December 2, 2023
Laxman Khobragade article on Comedy King Hiralal Pentar Sahare
Home » लोककलेच्या कोंदनातला अष्टपैलू हिरा
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

लोककलेच्या कोंदनातला अष्टपैलू हिरा

महाराष्ट्रातील लोककलेच्या कोंदनातला ड्यापाड्यातील जीवनपद्धती मांडण्याचा वसा घेतलेला हिरालाल पेंटर नावाचा वादळ. केवळ विनोदी शैलीतून लोकांचे मनोरंजन करीत नाही, तर पडेल त्या भूमिकेतून स्वतःला सिद्ध करतो.

लक्ष्मण खोब्रागडे

जुनासुर्ला, ता. मूल, जि. चंद्रपूर

२८ व्या झाडीबोली साहित्य संमेलनात मिळालेल्या स्फूर्तीची ऊर्जा सोबत होती. मुर्झा पारडी येथून मी आणि झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर (ग्रामीण)चे अध्यक्ष भुभरीकार अरुण झगडकर व ताटवाकार संतोष मेश्राम स्वगावी निघालो. वाटेत झाडीबोली समृद्ध करणाऱ्या नाट्यमंडळाची मांदियाळी असलेल्या वडसा येथे पोहचलो. आरमोरीवरून आम्हाला घ्यायला आलेले आमचे संगी, इतिहाससंशोधक, गायक, वादक, गजलकार, नाट्यकलावंत, अष्टपैलू व्यक्तीमत्व नंदकिशोर मसराम होते. वडसा येथे आल्या आल्या मनात घर करून असलेल्या व ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्यामुळे अधिक जवळ आलेल्या झाडीच्याच नाहीतर महाराष्ट्राच्या हिऱ्याची आठवण झाली. आमची गाडी राजसा रंगभूमीच्या कार्यालयाजवळ थांबली. भुभरीकार अरुण झगडकर यांनी विनोदाचा बादशहा हिरालाल पेंटर (सहारे) यांचा नंबर डायल करून भेटायचं आहे असे कळवले . कामाच्या व्यस्ततेत असूनही आम्ही आल्याचे कळताच, काम बाजूला सारून पाच मिनिटात कार्यालयात पोहोचले. लोककला जोपासत समाजप्रबोधन करणाऱ्या हिऱ्याच्या चैतन्यमय सहवासात जवळपास एक तास घालवला. चर्चेत पूर्वी माहीत असलेल्या अनेक पैलूपेक्षा हिराच्या अंतरात वाहणारी प्रतिभा, निगर्वी मन, कार्याप्रति असलेली निष्ठा, कृतज्ञतेचा झरा, सात्विकता, प्रेमळ ओलावा, विचाराची स्पष्टता, विद्रोह, आत दडलेला कवी अधिक उलगडत गेला.

मराठी भाषेला समृद्ध करणाऱ्या झाडीबोलीला जिवंत ठेवण्यासाठी नाटकांच्या माध्यमातून खेड्यापाड्यातील जीवनपद्धती मांडण्याचा वसा घेतलेला हिरालाल पेंटर नावाचा वादळ. केवळ विनोदी शैलीतून लोकांचे मनोरंजन करीत नाही, तर पडेल त्या भूमिकेतून स्वतःला सिद्ध करतो. प्राथमिक शिक्षणाच्या पुढे मजल मारता आली नाही, पण प्रतिभशक्तीच्या जोरावर अनेक कसदार नाटकांचे लेखन त्यांच्या हातून घडत आहे. लिहायचे म्हणून लिहिणारे खूप भेटतील, पण यांनी समाजातील ज्वलंत समस्यांचा अभ्यास करून जागृतीचा वणवा पेटवलेला दिसतो. हृदयाची भाषा हृदयाला भिडते म्हणूनच हा हिरा लोकांच्या हृदयात घर करतो. रसिकांचा प्रचंड प्रतिसाद घेऊनही मातीशी नाळ जुळलेला हिरा कधी गर्वात वाहत गेला नाही. सामाजिक भान असल्याने जमिनीवर पाऊल ठेवून समाज उद्धारासाठी झटताना दिसतो. कलावंत म्हणून लोकांनी आपल्या गळ्यातला ताईत बनवलेला हा हिरा समाजउद्धाराचा मुकुटमणी आहे.

प्रसिद्धी मिळावी म्हणून सवंग विषयाला कवटाळत न बसता त्याला बगल देत उदात्त भावनेने जाती – पातीचे भीषण वास्तव, व्यसन, आदिवासींच्या समस्या, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, पोकळ कल्पना यावर सडसडून टीका करीत हल्ला चढवित आहे. मनोरंजनातून नितीमत्तेला जागवण्याचे पवित्र कार्य हाती घेऊन हा हिरा चंदनाप्रमाणे झिजून समाजनिर्मितीचा सुगंध देत आहे. मिरवण्यात फुशारकी न मारता, रात्रीचा दिवस करून वर्षभर नाटकातून समाजप्रबोधन करताना दिसतो. त्यासाठी त्यांच्यात असलेला तेज तरुण पिढीला लाजवेल. उत्तरोत्तर वाढत जाणारी चमक त्यांच्या आत्मविश्वासात अनुभवायला मिळते. स्वतःचे चारित्र्य जपताना सन्मार्गाची कास धरलेला हा अवलिया अद्वितीय. राष्ट्रसंताची शिकवण असल्याने राष्ट्रनिर्माणासाठी निरोगी समाजाचा ध्यास असल्याने लेखनातून चारित्र्याची जोसापना करण्याचा आग्रह धरतो. झाडीच्या उज्ज्वल संस्कृतीला शिखरावर नेणारा कळस म्हणून आमचा हिरा पात्र आहे. आदर्शाच्या खाणीतून निघालेला हिरा इतरांना मिसाल बनावा असा स्वयंप्रकाशित तारा.

विक्रमासाठी वाटेल त्या थराला जाऊन झटणारे खूप भेटतील. सन्मार्गाने समाजाला जागवत स्वतःचा विक्रम तयार करण्यासाठी झिजणारा हिरा अमूल्य. विविध समस्यांत हात घालून स्वतः लिहिलेल्या नाटकांचे २०० च्या जवळपास प्रयोग करूनही न थकणारा वाटाड्या. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जनमानसाच्या काळजावर अधिराज्य गाजवत आहे. हाताळलेले विषय आणि शब्दांची बांधणी इतक्या ताकतीची की, काही ठिकाणी एकाच नाटकाचे दोन दोन प्रयोग प्रयोग झाले. हा हिरा स्वतंत्र प्रवृत्तीचा असून कलेच्या आड येणाऱ्या कोणाचीही भिडमुर्वत ठेवत नाही. याचा अनुभव कित्येकांना आला असेल. कलेशी तादात्म्य पावलेल्या हिराचा तेज कलाकारांच्या पंखात बळ देत जाते.

हळव्या मनाची प्रामाणिकता खळ्यांसाठी कठोर होत जाते, हे हिराचे बलस्थान आहे. ही प्रेरणा नाट्यरंगभूमीच्या कृतीतून दिसून येते. वाईटाशी दोन हात करण्यासाठी शब्दांना धार चढवणारा हिरा काव्यातून सृजनाची अपेक्षा करतो, हे कित्येकांना माहीत नाही. त्यांचा नवा पैलू अनुभवायचा असेल तर, त्यांच्या कवितांची दखल घ्यावीच लागेल. नदीला कोणता पहाड अडवू शकत नाही. तसा हिराने मनातील निर्मळ भावनांचे दमन केले नाही. मनात उठणारे भाव त्यांनी काव्यबद्ध केले. त्याचे उपयोजन ते नाटकातून सातत्याने करतात. त्यातील उच्चकोटीचा भाव समाजजागृतीची पकड घेते. आशय सोज्वळ भाववृत्तीचे दर्शन देते.

राष्ट्रसंताचा वारसा लाभल्याने, ‘जळती हे जन, देखवेना डोळा ‘। म्हणून कळवळा असलेला हिरा कीर्तनाच्या माध्यमातून समाजमन सुपीक करतो. सुपिकतेत भरभराट महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे. न्यूनगंडाच्या छायेत कित्येक रोपटे कोमेजले. पण आपल्या कमी शिक्षणाचा बाऊ न करता, स्वजाणिवेतून स्वतःला पैलू पाडणारा हिरा कीर्तनातून चैतन्य अधिक खुलवत गेला.

संतविचाराची माळ घालून विचाराची शेती फुलविणारा हिरा महाराष्ट्राचा खरा भूषण. हिराचे कित्येक पैलू सांगावे. महाराष्ट्राला लाभलेल्या या हिऱ्याजवळ जितके जाल तितके पैलू उजेडात येत जातात. आमचा हिरा जादूगर पण आहे. मायाजालात लीलया दोन तास अंधश्रद्धा पळविण्यासाठी प्रयोग करतो. डोळ्यावरील भ्रमाची झापड उघडण्यासाठी ढोंगाचा पर्दापाश करतो. या महान कार्यासाठी हिराचे जीवन सत्कारणी लागत आहे, हा पुरोगामी महाराष्ट्राचा अभिमान आहे.

जीवनाच्या वाटेवर हिराचा आणखी एक पैलू शिरपेचात मानाचा तुरा रोवते. त्यांची चित्रकला. नाटक, विनोद, कीर्तन, लेखन, काव्य आणि जादू यातून समाजाचे चित्र रंगवणारा हिरा, आपल्या कुंचल्यातून चित्रांना जिवंतपणा देतो. त्यांना कोणत्याही कामाची लाज वाटत नाही. हाती पडेल त्या कामाला पूर्णत्व देणे इतकंच माहीत. एकदा मुलीकडे दिल्लीला गेले. त्यांची हुन्नर पाहून चार ते पाच बिल्डिंगच्या सजावटीचे काम मिळाले. त्यांनी आनंदाने स्वीकारून दिल्लीकरांचे मन जिंकले. उत्कृष्ट निर्माता, दिग्दर्शक म्हणून कित्येक कलावंताच्या आयुष्याला कलाटणी देऊन ओळख दिली. लोककलेच्या संवर्धनासाठी स्वतःच्या मुलाला तयार केले. अशा अनेक पैलूंचा हिरा, पुरस्कारासाठी भांडला नाही. जमिनीवर पडलेले चांगले असेल ते आपण उचलून घेतोच. कार्य प्रामाणिक असेल त्याची कदर होतेच.

महाराष्ट्राच्या या अष्टपैलू नायकाने स्वतःच्या कसबीवर अनेक पुरस्कार मिळवले. पण कधी गर्व केला नाही. कार्याची दखल झाल्याने आज चंद्रपूर जिल्ह्याचे लोककलावंत मानधन समितीचे अध्यक्ष आहेत. या माध्यमातून कित्येक कलावंतांना न्याय देत आहेत. न्यायाची चाड, अन्यायाची चीड असल्याने गरजूंनाच लाभाचा प्रवाह मिळाला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या लोककला समितीच्या सदस्यपदाची धुरा यशस्वी पेलत आहेत. सातत्याने प्रसारमाध्यमात झळकणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व, पण अहंपणाचा लवलेश नाही. प्रसिद्धीच्या झोतातही इतकी सौजन्यशीलता बाळगत भेट देऊन आम्हाला उपकृत केले. धन्यता वाटली. या हिऱ्याचा शासनदरबारी उचित गौरव होऊन पुढील पिढीसाठी आदर्श मिळावा ही अभिलाषा बाळगून कृतज्ञ मनाने निरोप घेतला. या भेटीत महाराष्ट्राचा मुकुटमणी जवळून अनुभवता आला.

Related posts

सात्विक विचारातून फुटावा सात्त्विकतेचा पान्हा

स्वच्छतेचा संदेश देणारे “गाव रामायण “

अभिमानाला धक्का न लागता करावं लागेल जोडण्याचं काम – अभय फिरोदिया

1 comment

अरूण झगडकर December 28, 2021 at 8:40 AM

अतिशय सुंदर लेख आहेत…

Reply

Leave a Comment

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More