October 4, 2023
Sampat More Mulukhmarati Book review by Dr Randheer Shinde
Home » आडवळणाच्या समाज व्यथाकथांचा प्रदेश
मुक्त संवाद

आडवळणाच्या समाज व्यथाकथांचा प्रदेश

संपतने महाराष्ट्र व महाराष्ट्र सीमा भागातील फिरस्तीतून लोकविलक्षण अपरिचित कहाण्या शोधल्या आहेत. व्यक्ती आणि घटना-घडामोडींवरील समाजवृत्तान्तपर स्वरूपाचे हे लेखन आहे. या कहाण्या त्याने चमकदार पॉलिश न करता अनावरपणे सांगितल्या आहेत.

डॉ रणधीर शिंदे

मराठी विभाग
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

समाजमाध्यमे तसेच मुद्रित माध्यमांतून नवी पिढी सकस आणि वैविध्यपूर्ण लिखाण करते आहे. तरुणांच्या या अभिव्यक्तीने व अनावर कथनांनी सध्याची समाजमाध्यमे गजबजली आहेत. संपत मोरे नावाचा तरुण त्यांपैकीच एक. संपतकडे बालपणापासूनच समाजव्यवहार जाणून घेण्याचे विलक्षण कौशल्य असावे. वाड्मयीन परंपरेतील समाजशील लेखकांकडून वाहत आलेला इतिहास वारसा आणि बिनभिंतींच्या जगातून आलेल्या ‘शहाणिवांच्या जोरावर त्याच्याकडून प्रगल्भ लेखन घडते आहे. संपतचे समाजमाध्यमावरील लेखन हा त्याचाच एक भाग आहे. आणि ते बहुल वाचनप्रियही आहे. त्याचे ‘मुलूखमाती’ नावाचे सदर ‘दिव्य मराठी’ या दैनिकातून रविवार आवृत्तीतून प्रसिद्ध झाले. त्याचे हे ग्रंथरूप.

सदर ज्या वेळी प्रकाशित होत होते, त्या वेळी या लेखनविषयाची कुतूहलभूमी अधिक चाळवली आणि तिच्या शक्यताही जाणवत होत्या. संपतने महाराष्ट्र व महाराष्ट्र सीमा भागातील फिरस्तीतून लोकविलक्षण अपरिचित कहाण्या शोधल्या आहेत. व्यक्ती आणि घटना-घडामोडींवरील समाजवृत्तान्तपर स्वरूपाचे हे लेखन आहे. या कहाण्या त्याने चमकदार पॉलिश न करता अनावरपणे सांगितल्या आहेत.

मानवी जीवन व महाराष्ट्र प्रदेशावर संवेदनशील पत्रकार व लेखक म्हणून संपतला विशेष आस्थाभाव आहे. ‘मुलूखमाती’मधील ४१ लेखांतून मांडलेला त्याचा लेखनपसारा थक्क वाटावा असा आहे. संपतच्या या सदरातील लेखनप्रियतेबरोबरच वाचकांच्या जाणिवेत फरक तर पडलाच, त्याचबरोबर लेखनविषय झालेल्या उपेक्षित व्यक्तींना समाजातील अनेकांचे मदतीचे हातदेखील धावून आले.मराठीतील व्यक्तिचित्रणात्मक लेखन हे रोमँटिक, आत्मपर व ‘भळभळण्याच्या स्वरूपाचे आहे. तसेच समाजवृत्तान्तपर लेखनही सपाट रिपोर्ताज व प्रदर्शनवृत्तीचे आहे. या पार्श्वभूमीवर संपत मोरे यांचे लेखन बहुविध स्वरूपाचे आहे.

प्रदेश, समाजशोध, परिघावरील जग कुस्ती क्षेत्र व उपेक्षित समाजचित्रे अशा विषयांवरील हे लेखन आहे. व्यक्ती तसेच प्रदेशावरील खोलवरच्या आस्था सहानुभावातून ते निर्माण झाले आहे. समाजा विषयीच्या आंतरिक तळमळीचा व बांधिलकीचा गडद स्वर त्यामध्ये आहे.खुली जीवनदृष्टी आणि उमद्या मनाच्या महाराष्ट्र सफरीची समाजशोधरूपे संपतच्या लेखनात आहेत. एका अर्थाने व्यक्ती आणि प्रदेशाची ही वृत्तान्तचित्रे आहेत. त्यास शोधकहाण्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

व्यक्तिकहाण्या व काही घटना घडामोडींचे वर्तमान त्याच्या विविध कंगोऱ्यासह मांडले आहे. ही व्यक्तिचित्रे त्या त्या व्यक्तीपुरती सीमित राहत नाहीत तर ती समाजवकाश, प्रदेशपर्यावरण संचितासह उभी केली आहेत. त्यामध्ये एकारलेली दृष्टी नाही. तो व्यापक आणि विस्तृत आहे. संपरा ज्या पद्धतीने व्यक्ती व प्रदेश न्याहा अनेकांनी पाहिलेला, वाचलेला असतो. मात्र तो त्यांच्या जाणिवेच्या अळीत ढकलला गेलेला असतो. वा दुर्लक्षिला जातो. कोणत्याही समाजात अशा व्यक्ती व घटना या हिमनगाचे टोक असतात. त्याखाली गुंतागुतीचे बहुमितीय कोन दडलेले आहेत. या गुंतागुंतीच्या समाज बहूस्वरीयेला मुलूखमातीमध्ये मुखर केले आहे.’मुलूखमाती मध्ये सामान्य माणसांच्या लोकविलक्षण असामान्य कहाण्या आहेत. त्यामध्ये दडलेला जनेतिहास आहे.

लोकेतिहास व लोकव्यवहाराला त्याने उच्चाररूप दिले आहे. तसेच व्यक्ती आणि समाज-उपेक्षेमागे असणारी कारणे त्यातून स्वाभाविकपणे प्रकटली आहेत. यामागे सामाजिक कळवळ्याची दृष्टी आहे. डाव्या, समाजवादी व सामाजिक बांधिलकीच्या विचारदर्शनाची पृष्ठभूमी त्यास लाभली आहे. या लेखनात सतत राजकारण, समाजकारण व प्रभुत्वसंबंधांच्या नोंदी आहेत. त्यामुळे या लेखनाचा समाजविचार फलक विस्तारित झाला आहे. हा संग्रह त्याने भाई एन. डी. पाटील, शरद पवार व स्वतःच्या आजोबांना अर्पण केला आहे. त्यावरूनही ही बाब लक्षात येते.

संपत मोरे याच्या अनुभवविश्वातील समाजपाहणीचे एक महत्त्वाचे केंद्र परिघावरील सामान्यांच्या वंचितांच्या ‘स्टोऱ्या’ आहेत. कोळी, बेलदार, हेळवी व इतरही समाजाची उपेक्षाचित्रे त्याच्या लेखनाच्या केंद्रस्थानी आहेत. सामान्य माणसांच्या संघर्षाच्या दुःखाच्या व अस्वस्थ वर्तमानाच्या या कहाण्या आहेत. मात्र त्या केवळ गान्हाणी सांगणाच्या नाहीत, तर त्यांच्या जगण्याच्या चिवट संघर्षाचे चित्र उभ्या करणाऱ्या आहेत. त्यांत निमूटपण नाही. तर प्रेरकता आहे. उभं राहण्याच्या बळ देणाऱ्या या भावप्रेरककथा आहेत.

स्त्रियांचे जीवन हा त्याच्या खास आस्थेचा विषय आहे. निर्मळ आणि निकोप भावनेने त्याने स्त्रियांची शब्दचित्रे रेखाटली आहेत. शेतीतील कष्टाची कामे करणान्या नूतन मोहिते यांच्यापासून निर्भय कणखर “जगायचं हुतं म्हणून वस्तरा हातात घेणान्या शांताबाईची जिगरकथा संपतने निवेदिली आहे. समाजरचनेत ‘पुरुष’ व ‘बाईपणा’विषयी रचलेल्या संकेतांना शह देशाच्या ‘प्रत्यक्षा’तल्या अनेक गोष्टी त्याने शोधल्या वयाच्या ९७ व्या वर्षी अखंड सायकलीवरून भिरभिरणारे गणपती यादव, ३२ व्या वर्षी सरपंच असलेले साधेपणाने निरंतर शोभून दिसणारे दत्तूअप्पा, वंशावळीचा इतिहास ठेवणारा हेळवी, धाडसी स्त्री-पैलवान संजना बागडी, रामदास आठवले यांच्या मातोश्री हौसाबाई अशा व्यक्तींबरोबरच ‘कहाणी बाबासाहेबांच्या बैलगाडीची’, ‘वाठारची दुर्गा खानावळ’, ‘कानडी प्रदेशातील मराठी बेट’ अशा गोष्टींवर त्याने मनःपूर्वक लिहिले. सध्याच्या झगमगत्या काळात वार्तामूल्य नसलेल्या अनेक गोष्टी त्याने सांगितल्या आहेत. त्यामुळेच सांस्कृतिक जीवनाकडेही पाहण्याचा त्याचा डोळा समाजशील आहे.

महादेव मोरे, उत्तम बंडू तुपे, वामन होवाळ, नवनाथ गोरे, माणूस न पाहिलेला रानकवी यशवंत तांदळे या लेखकांची उपेक्षाचित्रे त्याने सामाजिक जाणिवेच्या अंगाने मांडली. या लेखनातील सांस्कृतिक जीवनातील सर्व तऱ्हेच्या उपेक्षेचे समाजवास्तव अस्वस्थ आणि व्याकूळ करणारे आहे. समाज आणि लेखन यांतील परस्परजीवी आणि परस्परप्रभावी वास्तवाची आणि व्यक्तीविषयीच्या भावपरतेने ओथंबलेली ही हृद्य शब्दचित्रे आहेत.याबरोबरच संपतच्या लेखनात महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासाची विस्मृतिचित्रे आहेत. प्रतिसरकारच्या चळवळीतील व्यक्तींविषयीचे लेखन वा कुस्तीवरील लेखन हे त्याचे दृश्य रूप आहे. झाकोळलेला दृश्य अदृश्याच्या सीमेवरील इतिहास त्याच्या लेखनातून मुखर झाला आहे. स्वातंत्र्य चळवळीतील झुंजार वीरनायकाच्या तसेच वीरनायिकांचा इतिहास त्यामधून उलगडविला आहे.

कुस्ती हा संपतचा जिव्हाळ्याचा विषय. महाराष्ट्रातील कुस्ती परंपरेचा वारसा आणि पैलवानांच्या संक्षिप्त चरित्रकथा त्याने इथं सांगितल्या आहेत. पैलवानांचा वैभवाचा काळ आणि त्यांच्या उत्तर आयुष्यातील संघर्ष, शोकात्म जाणिवांनी ते आकाराला आले आहे. पैलवानांच्या जीवनातील परस्परविरुद्ध व्यथित करणारी ही काळ स्थितिचित्रे आहेत. ‘जातीनं लोळवलेला तुफानी मल्ल असे समाजाला नको असलेले वाचनही त्यात आहे. शंकर अण्णांचे कुस्ती फडाचे धावते रंगबहारीचे समालोचन यावरील लेख व्यक्ती आणि समाजवाचनाचा उत्तम नमुना आहे. प्रत्यक्ष आखाड्याला आपल्या बोलण्यांतून लोकविलक्षण चैतन्य प्राप्त करून देणाऱ्या शंकरअण्णाचे निवेदन संपतने सजीव केले आहे. याबरोबरच हद्दपारीच्या वाटेवरील व्यवसायसमाजाची व्याकूळ चित्रदर्शने त्याच्या लेखनात आहेत. तसेच महाराष्ट्र भूमीपासून तुटलेल्या गावांच्या व्यथा, अस्मितांचे चित्रणदेखील आहे.’मुलूखमाती’मध्ये सामान्य माणसांच्या लोकविलक्षण असामान्य कहाण्या आहेत. त्यामध्ये दडलेला जनेतिहास आहे.

लोकेतिहास व लोकव्यवहाराला त्याने उच्चाररूप दिले आहे. तसेच व्यक्ती आणि समाज उपेक्षेमागे असणारी – कारणे त्यातून स्वाभाविकपणे प्रकटली आहेत. यामागे सामाजिक कळवळ्याची दृष्टी आहे. डाव्या, समाजवादी व सामाजिक बांधिलकीच्या विचारदर्शनाची पृष्ठभूमी त्यास लाभली आहे. या लेखनात सतत राजकारण, समाजकारण व प्रभुत्वसंबंधांच्या नोंदी आहेत. त्यामुळे या लेखनाचा समाजविचार फलक विस्तारित झाला आहे. हा संग्रह त्याने भाई एन. डी. पाटील, शरद पवार व स्वतःच्या आजोबांना अर्पण केला आहे. त्यावरूनही ही बाब लक्षात येते. संपतच्या या लेखनाने समाजऋणानुबंधाच्या कथांनी वाचकमनाला संपन्नता तर प्राप्त होते, त्याबरोबरच त्याच्या समाजाबद्दलच्या जाणिवेच्या कक्षांचा विस्तार होतो.

आकाशाएवढ्या डोंगराएवढ्या माणसांच्या जीवित प्रेरणाकथा आस्थाभावाने सांगितल्या गेल्यामुळे वाचकांच्या जाणीवइयत्तेत फरक पडतो. लिखित इतिहासात न सामावलेल्या विस्मृती समाज इतिहासाला साक्षात केले आहे. संपतची म्हणून ‘सांगण्या’ची विशिष्ट पद्धत आहे. ‘लोकबोलण्या’ला तो नेहमीच महत्त्व देत आला आहे. समाज आणि व्यक्तिभाषेच्या रंगरूपगंधासह साक्षात करणारी त्याची अभिनव अशी शैली आहे. प्रशांत पवार यांनी ‘रिपोर्ताज’चा ‘हिंद केसरी’ असे त्याच्या शैलीचे केलेले वर्णन सार्थ असेच आहे. त्यामुळे रूढ व्यक्तिचित्रणात्मक लेखनाच्या चौकटी ओलांडणारे आहे. मराठीतील कृतक रोमँटिक भावरंजक व्यक्तिचित्रणात्मक लेखन पार्श्वभूमीवर मराठीतील व्यक्तिचित्रणात्मक लेखनाचा विस्तार करणारे हे लेखन आहे. त्यास समृद्ध गद्याचे परिमाण लाभले आहे.

महाराष्ट्रभूमीचे विविध तऱ्हेचे धागेदोरे, विस्मृती इतिहास व लोकव्यवहाराची अनेक अंगे – त्यातून साक्षात झाली आहेत. आजच्या झगमगाटी, चमकी वातावरणात ‘वार्तामूल्य’ नसणाऱ्या असंख्य गोष्टी मांडल्या आहेत. मुक्तशोध पत्रकारितेचा एक वेगळा नमुना त्याने या लेखनरूपाने सादर केला आहे. पर्यायी पत्रकारितेला पर्याय देण्याचा धाडसी प्रयत्न त्याच्या लेखनात आहे. पुढील काळात संपतच्या लेखनास अनेक धुमारे फुटतील याच्या विपुल नांदीखुणा या लेखनात विसावल्या आहेत. आजच्या सर्व प्रकारच्या पडझडीच्या डिजिटल काळात समाजजाणिवांविषयी चौरस भान देणारे हे लेखन आहे. आडवाटेवरच्या समाज इतिहास व वर्तमान घडामोडींचा हा कथनावकाश नव्या पिढीला निश्चितच लेखनप्रेरणा देईल.

पुस्तकाचे नाव – मुलूखमाती
लेखक – संपत मोरे
प्रकाशन – लोकायत प्रकाशन
किंमत – २५० रुपये

Related posts

झोप लागत नाही ? हे उपाय करून पाहा…

मन हा मोगरा !

आई आपली म्हणायची…पण आता त्याचा अर्थ कळतो…

Leave a Comment