३३व्या झाडी बोली साहित्य संमेलनाचे थाटात उद् घाटन
काटलीला साहित्य पंढरीचे रुप
गडचिरोली – ” आज झाडी बोली साहित्याचा डंका सर्वत्र वाजत असतांना काही बाबी आता जपण्याची वेळ आली आहे. झाडीपट्टयात गावखेडयात अनेक आजी,आजोबांकडे लगनाची गाणी, महादेवाची, दंडारीची, भूलाबाईची गाणी उखाणे, म्हणी, वाक्प्रचार, विविध लोककथा या झाडीच्या लोकजीवनात विखुरलेल्या आहेत. त्या संकलित करुन त्याचे संवर्धन करणे काळाची गरज आहे. हा झाडीचा वारसा नव्या पिढीकडे सुपूर्द करावा. याशिवाय आपल्या झाडी बोली मायबोलीला जपून या बोलीबद्दल संशोधन, संवर्धनाची गरज आहे” असे मत संमेलनाध्यक्ष कवी, लेखक, झाडी भाष्यकार डॉ. धनराज खानोरकर यांनी मांडले. ते काटली येथे ३३ व्या झाडी बोली साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी अध्यक्षीय मनोगतात बोलत होते.
विचारपीठावर बोलीमहर्षी डॉ. हरिश्चंद्र बोरकर, अँड लखनसिंह कटरे, उद् घाटक माजी आमदार डॉ हेमकृष्ण कापगते, माजी संमेलनाध्यक्ष लोकराम शेंडे, पद्मश्री डॉ परशुराम खुणे, डॉ राजन जसस्वाल, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, अरुण झगडकर, कुंजीराम गोंधळे, पवन पाथाडे, डॉ चंद्रकांत लेनगुरे, प्रा विनायक धानोरकर, डॉ संजय निंबेकर, रत्नमाला भोयर, सरपंच पुण्यवान सोरते, टेकाजी उंदिरवाडे उपस्थित होते. याप्रसंगी बोढेकरांनी अहवालवाचन केले. आयोजक प्रा धानोरकरांनी प्रास्ताविक केले.
यावेळी उपस्थितांचे भाषणे झाली. अनेक पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सकाळी भव्य पुस्तकपोहा काढण्यात आला. यात विविध वेशभूषा करुन उपस्थितांचे मने जिंकली. यानंतर डॉ चंद्रकांत लेनगुरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ मोहन कापगते, रत्नमाला भोयर,अल्का दुधबुरेंच्या उपस्थितीत ‘ आमचे तीर्थस्थाने’ परिसंवाद रंगला.
या उद् घाटन सोहळ्याचे संचालन कमलेश झाड तर आभार रोशनी दातेंनी मानले. या संमेलनासाठी चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील अनेक कवी, लेखक, पत्रकार, अभ्यासक सहभागी झाले होते.
Discover more from इये मराठीचिये नगरी
Subscribe to get the latest posts sent to your email.
