April 19, 2024
For Successful life read Geeta and Dnyneshwari
Home » यशस्वी जीवनासाठीच गीतेचे, ज्ञानेश्वरीचे पठण
विश्वाचे आर्त

यशस्वी जीवनासाठीच गीतेचे, ज्ञानेश्वरीचे पठण

तैसी पाठाची ते वाटी । श्लोक पाद लावा ना जंव वोठी ।
तंव ब्रह्मतेची पुष्टी । येईल आंगा ।। १६९२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा

ओवीचा अर्थ – त्याप्रमाणे पाठरूपी वाटीनें गीतेचे श्लोक मुखाला लावतां न लावतां तोच, ब्रह्मतेची पुष्टि अंगाला येईल.

भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास गीता ही युद्धभुमीवर सांगितली. अर्जुन युद्धासाठी तयार होत नव्हता. आपल्या आप्त स्वकियांना मारून राज्य घ्यायचे हे त्याला मान्य होत नव्हते. त्यांच्याशी युद्ध करण्याच्या मनस्थितीत तो नव्हता. अर्थात त्याचे मन खचलेले होते. अशास्थितीतील व्यक्तीकडून युद्ध जिंकण्याची आशा करणेही व्यर्थ होते. इतकी बिकट स्थिती निर्माण झाली होती. अशा अवस्थेत युद्धसाठी अर्जुनाला तयार करणे इतकी सोपी गोष्ट नव्हती. अशा अवस्थेत यशस्वी होण्याचे सामर्थ्य, ही उर्जा भगवंतांनी गीतेतून अर्जुनाला दिली. यातून तो युद्धाला तयार झाला अन् त्याने युद्ध जिंकले.

आपल्या जीवनातही असे अनेक कठीण प्रसंग येत असतात. युद्धजन्य परिस्थितीही निर्माण होत असते. अशा या प्रसंगामुळे मनात नैराश्य निर्माण होत असते. नुकसान झाले म्हणून मन अस्वस्थ होते. कधी एखादा आजारही आपल्यात नैराश्य उत्पन्न करतो. मनाजोगे यश मिळाले नाही म्हणूनही अयशस्वी झाल्याची नाराजी उत्पन्न होते. अशा या भरकटलेल्या अवस्थेत योग्य मार्ग मिळणे आवश्यक असते. चुकीच्या मार्गाने जाऊन जीवन संपण्याचेही विचार उत्पन्न होऊ शकतात. अशावेळी आपण गीतेचे, ज्ञानेश्वरीचे पठण केल्यास जीवनात यशस्वी होण्याचे मार्ग निश्चितच सापडू शकतात. इतके सामर्थ्य या तत्त्वज्ञानात आहे.

आपण गीता तत्त्वज्ञानाकडे कसे पाहातो यावर सर्व अवलंबून आहे. संजयाच्या माध्यमातून धृतराष्ट्रालाही गीतेचे तत्त्वज्ञान ऐकायला मिळाले. पण त्याचावर याचा काय परिणाम झाला ? पुत्रप्रेमाने अंध झालेल्या धृतराष्ट्राला गीतेचे तत्त्वज्ञान रुचलेच नाही. मनात हेतू ठेवून गीतेचे श्रवण त्यांनी केले. स्वार्थीवृत्तीने, अंधदृष्टीने या तत्त्वज्ञानाकडे पाहील्यास हे तत्त्वज्ञान आत्मसात होत नाही हेच यातून स्पष्ट होते. जागरूक राहून गीतेतील सावधानता जीवनात अनुभवायला हवी. तरच हे तत्त्वज्ञान लाभदायक ठरेल. जीवनातील अंधकार, अज्ञान दूर करायचे असेल तर त्यादृष्टीने हे तत्त्वज्ञान समजून घ्यायला हवे.

गीतेवर भाष्य करणारी ज्ञानेश्वरीही त्याच दृष्टीने पाहायला हवी. नुसती पारायणे करून काहीच मिळत नाही. मनापासून पारायणे करायला हवीत. ओवीचा अनुभव घ्यायला हवा. ओवी तोंडपाठ असून उपयोग नाही तर ती ओवी अंगात उतरायला हवी. ओवीचे अर्थ हे यासाठीच अभ्यासायला हवेत अन् त्यानुसार आचरणही करायला हवे. ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या अनुभूतीतून ब्रह्मविद्येची पुष्टि येऊ शकते. यासाठी त्या दृष्टीने त्याकडे पाहायला हवे. जीवनाला यशस्वी करण्याचे तत्त्वज्ञान यामध्ये आहे. राजा व्हायचे की सन्यासी व्हायचे हे दोन्हीही पर्याय येथे उपलब्ध आहेत. तुम्ही ज्या दृष्टीने याकडे पाहाल त्यादृष्टीने हे तत्त्वज्ञान तुम्हाला घडवते. कारण हे जीवनाचे, समस्त मानव जातीच्या कल्याणाचे तत्वज्ञान आहे. मनात आणले तर राजाही होता येते अन् सन्यासी होऊन आत्मज्ञानाचे लाभार्थीही होता येते. फक्त यासाठी दृढसंकल्प हवा.

Related posts

म्हणोनि माझां स्वरुपी । मनबुद्धि इये निक्षेपीं ।

भावनाशील, पण बुद्धिवादी मानवतावादाचा धागा

पसायदान पुरस्कारासाठी कविता संग्रह पाठविण्याचे आवाहन

Leave a Comment