July 27, 2024
parediem-dr-harishchandra-borkar-and-lakhansinh-katare
Home » मित्रवर्य डाॅ. हरिश्चंद्र बोरकर आणि मी : एक पॅरेडाइम
मुक्त संवाद

मित्रवर्य डाॅ. हरिश्चंद्र बोरकर आणि मी : एक पॅरेडाइम

01 मे 2001 ला प्रकाशित माझ्या अगदी पहिल्यावहिल्या कथासंग्रहाची (एकोणिसावा अध्याय) प्रस्तावना डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी दि.10 एप्रिल 2001 ला लिहिली असून ती या कथासंग्रहात प्रसिद्ध झालेली आहे. डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी या प्रस्तावनेला ‘शापित गंधर्व’ असे शीर्षक दिले.

लखनसिंह कटरे

त्या प्रस्तावनेतील काही ठळक मुद्दे असे –

१)…साहित्याच्या क्षेत्रातील झाडी परिसरात वास्तव्य करणाऱ्या अशा शापित गंधर्वांची संख्या थोडीथोडकी नाही, हे आता लपून राहिलेले नाही. लखनसिंह कटरे हे देखील अशा शापित गंधर्वांपैकीच एक होत.

२)…आमच्या या मित्राने कविता व कथा या क्षेत्रांतील आपला ठसा आपल्या वेगळेपणाने कायम राखलेला आहे. याची आमच्या मायमराठीतील धृतराष्ट्रकुळीच्या समीक्षकांना जाणीवही नसेल, पण झाडीबोली चळवळीतील सुजाण कार्यकर्त्याला लखनसिंह कटरे यांच्या प्रतिभेचे मोल आणि कर्तृत्वाचे बळ पुरते माहिती होऊन चुकले आहे, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही.

३)…लखनसिंह कटरे या व्यक्तिमत्त्वाच्या काव्यविषयक जाणिवा किती प्रगल्भ आहेत आणि हा कवी विशिष्ट आवर्तात गुंतून पडणारा नाही हे पुन्हा (त्यांच्या ‘प्रमेय’ व ‘जाणिवेतील कर्कदंश’) या काव्यसंग्रहांनी सांगून टाकले आहे. काहीशी गूढगुंजनात्मक आणि म्हणून सामान्य पातळीवरील वाचकांना अगम्य व दुर्बोध वाटणारी ही कविता लखनसिंह कटरे यांच्या उर्जस्वल शैलीचे द्योतक आहे असे स्पष्ट आढळून येते. 

४)…या ग्रामीण कथांनी झाडीपट्टीचे वास्तव लखनसिंह कटरे यांच्या डोळ्यातून पुनश्च चित्रबद्ध केलेले आहे. येथील निसर्ग, रीतिरिवाज, शेतीच्या पद्धती, मालक-नोकर संबंध या साऱ्यांचा एक प्रत्यक्ष आलेख या कथांमधून कटरे सादर करतात.  ….  ‘माजा नाव सुका’ ही ‘जागली’ या झाडीबोलीतील प्रातिनिधिक कथासंग्रहात आलेली कथा. संपूर्ण कथन पद्धतीसह झाडी वातावरण उभे करण्यास ही कथा समर्थ ठरली आहे. झाडीपट्टीतील (जीवन)पट आणि त्या पटामुळे निर्माण होणाऱ्या गमती सांगून लेखकाने या कथेला शेवटी वेगळी नजाकत आणली आहे, असे म्हणता येईल. 

५)…त्यांच्या … लेखनप्रपंचात … झाडीबोलीचा अधिक वापर आणि वावर होताना आपणाला दिसून येतो. त्यामुळेच या कथासंग्रहातील अर्ध्या कथांमध्ये कथाकाराने आवर्जून याच झाडीबोलीचा वापर केला आहे. झाडीबोलीतील ग्रामीण जीवनाचे यथातथ्य चित्रण करावयास ही झाडीबोली किती पोषक ठरू शकते याचे प्रत्यक्ष उदाहरण हवे असेल तर लखनसिंह कटरे यांच्या या कथा अभ्यासाव्यात, इतका त्यांनी या बोलीचा योग्यप्रकारे वापर आपल्या कथांमधील संवादात चपखलपणे करून घेतला आहे.

६)… झाडीबोलीवर या कथाकाराचे केवळ प्रेम आहे असे नाही तर विलक्षण प्रभुत्वदेखील आहे हे त्यांच्या या कथांमध्ये दिसून येते. प्रत्यक्ष झाडीबोलीचा वापर न करता आपल्या प्रमाण मराठीतील कथनामध्ये देखील झाडी शब्द पेरण्याची लखनसिंह कटरे यांची शैली या परिसरातील नवलेखकांना आदर्श म्हणून पुढे ठेवण्यास योग्य आहे, तेवढीच झाडीबोलीतील शब्द अवघ्या मराठी माणसासमक्ष सुनियोजितरित्या मांडून या शब्दांना मायमराठीच्या शब्दागारात प्रवेश मिळविण्याकरिता त्यांनी योजलेली ही युक्तीही स्तुत्य आणि अनुकरणीय आहे. गव्हाच्या शेतात सूर्यफुलाचेही काही दाणे टाकावेत आणि काही महिन्यांनी गव्हांच्यावर येऊन मोहक सूर्यफुलेच नजरेत भरावीत तशी लखनसिंह कटरे यांनी ग्रांथिक मराठीच्या पिकात केलेली ही झाडी शब्दांची पखरण मनाला आकर्षित करून जाते. 

७)… झाडीपट्टीची कथा केवळ मराठीच्याच नाही, तर वैश्विक साहित्याच्या आभाळात आपले आगळेवेगळे अस्तित्व राखून कशी आहे या करिता या कथासंग्रहातील (‘एकोणिसावा अध्याय’) या कथेचे उदाहरण पुढे केल्यास ते पर्याप्त ठरावे. 

८)… मळलेल्या वाटेने न जाता स्वतःची वेगळी पाऊलवाट निर्माण करण्याचे सामर्थ्य या कथाकाराच्या प्रतिभेत आहे याचे मंगलाचरण या संग्रहाने गायले आहे हे निर्विवाद. 

९)… लखनसिंह कटरे या शापित गंधर्वाचा अज्ञातवास संपून त्याला साहित्याच्या नंदनवनात आमच्या मराठी रसिकांनी आणि अभ्यासकांनी प्रवेश करायला आता तरी निमंत्रित करावे एवढीच नम्र प्रार्थना या प्रसंगाने करणे अप्रस्तुत होणार नाही. कथावेड्या मराठी मनाला एवढेच आवाहन आहे.
– डाॅ.हरिश्चंद्र बोरकर,
‘झाडीबोली’, रेंगेपार(कोहळी),
10 एप्रिल 2001


Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related posts

Saloni Arts : वृत्तपत्राच्या रद्दीपासून सुंदर कलाकृती…

संत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते ?

भेटीलागी जीवा…चा आनंद

Leave a Comment

श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406

Discover more from इये मराठीचिये नगरी

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading