ आणि ग्रामगीता ग्रंथाचे रचयिते वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना ग्रामोध्दार अपेक्षित होता. गावे समृद्ध होईल तर राष्ट्र समृद्ध होईल हा विचार घेऊन ते गावोगावी गेलेत. आपल्या झाडीपट्टीवर त्यांचे फार प्रेम होते. झाडीबोली चळवळीतील डाॅ. हरिश्चंद्र बोरकरांनी ग्रामगीतेची शब्दश्रीमंती या ग्रंथात ग्रामगीतेतील झाडीबोली शब्दांचा शोधपूर्ण अभ्यास मांडलेला आहे. राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराज यांच्या पावन प्रेरणेतून डॉ. बोरकर ही झाडीबोली चळवळ अखंडपणे चालवित आहे, असे प्रतिपादन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी मुर्झा येथील २८ व्या झाडीबोली साहित्य संमेलनात ‘जय बोला जय झाडी’ या परिसंवादात अध्यक्षस्थानाहून बोलताना केले.
यावेळी व्यासपीठावर झाडीबोली साहित्य मंडळाचे अध्यक्ष डाॅ. हरिश्चंद्र बोरकर आणि संमेलनाध्यक्ष डाॅ. संजयकुमार निंबेकर, स्वागताध्यक्ष पुरूषोत्तम गोंधळे , संमेलनाचे उद्घाटक माजी आ. डॉ. हेमकृष्ण कापगते उपस्थित होते.
‘जेती जावा तेती माजा बावा’ या विषयावर बंडोपंत बोढेकरांनी अतिशय सुरेख शब्दांत राष्ट्रसंतांचे विचार मांडले. यावेळी डाॅ. मनोहर नरांजे यांनी ‘जेती गोटा, तेती देव मोटा’, डाॅ. श्याम मोहोरकर (चंद्रपूर) यांनी ‘नाटकाविना गाव सुना’, नरेश आंबिलकर (भंडारा), यांनी ‘ झाडी नांदते घरोघरी’, डाॅ. किशोर साखरे यांनी ‘ माजी झाडी, सब्दायची वाडी’ आदी विषयांवर अत्यंत प्रगल्भ शब्दांमध्ये आपले विचार व्यक्त केले. या परिसंवादाचे सुत्रसंचालन प्रा. विलास हलमारे यांनी तर आभार प्रदर्शन मकरध्वज वंजारी यांनी केले.
त्यानंतर ‘मी गुरूजी, झाडी माजी’ या विठ्ठल लांजेवार मांडवात आयोजित परिसंवादाचे अध्यक्षस्थानी हरिश्चंद्र लाडे होते. या परिसंवादात सपना शामकुंवर यांनी देखील आपले विचार व्यक्त केले. सुत्रसंचालन धनंजय मुळे यांनी तर आभारप्रदर्शन ललित झोडे यांनी केले.
याचवेळी बापूराव टोंगे मांडवात ‘झाडीबोलीना मालं का देलन?’ या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी हिरामन लांजे होते. या परिसंवादात सुभाष धकाते, लिपनकार लक्ष्मण खोब्रागडे व भूभरीकार अरूण झगडकर यांनी आपले विचार मांडले. सुत्रसंचालन पत्रकार ताराचंद कापगते तर आभार प्रदर्शन सचिन ब्राम्हणकर यांनी केले.
डाॅ.घनश्याम डोंगरे मांडवात आयोजित ‘झाडीबोली चरवडीची गरज आहे काय ?’ या परिसंवादाप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक लखनसिंह कटरे यांनी उपस्थिती दर्शवून मनोगत व्यक्त केले. अध्यक्षस्थानी डाॅ. गुरूप्रसाद पाखमोडे होते. परिसंवादात सुखदेव चौथाले, नरेश नवघरे व शाहीर लोकराम शेंडे यांनी सहभाग घेवून आपले विचार मांडले. सुत्रसंचालन कवी पालिकचंद बिसने यांनी तर आभार प्रदर्शन चोपराम ठलाल यांनी केले.
‘ताराबाई बोरकर मांडवात’ झाडीबोलीतील दळण, कांडण, रोवणा, लगन, कायदा व बारस्याची गीते ‘बायायचं गाना’ या सदरात सादर करून रसिकांची दाद मिळविली.यात मालता ठलाल, शकुंतला वंजारी, सकू गोंधळे, प्रभावती शेंडे, कांता ठलाल व अन्य कलावंतांनी सहभाग घेतला. सुत्रसंचालन मयुरी गोंधळे व निलीमा वालदे यांनी तर आभार प्रदर्शन वनिता शहारे यांनी केले.
‘गजानन बागडे मांडवात’ त्रिलोकधारा या दंडार, खडा डाहाका व खडी गंमत लोकगीतांचे शाहिर सुबोध कान्हेकर व अरूण बन्सोड आदींनी सादरीकरण करून रसिकांची दाद मिळविली. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुंजीराम गोंधळे यांनी केले.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.