January 21, 2026
Mumbai politics depicting Shiv Sena, BJP, Marathi identity struggle and corporate influence in Maharashtra
Home » डांगे मोडले, आता ठाकरेंची पाळी !
सत्ता संघर्ष

डांगे मोडले, आता ठाकरेंची पाळी !

संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला जात असतानाच मुंबई केंद्रशासित म्हणून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घोषणा देखील करून टाकली होती. महाराष्ट्रापासून मुंबई तोडणे, ही केवळ अफवा नव्हती तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी निर्णय देखील घेण्यात आला होता. याच निर्णयामुळे मुंबईतील मराठी कामगारांचा उद्रेक झाला आणि त्यातून एकशे सहा हुतात्मे झाले.

वसंत भोसले, ज्येष्ठ संपादक

शिवसेनेची ताकद संपवल्याशिवाय मुंबईची महापालिका मिळणार नाही ही अटकळ असल्यामुळेच हे राजकारण करण्यात आले. मुंबई आणि मुंबई परिसरातील इतर आठ महापालिका हा सर्व भाग खूप महत्त्वाचा आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. ‘तुम्ही मराठी माणसाला वडापावच्या गाड्यांशिवाय काय दिले? ‘ अशा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या प्रचार सभेत बोलताना केला आणि एक प्रकारे मराठी माणसाची मुंबईमध्ये वडापाव खाण्याचीच अवकात आहे, असे दाखवून दिले आहे. शिवसेना- मनसे युतीची शिवाजी पार्कवर जाहीर सभा झाली. तेव्हा राज ठाकरे यांनी मुंबई आणि मुंबईचा परिसर कोणाच्या मालकीचा होतो आहे. याचं एक सादरीकरण केले होते. त्या सादरीकरणामध्ये मुंबई परिसर, महाराष्ट्र राज्य आणि देशभरामध्ये अदानी समूहाला किती मोठ्या प्रमाणात कंत्राटे दिलेली आहेत, किती जमिनी दिलेल्या आहेत आणि किती खाणी देखील बहाल केलेल्या आहेत. याची सविस्तर माहिती दिली. तेव्हा मराठी माणूस खरंच अचंबित झाला असेल..!

त्याची तर लायकी वडापाव खाण्याची आहे. हे दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तुम्ही वडापावाची गाडी मराठी माणसाला दिली आणि भारतीय जनता पक्ष अदानी समूहाला काय काय देतो, हे सांगण्याची रीत होती का..? असा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही.

मुंबई शहर हे नेहमीच आर्थिक राजधानीचे शहर असल्यामुळे राजकीय महत्त्व देखील त्याला तेवढेच येते. राजकीय अर्थशास्त्राच्या भाषेत मुंबईचे राजकारण हे अर्थशास्त्राशी जोडलेले आहे. त्यामुळे मुंबई महाराष्ट्राला देण्यापेक्षा ती स्वतंत्र केंद्रशासित करावी, असा मराठीला विरोध करणाऱ्या लोकांची मागणी स्वातंत्र्य पूर्व काळापासून चालू होती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रांत रचना होत असताना ही मागणी पुन्हा डोके वर काढू लागली. मुंबई प्रांत हा गुजरातसह होता सौराष्ट्र मात्र वेगळे राज्य होते. त्यामुळे मुंबईवर हक्क जणू मराठी माणसा इतकाच गुजराती माणसाचा देखील आहे. असा समज त्यावेळी झाला होता. त्यालाच विरोध करण्यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिला हा लढा सामान्य माणसांच्या जीवावर लढवण्यात आला. त्याचं नेतृत्व अनेक नेत्यांनी केले त्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट चळवळीचे संस्थापक श्रीपाद अमृत डांगे यांचा वाटा मोठा होता.

मराठी माणूस

डांगे यांची भूमिका महत्त्वाची असण्याचे कारण की, या लढ्यामध्ये उतरलेला मराठी माणूस हा मुंबईतील कामगार होता आणि तो महाराष्ट्राच्या विविध भागातून मुंबईत आला होता. शिवाय मुंबईतील मराठी माणूस देखील जो कामगार होता तो या लढ्यामध्ये उत्तरला होता. संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला जात असतानाच मुंबई केंद्रशासित म्हणून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घोषणा देखील करून टाकली होती. महाराष्ट्रापासून मुंबई तोडणे, ही केवळ अफवा नव्हती तर ती प्रत्यक्षात आणण्यासाठी निर्णय देखील घेण्यात आला होता. याच निर्णयामुळे मुंबईतील मराठी कामगारांचा उद्रेक झाला आणि त्यातून एकशे सहा हुतात्मे झाले.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे म्हणून लढणाऱ्या मराठी माणसांमध्ये कोणी श्रीमंत माणूस नव्हता. मध्यमवर्गीय माणसांचा सहभाग जेमतेम होता. मोठी ताकद मराठी कामगारांनी लावली होती. हे सर्व कामगार लालबावट्याच्या झेंड्याखाली संघटित झाले होते. त्यांनीच लोकमान्य टिळक यांना जेव्हा अटक झाली तेव्हा पहिला राजकीय संप घडवून आणला होता. त्यामुळे कामगारांना राजकीय जाणीव जागृती झाल्याचे स्पष्ट झाले होते. याच मराठी माणसाने संयुक्त महाराष्ट्रासाठी गोळ्या झेलल्या. परिणामी मुंबई केंद्रशासित करून महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा निर्णय केंद्र सरकारला मागे घ्यावा लागला. त्याच्यावर कडी म्हणून गुजरात आणि महाराष्ट्र असे एकत्र करून द्विभाषिक राज्य स्थापन करण्यात आले. त्या राज्याचा अनुभव घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल असा मार्ग काढण्यात आला. याचा दुसरा अर्थ असा की मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र होईलच किंवा मराठी माणसाची मागणी पूर्ण करण्यात येईलच अशी काही परिस्थिती नव्हती. याच्याविरुद्ध पुढील दोन-तीन वर्षे मुंबईतील गिरणी कामगारांनी तमाम महाराष्ट्रातल्या मराठी माणसांच्या एक पाऊल पुढे जाऊन लढा दिला. म्हणून १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. याचे सारे श्रेय मुंबईत जो उठाव झाला होतात्याला जाते.

राजकीय ताकद

संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर मुंबई मध्ये राजकीय जाणीव जागृती झालेल्या कामगार वर्गाची राजकीय ताकद दिसू लागली होती. याच वेळी परप्रांतीयांच्या विरोधात उभी राहणारी चळवळ संघटित झाली आणि त्यांनी लाल बावटा संघटनेला विरोध करायला सुरुवात केला केली. हीच शक्ती म्हणजे मुंबईतील शिवसेना..! संघटित कामगारांची राजकीय ताकद मोडून काढण्यासाठी याच शिवसेनेचा वापर काँग्रेस पक्षाने खुबीने करून घेतला. तेव्हा असे आरोप केले जात होते की, डाव्या पक्षाच्या गुंडगिरीला मोडून काढण्यासाठी शिवसेना लढती आहे. मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेनेसारखी संघटना उभी राहिली पाहिजे या मताचे काँग्रेसचे अनेक नेते होते. त्यांनी वेळोवेळी शिवसेनेला पाठिंबा देखील दिला होता. एवढेच नव्हे तर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपादित केलेल्या मार्मिक या साप्ताहिकाचे उद्घाटन देखील यशवंतराव चव्हाण यांनी केले होते. पुढे त्यांचा वारसा चालवणारे वसंतराव नाईक यांनी तर शिवसेनेला अघोषित पाठिंबाच दिला होता. त्यामुळे शिवसेनेला वसंतसेना म्हटले जात असे. या सुप्त युतीचा परिणाम असा झाला की मुंबईतील लढाऊ गिरणी कामगारांची ताकद मोडून काढण्यात आली.

संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू होता तेव्हा हीच ताकद मुंबईचे आर्थिक बळ संपुष्टात आणेल, अशी भीती त्यावेळच्या कारखानदार आणि गिरणी मालकांना वाटत होती. त्यामुळे ही चळवळ मुंबईच्या हिताच्या विरोधात आहे असा प्रचार देखील करण्यात येत होता. चळवळीचा चेहरा जरी मराठी असला तरी तो मुंबईच्या आर्थिक हिताचा नाही, असा प्रचार करण्यात कोणतीही कसूर करण्यात आली नव्हती. त्यासाठी श्रीपाद अमृत डांगे यांना संपवण्यासाठी शिवसेनेचा वापर ज्या शक्तीने केला त्याच शक्ती आज भाजपच्या पाठीशी उभ्या आहेत. त्यामध्ये उत्तर भारतीयांचा देखील आता मोठा वाटा आहे.

स्थलांतर थांबले
संयुक्त महाराष्ट्राचा लढा चालू होता तेव्हा उत्तर भारतीय मोठ्या संख्येने मुंबईत नव्हते. याउलट दक्षिण भारतीय गरीब कामगार माणूस मुंबईत आश्रयाला येत होता. कालांतराने दक्षिणेतील सर्व राज्यांनी आपली प्रगती केली आणि तिकडून होणारे स्थलांतर कायमचे थांबले.

अलीकडच्या काळामध्ये उत्तर भारतातून मोठ्या संख्येने स्थलांतर झाले. ते अजूनही होत आहे. गुजराती भाषिक आणि स्थलांतरित झालेले उत्तर भारतीय यांचा पाठिंबा हिंदुत्वाच्या गोंडस नावाखाली भारतीय जनता पक्षाला आहे. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्राची सत्ता मिळवण्यासाठी मुंबईमध्ये शिवसेनेची युती करण्याचे राजकारण केले. शिवाय महाराष्ट्रात देखील बहुजन समाजामध्ये पाय रोवण्यासाठी शिवसेनेचाच वापर करून घेतला. काँग्रेस पक्षाने ज्या शिवसेनेला वाढवले आणि डाव्या आघाडीला संपवले. त्याच काँग्रेस पक्षाच्या विरोधात शिवसेना उभे राहिली, तेव्हा वेळ निघून गेली होती. शिवसेनेला वापरल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा प्रसार आणि प्रचार होणार नाही अशी आखणी करून प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे आदींनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळी शक्ती निर्माण केली. शिवसेनेने आपली मराठी बाण्याची तलवार म्यान करून हिंदुत्वाची तलवार बाहेर काढली आणि ती भारतीय जनता पक्षाच्या हातात कधी गेली. हे शिवसेनेला देखील कळले नाही. २०१४ मध्ये जेव्हा देशात सत्तांतर झाले तेव्हापासून भारतीय जनता पक्षाने प्रादेशिक पक्षांना संपवण्याचे राजकारण सुरू केले. त्याचाच फटका शिवसेनेला देखील कधी द्यायचा याचा मुहूर्त शोधण्यात येत होता.

ही खंत गुजरातची

मुंबई महाराष्ट्राला मिळाली ही खंत गुजरातची होतीच. तसेच मुंबईतल्या धनिकांची देखील होती. मुंबईतील संघटित श्रमिकांच्या राजकारणाची आडकाठी वाटत होती. ती शिवसेनेचा वापर करून मोडून काढण्यात आली आणि जेव्हा हिंदुत्वाचा विचार संघाने व्यवस्थितपणे पसरविला तेव्हा शिवसेनेला संपवण्यासाठी फूट पाडण्यात आली. शिवसेना कमकुवत झाल्याशिवाय मुंबई महापालिकेची सत्ता आपल्याला मिळणार नाही, याची जाणीव पुरेपूर होती. शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर प्रमुख शिवसेना म्हणून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला मान्यता देण्यात आली. त्या पक्षाबरोबर युती करून भाजपला सत्ता मिळवावी लागली. कारण भाजपला स्वबळावर मुंबईची सत्ता मिळणार नव्हती हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ होते. मागच्या निवडणुकीत ८२ जागा त्यांनी जिंकल्या होत्या. या वेळा त्या ८९ झाल्या. म्हणजे सात जागा तवाढल्या आहेत. शिवसेनेची ताकद संपवल्याशिवाय मुंबईची महापालिका मिळणार नाही ही अटकळ असल्यामुळेच हे राजकारण करण्यात आले.

मुंबई आणि मुंबई परिसरातील इतर आठ महापालिका हा सर्व भाग खूप महत्त्वाचा आहे. या भागामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होणार आहे. वाढवण बंदर बांधणे आहे, नवी मुंबई विमानतळ उभारणे आहे, शिवाय अनेक प्रकारचे रस्ते करणे आहेत, फ्लाय ओव्हर उभारणे आहेत. या सर्वांसाठी लाखो कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत आणि ही सर्व कामे मिळवण्यासाठी अदानी ग्रुपची मोठी हालचाल चालू आहे. यासाठीच तर हा सर्व अट्टाहास करण्यात आला होता. ठाणे आणि वसई विरार महापालिका वगळता बाकीच्या सर्व सहा महापालिकेमध्ये भाजपचा महापौर होईल. मुंबई परिसर आर्थिक दृष्ट्या खूप महत्त्वाचा असल्याने ही सर्व राजकीय खेळी खेळण्यात आली.

श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली श्रमिकांची शक्ती जी राजकीय शक्ती म्हणून उदयास आली होती. ती संपवल्यानंतर शिवसेना उभी राहिली डाव्यांची शक्ती संपवण्यासाठी काँग्रेसने शिवसेनेला उभा केले आता भाजपची शक्ती उभारण्यासाठी शिवसेनेला संपवण्यात आले. या सर्व राजकारणामध्ये काँग्रेसला स्थानच उरले नव्हते. वास्तविक ही राजकीय खेळी लक्षात घेऊन काँग्रेसने शिवसेनेबरोबर युती करणे आवश्यक होते. पण मनसे या युतीमध्ये असणार नाही ही अट काही मान्य नव्हती. मनसेची भूमिका विशेषता उत्तर भारतीयांच्या विषयी असलेली आक्रमक भूमिका काँग्रेसला परवडणारी नव्हती. त्यामुळेच काँग्रेसने कितीही टाळले. मनसेच्या देखील हे लक्षात येत नाही की उत्तर भारतीयांच्या मताची आज एक निर्णायक वळणावरील शक्ती ठरलेली आहे. ती नाकारता येत नाही. शिवसेने बरोबर युती करून देखील मनसेला फारशे यश या निवडणुकीत मिळाले नाही. राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होत असते पण त्यांना मते मिळत नाहीत. ही होणारी गर्दी मराठी माणसांची असेल पण केवळ त्यांच्या मतावर आता मुंबईचे राजकारण राहिलं नाही. हे इतके स्पष्ट झाले आहे. पूर्वीचा मराठी कामगार संपला. मध्यंतरी गिरणी कामगारांना संघटित करणाऱ्या कामगार आघाडीला संपवण्यात आले आणि आत्ता शिवसेनेला संपून मराठी भाषिकांना राजकीय दृष्ट्या हद्दपार करण्यात येत आहे. ही पाळी शिवसेनेने उडवून घेतली आहे. भाजपाला सोबत घेणाऱ्या शिवसेनेला हे दिवस पाहायला येतील हेही वाटले नसेल..! शिवसेनेचा वापर करून भारतीय जनता पक्षाने आपला विस्तार केला आणि त्यांना बाजूला करण्यात आले.

मुंबईतील विविध प्रकल्पांच्या बाबतीत जेव्हा ठाम भूमिका राज ठाकरे यांनी घेतली तेव्हा त्यांना मोडीत काढण्याचा डाव भाजपने आखला होता. यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार देखील पाडले होते आणि ज्यांच्यावर कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले होते त्यांच्याबरोबर सत्तेत बसताना देखील भाजपाला लाज वाटली नाही. अशी टीका अजित पवार यांनी केल्यानंतर मर्यादा सांभाळून बोलावे असा दम द्यायला देखील कमी केले नाही. त्यात अजित पवारांची मस्ती पुणे आणि पिंपरी- चिंचवड महापालिकेमध्ये जिरवण्यात आली. पिंपरी- चिंचवडची अपघाताने गेलेली सत्ता आहे असेच म्हणून अजित पवार लढत होते पण तो अपघात नव्हता ती व्यवस्थित केलेली व्युहरचना होती. त्यामध्ये ते सापडले. त्यामुळे मुंबईनंतर मराठी माणसाला आर्थिक स्थैर्य देणारा जो परिसर आहे.

पुणे परिसरात भाजपने आता आपली सत्ता एक हाती आणली आहे. बाकीच्या सर्व महापालिका या त्यांच्या दृष्टीने चिल्लर आहेत. नागपूरची महत्त्वाची महापालिका त्यांना मिळाली. मुस्लिम बहुल छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेला आम्हीच पर्याय आहोत, हेही भाजपने आता दाखवून दिले आहे. नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी शेकडो कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तेथे देखील सर्वांना मोडीत काढून भाजपने जिंकली आहे. जिथे पैसा आणि संपत्ती हातात हात घालून जातात. त्या ठिकाणी चतुरपणे राजकारण करीत सत्ता हस्तगत केली आहे. आता मराठी माणसाला वडापाव गाड्यांची साथ राहणार आहे. यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला “वडापाव”ची आठवण करून दिली.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

लोकशाही म्हणजे लोकांची सत्ता, पण आता ती झालीय लोकेशनशाही अर्थात भूखंडांची सत्ता !

फडणवीस आणि जरांगे, जिंकले कोण ?

मराठवाड्यात हाहाकार, मुंबईत उद्घाटनांची दिवाळी..!

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading