December 12, 2024
A book that preserves Kabir's universality
Home » कबीरांची वैश्विकता जपणारे पुस्तक
मुक्त संवाद

कबीरांची वैश्विकता जपणारे पुस्तक

कबीरांचा समग्र जीवनपट, त्यांची जीवन जगण्याची रीत, कबीरांचा समाजमनावर असलेला प्रभाव, कर्मकांडांऐवजी जगाला दिलेला कर्मानंद, लोकभाषेचा लहेजा, आपल्या वाट्याला आलेली लहान कामे करून निपुण बनण्याचा दिलेला दिव्यसंदेश हे पुस्तक वाचताना आपणांस मिळतो.

गंगा बाकले, परभणी.

कवी इंद्रजित भालेराव यांचे नव्यानेच आलेले ‘कबीर : संत, सुधारक आणि कवी’ हे पुस्तक मराठी भाषेतून कबीर समजून घेण्यासाठी फारच मौलिक आहे. कबीरांचे मूळ हिंदीतील दोहे आणि पदे लेखकांनी मराठीमध्ये या पुस्तकात अनुवादित केलेली आहेत. अनुवाद आशयसंपन्न आहे. काही लेखकांनी लिहिलेल्या लेखांची परिशिष्टे या पुस्तकात जोडलेली आहेत. लेखक कवीसुद्धा आहेत आणि त्यांची कबीरांवरील संवादात्मक दीर्घकविता या पुस्तकात वाचायला मिळते. कवी आणि कबीरांचा संवाद वाचकाला अंतर्मुख करणारा आहे. विशेषतः शेतकऱ्यांचा प्रतिनिधी होऊन कवी कबीरांशी बोलतो आणि कबीर त्यांना बोलतात. पुस्तकात प्रत्यक्ष हा भाग वाचन करणे अनुभवासाठी अगत्याचा आहे. सम्यकपणा – सरळपणा – प्रभावीपणा – भेदकता – परिणामकारकता – विचारांची स्पष्टता – मानवता आणि काळसुसंगतपणा या पुस्तकातून दिसून येतो. खरे पाहता, अल्पावधीतच आता तर संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्रच या पुस्तकाचा बोलबाला झालेला आहे.

माझ्या पुस्तक वाचण्याच्या बाबतीत माझ्या घरीच माझ्या घरवाल्यांनी या पुस्तकाच्या संदर्भात विचारणा केली. त्यावेळीही थोडी चर्चा झालीच. पण मला हे पुस्तक वाचकांकडून माझ्या वाचनासाठी भेट मिळालेले आहे, हे जेव्हा घरवाल्यांना वाचकांनी रीतसर समजावून सांगितले, तेव्हा या पुस्तकाचे चांगले वाचन करता आले. असो.

परभणीत सर्वप्रथम वाचकांकडून हे पुस्तक वाचन वाट्याला आल्यानंतर मी मनोमन त्याचे वाचन केलेले आहे. संत तुकाराम आणि संत कबीर हे माझे आवडते संत. संत तुकारामांची गाथा मराठीत उपलब्ध आहे. त्यांचे लेखनच मराठीत असल्यामुळे गाथेची उपलब्धता आणि वाचन मनाजोगते झाले. कबीरांच्या बाबतीत हिंदीमध्ये लेखन आहे. आता या पुस्तकाच्या माध्यमातून माझ्यासकट मराठी वाचकांना हे पुस्तक उपलब्ध झाल्यामुळे चांगल्या विचारांचा संग्रह करता येणार आहे. कबीर संघर्षातून सत्य जीवन जगलेले आणि त्यांचे विचार सत्य मानून जगणारे जगभरातील वैचारिक वाचक – अभ्यासक यांच्याप्रमाणेच मलाही या पुस्तकाची उत्सुकता होती. वाचन केल्यामुळे उत्सुकता आनंदात परावर्तित झाली आणि जीवनामध्ये विचारांचेही परिवर्तन होण्यास हे पुस्तक महत्त्वाचे आहे.

आयुष्यात आपण संत विचारांकडे वळतो किंवा संत साहित्याचे वाचन करतो त्यावेळी आपणांस समग्र जीवनाचे आकलन असलेले आणि साकल्याने विचार करणारे संत साहित्य भावते, त्यामध्ये संत कबीरांचे साहित्यही मोडते. धर्मापेक्षा निधर्मी वृत्ती जोपासून माणूस म्हणून साधे-सरळ आणि सोपे जीवन जगण्यासाठी कबीरांचे जीवन आपणांस कळते आणि त्यांचे विचार स्वीकारून जीवन समृद्ध करता येते. मनाला दिलासा देणारे कबीरांवरील हे पुस्तक कबीरांचे विचार-कृती आणि सामाजिक एकोपा अबाधित ठेवणारे विचारदर्शक आहे.

कबीरांचा समग्र जीवनपट, त्यांची जीवन जगण्याची रीत, कबीरांचा समाजमनावर असलेला प्रभाव, कर्मकांडांऐवजी जगाला दिलेला कर्मानंद, लोकभाषेचा लहेजा, आपल्या वाट्याला आलेली लहान कामे करून निपुण बनण्याचा दिलेला दिव्यसंदेश हे पुस्तक वाचताना आपणांस मिळतो. लेखकांनी पुस्तकाची निर्मिती करताना शब्द – आशय आणि सखोलता जपलेली आहे. प्रमाणभूत आणि प्रामाणिक जीवन जगण्यासाठी सर्वांनाच हे पुस्तक आवडणारे आहे. फार-फार थोर माणसांनी म्हणजेच, भालचंद्र नेमाडे, जब्बार पटेल, सुरेशचंद्र म्हात्रे, महारुद्र मंगनाळे यांच्यासारख्या अनेक जाणत्यांनी हे पुस्तक हातात पडल्या – पडल्या समाधान व्यक्त केल्याचे दिसून येत आहे.

कबीरांविषयी स्वतः लेखक तथा कवी इंद्रजित भालेराव यांनी लिहिलेली “कबीरा” ही कविता मला प्रचंड आवडलेली आहे. या कवितेतील काही ओळी अशा,

“तुझ्यानंतर ज्यांना ज्यांना सापडला
आपला सूर तुझ्या सुरात
ते तुझीच कविता पुढं नेत राहिले
ते कबीरच की युगायुगाचे
ज्यांची नामोनिशाणीही नाही
विलीन होते ते कबिरातच…”

या ओळींचा आपण बारकाईने विचार केला, तर ध्यानात येते की; कबीरांची कविता युगांतर करणारी आहे. कबीरांचा शब्द जगातल्या दबलेल्या माणसांचा एल्गार आहे. त्यामुळे कबीरांनी जगाला आपले मानले आणि जगाने कबीरांना स्वीकारले. कबीर हे समाजमनाचे मुख्य गायक आणि समाज त्यांचा कोरस बनलेला आहे. हे मर्म जाणून कवींनी वर लिहिलेले आहे की, “आपला सूर तुझ्या सुरात…” आणि हे तंतोतंत खरे आहे. कबीर आणि कबीरांचे विचार जपणारे त्यामुळे तर वैश्विक आहेत. कबीरांचा वैश्विकपणा जपण्यासाठी लेखकांनी अभ्यासपूर्ण लिहिलेले हे पुस्तक अतुलनीय आहे. लेखक आणि पुस्तकाचे स्वागत!

पुस्तकाचे नाव : कबीर – संत, सुधारक आणि कवी
लेखक : इंद्रजित भालेराव
प्रकाशक : सॅम पब्लिकेशन्स, पुणे.
मुखपृष्ठ : चंद्रमोहन कुलकर्णी.
मूल्य : ४३०/-रुपये.
पृष्ठे : २२४.


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading